You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
SAvsIND : 6 खेळाडू शून्यावर आऊट होऊनही भारताचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय
"दक्षिण आफ्रिका ऑल आउट झाल्यावर मी विमानात बसलो आणि विमान जमिनीवर उतरेपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या पुन्हा 3 विकेट पडल्या होत्या. मी नेमकं काय मिस केलं?"
सचिन तेंडुलकरने केलेलं हे ट्विट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचं अतिशय चपखल वर्णन करतं.
पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या मिळून 23 विकेट, मोहम्मद सिराजचे सहा बळी, दुसऱ्या डावात एडन मार्करमचे झुंजार शतक, जसप्रीत बुमराच्या 6 विकेट्स आणि शेवटच्या डावात आक्रमक फलंदाजी करत भारतीय फलंदाजांनी मिळवलेला विजय.
कोणत्याही आशियाई संघाने केपटाऊन मध्ये मिळवलेला हा पहिलाच विजय आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन मध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने अखेर 7 विकेट राखून विजय मिळवला आहे.
उसळी घेणारी खेळपट्टी आणि वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व राहिलेला हा कसोटी सामना फक्त दोन दिवसांतच आटोपला.
पहिल्या दिवशी काय घडलं?
या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे एकूण 23 खेळाडू बाद झाले होते. मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त 55 धावांवर संपला होता.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय खेळाडूंनादेखील फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
भारताचे शेवटचे सहा खेळाडू भोपळाही फोडू शकले नाहीत, शेवटच्या अकरा बॉलमध्ये भारताचे सहा फलंदाज बाद झाले आणि भारतीय संघ 153 धावाच करू शकला.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने दमदार शतक झळकावलं.
पण जसप्रीत बुमराच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा फारसा निभाव लागू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 176 धावा करू शकला.
चौथ्या डावात भारतीय संघाच्या सलामीवीरांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली.
यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीमुळे टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1अशी बरोबरी केली आहे.
एका इनिंगमधील सर्वाधिक डकआउट
आतापर्यंत एकूण 8 वेळा एकाच टीमचे 6 बॅट्समन एका इनिंगमध्ये शून्यावर म्हणजेच डकआउट झाले आहेत. पण या मॅचमध्ये जसं घडलं, सलग 6 फलंदाज एकही रन न करता आउट होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
दोन वेळा भारताचे बॅट्समन एका इनिंगमध्ये ऑलआउट झाले आहेत. 2014 मध्ये इंग्लंड येथील मॅंचेस्टरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताचे 6 बॅट्समन शून्यावर बाद झाले होते.
सर्वाधिक वेळा सहा फलंदाज डकआउट होण्याचा विक्रम बांगलादेशच्या नावावर आहे. एकाच इनिंगमध्ये 6 फलंदाज शून्यावर आउट होण्याची नामुष्की बांगलादेशवर 3 वेळा आली आहे.
हे वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.