अजगराच्या तेलाने अर्धांगवायूचा उपचार करण्याचा प्रयत्न आणि मग...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एस. महेश
- Role, बीबीसीसाठी
तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील एका वृद्धाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली. सापांना सहसा त्यांचे मांस आणि त्वचेसाठी मारलं जातं. पण औषध बनवण्यासाठी अजगर मारल्याच्या घटना दुर्मिळ आहेत.
नागरकोइलजवळील कल्याणकडू येथील 75 वर्षीय बाला सुब्रमण्यम यांनी अजगराला मारून त्यापासून तेल गोळा केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली.
वनकर्मचाऱ्यांनी त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना अजगराचं तेल सापडलं. अजगराला मारल्याप्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अर्धांगवायूच्या उपचारासाठी सापाचं तेल
कन्याकुमारी जिल्हा वनअधिकारी एम. इलायराजा यांनी सांगितलं की, कन्याकुमारी जिल्हा वन विभागाच्या इतिहासात अशी घटना प्रथमच समोर आली आहे.
"मी जुन्या नोंदीही पाहिल्या आहेत. अजगराची शिकार झाल्याची कोणतीही नोंद झालेली नाही," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
अजगर प्रकरणात अटक करण्यात आलेला बाला सुब्रमण्यम हा दहा वर्षांपासून वन विभागाने स्थापन केलेल्या ग्राम वन समितीचा सदस्य होता.
नुकत्याच गावात शिरलेल्या अजगराला स्थानिकांनी पकडलं. बाला सुब्रमण्यम हे वनखात्याच्या समितीचे सदस्य असल्याने त्यांनी त्याला त्यांच्याकडे सोपवलं.
बाला सुब्रमण्यन यांना अर्धांगवायूशी संबंधित लक्षणं होती. अजगराच्या चरबीच्या तेलाने रोग बरा होईल या आशेनं त्यांनी अजगराला मारलं आणि त्याच्या चरबीतून तेल काढलं.
असं असलं तरी, "तो अजगरांची शिकार आणि तस्करी करणारा माणूस नाही," असं जिल्हा वन अधिकारी इलायराजा यांनी सांगितलं.
कन्याकुमारीच्या राखीव प्रदेशात पानागुडी आणि अरलवाईमूली भागात जंगलं आहेत. त्या ठिकाणी वनजमिनींवर भाडेतत्त्वावर पवनचक्क्या उभारण्यात आल्यात. या परिसरात फारशी लोकवस्ती नसल्याने त्या भागात वन्यप्राणी फिरत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
'स्कंक' (कृष्णधवल रंगाचा व झुबकेदार शेपटीचा उत्तर अमेरिकेत आढळणारा एक प्राणी, ज्याच्यावर हल्ला केला असता तो उग्र घाण वास सोडतो) चे मांस खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते, अशी या प्रदेशात श्रद्धा आहे. त्यामुळे याठिकाणी स्कंकची शिकार केली जाते.
"स्कंक पकडणं सोपं नाही. त्याला पकडणारे काही विशिष्ट लोक आहेत. स्कंकची शिकार आता कमी झालेय कारण त्यांच्यावर पाळत ठेवली जाते आणि शिकारींना वेळोवेळी ताब्यात घेतलं जातं.
तसंच या प्रदेशात सांबर हरणाची शिकारसुद्धा केली जाते. इलायराजा म्हणाले की, वनविभागाने तपासणी नाके उभारून उपाययोजना केल्याने शिकारीचं प्रमाण कमी झालंय.
औषधासाठी उपयुक्त साप दुर्मिळ
पर्यावरण संवर्धक आणि जंगल प्राण्यांशी संबंधित गुन्ह्यांचे संशोधक असलेले शंकर प्रकाश सांगतात की, औषधी तेलासाठी अजगर मारणं दुर्मिळ आहे.
शंकर प्रकाश यांना पश्चिम घाटातील वन्यजीव गुन्हे रोखण्यासाठी वनविभाग आणि आदिवासींच्या भूमिकेवरील संशोधनासाठी डॉक्टरेट मिळाली आहे.

"भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या योजनेअंतर्गत बिनविषारी अजगरांचा समावेश होतो.
आग्नेय आशियाई देशांमध्ये पारंपरिक औषधं तयार करण्यासाठी जंगलातील प्राण्यांची तस्करी केली जाते आणि त्यांच्या शरीराचे अवयव हर्बल औषधं तयार करण्यासाठी वापरले जातात. परंतु सापांचा विचार करता ते त्यांच्या त्वचेसाठी किंवा पाळीव प्राणी म्हणून ठेवण्यासाठी पकडले जातात.
भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्येही मांसासाठी साप मारले जातात”, असं शंकर प्रकाश म्हणाले.
परदेशात प्रजनन घडवून तयार केले जाणारे बॉल अजगर (अजगराचा एक प्रकार), कासव, मकाक (माकडाचा एक प्रकार) आणि पोपट अशा वन्यप्राण्यांची भारतात तस्करी केली जाते.
त्यापैकी बहुतेक थायलंडमधून येतात. तस्करी केलेल्या बहुतेक प्राण्यांचा वापर श्रीमंतांच्या घरात पाळीव प्राणी म्हणून केला जातो.
"जंगली प्राणी भारतात आणताना कधी कधी विमानतळावर पकडले जातात. अधिकारी अशा घटनांवर गुन्हे नोंदवतात आणि त्यांना संबंधित देशांमध्ये परत पाठवतात", असंही शंकर प्रकाश म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








