माणूस दूध कधी व कसा पिऊ लागला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मायकेल मार्शल
- Role, बीबीसी फ्यूचर
प्रागैतिहासिक मानवाला किंवा आपल्या पूर्वजांना प्राण्यांचं दूध पचवण्याची ताकद पहिल्यापासून नव्हती.
पण आता जगातले बहुसंख्य लोक दूध पितात आणि पचवतात. उत्क्रांतीमध्ये नेमकं काय झालं की मनुष्यप्राणी दुग्धजन्य पदार्थ पचवायला शिकला?
डेअरी मिल्कला किंवा प्राणीज दुधाला आता स्पर्धा निर्माण झाली आहे. सोया किंवा बदामापासून आता 'दूध' निर्माण होतं आणि ते हळूहळू लोकप्रियही होत आहे. हे पर्याय बऱ्याचदा विगन फ्रेंडली मानले जात असल्याने ज्या लोकांना नेहमीच्या दुधाची अॅलर्जी आहे किंवा ज्यांना दूध पचत नाही अशांनाही ते घेता येतात. एका ब्रिटीश रिअॅलिटी शोमध्ये झळकलेल्या उद्योजकाने चक्क फ्लेवर्ड नट मिल्कचा व्यवसाय केला आणि यशस्वी करून दाखवला.
पण दुधाला पर्याय निर्माण झाल्याने मानवाचं प्राणीज दुधाशी असलेलं जुनं नातं संपलेलं नाही. उलट हे फक्त या नात्यातलं एक ताजं वळण आहे. कारण हे नातं तसं जुनं आहे. अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेलं आणि अनेक खाच-खळगे सोसत तरून गेलेलं.
तसं पाहायला गेलं तर दूध हे अगदी विचित्र पेय आहे. मनुष्याखेरीज कुठलाही प्राणी इतर प्राण्यांचं दूध पीत नाही. आपण पितो ते हे पेय गाय किंवा म्हैस तिच्या वासरांसाठी तयार करते. आपल्याला गाईचे सड दाबून ते काढून घ्यावे लागतं.
जगात अद्यापही अनेक संस्कृती अशा आहेत ज्यांना पशूंपासून मिळणारं दूध पिणं माहीत नाही. चीन हा महाकाय देश बराच काळ दुधापासून अपरिचित होता. चीनमध्ये दूध पिण्याला प्रोत्साहन देण्यासाठी 2000 साली देशव्यापी मोहीम उघडली होती.
दूध पिणं आरोग्यासाठी कसं चांगलं असतं हे पटवून देण्यासाठीची ही मोहीम अनेक वृद्ध चायनीज जनांच्या घशाखाली उतरत नव्हती. अगदी चीजसारखा पदार्थ जो अनेक नवनव्या डिशचा गाभा असतो तो खाऊनसुद्धा अनेक चिनी लोकांना कसंतरी होतं.

फोटो स्रोत, Getty Images
तीन लाख वर्षांचा मानवी उत्क्रांतीचा इतिहास लक्षात घेतला तर दूध पिणे ही तशी आपली अगदी नवी सवय मानावी लागेल. अगदी 10 हजार वर्षांपूर्वीचा मानव फार दूध पिणारा नव्हता. अगदी दुर्मीळ प्रसंगी दूध घेत असावा, असं इतिहास सांगतो.
पहिल्यांदा नियमितपणे दूध पिणारा माणूस हा शेतकरी असावा. पश्चिम युरोपातल्या पशुपालन करणाऱ्या जमाती म्हणजे गाईंसारख्या पाळीव जनावरांबरोबर राहणाऱ्या पहिल्या मानवी जातींपैकी एक असं मानलं जातं. आज उत्तर युरोप, उत्तर अमेरिका आणि जगभरातल्या अशा छोट्या-मोठ्या प्रदेशात दूध पिणं ही अगदी नेहमीची दैनंदिन सवय मानली जाते.
बाळाचं अन्न
प्राणीज दूध पिणं हे विचित्र आहे असं वर म्हटलं त्यामागे जैविक कारण आहे.
दुधात लॅक्टोस नावाची साखर असते. ही साखर इतर फळं किंवा कुठल्याही गोड पदार्थात सापडत नाही. आपण अगदी लहान असताना आईच्या दुधातलं लॅक्टोस पचवण्यासाठी लॅक्टेस नावाचं खास एंझाइम बाळांच्या शरीरात स्रवतं.
पण मूल मोठं झाल्यावर आणि दुधाखेरीज इतर अन्न पोटात जाऊ लागतं तेव्हा हे एन्झाइम स्रवणं बंद होतं. लॅक्टेसच्या अभावाने आपण दुधातलं लॅक्टोस व्यवस्थित पचवू शकत नाही.
त्यामुळे मोठ्या माणसाने बाळासारखं भसाभसा भरपूर दूध प्यायलं तर अनेक वेळा पोट बिघडण्याची, वात होऊन पोटदुखी होण्याची शक्यता असते. काहींना अतिदूधाने अतिसारही होतो.
(इथे हेही लक्षात घ्यायला हवं की, कुठल्याही इतर सस्तन प्राण्यांमध्ये लॅक्टेस म्हणजे दूध पचवण्याची शक्ती असणारी मोठी जनावरं नसतात. अगदी गाईलाही मोठं झाल्यावर ही दूध पचवायची स्पेशल क्षमता नसते. वयाने मोठ्या कुत्र्या-मांजरांनाही नसतेच.)

फोटो स्रोत, Getty Images
म्हणजे पहिल्या मानवाने प्राणीज दूध प्यायला सुरू केलं असेल तेव्हा त्याच्या पोटातून खालून-वरून किती आवाज आले असतील कल्पना करा. पण त्यानंतर उत्क्रांती होत गेली आणि मोठ्या वयातही लॅक्टेस एंझाइम स्रवू लागलं.
लॅक्टेस कायम राहिल्याने दूध घेतलं तरी ती पचवण्याची ताकद आली आणि त्याचे साइड इफेक्ट्स दिसले नाहीत. लॅक्टेस स्रवण्यास मदत करणारी जनुकं नियंत्रित करणाऱ्या मानवी डीएनच्या संरचनेत बदल झाला. म्हणून हे शक्य झालं.
"दक्षिण युरोपात साधारण 5000 वर्षांपूर्वी लॅक्टेस कायम राहण्याची संरचना झालेला मानव पहिल्यांदा दिसला. त्यातून मग 3000 वर्षांपूर्वी मध्य युरोपात तसे दाखले दिसतात", पॅरिसच्या म्युझियम ऑफ ह्युमनकाइंडमध्ये असिस्टंट प्रोफेसर असणाऱ्या लॉरी सेग्युरेल यांनी माहिती दिली. 2017 मध्ये रिव्ह्यू ऑफ द सायन्स ऑफ लॅक्टेस पर्सिंस्टन्स हा शोधनिबंध लिहिणाऱ्यांमध्ये ते एक होते.
लॅक्टेस परसिस्टन्स किंवा दूध पचवण्याची ताकद टिकवून असणारा मानव अनेक प्रजातींमध्ये दिसायला लागला. उत्तर युरोपातल्या 90 टक्के लोकसंख्येला दुधाहार पचतो. मध्यपूर्वेतले देश आणि आफ्रिकेतही हा बहुसंख्य लोकसंख्या लॅक्टेस पर्सिंस्टंट आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण जगात अजूनही काही ठिकाणच्या लोकांमध्ये लॅक्टेस पर्सिंस्टन्स दुर्मीळ आहे. आफ्रिकेतल्या काही जमातींमध्ये तसंच काही आशियायी देशांमध्ये आणि दक्षिण अमेरिकेत असे लोक दिसतात.
खरं तर जगभरात अशा ठराविक ठिकाणीच दूध पिण्याची सवय आणि म्हणून लॅक्टेस परसिस्टन्स का दिसते? मुळात दूध पिणं हे फायदेशीर आहे असं का आणि कुणी ठरवलं? सेग्युरेल प्रश्न उपस्थित करतात.
याचं सरळ उत्तर आहे की, दूध प्यायल्याने पोषकद्रव्य मिळतात. म्हणजेच मानवाला नव्या पोषकद्रव्याचा स्रोत उपलब्ध होतो जेणेकडून उपासपार टळेल, कुपोषण होणार नाही. पण खोलात जाऊन विचार केला तर दूध आहारात येण्याचं हे स्पष्टीकरण काही तर्कावर टिकणारं नाही.
सेग्युरेल स्पष्ट करतात, "अन्नाचे इतर अनेक स्रोत आहेत. पण ठराविक स्रोतापासून मिळणारं अन्नच महत्त्वाचं आणि तेही अशा विचित्र स्रोताकडून मिळणारं अन्न हे तत्कालीन मानवाला का वाटलं असावं? हे आश्चर्यकारक आहे."
लॅक्टेस नॉन पर्सिस्टंट असणारी म्हणजे दुधाहार न पचणारी माणसं थोड्या प्रमाणात लॅक्टोस पचवूच शकतात आणि दुधाचा कुठलाही दुष्परिणाम त्यांच्यावर होत नाही. त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात दूध पिणं हे ठीकच आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय दुधावर प्रक्रिया करून तयार झालेलं अन्न आहेच, म्हणजे दही, ताक, लोणी, चीज ज्यामध्ये लॅक्टोसचं प्रमाण कमी झालेलं असतं. चेदारसारखं हार्ड चीज असेल तर दुधाच्या 10 टक्क्यापेक्षा कमी प्रमाणात लॅक्टोस त्यात असतं.
तसंच लोणीसुद्धा कमी लॅक्टोसचा पर्याय आहे. घट्ट साय आणि लोणी यात सर्वात कमी लॅक्टोस असतं, असं सेग्युरेल सांगतात. पार्मिजियानो चीज हे लॅक्टोसची अॅलर्जी असणारेही खाऊ शकतात इतकं कमी लॅक्टोस त्यात असतं.
म्हणूनच कदाचित चीजनिर्मितीचा शोध त्या मानाने लवकर लागला असावा. सप्टेंबर 2018 मध्ये काही पुरातत्त्व शास्त्रज्ञांना आत्ताच्या क्रोएशियाच्या जागी काही खापराचे तुकडे सापडले. त्यामध्ये फॅटी अॅसिडचे अंश होते. याचा अर्थ दह्यातून पाणी काढून टाकण्यासाठी त्याचा वापर केलेला असावा, असा अंदाज आहे.
चीज बनवताना ही महत्त्वाची प्रक्रिया असते. आता हा तर्क खरा मानला तर 7200 वर्षांपूर्वी दक्षिण युरोपातले लोक चीज बनवू लागले होते. पण अर्थातच या खापराच्या तुकड्यावरून लावलेल्या तर्कावर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
पण अशाच प्रकारचे पुरावे युरोपात इतरत्रही पाहायला मिळाले आहेत. 6000 वर्षांपूर्वीचा ते इतिहास सांगतात. युरोपीयनांमध्ये लॅक्टोस टॉलरन्स यायच्या कितीतरी अगोदरचा हा काळ होता. म्हणजे तेव्हा लोक चीज बनवत होते हे निश्चित.

फोटो स्रोत, Getty Images
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन इथले जेनिटिक्सचे प्रोफेसर डल्लास स्वॅलो यांच्या मते, जगातल्या कुठल्या भागातल्या लोकांच्यात लॅक्टेस परसिस्टंट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे आणि कुठल्या भागात तो नाहीये याचा एक नेमका पॅटर्न दिसतो.
पशुपालन करणारे, गुराखी यांच्यामध्ये लॅक्टेस परसिस्टन्स दिसतो. याउलट शिकार करून गुजराण करणारे किंवा जे पशुपालन करत नाहीत त्यांच्याकडे ही दूध पचवण्याची ताकद राहिलेली नाही.
फॉरेस्ट गार्डनर्स म्हणून ओळखले जाणारे ज्यांनी सुरुवातीला झाडं लावायला, रोपं उगवायला आणि पर्यायाने शेती करायला सुरुवात केली पण ज्यांच्याकडे पशुधन नव्हतं त्यांच्यामध्येसुद्धा लॅक्टेस परसिस्टन्सचं प्रमाण कमी आहे.
ज्या जमातीच्या लोकांना पाळीव प्राण्यांचा सहवास मिळाला नव्हता त्यांना त्यांच्या दुधाची चवही माहीत नव्हती. त्यांच्यामध्ये उत्क्रांतीतला हा बदल होण्याचं काही कारणच नव्हतं.
पण मग फक्त ठराविक पशुपालकांमध्येच हा बदल होण्याचं कारण काय? इतर मानव प्रजातींमध्ये उत्क्रांतीदरम्यान हा बदल का झाला नाही?
सेग्युरेल याविषयी सांगतात. पूर्व आशियायी प्रदेशात पशुपालन करणारे लोकांच्यात लॅक्टेस परसिस्टन्स अगदी अल्प प्रमाणात दिसतो. विशेषतः मंगोलिया आणि आसपासच्या प्रांतात जिथे प्राणीज दुधावर त्यांच्या आहाराचा बऱ्यापैकी भर असतो तरीही त्यांच्यात लॅक्टोस पचवण्याची क्षमता कमीच कशी राहिली? जीन्स म्युटेशन युरोप आणि पश्चिम आशियात होत असताना हे लोक वेगळे कसे राहिले? त्यांच्या पिढ्यांमध्ये हा बदल उतरला नाही हे खरं आणि त एक कोडंच आहे, असं सेग्युरेल यांचं म्हणणं आहे.
दुधाचे फायदे
दुधात असणाऱ्या पोषकद्रव्यांसाठी तर आहेच पण दूध पिण्याचे इतरही फायदे असावेत.
सेग्युरेल यांच्या मते, दुधाचे इतर फायदेही असावेत म्हणूनच त्याकडे या दृष्टीने पाहिले पाहिजे. पशुपालन करणारी माणसं सर्वसाधारणपणे जनावरांपासून होणाऱ्या संसर्गांना सामोरे जात असतात.

फोटो स्रोत, Getty Images
अँथ्रॅक्स आणि क्रिप्टोस्पॉरिडिऑसिससारखे आजार या अशा संसर्गांतून होऊ शकतात. कदाचित प्राण्यांचं दूध प्यायल्याने या आजारांविरोधातल्या अँटिबॉडीज शरीरात तयार व्हायला मदत होत असावी. आईच्या दुधापासून तान्ह्या बाळांचं संरक्षण कसं होतं हे तर सर्वमान्य आहेच. तोच तर्क इथेही लावता येईल.
पण तरीही फक्त ठराविक लोकांमध्येच लॅक्टेस परसिस्टन्स निर्माण होण्यामागचं कारण पूर्णपणे उलगडच नाहीच. एखादी मेंढपाळ आणि गुराख्यांची जमात म्युटेशनची संधीच मिळाली नाही म्हणून उत्क्रांतीमध्ये मागे राहू शकते.
अगदी अलिकडच्या काळापर्यंत अशा प्रकारे लॅक्टेस परसिस्टन्स नसलेली माणसं जगात कमीच राहिलेली आहेत. त्यामुळे हे गट किंवा जमाती केवळ दुर्भाग्य म्हणूनच मागे राहिली असंच म्हणता येईल.
"तुमची जीवनशैली पशुपालनाशी संबंधित असेल तर हा बदल सुसंगत आणि पूरक वाटतो. पण तरीही तुम्ही काय करता हे ठरवण्याअगोदर उत्क्रांतीत म्युटेशन होणं आवश्यक आहेच. नाहीतर त्या जीवनपद्धतीच्या निवडीने काहीच साध्य होऊ शकणार नाही", असं प्रोफेसर स्वॅलो सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
मंगोलियन गुराख्यांच्या बाबतीत ते दूध पितात पण फरमेंटेड म्हणजे आंबवलेलं, ज्यामध्ये लॅक्टोसचं प्रमाण अत्यल्प असतं, स्वॅलो आठवण करून देतात. आता या तर्काच्या बाजूने विचार केला तर जेनेटिक म्युटेशन आणखी कोड्यात टाकणारं ठरतं.
दूध पचवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणं जर इतकं सुलभ असेल आणि अशा प्रकारे अन्नप्रक्रिया एका संस्कृतीतून दुसरीकडे जाणं काही फार अवघड नाही. इतर लोक पचायला हलके दुग्धजन्य पदार्थ सहज बनवू शकतात.
मग दूध पचवायला थेट जेनेटिक म्युटेशन व्हायची गरज का निर्माण झाली असावी? हा प्रश्न प्रा.स्वॅलो यांची पीएचडीची विद्यार्थिनी कॅथरिन वॉकर उपस्थित करतात.
लॅक्टेस परसिस्टन्स निर्माण होण्यामागे केवळ एकच एक कारण नसणार हे निश्चित. प्रा. स्वॅलो यांच्या म्हणण्याप्रमाणे दुधात असणारी पोषकद्रव्य ते पिण्याकडे कल वाढवणारी आहेत. स्निग्धता, प्रथिने, साखर आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखी सूक्ष्मपोषकद्रव्यं असल्याने दूध हा पूर्णाहार ठरू शकतो.
शिवाय शरीरातली पाण्याची उणीव भरून काढण्याचं कामही दूध करू शकतं. स्वच्छ पाण्याचा स्रोत म्हणूनही दुधाकडे बघणारे काही समाज आणि संस्कृती आजही आहेत. तुम्ही कुठल्या समाजात वावरता, जीवनपद्धती काय, भौगोलिक स्थान काय यावरून तुमच्यात दूध पचवायची ताकद देणारे एंझाइम का स्रवत राहतंय याचं कारण ठरतं.
लॅक्टेस परसिस्टन्स हा मानवी उत्क्रांतीतला टप्पा आहे की नाही हेसुद्धा खरं तर पुरेसं स्पष्ट नाही. कारण ही उत्क्रांतीची प्रक्रिया असेल तर लॅक्टेस परसिस्टन्स अजूनही अधिकाधिक प्रमाणात पसरू शकतो, असं स्वॅलो म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
प्रा. स्वॅलो यांनी इतर काही मंडळींबरोबर मेंढपाळ, पशुपालांचा एक अभ्यास केला आणि २०१८ मध्ये तो मांडला. चिलीमधल्या कोकिम्बो नावाच्या प्रांतातल्या गुराख्यांविषयी हे संशोधन होतं.
या जमातीला दूध पचवायची क्षमता तुलनेने नव्यानेच निर्माण झाली. ५०० वर्षांपूर्वी यांच्यातल्या काहींनी तिथे नव्याने आलेल्या युरोपीयन समाजातल्या लोकांबरोबर सोयरिक केली आणि या आंतरसंस्कृती संबंधांतून नव्या पिढीपर्यंत लॅक्टेस परसिस्टन्स पोहोचलं.
जे उत्तर युरोपात 5000 वर्षांपूर्वी झालं असावं ते इथे चिलीमध्ये पाचशे वर्षांपूर्वी झालं, असं या अभ्यासात मांडण्यात आलं आहे.
पण हे दुर्मीळ उदाहरण असू शकतं. कारण ही कोकिम्बो जमात दुधावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जगभरात याच एका उदाहेरणातून याचा विचार करता येणार नाही.
"ज्या देशांमध्ये लोकांचा आहार आणि जीवनपद्धती दुधावर अवलंबून आहे आणि जिथे अन्य अन्नद्रव्यांचा अभाव आहे तिथे हा उत्क्रांतीचा तर्क खरा ठरला असावा.
पाश्चिमात्य देशात भरपूर परिपूर्ण अन्नधान्य उपलब्ध असल्याने ठराविकच अन्न घेण्याचं कारण नसावं. त्यामुळे तिथे हा निष्कर्ष लागू होत नाही."
दुधाकडे पाठ?
दूध आणि ते पचवण्याची ताकद थेट उत्क्रांतीवादाशी जोडत आपण बोलत असलो तरी गेल्या काही वर्षांपासून वेगळाच ट्रेंड दिसतो. लोक दूध पिणं सोडू लागले आहेत.
नोव्हेंबर 2018 मध्ये द गार्डियन या वृत्तपत्राने एक बातमी प्रसिद्ध केली होती. ओट्स मिल्क आणि नटमिल्क विकणाऱ्या कंपन्या वाढत आहेत आणि त्यामुळे पारंपरिक दुग्धव्यवसायाला धोका निर्माण झाला आहे, अशा अर्थाचा त्या बातमीचा मथळा होता.

फोटो स्रोत, Getty Images
आकडेवारी वेगळीच कथा सांगते. 2018 च्या IFCN डेअरी रिसर्च नेटवर्कच्या आकडेवारीनुसार 1998 पासून जगभरात मागणी वाढल्याने दूध उत्पादन सतत वाढतच आहे. 2017 मध्ये जगभरात 86.4 कोटी टन दुधाचं उत्पादन झालं.
दूध उत्पादनाचे जागतिक आकडे वाढतच आहेत. IFCN च्या अंदाजाने दुधाची मागणीही वाढत जाणार आहे. 2030 सालापर्यंत ती आतापेक्षा 35 टक्क्यांनी वाढलेली असेल आणि त्या वेळी 116.8 कोटी टन दुधाची गरज जगाला असेल.
हा जगभरातला डेटा झाला. पण काही ठराविक देशातली स्थानिक आकडेवारी थोडं वेगळं तथ्य सांगणारी आहे. 2010 मध्ये अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणानुसार तिथे दूध पिण्याचं प्रमाण गेल्या काही दशकांपासून कमी होत आहे.
अर्थात पारंपरिक दुधाची जागा बदामाचं दूध घेतंय असं नाही तर एअरेटेड ड्रिंक्स लोक जास्त घेऊ लागले आहेत. अमेरिकेत दुधाला मागणी कमी होत असली तरी त्याचा समतोल साधायला विकसनशील जगातून दुधाला वाढती मागणी आहे. विशेषतः आशियातून दूध घेण्याचं प्रमाण वाढत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, 2015मध्ये 187 देशांत दूध पिण्याच्या सवयीबाबत सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना नियमित दूध घ्यायची सवय आहे. तरुणांना ते विशेष रुचत नाही. पण तरुण योगर्टसारखे दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर खातात याविषयी या सर्व्हेमध्ये वेगळं काही म्हटलेलं नाही.
पुढच्या काही दशकांत तरी प्राणीज दुधाला पर्याय म्हणून समोर आलेले दुधाचे प्रकार जगभरातल्या दूध उत्पादनावर काही परिणाम करेल असं वाटत नाही.
प्राणीज दुधाला जसाच्या तसा पर्याय म्हणून हे अन्य दूध पाहिलं जात नाही. या दुधामध्ये तशी पोषद्रव्यं नसतात. ज्या लोकांना दुधाची अॅलर्जी आहे किंवा जे व्हिगन आहेत त्यांच्यापुरतेच हे पर्याय उपयुक्त आहेत. दुधाची अॅलर्जी असणाऱ्या लोकांचा लॅक्टोस इनटॉलरन्सशी संबंध असतोच असं नाही. त्यांना दुधातल्या प्रोटीन्सची अॅलर्जी असते.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशियातून दुधाची मागणी वाढत आहे आणि तिथल्याच लोकांमध्ये लॅक्टेस परसिस्टन्स नाही. हे विचित्र आहे.
आशियातल्या (विशेषतः पूर्व आशिया) लोकांना दुधामध्ये एवढे फायदे दिसत आहेत की ते पचताना होणाऱ्या अडचणींकडे ते दुर्लक्ष करताना दिसतात. दुधावर प्रक्रिया करून त्यातल्यचा लॅक्टोसचं प्रमाण कमी करण्याची गरजही त्यांना फार वाटत नाही.
युनायटेड नेशन्स फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने विकसनशील देशांत अपारंपरिक दुभती जनावरे पाळावीत यासाठी प्रचार सुरू केला आहे. म्हणजे गाई-गुरांखेरीज अन्य दुभती जनावरं (उदाहरणार्थ मेंढीसारखा दिसणारा लामा हा प्राणी) जिथे उपलब्ध असतील त्याचं दूध प्यावं. ते त्यांच्यासाठी सहज उपलब्ध असेल आणि महागही नसेल.
गेल्या जानेवारीत आणखी एक आहारासंदर्भातला शोधनिबंध प्रसिद्ध झाला. प्लॅनेटरी हेल्थ डाएट नावाच्या या निबंधात माणसाने आपाला आहार आरोग्यपूर्ण आणि पर्यावरणाची कमीत कमी हानी करणारा कसा ठेवावा याविषयी संशोधन होतं. लाल मांस आणि इतर प्राणीज उत्पादनं कमी प्रमाणात सेवन करावीत असं यात म्हटलं असलं तरी किमान एक ग्लास दूध दररोज प्यावंच असाही आग्रह यात होता.
थोडक्यात, दुग्धपुराण संपणारं नाही. ही दुधाची गंगा वाहती राहणार आहे हे निश्चित. त्याला प्रतिसाद देणारे बदल करणं आपल्या शरीराने थांबवलं तरीही दूध थांबणार नाही, हेच यातून स्पष्ट होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








