विश्वचषक जिंकूनही ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतावर टीकेची झोड का उठवलीय?

वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा सहा विकेट्सनी पराभव करून सहाव्यांदा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचं सर्वत्र कौतुक होतंय.

या सामन्याचा नायक ट्रॅव्हिस हेड ठरला, ज्याच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने 42 चेंडू शिल्लक असताना तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळवलं.

ऑस्ट्रेलियाची प्रसारमाध्यमांकडून कर्णधार पॅट कमिन्सचं सर्वाधिक कौतुक केलं जातंय, ज्याने सामन्यापूर्वी सांगितलेलं की स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 1,30,000 भारतीय चाहत्यांना तो शांत करू इच्छितो.

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित हजारो प्रेक्षक शांत झाले, डेली टेलिग्राफ लिहितं की ‘कशाप्रकारे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी 1.4 अब्ज भारतीयांना शांत करून विश्वचषक हिसकावून घेतला.'

वृत्तपत्रानुसार, 'तांत्रिकदृष्ट्या ऑस्ट्रेलियाने अहमदाबादमध्ये भारताला हरवून विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक जिंकला, हा चषक खरंतर अनेक अर्थांनी भारताचा होणार होता, पण असं होता होता राहिलं.’

भारतीय खेळाडूंच्या वर्तनावर टीका

क्रॉनिकलने मथळा प्रकाशित केला - क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खिलाडूवृत्ती न दाखवल्याने भारतीयांवर टीका.

वृत्तपत्रात लिहिलंय, 'जखम खूप खोल होती. ज्या वेळी ऑस्ट्रेलियन संघ ट्रॉफीसह आनंद साजरा करत होता, त्यावेळी भारतीय खेळाडूंवर असभ्य वर्तनाचे आरोप केले जातायत.'

वृत्तपत्रात लिहिलंय की, हा विजय देखील खास होता कारण तो यजमान भारतीय संघाविरुद्ध मिळालेला होता, ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नव्हता.

'या मोठ्या कामगिरीची पातळी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि त्याच्या संघाच्या लक्षात आली नसेल, कारण त्यांना 1,30,000 क्षमतेच्या, पण रिकाम्या स्टेडियममध्ये ट्रॉफी देण्यात आली.'

'याहून विशेष म्हणजे ज्या वेळी ट्रॉफी मैदानावर सुपूर्द करण्यात आली, त्यावेळी भारतीय संघ कुठेच दिसत नव्हता.'

'खेळादरम्यान भारतीय खेळाडूंच्या उदासीनतेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं, कारण हे समजू शकतो की त्यांना भावना अनावर झालेल्या असू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की हे वर्तन खेळाच्या भावनेच्या विरुद्ध नव्हतं.'

द क्रॉनिकल लिहितं की, इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार मायकल वॉनने उघडपणे यावर टीका केली. त्याने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलं की, 'ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ट्रॉफी उंचावताना पाहण्यासाठी भारतीय संघ मैदानावर नव्हता हे आवडलं नाही.'

मात्र, नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली.

खेळपट्टीचा भारतावर उलट परिणाम

हेराल्ड सनने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची प्रतिक्रिया प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये त्याने खेळपट्टीबाबत भारताच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केलंय.

पाँटिंगने म्हटलंय की, जी खेळपट्टी तयार करण्यात आली होती तिचा भारतावर उलट परिणाम झाला.

वृत्तपत्रात लिहिलंय की, 'गेल्या महिन्यात खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यात ज्या खेळपट्टीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवला त्याच खेळपट्टीवर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला.'

'पॅट कमिन्सनेही आदल्या दिवशी खेळपट्टीबद्दल चिंता व्यक्त केलेली. शेवटी गवताळ खेळपट्टीमुळे ऑस्ट्रेलियाला लक्ष्याचा चांगल्या प्रकारे पाठलाग करण्यात मदत झाली.'

सामन्यानंतर रिकी पॉन्टिंग म्हणाला, 'ही खेळपट्टी माझ्या अपेक्षेपेक्षा कमी वेगवान होती. त्यावर अपेक्षेपेक्षा चेंडू कमी फिरला, पण प्रत्येकाने खेळपट्टीशी जुळवून घेत चांगली गोलंदाजी केली.'

सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघाच्या पराभवासाठी खेळपट्टीला दोष दिला नाही. तो म्हणाला, 'आम्हाला माहिती होतं की ते प्रकाशामुळे ती थोडी चांगली होईल, परंतु आता मला कोणतीही सबब सांगायची नाहीए.'

समालोचन करताना पॉन्टिंग म्हणाला, "ही खेळपट्टी (भारतीय) उपखंडातील परिस्थितीला खूप पूरक होती. प्रामाणिकपणे सांगायचं तर अशी खेळपट्टी तयार केली गेली होती, ज्याचा कदाचित भारतावर उलट परिणाम झाला."

त्याचवेळी माजी इंग्लिश क्रिकेटर मायकेल वॉन म्हणाला की, "ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतापेक्षा खेळपट्टीचा चांगला अभ्यास केला. व्यूहरचनेच्या बाबतीत तो खूप हुशार संघ आहेत.”

'स्टेडियममध्ये फक्त ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आवाज घुमला'

‘द एज’ने लिहिलं - 90 हजारांहून अधिक भारतीयांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये विराट कोहलीचा त्रिफळा उडाल्याचा आवाज आल्यानंतर फक्त ऑस्ट्रेलियाच्या 11 खेळाडूंचा जल्लोष ऐकू आला.

वृत्तपत्रात लिहिलंय, 'कोहलीची विकेट घेऊन कमिन्सने आपल्या संघाला विजयाच्या मार्गावर आणलं होतं आणि त्यानंतर उरलेली कसर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्यातील 192 धावांच्या भागीदारीने भरून काढली.'

'कोहलीचं खेळपट्टीवरून निघून जाणं असो, हेडचे शतक असो किंवा विजयाचा क्षण असो, नरेंद्र मोदी स्टेडियमवर जी शांतता पसरली होती ती कमिन्स आणि त्याच्या संघातील सदस्यांसाठी आनंदाची गोष्ट होती.

एवढंच नव्हे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कमिन्सला चषक सुपूर्द करण्यास उशीर केला.'

'कमिन्स एक धाडसी नेता ठरला'

द संडे मॉर्निंग हेराल्डने लिहिलं, ‘कमिन्सने भारताविरूद्ध विश्वचषक जिंकण्याबाबत म्हटलं की - हे क्रिकेटचं शिखर आहे.'

वृत्तपत्रानुसार, कर्णधार पॅट कमिन्सला वाटतं की, भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकणं ही आपल्या संघाची सर्वांत मोठी कामगिरी आहे.

कमिन्स म्हणाला, “मला वाटतं की हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं शिखर आहे, विशेषत: भारतातील अशा प्रेक्षकांसमोर जिंकणं. हे वर्ष आमच्या सर्वांसाठी खूप विशेष होतं. आमच्या संघाने अॅशेस आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपही जिंकली. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आयुष्यभर लक्षात राहील."

कमिन्सचं कौतुक करताना वृत्तपत्रानं लिहिलंय की, 'कमिन्स एक धाडसी आणि निर्णायक नेता असल्याचं सिद्ध झालंय, ज्याने पहिले दोन सामने गमावल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करत पुढील सलग नऊ विजय मिळवून दिले.

रविवारी जेव्हा संपूर्ण स्पर्धेत प्रथम फलंदाजी करून वर्चस्व गाजवणाऱ्या संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ते कमिन्सचं धाडस होतं. रोहित शर्माने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली तेव्हा तर हा निर्णय अधिक धाडसी वाटू लागला. मात्र कमिन्सने दोन महत्त्वाचे बळी घेतले आणि तेही 10 षटकांच्या बदल्यात फक्त 34 धावा दिल्या.'

वनडेचा नियम बदलण्याची मागणी

केर्न्स पोस्टने मिचेल स्टार्कच्या विधानाला प्रसिद्धी दिली आहे ज्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटचा नियम बदलण्याची मागणी केली आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन नवीन चेंडू वापरण्याचा नियम बदलला पाहिजे, असं मिचेल स्टार्कला वाटतं कारण त्यामुळे खेळ फलंदाजांसाठी जास्त अनुकूल झालाय.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्टार्कने या विश्वचषकात आठ सामन्यांत 43.40 च्या सरासरीने आणि 6.55 च्या इकॉनॉमी रेटने 10 बळी घेतले आहेत. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी नाही आणि 2015 आणि 2019 च्या विश्वचषकापेक्षाही वाईट आहे.

स्टार्क म्हणाला की, त्याने कबूल केलं की त्याने त्याच्या क्षमतेनुसार कामगिरी केली नाही, परंतु पुढे म्हणाला की 25 षटकांनंतर नवीन चेंडू वापरल्याने विशेषत: दिवसा रिव्हर्स स्विंग करणं खूप कठीण झालंय.

या विश्वचषकात दिवसा गोलंदाजी करताना स्टार्कला पॉवर प्लेमध्ये एकही विकेट मिळाली नाही, पण भारत आणि नेदरलँड्सविरुद्ध रात्री गोलंदाजी करताना त्याला यश मिळालं.

तो म्हणाला, “मला अजूनही वाटतं की दोन ऐवजी एक चेंडू वापरला पाहिजे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)