महिलांमधील लैंगिक नपुंसकत्व कसं ओळखायचं? त्यावर उपचार काय?

महिला आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, क्रिस्टिन मार्टिन्स
    • Role, बीबीसी न्यूज ब्राझील

फिमेल सेक्शुअल डिसफंक्शन ज्याला सामान्यतः महिलांमधील नपुंसकत्व (लैंगिक क्रियांमध्ये अडथळा, प्रतिसाद देण्यात बिघाड) असं म्हटलं जातं ही संकल्पना वरवर पाहाता सोपी वाटू शकते. पण ते तसं नाही.

महिलेने आपल्याला कितीवेळा लैंगिक तृप्तीचा अनुभव आला, किंवा स्वतःबरोबरच किंवा इतर कोणाशी

लैंगिक क्रीडा करताना आनंद किंवा वेदना जाणवल्या हा प्रश्न स्वतःलाच विचारला की संपलं असं वाटू

शकतं. परंतु याचं उत्तर नाही असं आलं तर मात्र हा विषय गुंतागुंतीचा आहे हे लक्षात येतं.

10 पैकी 4 प्रौढ महिलांना लैंगिक इच्छेची कमतरता, लैंगिक सुखात परमोच्च बिंदू मिळण्यात अडथळा, लैंगिक क्रीडेवेळी वेदना अशा त्रासांना सामोरे जावं लागतं असे तज्ज्ञ सांगतात.

पण त्यातल्या अनेक महिलांना आपल्याला ही समस्या आहे तिची काही कारणं आहेत आणि त्यावर उपायही शक्य आहेत याची जाणिव नसते.

लैंगिक क्रियेमागे दोन घटक असतात. पुनरुत्पादन आणि आनंद मिळवणे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात असं ब्राझिलियन फेडरेशन ऑफ गायनेकॉलॉजी अँड ऑस्बेस्ट्रिक्स असोसिएशनच्या ल्युसिया आल्वेस लारा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

आजवरच्या इतिहासात अनेक संशोधकांनी स्त्रीचं शरीर या ‘आनंद मिळवण्याच्या कृतीला’ कसं लैंगिक प्रतिसाद देतं याचा अभ्यास केला आहे. यामध्ये स्रीरोगतज्ज्ञ विल्यम मास्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ व्हर्जिनिया जॉन्सन यांचा समावेश होतो.

1960 च्या दशकांत या दोघांनी स्त्री आणि पुरुषांचा लैंगिकतेच्या बाबतीतील प्रतिसादाचा मानसशास्त्रीय आणि शरीररचनाशास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला आणि नंतर लैंगिक अकार्यक्षमतेवर (नपुंसकतेवर) उपचारांचा विचार केला.

महिला आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

मास्टर आणि जॉन्सन यांनी लैंगिक प्रतिसाद देण्याच्या भावनेवर अभ्यास केल्यानंतर अनेक वर्षांनंतर हेलन सिंगर काप्लान यांनी त्यावर अभ्यास केला. तोपर्यंत मधला काळ त्यावर फारसा अभ्यास झाला नव्हता.

त्यानंतर थेट 2001मध्ये कॅनडाचे मानसोपचारतज्ज्ञ रोझमेरी बॅसन यांनी स्त्रियांच्या लैंगिक क्रीडेतील प्रतिसादावर आणि इंटिमसी म्हणजे भावनिक-शारीरिक जवळीक सलगीवरही अभ्यास केला. त्यातून त्यांनी महिलांच्या लैंगिक प्रतिसादावर आधारीत मॉडेल तयार केले.

जसे पुरुषांच्या लैंगिक क्रीडेतील प्रतिसादाचे सुरुवात, मध्यांतर, शेवट असे टप्पे असतात तसे बॅसन यांनी महिलांच्या लैंगिक प्रतिसादाचे गोलाकार मॉडेल मांडले. त्यात स्त्री शरीरसुखाची भावना असताना नसतानाही जोडीदाराबरोबर जवळ असताना, मग उत्तेजित होताना, मग संभोगावस्थेत जाताना, मग परमोच्चसुखाच्या टप्प्यात जाताना असे टप्पे आहेत, अशी माहिती ल्युसिया लारा यांनी दिली.

महिला आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

आतापर्यंतच्या शास्त्रीय अभ्यासानुसार स्त्रीच्या लैंगिक प्रतिसाद चक्रामध्ये भावनिक जवळीकता, लैंगिक तटस्थता, लैंगिक उत्तेजना, उत्स्फूर्त लैंगिक इच्छा, प्रतिसादात्मक इच्छा आणि लैंगिक उत्तेजना आणि भावनिक आणि शारीरिक समाधान यांचा समावेश होतो.

हे सर्व तीन प्रमुख टप्प्यांशी जोडलेले आहेत, ते सगळे एकाच वेळी होऊ शकतात. लैंगिकसुखाची इच्छा होणे, उत्तेजित होणं आणि शारीरसुखाचा परमोच्चबिंदू हे ते तीन टप्पे आहेत.

आता यामध्ये डिसफंक्शन म्हणजे लैंगिक क्रीडेबद्दल अनास्था किंवा कोरडेपणा कधी येतो असं विचारलं तर त्याचं एकच असं उत्तर नाही. अशी अवस्था कधी, केव्हा, कितीवेळ येईल हे सांगता येत नाही. स्त्रिया स्वतःचे निरीक्षण करुन ते ठरवू शकतात. ल्युसिया लारा यांच्यामते 52 टक्केवेळा या अवस्थेचं कारण मानसिक घटकांमुळे असतं तर 48 टक्के कारण हे जैविक घटकांमुळे असतं.

फिमेल सेक्शुअल डिसफंक्शन कसं ओळखायचं?

लैंगिकसुखाची इच्छा कमी होणं हे महिलांमध्ये बऱ्याचदा दिसतं. आणि काहीतरी चुकलंय हे समजत असतं पण त्याची कारणं शोधली जात नाहीत.

ही अवस्था येण्याची वेळ, तिची वारंवारिता आणि ती किती तीव्र पातळीची आहे हीसुद्धा स्त्रियांमधील लैंगिक डिसफंक्शन ओळखण्याची महत्त्वाची चिन्हे आहेत. त्यासाठी ही सर्व स्थिती किती काळ चालते आणि कितीवेळा येतेय याचा विचार करता येईल.

प्रत्येक स्त्री मध्ये ही चिन्हं वेगवेगळी असू शकतात. एखादा घटक एका महिलेसाठी त्रासदायक असेल तर तो दुसऱ्या महिलेसाठीही त्रासदायक ठरू शकतो असं नसतं.

महिला आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

काहीवेळेस फक्त लक्षणांवरुन उपचार करता येतात. मात्र त्यामागची कारणं ओळखली तर त्यावर उपचार करणं चांगल्या पद्धतीनं शक्य आहे. उपचारांमध्ये डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश असतो.

तज्ज्ञांच्यामते स्त्रियांमधील सेक्शुअल डिसफंक्शन पुढील कारणांमुळे येते

  • इच्छा (अतिक्रियाशील लैंगिक इच्छा विकार)
  • उत्तेजना (स्त्रियांच्या लैंगिक उत्तेजनेंत बिघाड)
  • भावनोत्कटता (स्त्री संभोगातील बिघाड)
  • वेदना (स्त्री जननेंद्रिय-पेल्विक अवयवांतील वेदनांमुळे झालेला बिघाड)

1) अतिक्रियाशील लैंगिक इच्छा विकार

लैंगिक इच्छा म्हणजे सेक्स करणे असा अर्थ घेतला जात असला तरी स्त्रियांचा विचार केला असता त्यात दोन भाग येतात. ते म्हणजे उत्स्फूर्तता आणि प्रतिसाद.

पहिल्या गोष्टीचा विचार केला तर ती स्थिती साध्या उत्तेजनेमुळे येते. जसं की एखाद्या व्यक्तीला पाहिलं आणि त्यानंतर तिच्याशी संभाषण किंवा पुढील शारीरिक जवळीक प्रस्थापित केली अशाप्रकारे. न्यूट्रल अवस्थेपासून स्त्री लैंगिक प्रतिसाद आणि नंतर उत्कट अवस्थेपर्यंत जाते तो हा भाग.

महिलांमधील लैंगिक नपुंसकत्वः कसं ओळखायचं आणि त्यावर उपचार काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

यातील प्रतिसादाचा टप्पा थोडा किंवा पूर्णपणे नाहीसा झाला तर त्याला स्त्रियांमधील डिसफंक्शन असं तज्ज्ञ संबोधतात. हे सतत घडू शकतं किंवा कधीतरीच घडू शकतं.

या विकाराचे निदान करण्यासाठी स्त्रिला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लैंगिक इच्छा कमी झाल्याचं जाणवत असेल आणि तो होतोय हे तिला समजत असलं पाहिजे. अन्यथा त्याला विकार असं संबोधलं जात नाही.

यावर एकच विशिष्ट असा उपचार नसतो. कारण ते औषधांचे प्रतिकूल परिणाम, मानसिक आरोग्य समस्या आणि हायपोथायरॉईडीझम यावर अवलंबून असते. हे स्त्रियांमध्ये वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक रुग्णानुसार ते बदलते. रुग्णाची पूर्ण तपासणी करुन तिच्या जोडीदाराशी असलेले तिचे संबंध तसेच सर्व घटकांचा विचार करुन डॉक्टर औषधं देत असतात.

2) स्त्रियांच्या लैंगिक उत्तेजनेतील बिघाड

लैंगिक सुखाची भावना म्हणजे लैंगिक उत्तेजन. हे योनीजवळ अनुभवलं जातं. या स्थितीमध्ये योनीजवळच्या भागामध्ये रक्तप्रवाह वाढतो. तो भाग फुगतो आणि योनीमध्ये ओलसर असा कामसलील निर्माण होतो.

परंतु या उत्तेजनात बिघाड निर्माण झाला तर तसा कामसलील निर्माण होण्यात आणि लैंगिक उत्तेजन मिळण्यात अडथळे येतात. त्यांच्यामध्ये पूर्ण लैंगिक उद्दिपनानंतरही लैंगिक इच्छा थोडी किंवा पूर्ण कमी

झाल्याचं दिसतं. यामागे अनेक शारीरिक मानसिक कारणं तसेच एखादा मानसिक धक्का, छळ, हिंसा अशी कारणं असू शकतात.

3) भावनोत्कटतेमध्ये बिघाड

लैंगिक भावनोत्कटता ही स्त्रियाच्या लिंगाशी जोडलेली असते. अनेक नसांची मुळं तिथं जोडलेली असतात. क्लिटोरिस म्हणजे मदनध्वजाला 8000 नसांची मुळं संलग्न असतात. ही संख्या पुरुषांच्या लिंगाशी जोडलेल्या नसांच्या दुप्पट आहे.

या बिघाडात लैंगिक उद्दिपनानंतरही इप्सित कामोत्तेजन साधण्यात अडथळा येतो. त्याला anorgasmia असं म्हणतात. डॉक्टर सर्वप्रथम त्याची कारणं शोधतात मगच उपचार करतात.

लैंगिक विकारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ फर्नांडा बोनाटो सांगतात, "स्त्रियांमधील सेक्शुअल डिसफंक्शनचा विचार करताना अभ्यासकांचं अजूनही एका विशिष्ट कारणावर एकमत झालेलं नाही."

महिलांमधील लैंगिक नपुंसकत्वः कसं ओळखायचं आणि त्यावर उपचार काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

बोनाटो सांगतात, "लिंगशिक्षण आणि लैंगिकता शिक्षण यावर अनेक गैरसमज आहेत. अज्ञानामुळे अनेक अनैतिक गोष्टी तसेच बेकायदेशीर गोष्टी घडत राहातात. शाळांमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये, कुटुंबात अनेक स्त्रियांना हे शिक्षण मिळत नाही. लैंगिकतेवर आपण मौनच बाळगतो."

"कधीकधी महिलांना याबाबतची माहिती मिळते पण ती अशी काही आज्ञांच्या स्वरुपात असते जसं की लग्नाआधी सेक्स करु नको, गरोदर राहू नको, कोणाशीच सेक्स करू नको अशा नकारात्मक गोष्टींपुरती त्यांना माहिती मिळालेली असते.

स्वतःच्या शरीराचं ज्ञान नसल्यामुळे अनेक महिलांना सुख कसं मिळवायचं कुठे मिळवायचं यापासून वंचित राहातात आणि सेक्शुअल डिसफंक्शनसारख्या त्रासालाही सामोऱ्या जातात."

4) जननेंद्रिय आणि ओटीपोटातील वेदनांमुळे होणारा त्रास

ही स्थिती साधारणतः ज्या महिलांना संभोगावेळी पुरुषाचे लिंग आत गेल्यावर अपिरिमित वेदना होतात किंवा त्यांना या वेदनांमुळे संभोगच शक्य होत नाही त्यांच्यासाठी येते.

यामध्ये कधीकधी संभोगाच्या सुरुवातीला वेदना होतात तसेच पुरुष लिंगाची हालचाल होते तशा वेदना होऊ लागतात.

या वेदनांसाठी कामसलील पुरेसा स्रवलेला नसणं, संसर्ग तसेच मूत्रमार्गाचा संसर्ग कारणीभूत असू शकतो.

पुरुषलिंग गर्भाशयाला स्पर्श करतं तेव्हाही या वेदना होतात.

कधीकधी योनीजवळील स्नायू योग्यप्रकारे प्रसरण न पावल्याने आणि अनावश्यक आकुंचित पावल्याने त्रास होतो आणि संभोगाचा सुयोग्य आनंद घेण्यात अडथळा येतो. यासाठी शारीरिक, मानसिक घटक कारणीभूत असू शकतात. तसेच शोषण, आघात, बाळंतपण अशा प्रसंगानंतर ही स्थिती येऊ शकते. स्त्रीरोगतज्ज्ञांकडून याचे निदान व उपचार करुन घेता येतील.

काहीवेळेस योनीच्या सुरुवातीच्या वरील भागात प्रचंड वेदना होतात. यामागे काही आजार कारणीभूत असू शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे.

महिलांमधील लैंगिक नपुंसकत्वः कसं ओळखायचं आणि त्यावर उपचार काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मानवी लैंगिक कार्यासंदर्भातील आजारांवरती सेक्सोलॉजिस्ट उपचार करतात, तसेच मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत लागते.

रोगाचे निदान आणि उपचारांसाठी ते रुग्णाच्या आरोग्याची आणि आजवरच्या आजारांच्या इतिहासाची माहिती ते घेतात, त्यानुसार काही चाचण्या करतात आणि आवश्यकता असेल तर योग्य त्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही देतात.

स्त्रियांचे लैंगिक आरोग्य बिघडण्यासाठी काही औषधांचही भूमिका असते. वजन कमी करण्यासाठी घेतलेली औषधे, थायरॉईडवरील औषधे, अँटिडिप्रेसंट्स, गर्भनिरोधक गोळ्या यांचाही परिणाम होतो. नैराश्य, चिंतारोग, उच्च रक्तदाब, मधुमेहासारखी स्थितीही यामध्ये भर घालते.

"मधुमेह अनियंत्रित असल्यास व्यत्यय आणू शकतो, ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढणे, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, कोलेस्टेरॉलमधील बदल यामुळे स्त्री-पुरुष जननेंद्रियांचे रक्तवहिन्यामध्येही बदल होऊ शकतो. आणि लैंगिक उत्तेजनाच्या जाणिवेमध्ये देखील बदल होतात, कारण हे रक्तवहिन्यासंबंधीचे नुकसान मध्यवर्ती भागात होऊ शकते. मज्जासंस्था तसेच, थायरॉईड रोग (थायरॉईड विकार) देखील व्यत्यय आणू शकतात",असं तज्ज्ञ म्हणतात.

इतर शक्यतांमध्ये मनोवैज्ञानिक समस्या, आर्थिक समस्या, अपमानास्पद संबंध, स्वतःच्या शरीराची माहिती नसणे, लैंगिक शोषणाचा इतिहास, आघात, हार्मोन्समधील महत्त्वपूर्ण बदल, गर्भधारणा, क्लायमॅक्टेरिकशी जवळीक, अल्कोहोल आणि इतर औषधे वापरणे आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश होतो. कौटुंबिक दडपशाही, सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणेही परिणाम करत असतात.

(कोणत्याही आजाराचे निदान आणि उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करुन घ्यावेत, स्वतःच निदान करुन औषधं घेणं धोकादायक ठरू शकतं.)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)