साप चावण्याआधी काय इशारा देतो? कोणता आवाज काढतो आणि पावसाळ्यात तो जास्त का चावतो?

साप

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पारस झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

7 सप्टेंबर 2023 ला मध्यरात्री गोकुळाष्टमी साजरी होत होती. त्याचवेळी 17-वर्षांचा विपुल गुजरातमधल्या सुरेंद्रनगरच्या माफ्तीपारामधल्या आपल्या घरात झोपला होता.

अचानक त्याला वाटलं की त्याच्या हाताला कसलातरी स्पर्श होतोय. तो झोपेतून जागा झाला. पण हातातलं कडं असेल असं वाटून त्याने दुर्लक्ष केलं आणि तो परत झोपी गेला. पण काही वेळाने त्याच्या आईला विपुलच्या बेडवर साप दिसला.

त्यांनी ओरडून सगळ्यांना बोलावलं. विपुलला दवाखान्यात आणेपर्यंत अडीच-तीन तास गेले. सर्पदंशाचे उपचार मिळाल्यानंतर काही वेळातच विपुलचा मृत्यू झाला.

भारतात पावसळ्यात सर्पदंशाच्या अनेक घटना पाहायला मिळतात, विशेषतः ग्रामीण भागात. सर्पदंशावर वेळेवर उपचार मिळाले नाही तर माणसाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.

पावसाळ्यातच सर्पदंशाच्या घटना का वाढतात याचं कारण सांगताना तज्ज्ञ म्हणतात की यावेळी शेतीची कामं वाढलेली असतात आणि याच काळात साप अंडी घालतात तसंच घोणससारखे साप पिल्लांना जन्म देतात.

भारतात सापांच्या शेकडो जाती आहेत, पण त्यातले फक्त चार साप माणसाचा जीव घेऊ शकण्याइतके विषारी असतात.

अर्थात सर्पदंशांनंतर ताबडतोब उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. पण यात एक मिनिटाचाही उशीर नको.

तज्ज्ञांना असंही वाटतं की मानवी आणि सापांच्या वागणुकीचा नीट अभ्यास केला तर सर्पदंश टाळता येऊ शकतात.

भारतात सापडणारे विषारी साप कोणते? त्यांना कसं ओळखावं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सर्पदंशामुळे भारतात होणाऱ्या मृत्युंपैकी बहुतांश मृत्यू हे चार प्रकारचे विषारी साप चावल्याने होतात.

ते चार साप म्हणजे नाग, घोणस, फुरसं आणि मण्यार.

मण्यार

मण्यार भारतातल्या चार मुख्य विषारी सापांपैकी एक आहे. याच्या काही उपजातीही आहेत. त्यापैकी तीन उपजाती भारतात सापडतात. या सापाला इंग्लिशमध्ये इंडियन क्रेट असं म्हणतात.

मण्यारच्या काही उपजातीही आहेत. त्यापैकी साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार आणि काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात.

मण्यारच्या आणखी 10 उपजाती आहेत आणि त्यांचा अन्य आग्नेय आशियायी देशांमध्ये वावर आहे.

भारतात साधा मण्यार जास्त आढळतो. त्याचा वावर जंगलात असतो. गडद निळ्या रंगाच्या या सापाच्या अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीपासून डोक्यापर्यंत कमी कमी होत जातात. मण्यार साधारण दीड मीटर लांब असतो. हा मुख्यत्वे निशाचर साप आहे. अन्न आणि गारव्याच्या शोधात तो अनेकदा मानवी घरात शिरल्याचं आढळतं.

घोणस

हा अत्यंत विषारी साप आहे. हा दिसायला अजगरासारखा दिसत असल्याने लोकांचा गैरसमज होतो. घोणस ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावर साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात.

घोणस हिरवा, पिवळा, करडा अशा रंगामध्ये आढळतात. याचं तोंड बेडकासारखं असतं आणि हा तोंडाने कू असा कोंबडीच्या पिल्लांसारखा आवाज काढतो.

या सापाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची मादी आपली अंडी पोटातच उबवते आणि पिल्लं त्यातून बाहेर आली की पोटातून बाहेर काढते.

याला इंग्लिशमध्ये रसेल व्हायपर असं नाव आहे.

नाग

फोटो स्रोत, Getty Images

फुरसे

फुरसे जातीचे साप भारतात सगळीकडे आढळतात. याचा रंग फिकट पिवळा, तपकिरी किंवा वाळूसारखा असतो. या सापाच्या पाठीवर पांढरटसर रंगाच्या रेषा असतात. हा आकाराने लहान असला तरी याचं विष घातक असतं.

असं म्हणतात की सर्पदंशाने भारतात सर्वाधिक मृत्यू या सापामुळे होतात.

याला इंग्लिशमध्ये सॉ-स्केल्ड व्हायपर असं म्हणतात.

नाग

भारतात आढळणारे नाग कोब्रा प्रजातीचा एक भाग आहेत. त्यांना एशियन कोब्रा असंही म्हटलं जातं. या नागांचं वैशिष्ट्य म्हणजे ते मोठा फणा काढू शकतात.

गडद तपकिरी, काळा किंवा काळसर हिरवा अशा रंगांमध्ये हे नाग आढळतात.

भारतातल्या चार विषारी सापांच्या प्रजातीत याचा समावेश होतो. नाग हिंदू धर्मात पूजनीय आहेत.

साप कधी चावतो?

धर्मेंद्र त्रिवेदी गांधीनगरमधले सर्पमित्र आहेत. ते मानवी वस्त्यांमधून साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचं काम करतात. गेल्या 38 वर्षांपासून ते सापांबद्दल जनजागृती पसरवण्याचं काम करत आहेत.

ते म्हणतात, “आपण सापांना घाबरायला नको कारण ते आपल्याला घाबरतात. इतकंच नाही तर आपण काळजी घेतली आणि सापांच्या सवयी लक्षात घेतल्या तर सर्पदंशाचा धोकाही कमी होतो.”

ते पुढे म्हणतात की, “विष सापांसाठी शिकार करण्याचं हत्यार आहे. यामुळे ते आपलं भक्ष्य मिळवतात. त्यामुळे ते आपलं विष फार सांभाळून वापरतात. साप माणसाला तेव्हाच चावतो जेव्हा त्याला निसटण्याचा दुसरा काहीही पर्याय सापडत नाही. सापाशी उगाच खेळायला जाऊ नका आणि जर तुम्ही साप समोर असल्यावर न घाबरता काही हालचाल केली नाही तर तो तुमच्या पायांमधून शांतपणे निघून जाईल.”

ते असंही म्हणतात की, “हिवाळ्यात साप लपतात आणि पूर्ण हिवाळाभर झोपतात. ते उन्हाळ्यात बाहेर येतात. त्यावेळी अंडी घालतात. पावसाळ्यात ही अंडी उबतात आणि यातून लहान लहान पिल्लं बाहेर येतात. याच काळात साप आणि त्यांची पिल्लं येणाऱ्या हिवाळ्याच्या झोपेची तयारी करत असतात. यावेळी ते सतत भक्ष्य शोधतात. पावसाळ्यात सापांचं अन्न असणारे बेडूक, उंदीर, पाली, किडे भरपूर प्रमाणत उपलब्ध असल्याने ते भक्ष्याच्या शोधात सतत इकडून तिकडे फिरतात आणि लोकांच्या घराच्या आसपासही दिसतात.”

धमेंद्र त्रिवेदी

फोटो स्रोत, DHARMENDRA TRIVEDI

फोटो कॅप्शन, धमेंद्र त्रिवेदी

सापांच्या वर्तणुकीबद्दल बोलताना जयपूरमधले सर्प अभ्यासक विवेक शर्मा म्हणतात, “सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण भागात घडतात. त्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की सर्पदंश सहसा घरातल्या अंधाऱ्या खोलीत होतात, म्हणजे जिथे अंधार आहे किंवा प्रकाश कमी आहे. उदाहरणार्थ साठवणुकीची खोली, स्वयंपाकघर किंवा झोपायची खोली. घरात साप सापडण्याची आणखी एक जागा म्हणजे जिथे त्यांना खायला मिळेल. जिथे उंदीर-घुशी-पाली असतील. आता हे प्राणी तिथे असतात जिथे कचरा, धान्य किंवा गवत पडलेलं असतं.”

ते पुढे म्हणतात, “साप घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत चाललाय असं तुम्हाला सहसा दिसणार नाही कारण सापांना अंधारी जागा लागते. ते लपण्यासाठी अशा जागांचा वापर करतात."

साप चावण्याआधी इशारा देतात

साधा मण्यार जातीचा साप सोडला तर इतर साप चावण्याआधी इशारा देतात असं तज्ज्ञ म्हणतात.

धर्मेंद्र त्रिवेदी याबद्दल सांगतात, “मण्यार, त्यातही साधा (काळा) मण्यार कधी चावेल याचा भरोसा नाही. पण इतर तीन साप चावण्याआधी इशारा देतात. नाग फणा काढतो, फुरसं फुत्कार टाकतं आणि घोणस आपल्या शरीरावरचे खवले घासतं ज्यातून एक आवाज निघतो. तुम्हाला जर सापांची वर्तणूक माहीत असेल तर हे इशारे पाहून तुम्ही स्वतःचा जीव वाचवू शकता.”

ते पुढे म्हणतात, “मण्यार निशाचर असल्याने त्याचे दंश सहसा रात्री होतात. ते संध्याकाळपासून पहाटेपर्यंत फिरत असतात. इतर साप सहसा शेतात आणि बांधकामाच्या साईटवर सापडतात. तिथल्या करड्या, मातकट तपकिरी रंगात ते आरामात लपू शकतात. त्यांच्या भक्ष्यांनाही कळत नाही ते तिथे आहेत.”

साप चावल्यानंतर शरीरात काय होतं?

वर उल्लेखलेल्या चार सापांचं विष आपल्या शरीरातल्या दोन यंत्रणांवर परिणाम करतं.

याबद्दलल अधिक माहिती देताना डॉ हेमांग दोशी यांनी सांगितलं, “नाग आणि काळ्या मण्यारचं विष न्यूरोटॉक्सिक आहे तर घोणसं आणि फुरशाचं हिमॅटोटॉक्सिक.”

डॉ हेमांग दोशी

फोटो स्रोत, Hemang Doshi

फोटो कॅप्शन, डॉ हेमांग दोशी

ते यातला फरक उलगडून सांगतात, “न्यूरोटॉक्सिक विष तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं आणि तुम्हाला लकवा, श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणं दिसायला लागतात, तर हिमॅटोटॉक्सिक विष तुमच्या रक्तात मिसळतं आणि तुमच्या रक्तवाहिन्या फुटून अंतर्गत रक्तस्राव व्हायला लागतो.”

ते पुढे म्हणतात की, “नाग चावल्यानंतर 15 ते 20 मिनिटात शरीरावर विषाचे परिणाम दिसायला लागतात. 30-45 मिनिटात विषाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोचते. जर मण्यार चावला तर विषाची लक्षणं दिसायला साधारण दोन ते अडीच तास लागतात आणि चार ते सहा तासांत विषाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोचते. फुरसं आणि घोणस चावल्यानंतर त्याची लक्षणं लगेच दिसत नाहीत. फक्त ज्या ठिकाणी सर्पदंश झालाय तिथे अत्याधिक वेदना होतात.”

साप चावल्यावर काय करावं आणि काय करू नये?

एका सापाला वाचवत असताना 2008 साली धर्मेंद्र त्रिवेदी यांना नाग डसला.

तो अनुभव सांगताना ते म्हणतात, “सापाचे दात इंजेक्शनसारखे असतात. इंजेक्शन देताना ते तीन प्रकारे दिलं जातं, एकतर स्नायूत, एकतर शिरेत किंवा त्वचेच्या दोन थरांमध्ये. सापाचं विषही अशाच तीन पद्धतीने शरीरात शिरतं. साप चावला की एका क्षणाचाही विलंब न करता सरकारी दवाखान्यात जा किंवा एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन उपचार सुरू करा. कोणत्याही बुवाबाबाकडे जाऊ नका. ते लोक विष उतरवतात ही अंधश्रद्धा आहे.”

ते पुढे सांगतात, “मला नागही चावलाय आणि घोणसही. पण मी सर्पदंश झाल्याच्या दहा मिनिटात दवाखान्यात दाखल झालो. मला योग्य ते उपचार मिळाले म्हणून मी वाचलो. अर्थात मला साप चावले हा काही अभिमानाची गोष्ट नाही. त्याचा बचाव करतानाही ते चावले म्हणजे मी योग्य ती काळजी घेतली नव्हती. साप त्याच्या प्रकृतीप्रमाणे दंश करणारच.”

डॉ दोशी म्हणतात, “आता खेडोपाडी 108 रुग्णवाहिकेच्या सोयी उपलब्ध आहेत. सर्पदंश झाला तरी तातडीने जवळच्या दवाखान्यात जाता येतं. औषधं उपलब्ध असतात. त्यामुळे आता साप मारून तो दवाखान्यात आणण्याची गरज नाहीये. आता उपलब्ध असलेले अँटीव्हेनम चारही प्रकारच्या सापांच्या विषावर काम करतात.”

साप चावल्यावर काय करावं?

  • जिथे साप चावला तो भाग साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवा.
  • त्या भागातलं रक्ताभिसरण थांबवण्यासाठी बोटभर पट्टी बांधा.
  • तातडीने एमडी डॉक्टरकडे किंवा सरकारी दवाखान्यात जा.

काय करू नये?

  • अतिघट्ट पट्टी बांधू नका. खूप घट्ट बांधली आणि त्या अवयवातलं रक्ताभिसरण पूर्ण थांबलं तर तो अवयव कापावा लागेल.
  • ज्याला साप चावला आहे त्या व्यक्तीला फार हलवू नका. अशाने विष शरीरात लवकर पसरेल.

सर्पदंश झाल्यानंतर जीव वाचवणं शक्य आहे

ज्या विपुलचा साप चावल्याने मृत्यू झाला होता त्याचा भाऊ सागर कोळी म्हणतो की, “माझ्या भावाला साधारण 12-12.30 च्या सुमारास साप चावला. आम्हाला एका तासानंतर कळलं की साप त्याला साप चावला आहे. तोवर त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला आम्ही डॉक्टरकडे घेऊन निघालो. पण आम्हाला दवाखान्यात पोचायला अडीच तीन तास लागले. तोवर फार उशीर झाला होता.”

साप

फोटो स्रोत, Getty Images

पण जर वेळेत उपचार मिळाले असते तर तो वाचला असता असंही सागरला वाटतं.

गुजरातमधल्या कैलासनगर गावाचे रहिवासी लालाभाई भाटिया आपला अनुभव सांगतात. ते म्हणतात, “माझा पुतण्या कांजी भाटिया 19-20 वर्षांचा असेल. त्याचे वडील आणि तो एक किराणा मालाचं दुकान चालवतात. त्याला दुकानाच्या फडताळात लपून बसलेला नाग डसला.”

“पण आपल्याला नाग डसला हे त्याच्या लगेच लक्षात आलं आणि आम्ही त्याला तातडीने दवाखान्यात नेलं. आम्ही दवाखान्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असताना त्याची शुद्ध हरपली, पण आम्ही घाई केली. त्याला योग्य ते उपचार वेळेत मिळाले आणि चार-पाच दिवसात त्याला बरं वाटलं, त्याचा जीव वाचला.”

ते पुढे म्हणतात, “तरीही आम्ही एकच चूक केली. आम्ही त्याला पाणी प्यायला दिलं. जे आम्ही करायला नको होतं. पण आता तो ठणठणीत बरा आहे.”

साप चावू नये म्हणून काय करावं?

विवेक शर्मांना वाटतं की साप चावल्यावर उपचार घेण्यापेक्षा जे लोक सापांची संख्या जास्त असलेल्या भागात राहातात त्यांनी साप चावू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.

ते म्हणतात, “जे लोक घराबाहेर अंगणात झोपतात त्यांनी मच्छरदाणी लावून झोपलं पाहिजे. मच्छरदाणी फक्त डासांपासून वाचवते असं नाही तर सापांनाही तुमच्या अंथरुणात येऊ देत नाही. हा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे.”

ते पुढे म्हणतात, “अंधारात जाण्याआधी किंवा घरातल्या अंधाऱ्या खोलीत जाण्याआधी एक टॉर्च घ्या, तिथे प्रकाश टाका. जिथे आहात ती जागा नीट पाहा, तिथल्या गोष्टी जरा हलवून पहा. महत्त्वाचं म्हणजे एखाद्या कोनाड्यात, अंधाऱ्या फडताळात, कोपऱ्यात हात घालण्याआधी नीट निरखून पहा. जर अशा जागी हात घालायचाच असेल तर एखाद्या काचेचा बरणीत हात घालून किंवा ब्लँकेटमध्ये गुंडाळून हात घाला.”

साप

फोटो स्रोत, Getty Images

ते असंही सांगतात की, “शेतात, बागेत किंवा कुरणात जाण्याआधी मोठे गमबूट घाला. जर हातातली कोणती गोष्ट झुडुपात पडली तर लगेच हात घालू नका, जरा नीट निरखून पहा. तुम्हाला या सगळ्या काळजी घेण्यासाठी कोणतीही नवी गोष्ट विकत घेण्याची गरज नाही. फक्त सोप्या सोप्या उपायांनी सर्पदंश टाळता येऊ शकतो.”

भारतात सर्पदंशाची परिस्थिती काय?

मुंबईस्थित प्रियंका कदम यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत सर्पदंश या विषयावर काम केलं आहे. सध्या त्या स्नेकबाईट हिलिंग आणि एज्युकेशन इंडिया (SHE India) या संस्थेच्या संस्थापक सदस्य म्हणून काम करतात.

त्या म्हणतात, “सर्पदंशावर तातडीने उपचार करावे लागतात. दुर्दैवाना सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य त्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि विषविरोधी औषधांची कमतरता असल्याने त्यांना लांबवरच्या हॉस्पिटल्समध्ये रेफर केलं जातं. यात मौल्यवान वेळ जातो आणि एकतर रुग्णाचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व येतं.”

त्या पुढे सांगतात, “राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सर्पदंशाच्या उपचारांचा समावेश करणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांना निधी मिळेल. त्यासाठी खास आशा सेविका नेमून त्यांना मानधन देता येईल. तसंच सामाजिक जनजागृती कार्यक्रमांमुळे सर्पदंशाबाबत लोकांना जागरूक करता येईल. त्याच प्रकारे सर्पदंशावर उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही याचा फायदा होईल.”

या उपायांमुळे लोकांचाही दृष्टीकोन बदलेल, सर्पदंशाबाबत असणाऱ्या अंधश्रद्धा कमी व्हायला मदत होईल, तसंच लोक सर्पदंश झाला तर आधुनिक औषधांचा आधार घेतील.

(या बातमीसाठी बीबीसीचे सुंदरनगर, गुजरातचे सहयोगी सचिन पिठवा यांची मदत झालेली आहे.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.