हॉलिवूड सेलिब्रेटी अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचं नातं घटस्फोटापर्यंत कसं गेलं?

    • Author, विकी वॉन्ग

आठ वर्ष घटस्फोटाचा न्यायालयीन खटला लढल्यानंतर हॉलिवूडचं सेलिब्रेटी कपल अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्यात तडजोड झाली आहे. त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालाय. अँजेलिनाच्या वकिलांनी याबद्दलची माहिती माध्यमांना दिली आहे.

अमेरिकेतल्या एपी या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे, घटस्फोटाबद्दल ब्रॅड पिट यांच्या वकिलांना संपर्क करायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हॉलिवूडच्या या प्रसिद्ध जोडप्याने 2014 ला लग्न केलं होतं. त्यांना सहा मुलं आहेत. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान मुलांचा ताबा कोणाकडे जाणार यावरूनही खूप वाद झाले.

लग्नानंतर दोनच वर्षांत 2016 मध्ये अँजेलिना यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यावेळी एकमेकांत तीव्र मतभेद असल्याचं कारण त्यांनी दिलं होतं.

नंतर न्यायालयीन सुनावणीच्या वेळी दोघांनी एकमेकांवर केलेल आरोप समोर आले. ब्रॅड पिट यांनी एका खासगी विमानात अँजेलिना आणि त्यांच्या दोन मुलांना मारहाण केल्याचा आरोपही त्यात होता.

ब्रॅड पिट यांनी हे आरोप धुडकावून लावले. या घटनेचा पोलिसांनीही तपासही केला. मात्र, पिट यांच्यावर त्यांच्यावर खटला भरला गेला नाही.

नंतर दोघांमध्ये मुलांना सांभाळण्यावरून वाद सुरू होती. 2021 मध्ये एका न्यायाधिशाने मुलांचा ताबा दोघांनाही एकत्रित मिळेल असा निर्णय दिला.

जोलीच्या वकिलांनी काय माहिती दिली?

जोली यांचे वकील जेम्स सायमन यांनी पिपल्स मॅगझिन या मासिकाला प्रतिक्रिया दिली होती.

घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून त्यांच्या अशील, म्हणजे जोली, कुटुंबात शांतता असावी आणि दुखावल्या मनांवर फुंकर मारली जावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय.

"आठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका लांबलचक प्रक्रियेचा हा केवळ एक भाग आहे. खरं सांगायचं तर अँजेलिना फार थकल्या आहेत. पण निदान प्रक्रियेचा एक भाग पूर्ण झाला असल्याचं समाधान त्यांना वाटतंय," असं सायमन म्हणाले.

तडजोडीच्या अटी मात्र त्यांनी सार्वजनिकरित्या सांगितल्या नाहीत.

2016 मध्ये पहिल्यांदा दोघं वेगळे होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं, तेव्हा जोडप्याने एक निवेदन जाहीर करत ही प्रक्रिया खासगीत करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर दोघांनीही याबद्दल जाहीरपणे काहीही बोलायला नकार दिला.

न्यायलयीन सुनावणीच्या वेळी मिळालेल्या माहितीवरून दोघांमध्ये असलेल्या मतभेदांचं स्वरूप लक्षात आलं.

पिट सूडाच्या भावनेनं घटस्फोटाची लढाई ताणत असल्याचा आरोप जोली यांनी लावला होता. तर त्यांच्या व्यवसायाला तोटा व्हावा यासाठी जोली मुद्दाम प्रयत्न करत असल्याचं पिट यांचं म्हणणं होतं.

आता घटस्फोटाच्या तडजोडींवर दोघं सहमत झाले आहेत. मात्र, फ्रान्समधल्या द्राक्षाच्या बागांवरून दोघांमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा निघाला की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

तणाव वाढवणारी द्राक्ष्यांची बाग

फ्रान्समधल्या 'शेत्यू मिरावाल'मध्ये एक मोठी द्राक्ष्यांची बाग दोघांनी मिळून 2008 साली 2.5 कोटी युरो किंमतीला विकत घेतली होती. त्यानंतर सहा वर्षांनी याच बागेत त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता.

त्यातला स्वतःचा हिस्सा जोली यांनी रशियन अब्जाधीश युरी शेल्फर यांना विकल्याचा आरोप पिट यांनी 2022 मध्ये केला.

युरी शेल्फर पेय पदार्थांच्या क्षेत्रातल्या मोठ्या उद्योगपती आहेत. अन्य पदार्थांसोबतच स्टोलिचनाया नावाच्या वोडका ब्रँडच्याही त्या मालक आहेत.

जोली यांनी द्राक्षाच्या बागेतला त्यांचा हिस्सा विकल्यानं पिट यांंनी मेहनतीनं उभारलेल्या वाईन व्यवसायाला मोठा फटका बसल्याचं न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

पिट यांचा व्यवसाय फार जलद गतीने वाढत होता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक यशस्वी उदाहरण म्हणून प्रसिद्ध होत होता, असं पिट यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. त्यात जोली यांचं काहीही योगदान नाही.

'आपला हिस्सा विकून जोली यांनी पिट यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला,' असं याचिकेत म्हटलं आहे.

जोली यांचं म्हणणं काय?

2016 मध्ये एका खासगी विमानात मुलांसोबत प्रवास करत असताना ब्रॅड यांनी जोली यांना आणि त्यांच्या दोन मुलांना मारहाण केल्याचं आणि मानसिक त्रास दिल्याचं न्यायालयीन कागदपत्रात म्हटलं आहे.

विमानात झालेल्या भांडणादरम्यान पिट यांनी जोली यांना धक्का मारला. दोन्ही मुलांनाही जबर मारहाण केली असं जोलीच्या वकिलांचं म्हणणं आहे.

पिट यांनी हे आरोप नाकारले.

यामुळे दोघांमध्ये मुलांचा ताबा कोणाला मिळणार यावरून कायदेशीर लढाई सुरू होती. 2021 मध्ये दोघांना एकत्रित ताबा दिला गेला.

2024 च्या जून महिन्यात या जोडप्याचं तिसरं आपत्य, शिलॉय हिनं तिच्या नावातलं पिट हे आडनाव काढून टाकण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल केली.

जोली यांच्या इतर दोन मुलांनीही पिट यांच्या नावाचा वापर करणं बंद केल्याचं बोललं जातंय.

त्यांचं लग्न झालं तेव्हा अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट हे हॉलिवूडमधल्या सर्वात आकर्षक जोडप्यांपैकी एक होतं.

त्यांच्या घटस्फोटाची घोषणा झाल्यानंतर फोर्ब्स मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटलं आहे की, त्यांची अंदाजे संपत्ती 40 कोटी डॉलर होती.

एकेकाळचं सेलिब्रेटी जोडपं

चाहत्यांमध्ये 'ब्रँगेलिना' म्हणून हे जोडपं प्रसिद्ध होतं. दोघांची ओळख 2005 च्या 'मिस्टर अँड मिसेस स्मिथ' या सिनेमाच्या शुटिंगवेळी सेटवर झाली होती.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही त्यांच्या नातेसंबंधाचा विषय आवडीने चघळला जात असे.

हॉलिवूडच्या फ्रेन्ड्स या टीवी सिरियलमधल्या जेनिफर ॲनिस्टनसोबत पिट यांचे पहिले नातेसंबंध होते. त्यानंतर अँजेलिना यांच्याशी त्यांचं दुसरं लग्न झालं.

अँजेलिना यांचंही याआधी दोनवेळा बिली बॉब आणि जॉनी ली मिलर यांच्याशी लग्न झालं होतं.

'लॉरा क्राफ्ट : टॉम्ब राइडर', 'चेंजलिंग अँड गर्ल' आणि 'इंटरप्टेड' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये जोली यांनी काम केलं आहे. त्यांचा नवा सिनेमा ऑपेरा गायक मारिया कलास यांच्या जीवनावर आधारित आहे.

तर, पिट यांनी 'फाइट क्लब', 'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड' आणि 'ट्वेल्व मंकीज' यासारख्या चित्रपटात प्रमुख भुमिका साकारली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)