तलवार गिळण्याच्या भारतीय कलेनं एंडोस्कोपी चाचणीचा असा शोध लावला

फोटो स्रोत, GETTY IMAGES
- Author, वकार मुस्तफा
- Role, पत्रकार आणि संशोधक
तलवार पोटात गेल्यानंतर गायब होते आणि काही क्षणांतच चमत्कारिकरित्या ती पुन्हा बाहेर येते.
19 व्या शतकातील एका सायंकाळी जर्मनीतील हायडलबर्ग शहरातून फिरणारे डॉक्टर अॅडॉल्फ कुस्मॉल यांचं लक्ष गर्दीकडं वेधलं गेलं. लोक खूप उत्साहात दिसत होते. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊन पाहिलं, तर त्यांनाही आश्चर्य वाटणारं असं दृश्य दिसलं.
"तलवार गिळण्याच्या सादरीकरणानं आश्चर्यचकित झालेल्या कुस्मॉल यांनी अशाच प्रकारे मानवी शरीराच्या आत डोकवण्याचा प्रयोगही करता येऊ शकतो का असा विचार केला," असं रॉबर्ट यंगसन यांनी 'द मेडिकल मेव्हरिक्स'मध्ये लिहिलं आहे.
तलवार गिळणं ही एक प्राचीन कला किंवा कलागुण आहे.
बॅरी डिलाँग आणि हेराल्ड एस. पाइन यांच्या संशोधनानुसार या कलेचा उगम ईसवी सन पूर्व 2000 मध्ये भारतातच झाला होता.
भारतातून ब्रिटनला पोहोचली कला
19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या एका पत्रिकेनुसार ही कला जेव्हा सर्वात आधी ब्रिटनला पोहोचली, त्यावेळी भारतातील तलवार गिळणाऱ्यांची कला अविश्वसनीय समजली जात होती.
1813 मध्ये 'तलवार गिळणं' याचा लंडनमध्ये भारतीय कलाकारांकडून केल्या जाणाऱ्या एका नवीन आणि आश्चर्यकारक खेळ किंवा कलागुण असा प्रचार करण्यात आला होता.
या कलेचं सादरीकरण करणाऱ्यांनी कधी युरोप तर कधी अमेरिकेतही दौरा केला. तसंच याच्या सादरीकरणाबाबत 'द टाइम्स' मध्ये लिखाणही करण्यात आलं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
'तलवार गिळण्याच्या या नव्या खेळानं जनतेचं लक्ष इतर गोष्टींवरून स्वतःकडं वेधून घेतलं आहे. भारतीय जादुगरांनी तलवार गिळण्याचा खेळ सादर करत शहराला आश्चर्यचकित करून सोडलं आहे,' असं त्यांनी लिहिलं होतं.
19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत तलवार गिळण्याची ही कला युरोपसह संपूर्ण जगभरात पसरली होती.
आयरन हेन्री यांचं योगदान
"डॉ. अॅडॉल्फ कुस्मॉल यांनी तलवार गिळणाऱ्या 'आयरन हेन्री' यांच्या मदतीनं एक उपकरण तयार केलं. आजाराची तपासणी करण्यासाठी हे उपकरण अन्ननलिकेच्या माध्यमातून शरिरात आतपर्यंत ढकलणं शक्य होतं," असं लाँग आणि पाइन यांनी लिहिलं आहे.
एलिजा बर्मन यांच्या मते, डॉक्टर कुस्मॉल यांनी 1868 मध्ये याद्वारे पोटाच्या वरच्या भागाची पहिली तपासणी केली. वैद्यकीय भाषेत एंडोस्कोपी चाचणी 'आयरन हेनरी' यांच्यावर केली होती.
"कुस्मॉल यांना एका ट्यूमर असलेल्या रुग्णाच्या अन्ननलिकेतून फार दूरपर्यंतचं निरीक्षण करता आलं नव्हतं. त्यामुळं ते निराश होते. आयरन हेनरी यांनी 47 सेंटिमीटर लांबीची ट्यूब गिळली त्याद्वारे कुस्मॉल यांनी आरसे आणि लॅम्पच्या मदतीनं तलवार गिळणाऱ्याच्या पोटातील संपूर्ण अन्ननलिकेचं निरीक्षण केलं," असं त्यांनी लिहिलं आहे.
तलवार गिळणं हा एक धोकादायक करतब आहे. त्यात जीव जाण्याचाही धोका असतो. तलवार गिळण्याचं सादरीकरण करणाऱ्या महिला आणि पुरुषांबाबत प्रकाशित ब्रिटिश मेडिकल पत्रिकेच्या एका संशोधनानुसार, त्यांच्या आतड्यांमधून रक्तस्त्राव आणि अन्ननलिकेला जखमा झाल्याचे प्रकार पाहायला मिळतात.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अल्बर्ट हॉपकिन्स यांच्या मते, 1897 मध्ये स्टिव्हन्स नावाच्या एका स्कॉटिश डॉक्टरांनी तलवार गिळणाऱ्या व्यक्तीबरोबर अनेक प्रयोग केले होते.
'इलेक्ट्रो कार्डियोग्राम' शब्द फक्त डॉक्टरांनाच माहिती असला तरी, त्याचं छोटं नाव 'ईसीजी' जवळपास सर्वांनाच माहिती आहे. हृदयाची हालचाल तपासण्यासाठी केली जाणारी चाचणी इलेक्ट्रो कार्डियोग्राफी (ईसीजी) म्हणून ओळखली जाते.
याचा प्रयोगही 1906 मध्ये एका तलवार गिळणाऱ्यांवर करण्यात आला होता. जर्मन डॉक्टर एम क्रेमर यांनी हृदयाची हालचाल तपासण्यासाठी त्यावेळी त्यांच्या अन्ननलिकेत एक इलेक्ट्रोड टाकला होता.
तलवार गिळणाऱ्यांची आजच्या वैद्यकीय प्रयोगांमध्ये अत्यंत मोलाची भूमिका आहे. पण हे अत्यंत धोकादायक कौशल्य आहे. त्यामुळं जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
जानेवारी 2006 मध्ये तलवार गिळणारे डॅन मेयर यांनी नॅशविले (टेनेसी) मध्ये संशोधकांबरोबर काम केलं. त्यांनी तलवार गिळण्याच्या प्रक्रियेचा वापर गिळण्याच्या संबंधींच्या आजार असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी केला जाऊ शकतो का, याचा तपास घेण्याचा प्रयत्न केला.
तलवार गिळणाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय दिन
2007 मध्ये तलवार गिळणारे दाई अँड्रयूज यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात डॉ.शेरोन कॅपलान यांना मदत केली. गळ्याला गंभीर जखमा किंवा नुकसान झालं असेल, अशा रुग्णांच्या मदतीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो का याचा अभ्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
कधी-कधी तलवार गिळणाऱ्यांना या अनुभवाचा फायदा होतो हे स्पष्टच होतं.
पत्रकार ऑलिव्हिया बी. वॅक्समन यांनी तलवार गिळणारे आणि या कलेच्या इतिहासासंदर्भात येलमध्ये लेक्चर देणारे टॉड रॉबिन्स यांच्याशी चर्चा केली. एंडोस्कोपी त्यांच्यासाठी किती सोपी ठरली हे त्यांनी सांगितलं.
"मला एंडोस्कोरी करायची होती. साधारणपणे ते ट्यूब टाकण्याआधी रुग्णाला बेशुद्ध करतात. पण मी तलवार गिळणाराच होतो त्यामुळं डॉक्टरांनी फक्त एंडोस्कोप माझ्याकडं दिला आणि मी तो गिळला," असं ते म्हणाले.
पण आता हा कलागुण किंवा कलाप्रकार जवळपास संपुष्टात येत आहे.
तलवार गिळणाऱ्या कलाकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माहितीनुसार आता ही कला सादर करणारे काही मोजकेच कलाकार शिल्लक आहेत.
या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरच्या शनिवारी तलवार गिळणारे ही कला सादर करत आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात.
तलवार गिळणाऱ्यांच्या संघटनेनुसार, ही प्राचीन कला सादर करण्याचा उद्देश विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात तलवार गिळणाऱ्यांच्या योगदानाबाबत जागरुकता वाढवणं हा आहे.











