लोकसभा : भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लढणार

फोटो स्रोत, Getty Images
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.
भाजपच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवारांचं नाव घोषित करण्यात आलं नाहीय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे, तर गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
केरळमधून काँग्रेस नेते ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची घोषणा करताना, पत्रकार परिषदेत म्हटलं की, "प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून काही नावं आमच्याकडे आली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत तिथल्या स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली."
29 फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 195 जणांची पहिली यादी निश्चित करण्यात आल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं.

फोटो स्रोत, BJP
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडूणक लढतील, अशी माहिती तावडेंनी दिली.
तसंच, या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची नावं या यादीत आहेत. लोकसभा अध्यक्षांचं नावही या यादीत आहे, असं विनोद तावडेंनी सांगितलं.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने सेवा, सुशासन, गरीब कल्याण तसंच सबक साथ, सबका विकास यांचं उदाहरण गेल्या दशकभरात जगभरात प्रस्थापित केलं आहे.
“अनेक महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाले. यावेळी एनडीए चारसौ पारचं उद्दिष्ट घेऊन पुढे जाण्याचं लक्ष्य पंतप्रधानांनी समोर ठेवलं आहे. जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने गेल्या दोन वेळेपेक्षाही प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल हा विश्वास आम्हाला आहे.”
भाजपच्या पहिल्या यादीतील मोठी नावं
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.
मध्य प्रदेशमधील गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे.
राजस्थानच्या बिकानेरमधून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर कोटा इथून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देब यांनाही लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
मथुरेच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
लखीमपूर खिरीमधून अजय मिश्रा टेनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उन्नावमधून साक्षी महाराज यांना उमेदवारी देण्यात आलीय, तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही पुन्हा एकदा अमेठीतून संधी दिली गेलीये.
दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातली 20 नावं
भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी 13 मार्च रोजी जाहीर केली. यात महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
या यादीमध्ये खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबई मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना संधी मिळाली आहे.
नंदुरबारमधून हिना गावीत, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगांवमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामचंद्र तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव पाटील, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीमधून कपिल पाटील, ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमजनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारेे, माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.
कर्नाटकात चिकोडींमधून अण्णासाहेब जोल्ले, विजापूरमधून रमेश जिगजिनगी, गुलबर्ग्यातून उमेश जाधव यांना संधी मिळाली आहे. हावेरीतून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना तिकीट देण्यात आले आहे. धारवाडमधून प्रल्हाद जोशी तर म्हैसूरमधून यदुवीर वाडियार यांना संधी मिळाली आहे.
बंगळुरू उत्तरमधून शोभा करदलांजे यांना बंगळुरू दक्षिणमधून तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी मिळाली आहे. कर्नाटकातील 26 जागांची यादी यामध्ये आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हमीरपूरमधून अनुराग ठाकूर, शिमल्यातून सुरेश कश्यप यांना संधी देण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे.
ठाकरे गटाने पाठींबा दिलेल्या कलाबेन डेलकर यांना दादरा नगर हवेलीतून तिकीट देण्यात आले आहे.











