खुदिराम बोस : हातात गीतेची प्रत घेऊन 18 व्या वर्षी फासावर गेलेला क्रांतिकारक

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
19 जुलै 1905 रोजी लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केली. त्यामुळे बंगालच नाही तर सगळ्या भारतभरात इंग्रजांच्या विरोधात आक्रोश व्यक्त होऊ लागला.
सर्वत्र निदर्शनं, मोर्चे, परदेशी मालावर बहिष्कार घातला जाऊ लागला. तसेच वर्तमानपत्रात इंग्रजांविरोधात लेखांचा ओघच सुरू झाला.
त्याच काळात स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांच्या ‘युगांतर’ वर्तमानपत्रात एक लिहिला होता. इंग्पज सरकारने त्याला राजद्रोह मानलं आणि कारवाई सुरू केली.

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS
कलकत्ता प्रांताचे मॅजिस्ट्रेट डग्लस किंग्जफोर्ड यांनी सगळा छापखाना जप्त करायचा आदेश दिला आणि तो लेख लिहिल्याबद्दल भूपेंद्रनाथ यांना एका वर्षाचा कारावास ठोठावला. या निर्णयामुळे आगीत तेल ओतल्यासारखंच झालं.
इतकंच नाही तर किंग्जफोर्ड यांनी वंदे मातरमची घोषणा देणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाला वेताचे 15 फटके देण्याची शिक्षा केली.
यानंतर 6 डिसेंबर, 1907 च्या रात्री मिदनापूर जिल्ह्यातील नारायणगडजवळ बंगाचे लेफ्टनंट गव्हर्नर अँड्र्यू फ्रेजर यांची रेल्वे बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न झाला. त्यात बरिंद्र घोष, उलासकर दत्त आणि प्रफुल्ल चाकी सहभागी होते.
लहानपणापासूनच इंग्रजांना विरोध
1906 साली मिदनापूर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सत्येंद्रनाथ बोस यांनी वंदे मातरम शीर्षकासह एक पत्रक प्रसिद्ध केलं आणि या कार्यक्रमात त्याचं वितरण करण्याचं काम खुदिराम बोस यांना दिलं होतं. या पत्रकात ब्रिटिश सरकारविरोधात मजकूर होता.
खुदिराम ही पत्रकं वाटत असल्याचं इंग्रजांच्याप्रती प्रामाणिक असणाऱ्या रामचरण सेन यानं पाहिलं. ही माहिती त्यानं तिथं तैनात असलेल्या शिपायाला दिली.
त्या पोलीस शिपायानं खुदिरामला पकडण्याचा प्रयत्न केला, पण खुदिराम यांनी त्या शिपायाच्या तोंडावर एक ठोसा दिला. तितक्यात तिथं दुसरे पोलीस आले आणि सर्वांनी मिळून खुदिराम बोस यांना पकडलं.
खुदिराम बोस यांचं चरित्र लिहिणारे लक्ष्मेंद्र चोपडा लिहितात, "सत्येंद्रनाथही त्याच कार्यकर्मात फिरत होते. त्यांनी शिपायांना ओरडून सांगितलं, तुम्ही डेप्युटी मॅजिस्ट्रेटच्या मुलाला का पकडलं आहे? असं म्हणताच शिपाई गांगरले, त्यांची पकड सैल होताच खुदिराम तिथून पळून गेले.
त्यानंतर डी वेस्टन कोर्टानं सत्येंद्रनाथ यांच्यावर पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवून खटला चालवला मात्र तो आरोप सिद्ध होऊ शकला नाही. कोर्टानं आपला निर्णय अशा विशिष्ट प्रकारे दिला की 1906मध्ये सत्येंद्रनाथ यांना अध्यापकपदावरून निलंबित करण्यात आलं. "
खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी पिस्तुल घेऊन मुजफ्फरपूरला पोहोचले
8 एप्रिल 1908 रोजी 17 वर्षांचे खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांना डग्ल किंग्जफोर्डची हत्या करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
याआधी किंग्जफोर्ड यांची पार्सल बॉम्ब पाठवून हत्या करण्याचा प्रयत्न क्रांतिकारकांनी केला होता. मात्र ते पार्सल किंग्जफोर्डनी उघडलं नाही, ते दुसऱ्याच कर्मचाऱ्यानं उघडलं आणि तो जखमी झाला.
या दरम्यान क्रांतिकारकांच्या कारवायांना घाबरुन किंग्जफोर्डने आपली बदली बंगालपासून दूर बिहारमधील मुजफ्फरपूरला करुन घेतली.
युगांतकारी संघटनेतर्फे खुदिराम बोसना दोन पिस्तुलं आणि प्रफुल्ल चाकींना 1 पिस्तुल आणि काडतुसं देण्यात आली आणि मुजफ्फरपूरला पाठवण्यात आलं. हेमंचद कानुनगो यांनी त्यांना काही हातबॉम्बही दिले.

फोटो स्रोत, BHARTIYA GYANPEETH
लक्ष्मेंद्र चोपडा लिहितात, 18 एप्रिल 1908 रोजी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी आपल्या मोहिमेवर मुजफ्फरपूरला पोहोचले. तिथं दोघेही वीर मोती झील भागात एका धर्मशाळेत उतरले.
दोन्ही तरुणांनी किंग्जफोर्डच्या घराचं आणि त्यांच्या दिनचर्येचं बारीक निरीक्षण सुरू केलं.
तोपर्यंत पोलिसांच्या गुप्तचर विभागाला या योजनेची थोडीशी माहिती मिळाली होती. त्यांनी किंग्जफोर्ड यांना सांगून त्यांचं संरक्षण वाढवलं होतं.
किंग्जफोर्ड प्रत्येक रात्री व्हिक्टोरिया बग्गीतून आपल्या बायकोबरोबर स्टेशन क्लबमध्ये येतात हे खुदिराम आणि प्रफुल्ल यांना लक्षात आलं होतं.
क्लबमधून येताना त्यांच्या बग्गीवर बॉम्ब टाकायची योजना त्यांनी आखली.
रात्री साडेआठ वाजता फेकला बॉम्ब
त्या काळी मुजफ्फरपूरच्या स्टेशन क्लबात मोठी रेलचेल असे. तिथं रोज संध्याकाळी ब्रिटिश अधिकारी आणि उच्चपदस्थ भारतीय एकत्र येऊन पार्टी करत. तिथं बैठे खेळही खेळले जात.
मात्र कलकत्त्याच्या तुलनेत इथली संध्याकाळ लवकर आटपत असे.
त्या संध्याकाळी किंग्जफोर्ड एक इंग्रज बॅरिस्टर प्रिंगल कॅनेडी यांची पत्नी आणि मुलीसह ब्रिज खेळत होते. 30 एप्रिल 1908 चा तो दिवस होता.
साडेआठ वाजता खेळ संपल्यावर श्रीमती कॅनेडी आणि ग्रेस कॅनेडी एका बग्गीत बसल्या. ही बग्गी अगदी किंग्जफोर्ड यांच्या बग्गीसारखीच होती. या दुसऱ्या बग्गीत किंग्जफोर्ड दाम्पत्य बसलं. त्या दोघींनीही किंग्जफोर्ड यांच्या घरावरुन जाणाराच रस्ता घेतला होता.

फोटो स्रोत, INDIAN POSTAL DEPARTMENT
नरुल होदा आपल्या 'द अलिपूर बॉम्बकेस' पुस्तकात लिहितात, "ती रात्र अंधारी होती. किंग्जफोर्ड यांच्या घराच्या आवाराजवळ पूर्वेकडील दाराजवळ बग्गी आली तेव्हा रस्त्याजवळ लपलेले दोघे त्यादिशेने पळत आले आणि त्यांनी बग्गीवर बॉम्ब टाकले.
बग्गीच्या ठिकऱ्या उडाल्या आणि त्यात बसलेल्या दोन्ही महिलांना गंभीर जखमा झाल्या. बग्गीबरोबर असेला सेवक जखमी होऊन खाली पडला. सर्व जखमींना किंग्जफोर्ड यांच्या घरी नेण्यात आलं. ग्रेस कॅनेडी यांनी एका तासात प्राण सोडले तर श्रीमती कॅनेडी यांचा 2 मे रोजी मृत्यू झाला."
बोस आणि चाकी यांच्यावर 5 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर झालं.
या घटनेच्या रेकॉर्डमध्ये नमूद करण्यात आलं, 'बॉम्बस्फोट तितका तीव्र नव्हता. मात्र तो अचूक नेम धरुन फेकण्यात आला होता. जर त्यांचा नेम एखादा फुटभर जरी चुकला असता तरी दोनपैकी एका महिलेचा जीव वाचला असता.'
जेव्हा कलकत्ता पोलिसांनी किंग्जफोर्ड यांच्या संभाव्य हत्येबद्दल सूचना दिली होती तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी दोन पोलीस कर्मचारी तहसिलदार खान आणि फैयाजुद्दिन यांची नेमणूक करण्यात आली होती.
30 एप्रिल रोजी संध्याकाळी या दोघांना स्टेशन क्लब आणि किंग्जफोर्ड यांच्या घराच्यामध्ये गस्त घालण्याचं काम दिलं होतं. साडेआठ वाजता स्फोट झाल्यावर त्यांनी दोन लोकांना पळताना पाहिलं पण अंधारात ते गडप झाले होते.
खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी तिथून पळाले मात्र घाई-गडबडीत खुदिरामांच्या चपला तिथंच राहिल्या. या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी मुजफ्फरपूरमधून मोकामा आणि बांकीपूरच्या दिशेने या लोकांना पकडण्यासाठी पोलीस पाठवले.
तसेच या लोकांची माहिती देणाऱ्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं
खुदिराम बोस यांना अटक
या घटनेनंतर सर्व मुजफ्फरपूर शहरात सनसनाटीचं वातावरण तयार झालं. खुदिराम आणि चाकी रेल्वे रुळाजवळून धावत समस्तीपूरच्या जवळ वैनी रेल्वे स्थानकात आले.
त्यांनी रात्रीच्या काळोखात सुमारे 24 मैलाचं अंतर पायीच कापलं होतं.
वैनी स्थानकाबाहेर दोन्ही क्रांतिकारकांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि जगलो-वाचलो तर कलकत्त्यात पुन्हा भेटू असा संकल्प करुन ते वेगवेगळ्या दिशेने निघाले.

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS
लक्ष्मेंद्र चोपडा लिहितात, “1 मे 1908 रोजी सकाळी वैनी स्थानकाजवळ खुदिराम पाणी पिऊन विश्रांती घेत होते तेव्हा आजूबाजूचे लोक कालच्या घटनेची चर्चा करत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यात एक जण सांगत होता, तो किंग्जफोर्ड मेला नाही पण बॉम्बमुळे इंग्रज आई-मुलगी मारली गेली.
हे ऐकून खुदिरामना धक्का बसला आणि मग किंग्जफोर्ड मारला गेला नाही? असे शब्द त्यांच्या तोंडून अनवधानाने बाहेर पडले.
तिथं काही इंग्रज पोलीस आणि हेर फिरत होते. खुदिरामना आलेला थकवा, उत्तेजित होऊन बोलणं, त्यांचं वय, बोलण्यातील बंगाली हेल, त्यांचं अनवाणी असणं य़ामुळे शंका निर्माण झाली आणि त्यांना पकडण्यात आलं. पकडताना त्यांच्या कपड्यातून एक पिस्तुल बाहेर पडलं. त्यांच्या खिशातून 37 काडतुसं आणि 30 रुपयेही मिळाले.”
पायात चपला घालून पाहिल्या
लक्ष्मेंद्र चोपडा लिहितात, खुदिराम यांच्या कंबरेला एक कोट बांधलेला होता. नंतर तहसिलदार खानने क्लबबाहेर खुदिराम यांना हा कोट घातलेला असताना पाहिल्याचं सांगितलं.
बोस यांना अटक झाल्यानंतर जिल्हा मॅजिस्ट्रेट वैनीला पोहोचले. नंतर तहसिलदार आणि फैयाजुद्दिन यांनी खुदिराम बोस यांची ओळख पटवून 30 एप्रिल 1908 साली क्लबसमोर दिसलेल्या दोघांपैकी हा एक असल्याचं सांगितलं. घटमास्थळी सापडलेल्या चपला खुदिराम यांना घालून पाहण्यात आलं.
ते अगदी बरोबर बसले मग खुदिराम यांनी त्या आपल्याच असल्याचं सांगितलं. पोलिसांच्या चौकशीत बोस यांनी आपल्या साथीदाराचं खरं नाव न सांगता दिनेशचंद्र रॉय असं सांगितलं.
खुदिराम बोस यांना पोलिसांनी कैदी बनवून मुजफ्फरपूर स्थानकात नेलं तेव्हा त्यांना पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली
1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता सब इन्स्पेक्टर नंदलाल बॅनर्जी यांनी सिंहभूमला जाणारी रेल्वे पकडली. समस्तीपूर स्थानकावर नंदलालने फलाटावर नवे कपडे आणि चपला घातल्याचं पाहिलं. त्यांना या वेशभूषेमुळे शंका आली.
हा युवक ज्या डब्ब्यात बसला त्याच डब्यात नंदलाल घुसले. त्यांनी त्या युवकाशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो युवक नाराज होऊन दुसऱ्या डब्यात गेला. मोकामा घाट स्थानकाजवळ असताना नंदलाल पुन्हा तो युवक ज्या डब्यात बसला होता त्या डब्यात गेले.

या काळात आपल्याला आलेली शंका त्यांनी लिहून मुजफ्फरपूर पोलिसांना तारेने कळवली. मोकामा स्थानकात त्या तारेला उत्तरादाखल तार आली होती. आपल्याला पकडलं जाणार हे कळताच त्या युवकानं फलाटावर उडी मारली.
नरुल होदा लिहितात, “तो युवक महिलांच्या विश्रांतीकक्षाच्या दिशेने पळाला. तिथं जीआरपीच्या पोलिसानं त्याला पकडायचा प्रयत्न केला. तेव्हा तो युवकानं त्या जवानाच्या दिशेनं गोळीबार केला मात्र नेम लागला नाही. त्या युवकाला
घेरल्यानंतर त्यानं स्वतःवर दोन गोळ्या झाडून घेतल्या. एक गोळी गळ्याला आणि दुसरी कॉलर बोनला लागली. तो तिथंच मृत्युमुखी पडला.”

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS
एका महिन्यातच फाशीची शिक्षा
प्रफुल्ल चाकी यांची ओळख पटवायला तो देह मुजफ्फरपूरला पाठवला गेला. तिथं तहसिलदार खान आणि फैयाजुद्दिन यांनी क्लबजवळ फिरणाऱ्या खुदिरामबरोबर हा माणूसही होता असं सांगितलं.
त्यानंतर तो देह खुदिरामना दाखवला. खुदिरामनी तो ओळखला मात्र त्यांचं नाव मात्र दिनेशचंद्र रॉय असं सांगितलं.

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS
चाकी यांचं पिस्तुल दाखवल्यावर ते खुदिराम ओळखू शकले नाहीत. मात्र दिनेश यांनी आपल्याजवळ पिस्तुल असल्याचं सांगितलं होतं असं ते म्हणाले.
या घटनेच्या 5 महिन्यांनी 9 नोव्हेंबर 1908 रोजी प्रफुल्ल चाकी यांना अटक करणाऱ्या नंदलाल बॅनर्जींची श्रीशचंद्र पाल आणि गनेंद्रबाबू गांगुली यांनी कलकत्त्यात गोळी घालून हत्या केली.
खुदीराम यांच्यावर अपर सत्र न्यायाधीश एच. डब्ल्यू कॉर्नडफ यांच्या कोर्टात खटला चालवला गेला. खुदिराम यांना कोर्टात आणताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभं राहून लोक जिंदाबाद, वंदे मातरमच्या घोषणा देत. 13 जून 1908 रोजी खुदिराम बोस यांना फाशीची शिक्षा झाली.

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS
संपूर्ण भारतात शोक
11 ऑगस्ट 1908 रोजी सकाळी 6 वाजता भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका इतक्या किशोरावस्थेतील मुलाला फाशी देण्यात आली. त्यावेळेस खुदिराम यांच्या हातात गीतेची एक प्रत होती. त्यांचं वय 18 वर्षं, 8 महिने 8 दिवस होतं. तुरुंगाच्या बाहेर त्यांना निरोप द्यायला आलेल्या मोठ्या जमावानं वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या.

फोटो स्रोत, INDIAN POST
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी खुदिराम बोस यांच्या हौतात्म्यावर अनेक लेख लिहिले.
मराठामधून त्यांनी 10 मे 1908च्या अंकात हा तीव्र विद्रोहाचा मार्ग आहे, याला इंग्रज सरकार जबाबदार आहे.
संपूर्ण देशभरात खुदिराम बोस यांची चित्रं वाटली गेली. लेखक बाळकृष्ण भट्ट यांनी आपल्या एका व्याख्यानात खुदिराम बोस यांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली होती. मुन्शी प्रेमचंद यांनी खुदिराम यांचं एक चित्र आपल्या वाचनाच्या खोलीच्या भिंतीवर लावलं होतं

फोटो स्रोत, NIYOGI BOOKS
खुदिराम बोस यांच्या हौतात्म्याचा विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला. त्यांच्या मते, वंदे मातरम आणि आनंदमठाच्या वाचनाची, पाठांतराची आवड निर्माण झाली.
बंगालमधील विणकरांनी एक नव्या प्रकारचं धोतर विणायला सुरुवात केली त्यावर खुदिराम लिहिलेलं असे. पितांबर दास यांनी खुदिराम यांच्यावर एक गाणं लिहिलं ते आजही बंगालमध्ये घराघरात गायलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
ऐक बार बिदाए दे माघुरे आशि....(आई एकदा तरी मला सोड, म्हणजे मी फिरुन येऊ शकेन) असं ते गाणं आहे.
त्यात पुढे लिहिलंय, दश माश दश दिन पोरे, जन्मो नेबो माशीर घरे मा गो, तॉखोन जोदी ना चीनते पारिश, देखबी गोलाए फांशी ( ए आई, आजपासून 10 महिने 10 दिवसांनी मी मावशीच्या घरी जन्म घेऊन पुन्हा येईन, जर तू मला ओळखू शकली नाहीस तर माझ्या गळ्याला फासाचे वळ पाहून तू ओळखू शकशील).
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








