You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BCCI वर पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशचे क्रिकेट बोर्ड नाराज का आहेत?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
वर्ल्ड कप संपला आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकला नसला, तरी संपूर्ण स्पर्धेवर मात्र वर्चस्व गाजवलं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जरी सामना झाला असला तरी या निमित्ताने क्रिकेट विश्वातले अनेक संघर्ष यानिमित्ताने समोर आले आहेत.
भारतीय क्रिकेट बोर्डालासुद्धा याबाबतीत टीका सहन करावी लागली. त्यामुळे असा प्रश्न पडतो की भारतीय क्रिकेट बोर्डाबद्दल शेजारी देश नाखूष आहेत का?
अफगाणिस्तान आणि नेपाळ सोडलं तर पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या महत्त्वाच्या दक्षिण आशियाई देशांना एक तर अडचणी आल्या किंवा बीसीसीआयबद्दल नाखूशी व्यक्त केली.
काय झालं त्यावर एक नजर टाकू या.
रणतुंगा यांचे जय शाह यांच्यावर आरोप
श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगा यांनी जय शाह यांनी श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डावर प्रभाव टाकल्याचा आरोप केला.
त्यानंतर श्रीलंका सरकारने एक माफीनामा सादर केला आणि स्पष्टीकरण दिलं.
SLC गेल्या काही काळापासून वादात आहे. श्रीलंकेच्या संघाचा वर्ल्ड कपमध्ये पराभव झाल्यापासून गदारोळ माजला आहे. त्यानंतर आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केलं आहे.
या सर्व मुदद्यावर रणतुंगा यांनी मत व्यक्त केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात झळकल्या.
ते म्हणाले, “ SLC आणि जय शाह यांच्यात असलेल्या संबंधांमुळे त्यांना असं वाटतं की ते काहीही करू शकतात आणि SLC वर नियंत्रण मिळवू शकतात. जय शाह यांच्या दबावामुळे SLC चा चेहरामोहरा बिघडला. एक व्यक्ती अख्खं बोर्ड खराब करत आहे. ते त्यांच्या वडिलांमुळे शक्तिशाली आहेत.”
जय शाह हे एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आहेत.
रणतुंगा यांच्या टिप्पणीनंतर SLC ने एक माफीनामा सादर केला आहे.
श्रीलंकेचे मंत्री कांचन विजेशेखर यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. आपल्या क्रिकेट बोर्डाच्या ज्या त्रुटी आहेत त्याविषयी एशियन क्रिकेट काऊंसिलच्या अध्यक्षांना किंवा इतर देशांना जबाबदार धरलं जाऊ शकत नाही.
‘आयसीसी वर्ल्ड कप ही BCCIची स्पर्धा होती का?’
आयसीसीच्या स्पर्धेत जगभरातून क्रिकेट चाहते त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येत असतात.
मात्र, 14 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात अनेक पाकिस्तानी चाहत्यांना व्हिसा न मिळाल्याने नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये फक्त ‘निळाई’ लोटली होती.
पाकिस्तानचे टीम संचालक मिकी आर्थर म्हणाले, “ही आयसीसीची स्पर्धा वाटलीच नाही. ही दोन देशांमध्ये बीसीसीआयने आयोजित केलेली स्पर्धा वाटली.”
“दिल दिल पाकिस्तान अशा घोषणा अजिबात ऐकू आल्या नाहीत,” असं आर्थर म्हणाले.
'दिल दिल पाकिस्तान' हे खेळाच्या क्षेत्रातलं राष्ट्रगीत असल्यासारखं आहे.
काही दिवसांनंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला. तेव्हा इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला, “मला असं वाटतं चेन्नईमध्ये 'दिल दिल पाकिस्तान' वाजवलं गेलं नाही.”
याशिवाय काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आरोप लावला की, भारताला फायदा व्हावा अशा पद्धतीने टॉस केला जात आहे आणि पीच तयार केल्या जात आहेत.
मात्र, या दाव्यांची पुष्टी करण्यात आलेली नाही.
दोन्ही बाजूंनी अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप ही काही नवी गोष्ट नाही.
मात्र गेल्या काही काळात दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डात असेच आरोप प्रत्यारोप होत असतात.
तसंच आयसीसी कडून होणाऱ्या निधी वाटपाविषयी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रश्न विचारले. PCB चे अध्यक्ष नजम सेठी यांनी कबुल केलं की, बीसीसीआयला जास्त निधी मिळावा याबद्दल आमचं दुमत नाही मात्र आयसीसीच्या प्रस्तावित रेव्हेन्यू मॉडेलबद्दल त्यांना आक्षेप आहेत.
आशिया कप आणि पीसीबीचा वाद
वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधी आशिया कपच्या मुद्द्यावरून दोन देश एकमेकांमध्ये भिडले.
आशिया कप मागच्या वर्षी पाकिस्तानला देण्यात आला, मात्र बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाण्यास नकार दिला.
यावर्षी 28 मे रोजी बीसीसीआयने श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना आयपीएल फायनलसाठी बोलावलं होतं. त्यांनी एशियन क्रिकेट कौन्सिलशी निगडीत प्रकरणांचीही चर्चा केली. मात्र त्यात PCB ला आमंत्रण नव्हतं.
शेवटी आशिया कपचं वेळापत्रक बदलण्यात आलं. SLC ने बीसीसीआयची कास धरली आणि PCB ला आशियन क्रिकेट कौन्सिलमध्ये कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळाला नाही.
PCB ने सुरुवातीला सूचित केलं की, ही स्पर्धा UAE मध्ये घ्यावी आणि PCB ला यजमानपद मिळावं. मात्र श्रीलंका आणि बांगलादेश यांनी उन्हाळ्याचं कारण देत श्रीलंकेला सहयजमानपद देण्यात आलं.
PCB चे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी श्रीलंकेला प्राधान्य दिल्याबद्दल ACC आणि जय शाह यांच्यावर खापर फोडलं.
जय शाह यांनी यावर प्रतिसाद दिला आणि ते म्हणाले, “सर्व सदस्य आधीपासूनच सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात स्पर्धा घेण्याच्या विरोधात होतो.”
ते पुढे म्हणाले की PCB मध्ये काही बदल झाल्याhने चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या.
नंतर कोलंबोमधले सामने पावसामुळे रद्द झाल्याने PCB प्रमुख झका अश्रफ यांनी पैसे परत मिळावे अशी मागणी केली होती. त्यामुळे दोन बड्या क्रिकेट बोर्डांमधील संबंध आणखीच बिघडले.
बांगलादेशचा प्रश्न
भारत पाकिस्तानच्या या वादात बांगलादेश क्रिकेट बोर्डही या वादात भरडलं गेलं होतं.
बांगलादेशच्या खेळाडूंना श्रीलंका आणि पाकिस्तानला जावं लागलं म्हणून बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी नाराजी व्यक्त केली होती.
बांगलादेशचे मुख्य चंदिका हथुरसिंघा यांनी भारत पाकिस्तान सुपर फोर मॅचच्या दरम्यान एक राखीव दिवस ठेवल्याबद्दल टीका केली होती. हे सगळं मुद्दाम केल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
काही भारतीय क्रिकेटपटूंनी या निर्णयावर टीका केली होती.
मात्र हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला आहे असं नंतर BCB आणि SLC यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)