'माझ्या आईच्या आधीच माझी पाळी थांबली', विशीतच रजोनिवृत्ती आली अन्...

- Author, डेईरड्रे फिनर्टी, एलिस विकर आणि याझमिना गार्शिया
- Role, बीबीसी न्यूज
कल्पना करा की तुम्ही किशोरवयात किंवा वयाच्या विशीमध्ये असतानाच तुम्हाला या वयात रजोनिवृत्ती (मेनोपॉज) झाली आहे, असं समजलं तर... एम्मा, सो म्यात आणि एल्सपेथ यांनी त्यांच्या पौढत्वाचं चित्र रंगवताना अशी कल्पना केली नसावी.
हा प्रकार म्हणजे जीवनातील एक महत्त्वाच्या घटनेच्या दिशेनं प्रवासाची सुरुवात होती आणि त्यांना त्यात एकटेपणाचाही अनुभव येणार होता. अशी घटना जी सर्वच महिलांच्या जीवनात येते, पण त्याची फारशी चर्चा होत नाही.
2013 च्या ऑगस्ट महिन्यातील एक सकाळ होती. एका डॉक्टरांनी एम्मा डेलानी यांची फाईल तपासली आणि त्यांना वयाच्या 25 व्या वर्षी रजोनिवृत्ती झाल्याचं सांगितलं.
एम्मा रुग्णालयाच्या खुर्चीवर निर्विकारपणे बसल्या होत्या. डॉक्टर जे काही सांगत होते, त्याच्या विचारांची ये-जा मनात सुरू होती.
काही वर्षांपूर्वी गोळ्या घेल्यानंतर त्यांची मासिक पाळी परत आलीच नव्हती आणि शक्यतो ती परत कधीच येणारही नव्हती. त्या कधीही नैसर्गिकपणे गर्भधारण करण्याची शक्यताच शिल्लक नव्हती.
"मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं. डॉक्टरांनी मला सांगितलं की, मला कधीही मूल होऊ शकणार नाहीत," असं त्या म्हणाल्या.
एम्मा या प्रायमरी ओव्हरियन इनसफिशियन्सी (POI)नावाच्या आजाराने ग्रस्त महिलांच्या ग्रुपच्या सदस्य आहेत.
प्रायमरी ओव्हरियन इनसफिशियन्सी म्हणजे काय?
वयाच्या 40 वर्षांपूर्वी होणाऱ्या कोणत्याही रजोनिवृत्तीशी संबंधित ही स्थिती असते. बहुतांशवेळा यात कोणतंही ठरावीक असं कारण नसतं. POI असलेल्या महिलांना वयाच्या पन्नाशीमध्ये येईपर्यंत रजोनिवृत्तीची लक्षणं दिसू लागतात.
युकेमधील सुमारे 100 पैकी एका महिला अशा प्रकारच्या वैद्यकीय स्थितीचा सामना करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे प्रमाण यापेक्षाही अधिक असू शकतं. पण हा एक असा मुद्दा आहे, ज्यावर पुरेशी चर्चाच होत नाही.

"तरुण वयोगटामध्ये रजोनिवृत्तीसंदर्भात अत्यंत कमी प्रमाणावर संभाषण होतं," असं डॉक्टर आणि टिकटॉक स्टार तसंच रजोनिवृत्ती विशेषज्ञ असलेल्या डॉक्टर निघत आरीफ यांनी म्हटलं.
"सर्वसाधारणपणे आपण वय झालेल्या, पांढऱ्या, करड्या रंगाचे केस झालेल्या महिलांची कल्पना करतो, पण केवळ त्याच याचं प्रतिनिधित्व करतात असं नाही," आरीफ सांगतात.
'मला दोन मुलं होतील हे माझं स्वप्न होतं'
एम्मासारख्या काहीं महिलांच्या संदर्भात त्यांचं अंडाशय काम का करत नाही, हे स्पष्ट नाही.
मात्र, POI हे स्वयंचलित प्रतिकार क्षमता, गुणसुत्रांचा विकार किंवा पोट आणि अंडाशयाच्या शस्त्रक्रियेमुळंदेखील उद्भवू शकतं.
अशा प्रकारच्या आजाराचे शारीरिक परिणामांबरोबर अत्यंत घातक असे मानसिक परिणामही असू शकतात.
एम्माच्या डॉक्टरांनी याबाबत सांगितल्यानंतर त्या सुमारे तासभर त्यांच्या कारमध्ये बसून रडत होत्या.
एम्मा अत्यंत वर्दळ असलेल्या मँचेस्टर सलूनमध्ये काम करतात. त्याठिकाणी येणाऱ्या वृद्ध महिलांकडून जे ऐकलं होतं, त्यापलीकडं त्यांना रजोनिवृत्तीबद्दल काहीही माहिती नव्हतं.
दोन मुलांसह भविष्याचं जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं, ते त्यांच्यापासून हिरावलं गेलं होतं.

पुढचे काही महिने उपचारात एम्मा यांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT)ची औषधं देण्यात आली. त्यांना समजलं होतं की, त्यांच्या अंडाशयानं काम करणं बंद केलं होतं.
तसंच त्याचं शरीर पुरेशा प्रमाणात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची निर्मिती करू शकत नव्हतं.
हे हार्मोन्स शरीरात मासिक पाळीच्या नियंत्रणाचं काम करत असतात. त्याच्या असंतुलनामुळं शरीरावर अनेक वर्षे परिणाम होत होता.
'अल्कोहोल आणि सेक्समुळे करून घेतलं शरीराचं नुकसान'
त्यांना सातत्यानं अनुभव येणारा ब्रेन फॉगचा प्रकार हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग नसल्याचं त्यांना जाणवलं.
शिवाय संपूर्ण शरीरातून फटाके फुटावे अशा प्रकारे उष्णता बाहेर पडणं, हादेखील अनेक तास हेअर ड्रायर चालवल्याचा परिणाम नव्हता.
तसंच रात्रीची झोप न येणं हे निद्रानाशामुळं होत नव्हतं, तर ही सर्व हार्मोन्सच्या असंतुलनाची काही लक्षणं होती.
एम्मा यांच्या आई वयाच्या चाळिशीमध्ये होत्या. पण त्यादेखील अद्याप रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. पण त्यानं फारसा काही फरक पडणार नव्हता.
त्यांच्या मैत्रिणी आता सेटल होऊ लागल्या होत्या, त्यांना स्वतःची मुलं होत होती. मला कोणीही समजून घेऊ शकणार नाही असं वाटत होतं," असं त्या म्हणाल्या.
एम्मा यांनी स्वतःला कामात झोकून दिलं आणि या विषयावर चर्चा करणंच टाळू लागल्या. त्यांनी नाईट आऊट आणि कॅज्युअल डेटिंग सुरू केलं.
पार्टनर आणि मुलं असलेल्या मैत्रिणींच्या अगदी वेगळं जीवन त्यांना जगायचं होतं. "मी अल्कोहोल आणि सेक्स याद्वारे स्वतःच्याच शरीरावर अक्षरशः अत्याचार केले... याबाबत एखाद्याशी बोलणं किती गरजेचं होतं, याची मला जाणीवच नव्हती," असं त्या सांगत होत्या.
रजोनिवृत्ती आणि कॅन्सरशी लढा
अकाली किंवा कमी वयात रजोनिवृत्तीचा सामना करणं हे अत्यंत कठीण ठरतं. मोठ्या प्रमाणावर महिलांचा विचार करता, त्यांनी दुसऱ्या गंभीर आजारावर उपचार सुरू केल्यानंतर, याचं निदान होतं.
लंडन येथील ग्राफिक डिझाइनचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी सो-म्यात नो यांना कॅन्सरच्या उपचारादरम्यान अनपेक्षित दुष्परिणाम म्हणून रजोनिवृत्तीचा सामना करावा लागला.
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांना तिसऱ्या स्टेजचा आतड्यांचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. पोटाच्या भागातील रेडिएशनमुळं त्यांच्या अंडाशयाला इजा झाली पण त्यावेळी त्यांना याचा नेमका अर्थ समजला नव्हता.
"ते सगळे (डॉक्टर, नर्स) पूर्णपणे माझ्या कॅन्सरवर लक्ष केंद्रित करून त्यावर उपचार करत होते. मला कोणीही रजोनिवृत्तीबाबत काहीही सांगितलेलं आठवत नाही," असं म्यात म्हणाल्या. त्यांचा अचानक काही लक्षणे दिसू लागली आणि ती अत्यंत तीव्र होती. त्यात कानात आवाज येणं, जीव घाबरणं आणि थकवा याचा समावेश होता.
सो-म्यात जेव्हा मोठ्या होत होत्या, त्यावेळी त्यांच्यासाठी मासिक पाळी, प्रजनन आणि रजोनिवृत्ती अशा विषयावरची चर्चा ही सर्वसामान्य बाब नव्हती.
त्यामुळं त्यांना याबाबत फारसं काही माहिती नव्हतं. विद्यापीठातील त्यांच्या मैत्रिणींना IUDs आणि गर्भनिरोधक गोळ्यांची कायम चिंता असायची, पण सो-म्यात यांचा अनुभव तसा राहिलेला नव्हता.

"माझ्याबरोबर जे काही घडत होतं, त्यामुळं मी कायम मोठ्या किंवा जास्त वयाच्या लोकांशी जोडले जात होते. माझ्या जीवनातील एक मोठा टप्पाच वगळल्याची जाणीव मला होत होती."
सो-म्यात समुपदेशकांबरोबर मानसिक आरोग्यावर चर्चा करत असतानाही, त्यांच्या रजोनिवृत्तीच्या शारीरिक लक्षणांचा विचार करण्यात आला नाही. त्यांना स्वतःलाच सगळं बोलावं लागलं. किमोथेरपीनंतर आलेला थकवा आणि स्टोमा बॅगचा सामना करताना, त्यांना उपचाराची माहिती मिळवावी लागत होती.
काही प्रकारचे कॅन्सर असलेल्या महिलांना HRT योग्य ठरत नाही. पण सो-म्यात यांच्याबाबत तसं झालं नाही. त्यामुळं त्यांनी उपचार सुरू केल्यानंतर लक्षणांमध्येही सुधारणा झाली.
तेव्हापासून त्यांनी सर्वकाही व्यवस्थित सुरू केलं. HRT सुरू ठेवत त्यांनी इतर काही गोष्टीदेखील सुरू केल्या. फिरायला जाणं त्रास होऊ नये म्हणून गरम पेय टाळणं अशा बाबींचा त्यात समावेश होता.
पण आधीच सुरू असलेल्या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना ही लक्षणं हाताळण्यासाठी सल्ला मिळायला हवा होता, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
"ते फारसं कठीण ठरलं नसतं," असं त्या म्हणाल्या.
डॉ. निघत आरीफ यांचं सोशल मीडिया अकाऊंट अशाच प्रकारचे अनुभव असलेल्या महिलांच्या संदेशांनी भरलेलं आहे. त्यांच्या मते, आरोग्य कर्मचारी आणि तज्ञांनी रजोनिवृत्तीदरम्यान घेण्याच्या काळजीसंदर्भात "अधिक आणि खोलात समजून घेणं" गरजेचं आहे. तसंच सर्वच वयोगटातील महिलांनी याभोवती असलेलं "निषिद्धतेचं" वातावरण बदलणं गरजेचं आहे.
"तुमच्या आयुष्यात असलेल्या महिलांशी चर्चा करा... तुमची आई, आजी, काकू, मावशी, बहिणी किंवा जवळच्या मैत्रिणीशी याबाबत चर्चा करा. यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. त्यांच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा."
प्रेमसंबंधांची इच्छा कमी होत जाणे..
लक्षणांच्या संदर्भात झालेल्या जनजागृतीमुळं आता अधिक महिलांना POI चे निदान होत आहे, पण तरीही अजून बराच पल्ला गाठायचा असल्याचं डॉ. आरीफ म्हणतात. यावर दीर्घकाळ उपचार केले नाहीत, तर त्याचे महिलांची हाडं, हृदय आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असते.
"काही रुग्ण यामुळं अगदीच अंध:कारामध्ये ढकलून देतात. त्यांना कदाचित अपत्यं हवी होती. त्यामुळं त्यांच्या जीवनाबाबतच्या असलेल्या निवडी किंवा इच्छा त्यामुळं दाबल्या जाऊ शकतात," असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. आरीफ यांना इतर काही दुर्मिळ आणि चर्चा न होणारे परिणामही आढळले. लैंगिक संबंधांदरम्यान वेदना, कामवासना कमी होणे यांचा त्यात समावेश होतो.

23 वर्षांच्या एल्सपेथ विल्सन यांनाही याची चांगलीच जाणीव आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांना POIचं निदान झालं होतं. डेटिंग दरम्यान त्यांना लैंगिक संबंधात काही अडचणींचा यामुळं सामना करावा लागला.
"एखाद्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना तुमचं त्याच्यावर प्रेम आहे हे दाखवायचं असतं. पण जेव्हा तुमचं शरीर ते मान्य करत नसतं आणि काही गोष्टी अत्यंत विचित्र बनतात, तेव्हा हे सर्व फार कठीण ठरतं," असं त्या म्हणाल्या.
"मला डॉक्टरांनी याची कल्पना दिली नव्हती, त्याचा सर्वाधिक त्रास झाला." एल्सपेथ यांनी शिक्षणानंतर नुकतीच न्यूकॅसलमध्ये मार्केट रिसर्चर म्हणून पहिली नोकरी सुरू केली आहे. त्यांचे एम्प्लॉयर सहकार्य करत असल्याचं त्यांनी म्हटलं असलं तरी, POI सह या कठीण काळात सर्व सांभाळणं त्यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरणार हे नक्की.
"यामुळं इम्पोस्टर सिंड्रोममध्ये भर पडते. असे काही क्षण असतात जेव्हा मला ब्रेन फॉगची जाणीव होते, तीही अगदी चुकीच्या वेळेला होत असते," एल्सपेथ म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
अशाच परिस्थितीचा सामना करणाऱ्या इतर काही महिलांच्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये त्यांना काहीसं बरं वाटलं. त्यांच्या ग्रुपचॅटमध्ये काहीही मर्यादा नाहीत.
"यासंबंधीचे प्रश्न विचारून त्याला वाट करून देणं हेदेखील अत्यंत आश्वासक असं असतं. तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता याबाबत बोलण्याची क्षमता असेल, तर हे फार सोपं ठरतं."
कॅन्सरमुळं रजोनिवृत्तीचा सामना करावा लागलेल्या तरुण महिलांसाठीच्या ऑनलाईन सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या सो-म्यात यांनीही याबाबत सहमती दर्शवली.
एम्मा यांनीदेखील काळानुरुप हा धडा घेतला आहे.
अनेकवर्षं याबाबतच्या वेदना थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर एम्मा यांनी शेवटी त्यांच्या अनुभवांबाबत अधिक मोकळेपणानं बोलायला सुरुवात केली. एका समुपदेशकाला मनातील सर्वकाही सांगत त्यांनी याची सुरुवात केली. त्यांनी एम्मा यांना पुन्हा स्वतःची ओळख करून दिली.
"मला काय झाले यानं काहीही फरक पडत नाही. मी तीच आहे. मला जे झालंय त्यापेक्षा माझं महत्त्व अधिक आहे. हा धडा शिकणं सर्वात गरजेचं आहे."
काही वर्षांपूर्वी त्यांच्या आरोग्यासंबंधी शारीरिक समस्येची जाणीव असलेल्या एका पार्टनरबरोबर एम्मा यांची भेट झाली. ते दोघे आता सोबत राहतात.

इन्स्टाग्रामवर त्यांनी रजोनिवृत्तीशी संबंधित हॅशटॅग फॉलो सुरू केले असून डेजी नेटवर्क नावाने एक संस्थाही सुरू केली आहे. त्या माध्यमातून POI च्या समस्येचा सामना करणाऱ्या महिलांना माहिती आणि सहकार्य देण्याचा प्रयत्न त्या करतात. यामुळं प्रथमच त्या अशा लोकांशी बोलल्या, ज्यांना त्यांच्या समस्येची जाणीव होती.
सध्या 34 वर्षाच्या असलेल्या एम्मा यांना भविष्यात मुलं असतील असंही वाटतं. आयव्हीएफ किंवा एग डोनेशन हे काहीसं अस्वस्थ करणारं आहे, त्यामुळं पुढच्या काही वर्षात मुल दत्तक घेण्याचा त्यांचा विचार आहे.
तसंच वरचेवर सलूनमध्ये काळा टी शर्ट घालून जाण्याचा निर्धार त्यांनी केलाय. त्यावर "Make Menopause Matter" असा प्रकारचे स्लोगन लिहिलेले आहे. ब्लीच करताना पडलेल्या डागांमुळं त्यांच्या टीशर्टवरचा हा स्लोगन काहीसा झाकला गेलाय.
रजोनिवृत्तीचा सामना करण्यासाठी एम्माचं वय फारच कमी असल्याचं त्याच्या क्लाएंट म्हणतात, तेव्हा त्या सलूनचं काम करताना स्वतःची संपूर्ण मेडिकल कंडिशन समजावून सांगतात.
संपूर्ण आयुष्यात रजोनिवृत्तीबद्दल जेवढी माहिती मिळाली नाही, तेवढी त्यांना 30 मिनिटांत माझ्याकडून मिळाली, असं त्या महिला मला सांगतात.
"मला याचा अभिमान वाटतो की, मी प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाचं, असं काही तरी सांगत आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








