हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये सध्या काय स्थिती आहे? लोक काय म्हणत आहेत? - ग्राऊंड रिपोर्ट

- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
वक्फ (दुरुस्ती) कायद्याला केंद्र सरकारनं दिलेल्या मंजुरीनंतर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या खाणाखुणा अजूनही त्या परिसरात दिसत आहेत.
राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे परिस्थिती हळूहळू स्थिर होताना दिसत असली तरी या घटनेचे पडसाद अजूनही जनमानसात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर घटनास्थळावरून बीबीसीने घेतलेला ग्राऊंड रिपोर्ट.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील धुलियान आणि आसपासच्या हिंसाचारग्रस्त भागात परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. येथील हिंसाचारामुळं घरं सोडून गेलेले लोक आता परतत आहेत.
काही दिवसांपूर्वी वक्फ (दुरुस्ती) कायद्याला विरोध करताना येथे हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. आता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोलीस आणि निमलष्करी दलांचा मोठा बंदोबस्त दिसत आहे.
बीबीसीने मंगळवारी (दि.15) मुर्शिदाबादमधील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
बीबीसीला धुलियनमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या खुणा स्पष्टपणे दिसल्या. मोडतोड केलेली घरं-दुकानं, जळालेली वाहनं जागोजागी दिसत होती. मुख्य रस्त्यांवर आता जळालेली वाहनं नसली तरी त्यांच्या खाणाखुणा मात्र अजूनही दिसत आहेत.

हिंसाचार झालेल्या भागात अनेक ठिकाणी घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या दिसतात. दुकानांचे शटर तोडलेले दिसत आहेत. रस्त्यांवर पोलिसांची वाहनं सतत गस्त घालत असतात. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान ठिकठिकाणी तैनात असल्याचे दिसतात.
मात्र, हळूहळू येथील परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. इतर वाहनंही रस्त्यावरून ये-जा करताना दिसतात. आता काही दुकानंही पुन्हा सुरू झाली आहेत.
हिंसाचारग्रस्त लोकांचं म्हणणं काय आहे?
धुलियानमधील वातावरण आता थोडंसं शांत झालं आहे. हिंसाचारग्रस्त लोक आपलं उरलेलं साहित्य गोळा करताना दिसले. काही लोक तुटलेल्या काचा आणि नुकसान झालेल्या घरांची साफसफाई करताना दिसले.
तिथे आम्हाला सूर्यदीप सरकार भेटले.
सूर्यदीप सरकार यांनी बीबीसीला सांगितलं की, "आंदोलक नियंत्रणाबाहेर गेले होते. त्यांनी घरांवर आणि दुकानांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. याचदरम्यान काही मुस्लिम विद्यार्थिनी जमावापासून आणि हिंसाचारापासून वाचण्यासाठी माझ्या दरवाज्याजवळ धावत आल्या. त्या रडत होत्या. आम्ही त्यांना वाचवलं."

सूर्यदीप यांनी सांगितलं की "हल्लेखोरांना आम्ही म्हणालो, तुमच्याच समाजातील मुलींचे प्राण आम्ही वाचवत आहोत. आमच्यावर हल्ला करू नका, तरी त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि घराबाहेर नासधूस केली.
आता परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
आम्ही आणखी एक स्थानिक व्यक्ती सुकांत भट्टाचार्य यांना भेटलो. शुक्रवारी मोठी मोर्चा निघाला होता, असं त्यांनी सांगितलं.
"तो मोर्चा परत आल्यानंतर तोडफोड सुरू झाली. माझ्या घराचीही तोडफोड करण्यात आली. माझ्या घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. आम्ही कसंबसं तिथून पळून आलो. अन्यथा आमचा जीव वाचला नसता. आम्ही कसं वाचलो ते ईश्वरालाच माहीत."
हिंसाचाराच्या वेळी लुटमारीचाही प्रयत्न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पोलीस काय म्हणत आहेत?
दरम्यान, पश्चिम बंगालचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) जावेद शमीम यांनी सांगितलं की, हिंसाचाराच्या संदर्भात दोनशेहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत एकूण 11 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये नामांकित तसेच अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.
ते म्हणाले की, पीडित आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे आणखी काहींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे.

राज्याचे पोलीस प्रमुख राजीव कुमार यांनी सांगितलं की, मालदा येथून प्रक्षोभक बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळं मुर्शिदाबादला लागून असलेल्या इतर जिल्ह्यांतील काही भागात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांना शोधून पकडलं जाईल, असे ते म्हणाले आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जात आहे.
याच दरम्यान, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अतिरिक्त कंपन्याही येथे पोहोचल्या आहेत.
याआधी, कोलकाता उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय बल तैनात करण्याचे निर्देश दिले होते.
मुर्शिदाबादमध्ये नक्की काय झालं होतं?
वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरोधात मुर्शिदाबादमध्ये मोठी निदर्शने झाली होती. या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला अन्य यात तीन जणांचा मृत्यू झाला.
एजाज अहमद (17), हरगोविंद दास (65) आणि चंदन दास (35) अशी मृतांची नावं आहेत. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या विविध भागांतून वक्फ कायद्याला विरोध होत असल्याच्या बातम्या सातत्यानं येत आहेत.
यानंतर, कोलकाता उच्च न्यायालयानं शनिवारी राज्यात केंद्रीय सुरक्षा दलांना तत्काळ तैनात करण्याचे आदेश दिले होते.

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर हा आदेश देण्यात आला होता. त्यात त्यांनी जिल्ह्यात केंद्रीय दले तैनात करण्याची मागणी केली होती.
इतकंच नाही तर केंद्रीय गृहसचिवांनी हिंसाचाराच्या मुद्द्यावर पश्चिम बंगालच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व
2011 च्या जनगणनेनुसार मुर्शिदाबादमधील 66 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या मुस्लिम आहे. नुकत्याच झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसने येथील जवळपास प्रत्येक जागा जिंकली आहे.
मुर्शिदाबादचे तीनही खासदार राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचे आहेत. विधानसभेत मुर्शिदाबादमधील 22 पैकी 20 सदस्य तृणमूल काँग्रेसचे आहेत.

उत्तर मुर्शिदाबाद परिसरात या हिंसक घटना घडल्या. या भागातील सर्व आमदार तृणमूल काँग्रेसचे आहेत. याशिवाय आठपैकी सात नगरपालिका आणि सर्व 26 पंचायत समित्यांवर तृणमूल काँग्रेसचेच नियंत्रण आहे.
राजकीय पक्षांचे नेते काय म्हणाले...
पश्चिम बंगालमध्ये वक्फ दुरुस्ती कायदा लागू केला जाणार नाही, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारच्या हिंसाचारानंतर सोशल मीडियावर सांगितलं होतं.
हा कायदा केंद्र सरकारने केला आहे. त्यांच्याकडेच याचं उत्तर मागितलं पाहिजे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी प्रत्येक धर्माच्या लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करते. धर्माच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचं अधार्मिक वर्तन करू नका. प्रत्येक जीव बहुमूल्य आहे. राजकारणासाठी दंगली पसरवू नका. जे हे करत आहेत ते समाजाचं नुकसान करत आहेत."
"मुर्शिदाबाद जिल्ह्याला पश्चिम बंगालपासून वेगळं करण्याचं षडयंत्र सुरू आहे," असं पश्चिम बंगालमधील भाजप नेते दिलीप घोष यांनी म्हटलं होतं.
हिंदूबहुल भागात हिंसाचार केला जात आहे. पण राज्याचे डीजीपी काहीही झालं नसल्याचं सांगत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.
मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार- केव्हा काय झालं?
तर पश्चिम बंगालमध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शुभंकर सरकार म्हणाले होते की, "पश्चिम बंगालमध्ये अशी हिंसक घटना घडायला नको होती. बंगाल हे शांतता आणि सौहार्दाचे ठिकाण आहे. मी बंगाल आणि मुर्शिदाबादच्या जनतेला बंधुभाव आणि शांतता राखण्याचं आवाहन करतो."
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना टीएमसीचे खासदार खलीलूर रहमान यांनी हिंसाचाराबद्दल खेद व्यक्त केला होता. जे काही झालं, ते व्हायला नको होतं, असं ते म्हणाले होते.

खलीलूर रहमान म्हणाले, "आमच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात प्रत्येक समाजाचे लोक बंधुभावाने एकत्र राहत होते. ते आजही आहेत आणि उद्याही असतील. पण जी घटना घडली, ती घडायला नको होती. याचं आम्हाला खूप दुःख झालं आहे."
ते म्हणाले, "येथे झालेल्या आंदोलनाला कोणताही नेता नव्हता, बॅनर किंवा व्यासपीठ नव्हतं. फक्त काही मुलांनी आणि तरुणांनी निदर्शने केली. हे आंदोलन काही वेळ भरकटलं. दगडफेकीची घटना घडली. काही पोलीस अधिकारीही जखमी झाले. असं घडायला नको होतं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.










