You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपचे मंत्री म्हणतात, ‘तुनिषा शर्माचा मृत्यू म्हणजे लव्ह जिहाद’, काय आहे सगळं प्रकरण?
टीव्ही सीरियल 'अली बाबा'मुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तुनिषा शर्मा 24 डिसेंबरला शुटिंगदरम्यान मृतावस्थेत आढळून आली होती.
तिच्या मृत्यूनंतर आता रोज नवनवीन माहिती समोर येतेय.
या प्रकरणावरून महाराष्ट्रात आता राजकारणही तापलंय. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं की, हे लव्ह जिहादचं प्रकरण आहे.
“पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे आम्ही याविरोधात (लव्ह जिहाद) कायदा आणण्याचा विचार करतोय.”
भाजप नेते राम कदम यांनीही म्हटलं की, तुनिषा शर्माच्या कुटुंबाला न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे प्रकरण लव्ह जिहादचं असेल तर याचीही चौकशी केली जाईल.
त्यांनी इशारा दिला की याप्रकरणी कोणी कट-कारस्थान रचलं असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल.
पण या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी म्हटलंय की आतापर्यंत या प्रकरणात कोणताही 'लव्ह जिहाद'चा अँगल समोर आलेला नाही.
पोलिसांनी सुरुवातीला म्हटलं होतं की, तुनिषाने आत्महत्या केली आहे. पण तिच्या कुटुंबाने तिचा को-स्टार शीझान खानवर तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
कोण आहे तुनिषा शर्मा?
चंदीगढमध्ये जन्मलेल्या तुनिषा शर्माने वयाच्या 14 व्या वर्षी अभिनय सुरू केला होता. 2015 साली तिने चर्चेत असलेली सीरियल ‘भारत का वीरपुत्र – महाराणा प्रताप’ यात अभिनय केला होता.
यानंतर तिने ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकेतही काम केलं होतं. ‘इश्क सुभान अल्लाह’, ‘इंटरनेटवाला लव्ह’ अशा सीरियल्समध्येही ती चमकली होती.
2016 साली तिने ‘फितूर’ चित्रपटात काम केलं होतं. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. यात तिने कॅटरिना कैफच्या कॅरेक्टरच्या बालपणातली भूमिका रंगवली होती. अभिनेत्री विद्या बालनसोबत तुनिशानं 'कहानी 2' सिनेमातही काम केलं होतं.
तुनिषाच्या आईचे गंभीर आरोप
तुनिषाची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलीस आपला तपास करत आहेत. त्यांनी तपासादरम्यान तुनिषाचा मोबाईल फोन आपल्या ताब्यात घेतला आहे.
“तिच्यासोबत काम करणाऱ्या शीझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते आणि यातल्या नैराश्यातून तिनं हे पाऊल उचलल्याचं तुनिशाच्या आईचं म्हणणं आहे. तिच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. शिझानला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे,” असंही एसीपी चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं.
तुनिषाच्या आईने म्हटलं की, “शीझानने तुनिषाला फसवलं. आधी तिच्यासोबत रिलेशिनशिपमध्ये होता. लग्नाचं वचन दिलं आणि मग त्याने तिच्याशी ब्रेकअप केलं.”
वनिता शर्मा यांनी म्हटलं, “त्याचे आधीच कोणत्यातरी मुलीशी संबंध होते. तरीही त्याने तुनिषाशी जवळीक साधली. तीन-चार महिने तिला वापरलं. मला एवढंच सांगायचं आहे की शीझानला शिक्षा झाली पाहिजे.”
वनिता शर्मा यांनी सांगितलं की 23 डिसेंबरला म्हणजे तुनिषाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्या स्वतः सेटवर गेल्या होत्या. तुनिषाने त्यांना सांगितलं की तिला शीझान हवाय आणि शीझान तिच्या आयुष्यात परत यावा अशी तिची इच्छा आहे, पण तो ऐकत नाहीये.
आत्महत्या की हत्या?
तुनिषा शर्मा सध्या सोनी सब टीव्हीवरील 'अलिबाबा : दास्तान ए काबुल' नामक सीरियलमध्ये मुख्य भूमिका करत होती.
या सीरियलचं शूटिंग सुरू असताना ब्रेक झाला. त्या ब्रेकदरम्यान मेकअप रूममध्ये तुनिषानं आत्महत्येचं पाऊल उचललं.
तुनिषा बराच वेळ मेकअप रूमच्या बाहेर न आल्यानं इतर सहकाऱ्यानं मेकअप रूमच्या दिशेनं धाव घेतली.
25 डिसेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसीपी चंद्रकांत जाधव यांनी म्हटलं की पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार तुनिषाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला आहे.
त्यांनी म्हटलं की प्राथमिक तपासाअंती हे समोर आलंय की तुनिषाचं ब्रेकअप झाल्यामुळे तिने हे पाऊल उचललं.
ते म्हणाले, “तुनिषाने आपल्या आईलाही सांगितलं होतं की तिचं ब्रेकअप झालं आहे आणि तो मुलगा आता तिच्याशी बोलत नाही, तिच्याशी संबंध ठेवू इच्छित नाही. म्हणूनच ती टेंशनमध्ये होती.”
शीझान खान पोलिसांच्या ताब्यात
ठाणे जिल्ह्यातल्या वाळीव पोलिसांनी शीझान खानला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोपावरून अटक केली आहे.
पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीझान खानला चार दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. पोलिसांनी कोर्टात सात दिवसांची कस्टडी मागितली होती.
शीझान खानही तुनिषासोबत ‘अलिबाबा दास्तान-ए-काबुल’ या सीरियलमध्ये काम करत होता. तुनिषा या सीरियलमध्ये राजकुमारी मरियमची भूमिका करत होती.
एएनआयने वृत्त दिलंय की शीझानच्या वकिलांनी म्हटलं, “पोलिसांकडे अजून कोणतेही पुरावे नाहीयेत. शीझानवर आरोप केले गेलेत पण त्याची चौकशी बाकी आहे.”
या प्रकरणी शीझानची बहीण शफक नाझ, फलक नाझ आणि त्यांच्या कुटुंबाने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यांनी आपल्या पत्रकात म्हटलंय की, “प्रत्येकाला या प्रकरणी आमच्याशी बोलायचं आहे. या प्रकरणी जे आमच्याशी संपर्क करू इच्छितात त्यांनी कृपया करू नये. या कठीण प्रसंगी आमच्या कुटुंबाच्या खाजगीपणाचा आदर करावा.”
“मीडियाची माणसं सतत आम्हाला फोन करत आहेत. आमच्या बिल्डिंगखाली येऊन उभे राहात आहेत. याचा आम्हाला त्रास होतोय. आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. शीझान मुंबई पोलिसांना सहकार्य करतोय. योग्य वेळी आम्ही या प्रकरणावर बोलू.”
तुनिषाने शीझानसाठी काय लिहिलं?
तुनिषा शर्माच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 12 लाख फॉलोअर्स आहेत. तिने अनेकदा शीझानसोबत आपले फोटो पोस्ट केले आहेत.
19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाच्या निमित्ताने तिने शीझानसोबत स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, “माझ्या आयुष्यातला सर्वात मेहनती, भावनाशील, उत्साही आणि सर्वात सुंदर पुरुष. शीझान तुला माहीत नाही तू कोण आहेस आणि हे खूप सुंदर आहे.”
अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसोबत एक वाक्यही लिहिलं आहे.
या फोटोत तिच्या हातात काही कागद दिसत आहेत. तिने या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की - "स्वत:च्या जिद्दीनं काम करणारे कधीच थांबत नाहीत..."
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)