You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी सिझेरियन केलं, माझी सून आणि नातू दोघेही मरण पावले’
- Author, प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईच्या पूर्व उपनरातील भांडूपमधील महानगरपालिकेच्या रूग्णालयात वीज गेल्यानंतरही मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात एका गरोदर महिलेचं सिझेरियन करण्यात आलं. त्यामध्ये तिला आणि नवजात शिशूला स्वत:चा जीव गमवावा लागला.
लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याचा आणि घरात मूल जन्माला येण्याचा आनंद साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या अन्सारी कुटुंबावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ज्या रूग्णालयात ही घटना घडली तिथे यापूर्वीसुद्धा रूग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांकडून हलगर्जीपणाच्या घटना घडल्या असूनही प्रशासन ढीम्म आहे.
“मला माझ्या बाळाचा चेहरा दाखवला तेव्हा तो मेला होता. पण त्यांनी मला दिलासा दिला की त्याच्या तोंडात कचरा गेलाय, आम्ही तो साफ करतोय. धीर धरा बाळ व्यवस्थित आहे. त्यानंतर 5-10 मिनिटांनी येऊन त्यांनी मला सांगितलं की माझं बाळ मरण पावलंय.”
मृत्यूमुखी पडलेल्या नवजात शिशुचे वडिल खुसरूद्दीन अन्सारी कॅमेऱ्याकडे एकटक पाहत सांगत होते. त्यांच्याकडे सांगण्यासारखं दुसरं काहीच नसतं.
“बाळ जन्माला येतं तेव्हा पोटाच्या खालच्या दिशेने सरकतं, पण माझ्या सूनेचं बाळ छातीच्या दिशेला होतं आणि दोन डॉक्टर वरून ते खाली ढकण्याचा प्रयत्न करत होते. आमचं बाळ त्याचवेळेला पोटात मेलेलं होतं. त्यांनी प्रसृतीसाठी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि नंतर काहीतरी गडबड झाल्याने माझ्या मुलाची कागदपत्रावर सही घ्यायला बाहेर आले.
"सुनेला आत नेलं तेव्हा वीज गेली. तरीही त्यांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सिझेरियन केलं. माझी सून आणि नातू आधीच मरण पावलेला. तरी आम्हाला सांगितलं गेलं की सर्वकाही आलबेल आहे," सूनेच्या आणि नातवाच्या दु:खात रडून रडून बसलेल्या आवाजात नजबून निसा अंन्सारी सर्व हकीकत सांगत होत्या.
साहिदुन आणि खुसरूद्दीन अन्सारी यांच्या लग्नाचा येत्या 15 मे रोजी पहिला वाढदिवस होता. खुसरूद्दीन एका पायाने अधू आहेत. ब-याच काळाने त्यांचं लग्न ठरल्याने आणि वर्षभराच्या आतच घरात गोड बातमी मिळणार असल्याने संपूर्ण अन्सारी कुटुंब आनंदी होतं.
नऊ महिन्यांच्या काळात नियमितपणे तपासणीसाठी जाणा-या साहिदुन आणि त्यांच्या बाळाची तब्येत चांगली होती. नैसर्गिक प्रसृती होईल असं डॉक्टरांनी सांगितलेलं. 29 एप्रिल रोजी दवाखान्यात दाखल झाल्यानंतरही प्रसृतीकळांव्यतिरिक्त संध्याकाळपर्यंत सर्वकाही ठीक होतं.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या पूर्व उपनगरातील हनुमान नगर भागात राहणा-या साहिदुन अन्सारी या 26 वर्षीय महिलेला प्रसृतीकळा येत असल्याने प्रसृतीसाठी भांडूप येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुषमा स्वराज प्रसूतिगृहामध्ये 29 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता दाखल करण्यात आले होते.
डॉक्टरांनी साहिदुन यांची तपासणी करून नैसर्गिक प्रसृती होईल असं सांगितलं. दुपारी बारा वाजले तरी प्रसृतीकळा थांबेना म्हणून नातेवाईकांनी डॉक्टरांकडे पुन्हा विचारणा केली. पहिलं मुलं असल्याने थोडा वेळ लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
दुपारी दोन वाजेपर्यंत कळा आणखी वाढल्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा चौकशी केली. पण डॉक्टरांनी पुन्हा आई आणि मूल दोन्ही चांगल्या स्थित असल्याचं सांगितलं. साहिदुन यांना वेदनेने तडफताना पाहून नातेवाईकांनी डॉक्टरांना सिझेरियन करण्याची विनंती केली. पण तेव्हासुद्धा डॉक्टरांनी तास-दीड तासात नैसर्गिक प्रसृती होईल, असं सांगितल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे.
पण तिला वेदना होत असतील सिझेरियन करून टाका असं नातेवाईक म्हणाले. डॉक्टर त्यावर काहीच बोलले नसल्याचा त्यांचा दावा आहे.
डॉक्टरांच्या सांगण्यावरून संध्याकाळी नातेवाईकांनी साहिदून यांना चहा आणि बिस्किट दिलं. संध्याकाळी अर्भकाच्या ह्रदयाचे ठोके 110 होते. आता प्रसृती करू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले.
नातेवाईकांच्या परवानगीशिवाय डॉक्टरांनी साहिदुन यांच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेड मारलं आणि जबरदस्तीने प्रसृती करण्याचा ते प्रयत्न करू लागल्याची माहिती साहिदून यांची मावशी रेहमुन्निसा यांनी दिली. तिच्या शरीरातून भरपूर रक्त वाहून गेलं.
त्याचवेळी मुलाच्या ह्रदयाचे ठोके 40 पॉईंटवर आल्याचं डॉक्टरांनी सांगत सिझेरियन करावं लागेल, असं सांगितलं. डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन कागदपत्रांवर खुसरूद्दीन यांची सही घेतली.
रेहमुन्निसा पुढे म्हणाल्या की, तिच्या शरीरावरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता की आम्हाला काय करावं हेच कळत नव्हतं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तिला सिझेरियन रूममध्ये घेऊन जायचंय. तिला तिथे घेऊन जाण्यासाठी रूग्णालयातील मावशी किंवा परिचारिकांपैकी कुणीच तिथे हजर नव्हत्या. तिची मॅक्सी रक्तात माखली होती. खाली रक्त सांडत होतं.
"हे सर्व पाहून मीच घाबरले आणि मला रडू कोसळलं. डॉक्टरांनी मलाच तिची मॅक्सी काढायला सांगितली. मला कैची देऊन तिची रक्तात माखलेली मॅक्सी फाडायला सांगितली. तिला सिझेरियन रूमपर्यंत नेण्यासाठी त्यांच्याकडे व्हिलचेअर किंवा स्ट्रेचरही नव्हतं. तिच्या मागेपुढे कपडा धरून आम्ही तिला चालवत सिझेरियन रूमपर्यंत घेऊन गेलो. त्याचवेळी रूग्णालयाची वीज गेली होती."
त्या पुढे सांगायला लागल्या, "साहिदुनला प्रचंड दुखत होतं आणि ती माझ्या चेह-याकडे पाहत होती आणि मी तिला दिलासा देत होते. ऑपरेशन नंतर मुलाला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा त्याच्या वडिलांना बोलावून सांगितलं की मुलाची तब्येत गंभीर आहे, त्याच्या तोंडात कचरा गेला आणि तो साफ करतोय. पण सर्वकाही ठीक होईल. खरंतर मुलगा तेव्हाच मरण पावलेला होता, पण त्यांनी आमच्यापासून ते लपवलं.
"काही वेळाने येऊन सांगितलं की मुलाचा मृत्यू झालाय. त्यानंतर आईला दुस-या रूग्णालयात नेण्यासाठी बाहेर काढण्यात आलं. रूग्णाला रूग्णवाहिकेत हलवण्यासाठीही त्यांच्याकडे स्टाफ नव्हता. आमच्या कुटुंबातील लोकांनीच तिला रूग्णवाहिकेत हलवलं. त्यांच्याकडे ऑक्सिजनची सुविधादेखील नव्हती. तिच्या तोंडातून फेस येत होता.
"आम्ही त्यांना प्रश्न विचारल्यावर तिला फिट आल्याचं त्यांनी सांगितलं. खरंतर तिचा रूग्णालयातच मृत्यू झालेला. तरीही आमच्या मुलीला सायन रूग्णालयात पाठवण्यात आलं. तिथे गेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आलं."
आम्ही रूग्णालयात आनंदाची बातमी ऐकायला गेलो होतो, परंतु तिथल्या डॉक्टरांनी आमच्या पदरात दु:ख दिल्याचं रेहमुन्निसा यांचं म्हणणं आहे.
'आमच्या टीमने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली'
या प्रकरणी मुंबई महानगपालिकेने केईएम, शीव, नायर रूग्णालयातील दहा तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली आहे. ही समिती आठवडाभरात त्यांचा अहवाल सादर करणार असून, त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
रूग्णालयात जनरेट आहे, मात्र त्याची त्या दिवशी संपूर्ण परिसरात वीजेचा घोळ सुरू होता. तरीही आमच्या टीमने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याचं डॉ. दक्षा शहा यांनी सांगितलं.
मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात प्रसृती करण्याविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या की, "आमच्या टीमने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. त्याच दिवशी मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात आमच्या स्टाफने आणखी एक नैसर्गिक प्रसृती केली. वीजेसाठी आम्ही पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत."
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप पश्चिमेच्या ‘एस विभाग’ कार्यालयाचे वैद्यकीय कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश वायदंडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून संपूर्ण अहवाल हाती आल्यानंतरच नेमकं काय घडलं यावर भाष्य करता येईल आणि त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.
पालिका रूग्णालयात सुविधांचा अभाव?
सुषमा स्वराज प्रसृतीगृहामध्ये यापूर्वीही डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या घटना घडल्याचा आरोप या विभागाच्या माजी नगरसेविका जागृती पाटील यांनी केला आहे.
बीबीसी मराठीसोबत बोलताना त्या म्हणाल्या, "पालिका रूग्णालयात सुविधांचा अभाव आहे. वारंवार तक्रारी करूनही कुठलीही कार्यवाही होत नाही. ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवशी रात्री साडेबारा वाजता मी तिथे पोहोचले आणि सकाळी पाऊणे चार वाजेपर्यंत रूग्णालयात होते. वारंवार फोन केल्यानंतर रूग्णालयाच्या डीन रात्री अडीच वाजता तिथे आल्या. 27 एप्रिलपासूनच रूग्णालयातील जनरेटर नादुरूस्त होता. आम्ही त्याबद्दल प्रशासनाला तक्रारदेखील केली होती."
ही घटना घडली त्या दिवशी सकाळपासून सात वेळा वीज गेल्याचं जागृती पाटील यांनी सांगितलं.
जनरेटर नादुरूस्त असेल तर मुंबईसारख्या शहरात विजेची पर्यायी व्यवस्था सहज करता येऊ शकते. बॅटरीवर चालणा-या लाईट लावता येऊ शकतात. मात्र तरीही मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात प्रसृती केली जाते, ही अतिशय गंभीर बाब असल्याचं पाटील म्हणाल्या.
रूग्णालयाच्या डीन डॉ. चंद्रकला कदम यांनी त्यांच्या स्टाफकडून चूक झाल्याचं मान्य केलं असून तसं लेखी पत्रही दिलंय. तरीही त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पालिकेकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पण, एका महिलेचा आणि नवजात शिशुचा जीव जाऊनदेखील प्रशासन नेमकं कुणाला आणि का वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवालदेखील जागृती पाटील यांनी उपस्थित केला.
आम्ही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही. पालिकेतील सुविधांच्या अभावामुळे सोमवारी रूग्णालयावर मोर्चा नेण्यात येणार असून माजी खासदार किरीट सोमय्या देखील यावेळी उपस्थित असणार आहेत.
अधिक माहितीसाठी बीबीसी मराठीने रूग्णालयाच्या डीन डॉ. चंद्रकला कदम यांना रूग्णालयात जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट होऊ शकली नाही. वारंवार फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
'माझ्या बहिणीला मारलं गेलं'
“साहिदुन आम्हा सर्व भावंडांमध्ये सर्वांत धाकटी होती. लग्नानंतर आणि गर्भवती असताना ती अतिशय आनंदी होती. मी तिच्याशी रोज फोनवर बोलायचे. तिला कोणताही त्रास नव्हता. पोटातील तिचं बाळही चांगल्या स्थितीत होतं.
"मला तिने बाळासाठी गावावरून काही सामान आणायला सांगितलं होतं. मी तिच्यासाठी सर्व सामान घेऊन आले होते. तिच्यासाठी आणलेल्या सामानाची बॅग आता तशीच पडून आहे. आमच्या हातून बाळही गेलं आणि तीसुद्धा आम्हाला सोडून गेली. माझ्या बहिणीला ठरवून मारण्यात आलंय. तिच्या मृत्याचा आमच्या वडिलांना धक्का बसलाय. ते हॉस्पिटलमध्ये अंथरूणाला खिळून आहेत," शाहजहान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“मी त्यांच्याकडे विनंती करून थकले की मला बाळाला बघू द्या, पण मला कुणीच दाद दिली नाही. आमचं बाळ मेलेलंच जन्माला आलं. आमच्या बाळाच्या तोंडाजवळ बर्फ ठेवला होता. त्याच्या तोंडाजवळ रक्त साकळलं होतं. त्याच्या आजूबाजूला माश्या घोंगावत होत्या. आमचं बाळ लावारिस असल्यासारखं पडलं होतं. माझ्या बहिणीवर उपचार करणा-या परिचारिका आणि डॉक्टरचं लायसन रद्द केलं पाहिजे, त्यांना कुठेही नोकरी मिळता कामा नये. आम्हाला मला न्याय पाहिजे," असं शाहजहान म्हणाल्या.
'भांडूपमध्ये तीन चार वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता'
इलेक्ट्रिक विभागातील इलेक्ट्रीकलचा अतिरिक्त चार्ज असलेले वीज अभियंता मयुर भागवत बीबीसीसोबत बोलताना म्हणाले की, “आमच्या विभागाकडे हॉस्पिटलच्या वीजेची जबाबदारी येत नाही. या भागातील वीज नेमकी कशामुळे गेली आणि रूग्णालयातील जनरेटर सुरू आहे की बंद याची आम्हाला काहीच कल्पना नाही.”
महावितरणचे भांडूप विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. टी. दंडवते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले की, "ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी संपूर्ण भांडूप परिसरात दिवसभरात तीन-चार वेळा वीज खंडीत झाली होती. तापमान वाढल्यामुळे वीजेवरील भार वाढला आणि या परिसराला वीजपुरवठा करणारी मुख्य लाईन बंद पडल्याने वीज खंडित झाली. त्याचा परिणाम रूग्णालयालादेखील झाला असावा," असं दंडवते यांनी सांगितलं.
तीन महिन्यापासून जनरेटर खराब
वीज गेल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लावण्यात आलेला जनरेटर गेले तीन महिने म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून नादुरूस्त असल्याचा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलम कदम यांनी पीडित अन्सारी कुटुंबीय, माजी खासदार किरीट सोमय्या आणि माजी नगरसेविका जागृती पाटील यांच्यासोबत रूग्णालयात झालेल्या भेटीत बोलताना केला.
ज्यादिवशी ही घटना घडली त्या दिवशी दिवसभरात तीन-चार वेळा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, जनरेटर नादुरूस्त असल्याने रूग्णालयातील वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
साहिदुन अन्सारी आणि त्याच्या नवजात शिशुच्या मृत्यूनंतर भांडूप येथील सुषमा स्वराज महापालिका रूग्णालयाच्या डीन डॉ. चंद्रकला कदम आणि त्यादिवशी महिलेची प्रसृती करणाऱ्या दोन डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असल्याचंही डॉ. कदम यांनी सांगितलं. पीडित कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून सविस्तर वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आवश्यक कारवाई केली जाईल, असंही डॉ. कदम म्हणाल्या.
पीडितेची प्रकृती खालावली होती का?
दरम्यान, प्रसृतीसाठी रूग्णालयात दाखल झालेली गरोदर महिला व अर्भकाची तब्येत बिघडलेली होती आणि सिझेरियनचा पर्याय देऊनही नातेवाईकांनी त्याला नकार दिल्याचं रूग्णालय प्रशासनातील परिचारिकेने डॉ. निलम कदम यांच्या समक्ष सर्वांसमोर बोलताना सांगितलं.
सदर घटना घडली तेव्हा त्या रूग्णालयात उपस्थित नव्हत्या, मात्र आपल्या ऐकण्यात आलेल्या गोष्टींवरून हे सांगत असल्याचंही त्या म्हणाल्या. पीडितेच्या नातेवाईकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
साहिदुनचे पती खुसरूद्दीन अन्सारी यांनी बीबीसीला सांगितलं की,"ज्या परिचारिकेने माझी बायको आणि बाळाची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं ती परिचारिका त्यादिवशी रूग्णालयात उपस्थितच नव्हती. आम्ही गेले नऊ महिने नियमितपणे त्याच रूग्णालयात तपासणीसाठी जात होतो, मात्र माता आणि अर्भकाला कोणताही त्रास असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं नाही. एकाद्या व्यक्तीला अचानक कशी फिट येऊ शकते," असा सवालही अन्सारी यांनी विचारला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2011 च्या शासन निर्णयानुसार एखादी घटना डॉक्टरांशी संबंधित असल्यास त्यामध्ये जोपर्यंत वैद्यकीय अहवाल हाती येत नाही, तोपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय अहवाल हाती आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असं भांडूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जायकर बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले.