राज ठाकरे: 'राहुल गांधी बोलतात की आर. डी. बर्मन हे कळत नाही', कोश्यारींचा उल्लेख 'ते धोतर'

राज ठाकरे: 'राहुल गांधी बोलतात की आर. डी. बर्मन हे कळत नाही', कोश्यारींचा उल्लेख 'ते धोतर' मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राहुल गांधी, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे स्वतः बोलत आहेत की आर. डी. बर्मन बोलत आहे, हेच कळत नाही असं राज ठाकरे म्हणाले.

कोश्यारींचा धोतर म्हणून उल्लेख

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा उल्लेख राज यांनी 'ते धोतर' असा केला. कोश्यारींचं वय काय ते काय बोलत आहेत? ते राज्यपाल पदावर बसलेले आहेत, म्हणून मान राखतोय, अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

इथले मारवाडी-गुजराती परत गेले तर काय होईल, असं त्यांनी म्हटलं होतं. कोश्यारीजी, तुम्ही पहिल्यांदा मारवाडी-गुजराती समाजाला विचारा की तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती, व्यापारी आहात, तर मग तुमच्या राज्यात उद्योग का नाही केला. कारण उद्योगासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. महाराष्ट्र हा मोठाच होता आणि मोठाच आहे. महाराष्ट्र काय आहे, हे आम्हाला कोश्यारी यांच्याकडून ऐकायचं नाही. आज जर आपण मारवाडी-गुजराती समाजाला सांगितलं की परत जा, तर ते जातील का?

राहुल गांधी बोलतात की आर. डी. बर्मन?

राहुल गांधींचा म्हैसूर सँडल सोप असा उल्लेख करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.सावरकर कोण आहेत, त्यांना कुठे ठेवलं होतं, त्यांनी काय हाल-अपेष्टा सहन केल्या ते राहुल गांधींना माहीत आहे का?

सावरकर यांनी माफी मागितली असं ते म्हणतात, पण रणनिती नावाची एक गोष्ट असते. त्याचा आम्ही कधी विचार करणार नाही. आम्ही फक्त दयेचा अर्ज पाहणार. सर सलामत तो पगडी पचास.

50 वर्षे शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटे बोलून बाहेर तरी येतो, याला स्ट्रॅटेजी म्हणतात.एखादी चांगली गोष्ट घडणार असेल आणि त्यासाठी खोटं बोलावं लागत असेल, तर बोला, असं आमची कृष्णनिती आम्हाला सांगते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना गडकिल्ले दिले, ती काय चितळ्यांची बर्फी होती का? त्यावेळची परिस्थितीच तशी होती. मावळे थकलेले होते. आर्थिक अडचणी होत्या.

आलेल्या सैन्याला परत तोंड देणं शक्य नव्हतं. गडकिल्ले फक्त लिहून द्यायचे ते कुठेच जाणार नाहीत, ही रणनिती असते. ही रणनिती समजत नाही, तो गुळगुळीत मेंदूचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचीही मिमिक्री

मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे.

"कोणतंही काम न करता हिंदुत्व-हिंदुत्व म्हणून जपणारे रझा अकादमीच्या मोर्चावेळी कुठे होते? या लोकांना काही देणं घेणंच नाही.

दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरेंचीही मिमिक्री केली.

मुख्यमंत्रिपदावर असताना तब्येतीचं कारण सांगून घरी बसलेले उद्धव ठाकरे आता सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखे वागणाऱ्यातला मी नव्हे," असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेत कोपऱ्यात जाऊन बसायचं, असे धंदे मी करत नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.एकनाथ शिंदेंनी रात्रीत कांडी फिरवली आणि हे घराबाहेर पडले. उद्धव ठाकरे यांनी कधीच कोणती भूमिका घेतली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)