You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला आरक्षणाला कॅबिनेटमध्ये मंजुरी, 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं विधेयकाला नाव
भारतीय संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाचा आज (19 सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्त्वात सर्व खासदारांनी संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश केला.
या प्रवेशापूर्वी जुन्या इमारतीतल्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व खासदार एकत्र आले आणि संसदेतील आठवणींना उजाळा दिला.
सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "नव्या संसद भवनात सर्व मिळून नव्या भविष्याचा श्रीगणेशा करतोय. विकसित भारताचा संकल्प परिपूर्ण करण्याच्या उद्देशाने नव्या इमारतीकडे आपण जातोय."
नरेंद्र मोदी संसदेच्या नव्या इमारतीतल्या पहिल्या भाषणात म्हणाले की, "पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बोलण्याची संधी दिल्याबद्दल लोकसभा अध्यक्षांचे आभार व्यक्त करतो. या नव्या संसद भवनात सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ही संधी अनेक अर्थांनी अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्यांच्या अमृतकालाचा हा उष:काल आहे. भारत नवे संकल्प घेऊन नव्या संसदेतून पुढे जात आहे."
"लोकमान्य टिळकांची आठवण येते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सव बनवला आणि लोकांमध्ये राष्ट्रऐक्याची भावना जागवली. टिळकांनी स्वराज्य भारताचं स्वप्न पाहिलं, आज आपण समृद्ध भारताचं ध्येय घेऊन पुढे जात आहोत," असं मोदी म्हणाले.
महिला आरक्षणाला मंजुरी
महिला आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीय.
मोदी म्हणाले की, "अनेक वर्षांपासून महिला आरक्षणावर वाद सुरु आहेत. याच्या आधी काही प्रयत्न झाले. 1996 मध्ये पहिल्यांदा हे विधेयक आणले गेले. अटलजींच्या काळात तर कित्येकवेळा हा प्रयत्न झाला. पण ते आकडे जमवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. पण अशा अनेक पवित्र कामांसाठी कदाचित परमेश्वरानं माझी निवड केली आहे."
'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं महिला आरक्षणाच्या कायद्याचं नाव असेल. विधानसभा आणि लोकसभेत महिलांना आरक्षण दिलं जाईल.
नरेंद्र मोदींच्या सेंट्रल हॉलमधील भाषणातील मुद्दे -
- हे सेंट्रल हॉल आपल्या भावनांनी भरलंय.
- हा हॉल पूर्वी ग्रंथालयासारखा वापरला जात असे. मग संविधान सभा इथे होऊ लागली.
- इथेच 1947 साली ब्रिटिशांकडून सत्ता आपण मिळवली. त्या प्रक्रियेचा हा हॉल साक्षीदार आहे.
- याच सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या राष्ट्रगीताचा स्वीकार झाला.
- 1952 नंतर जगातल्या जवळपास 41 राष्ट्राध्यक्षांनी या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या खासदारांना संबोधित केलंय.
- राष्ट्रपती महोदयांनी 86 वेळा इथे संबोधन केलं गेलंय.
- अनेक संशोधनं, अनेक सुधारणांचा साक्षीदार आपली संसद राहिलीय.
- संयुक्त अधिवेशनाच्या माध्यमातूनही विधेयक मंजूरही केलं गेलंय.
- भारताच्या मोठ्या बदलांमध्ये संसदेची मोठी भूमिका आहे
- आज जम्मू-काश्मीर शांतता आणि विकासाच्या वाटेवर चालतंय
- आज जम्मू-काश्मीरचे लोक पुढे जाण्याची संधी सोडत नाहीत
- संसदेच्या भवनात कितीतरी महत्त्वपूर्ण काम केले गेलेत
- भारत नव्या उत्साहानं पुनर्जागृत होतोय, नव्या उर्जेनं भरलाय, हीच उर्जा, हाच उत्साह देशातल्या कोटी लोकांच्या स्वप्नांना पूर्ण करू शकणार आहे
- माझा विश्वास आहे, देश ज्या दिशेला जातोय, इच्छित परिणाम आवश्यक पूर्ण होईल
सेंट्रल हॉलमधून जुन्या आठवणींना उजाळा
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमाच्या सुरुवातील भाषण केलं. प्रल्हाद जोशी म्हणाले, "आजपासून आपण संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश करणार आहोत. जुन्या इमारतीतलं हे सेंट्रल हॉल ब्रिटिशांकडून भारताकडे सत्तांतराचं साक्षीदार आहे."
संसदेची नवी इमारत नव्या विकसित भारताचं प्रतिक आहे, असंही यावेळी प्रल्हाद जोशी म्हणाले.
तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टिकोनामुळे भारत वैश्विक शक्ती बनतंय.
"संसद कायमच एकतेचं प्रतिक राहिलंय. संसदेच्या मूल्यांचं रक्षण संसद करते. विविध भाषा आणि संस्कृती असूनही आपल्याला राष्ट्र म्हणून संसद एक ठेवते. असंच आपण एकत्रित काम करत राहू," असं पियुष गोयल म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेंनी भाषणाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
"संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश करताना मी काहीसा भावनिक झालोय. कारण जुन्या इमारतीतल्या अनेक आठवणी आठवतील," असं खर्गे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)