कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यामागे भाजपा खंबीरपणे उभी राहाणार- देवेंद्र फडणवीस

- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठीसाठी
शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर निर्माण झालेले दोन गट या पार्श्वभूमीवर सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार? यावर सगळ्यांच्या नजरा रोखल्या आहेत.
शिंदेंचा निर्णय सामान्य शिवसैनिकांना खरंच भावला आहे की अजूनही ते ठाकरेंच्याच पाठिशी आहेत, याच्या लिटमस टेस्टसाठी कल्याणशिवाय दुसरा कोणताही मतदारसंघ जास्त उपयुक्त ठरू शकत नाही. कारण शिंदेंचा गड असलेल्या या मतदारसंघात त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत.
कल्याणमध्ये उमेदवारी जाहीर करण्याच्या बाबतीत शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आगेकूच केली आहे. 2014 मध्ये मनसेकडून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात लढलेल्या वैशाली दरेकर-राणे यांना याठिकाणी मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळं आता महायुती त्यांच्याविरोधात कुणाला उतरवणार याकडं लक्ष लागलंय. मात्र आज 6 एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले, " भाजपाकडून श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. शिवसेनेचे उमेदवार असतील, महायुतीचे उमेदवार असतील. भाजपा त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहाणार आहे. त्यांना पूर्ण ताकदीने मागच्यावेळेपेक्षा जास्त मतांनी त्यांना महायुती निवडून आणेल".
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
कल्याणमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख 3 मे तर मतदानाची तारीख 20 मे अशी आहे
कोण आहेत वैशाली दरेकर-राणे?
कल्याणची सुभेदारी पुन्हा मिळवण्याच्या उद्देशानं उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या वैशाली दरेकर-राणे या मूळच्या शिवसैनिक आहे. पण राज ठाकरेंबरोबर त्यांनी शिवसेना सोडली होती.
2009 मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर कल्याणमधील लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना एक लाखावर मतं मिळाली होती.
त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यात विजयी होत त्या सर्वात तरुण वयाच्या नगरसेविका बनल्या होत्या. त्यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पदाची भूमिकाही बजावली होती.
नंतरच्या काळात वैशाली दरेकर-राणे यांनी पुन्हा मनसे सोडत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतील राजकीय फुटीनंतरही त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्या. त्या निष्ठेचं फळ त्यांना मिळालं असं म्हटलं जात आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
आक्रमक नेतृत्व आणि वक्तृत्वावर प्रभुत्व असलेल्या नेत्या अशी वैशाली यांची ओळख आहे. महानगरपालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून काम करताना त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवल्याचं पाहायला मिळालं होतं.
मनसे आणि शिवसेनेतही आंदोलनं किंवा संघटनात्मक कामात सक्रियपणे सहभाग असल्यानं त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे.
उद्धव ठाकरे गटासाठी राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत याठिकाणी असेल असं म्हटलं जात आहे. फार जास्त चर्चा नसतानाही शिवसेनेनं वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं आता हा डाव किती यशस्वी ठरतो याकडंच सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे.
ठाकरे गटाकडून याठिकाणी सुधीरशेठ वंडार पाटील यांच्या नावाची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर असले तरी ते उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेऊन लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती.
ठाणे की कल्याण? शिंदेंसमोरचा यक्षप्रश्न
कल्याणमध्ये महायुतीतील मित्रपक्षांमध्ये काहीही आलबेल नसल्याचं चित्र अनेक दिवसांपासूनच पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांतील घडामोडींमुळं भाजप-शिवसेनेतही याठिकाणी तणाव पाहायला मिळाला होता. त्यामुळं भाजप या जागेसाठी आक्रमक आहे.
श्रीकांत शिंदे आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये इथं अनेकदा वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतरही शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव वाढला होता.
या सर्वामुळं स्थानिक भाजप नेते आणि कार्यकर्ते यांच्या भूमिकेचा विचार करून भाजपनं कल्याण मतदारसंघ त्यांना मिळावा यासाठीचा आग्रह कायम ठेवला आहे.पण शिंदे कल्याणची जागा मिळणारच याची खात्री व्यक्त करत आहेत.
यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची जागा भाजपला देऊन त्या मोबदल्यात कल्याणची जागा श्रीकांत शिंदेंसाठी पदरात पाडून घ्यावी असा एक पर्याय समोर आलेला आहे. भाजपकडून डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे या जागेसाठी प्रचंड आग्रही असल्याची चर्चा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर कल्याणमधील श्रीकांत शिंदेंना असलेला विरोध पाहता त्यांनी ठाण्यातून मैदानात उतरवायचं आणि भाजपला कल्याण मतदारसंघ द्यायचा असा विचारही एकनाथ शिंदेंकडून केला जाण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील नेते राजन विचारे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळं हा गड राखण्यासाठी श्रीकांत शिंदेंना इथून लोकसभेच्या मैदानात उतरवावं असाही विचार त्यांच्यासमोर नक्कीच असू शकतो.
त्यामुळं आता भाजपच्या हट्टापुढे वर्चस्व असलेल्या ठाण्याच्या जागेवर पाणी सोडावं की, मुलाचा कल्याण मतदारसंघ देऊन श्रीकांत शिंदेंना ठाण्यातून उतरवावं हा यक्षप्रश्न शिंदेंसमोर उभा आहे.
मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
कल्याण मतदारसंघात सध्या शिंदेंना भाजपकडून निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करावा लागत असला तरी विरोधकांसह मनसेच्या भूमिकेकडंही त्यांना लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे.
मनसेचा एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीण मतदारसंघ आहे. तसंच एकूणच कल्याणमध्ये मनसेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळं त्याचा विचारही महायुतीच्या उमेदवाराला याठिकाणी करावा लागणार आहे.
राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यातही अनेकदा शाब्दीक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं याठिकाणी राज ठाकरेंचा पाठिंबा घेणं महायुतीच्या उमेदवारासाठी गरजेचं असेल.
मतदारसंघाचा इतिहास
2008 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वेगळ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 2009 मध्ये याठिकाणी पहिल्यांदा निवडणूक झाली आणि अपेक्षेप्रमाणं शिवसेनेनं इथं वर्चस्व मिळवलं.
शिवसेनेचे आनंद परांजपे यांनी वसंत डावखरे यांच्या विरोधात अगदी अटीतटीच्या लढाईत याठिकाणी विजय मिळवला होता. त्यांचं मताधिक्य 25 हजारांपेक्षाही कमी होतं.
विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर-राणे यांनी तेव्हा मनसेकडून लाखभर मतं घेतली होती.

त्यानंतरच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना सोडून गेलेल्या आनंद परांजपे यांचा पराभव केला. परांजपे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करत ही निवडणूक शिवसेनेविरोधात लढवली होती.
त्यानंतर 2019 मध्येही श्रीकांत शिंदे यांनीच इथं विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांचा जवळपास साडेतीन लाख मतांनी पराभव करत शिवसेनेचा हा किल्ला राखला होता.
2019 नंतर बदलली परिस्थिती
राज्यातच नव्हे तर देशात चर्चा झालेल्या राजकीय भूकंपाची परिस्थिती 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर समोर आली. मविआच्या प्रयोगानंतर शिंदेंच्या बंडखोरीनं सर्वांनाच धक्का दिला.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत तीन आमदार भाजपचे आणि शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी एक आमदार अशी स्थिती होती.
बंडखोरीनंतर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप एकत्र आले असले तरी या मतदारसंघात मात्र या दोन पक्षांचं फारसं जमत नसल्याचं पाहायला मिळालं.
खासदार श्रीकांत शिंदे यांचं स्थानिक आमदारांशी फार सख्य नसल्याचंही अनेकदा समोर आलं. त्यातही बालाजी किणीकर, रविंद्र चव्हाण इथपर्यंत ठीक, पण गणपत गायकवाड यांच्याशी थेट संघर्ष पाहायला मिळाला.
या सर्वांचा परिणाम म्हणूनच भाजप कल्याणची जागा त्यांना मिळावी म्हणून अडून बसल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसैनिक कुणाच्या बाजूने?
एकनाथ शिंदेंसाठी ठाणे ही कर्मभूमी असली तरी कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळं हा मतदारसंघही त्यांच्यासाठी तेवढाच प्रतिष्ठेचा आहे.
त्यामुळं महायुतीच्या उमेदवारीचं काहीही झालं तरी, याठिकाणचे स्थानिक शिवसैनिक कुणाच्या बाजुनं उभे राहणार यावर या निवडणुकीचं भवितव्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल.

फोटो स्रोत, ANI
तीन आमदार भाजपचे असले तरी भाजपचा उमेदवार असला तरच त्याचा फायदा होईल. शिवाय विधानसभा आणि लोकसभेची गणितं वेगळी असतात आणि ठाकरे विरुद्ध शिंदे या लढाईत लोकांची भूमिका महत्त्वाची असेल.
राष्ट्रवादी, मनसेच्या याठिकाणच्या शक्तीचाही उमेदवारांना विचार करावा लागेल. त्यावरच महायुतीचा उमेदवार कोण असणार? भाजपचा की शिवसेनेचा? ही सगळी गणितं अवलंबून असू शकतात.
एकूणच उद्धव ठाकरेंनी कल्याणमध्ये उमेदवारी जाहीर करत त्यांची चाल खेळली आहे. आता महायुती त्याला कसं प्रत्युत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असणार हे नक्की.











