मुर्शिदाबादनंतर आगरतळ्यातही पेटले वक्फ विरोधी आंदोलन, सात पोलीस जखमी झाल्याची माहिती

फोटो स्रोत, ANI
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
वक्फ कायद्याच्या विरोधात सुरू झालेला संघर्ष पश्चिम बंगालमधून त्रिपुरामध्ये पोहोचला आहे. शनिवारी अगरतळा येथील कैलाशहर याठिकाणी झालेल्या हिंसाचारात सात पोलीस जखमी झाले तर आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
त्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये या कायद्या विरोधात आंदोलनं झाली. त्यावेळीही आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं.
मुर्शिदाबादमधील या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मुर्शिदाबादच्या जंगीपूरमध्ये सुमारी तीन-चार दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. पण शुक्रवारपासून त्याला हिंसक वळण मिळू लागलं.
त्यानंतर त्रिपुराच्या आगरतळामधील कैलाशहरमध्ये झालेल्या आंदोलनात आंदोलक आणि पोलिसांत संघर्ष झाला. त्यात पोलीस अधिकारीही जखमी झाले.
पश्चिम बंगालपाठोपाठ त्रिपुऱ्यात पेटले आंदोलन
अगरतळाच्या कैलाशशहरमध्ये संयुक्त कृती समितीनं काँग्रेसचे नेते मोहम्मद बद्रुझ्झमान यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीसाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली नव्हती.
आंदोलकांनी कबझारच्या तिलाबाजारपासून मोर्चाला सुरुवात केली. पण कोणीतरी बूट फेकल्याच्या दाव्यावरून एकच गोंधळ सुरू झाला आणि तरुणांचा समूह हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांचा पोलिसांबरोबर संघर्ष सुरू झाला.
मेलीमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर विटा, दगडं आणि काचेच्या बाटल्यांनी हल्ला केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यात पोलीस अधिकारी जतिंदर दास यांच्यासह काही पोलीस जखमीही झाले.
त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्च केला. त्यानंतर आंदोलक त्याठिकाणाहून पळून गेले. त्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला.
जखमी अधिकाऱ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

फोटो स्रोत, PINAKI DAS
पोलीस महासंचालक देबनाथ यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं. पोलीस अधीक्षक शुधांबिका आणि नेते मोहम्मद बद्रुझ्झमान यांच्या वादवादी झाल्याचंही समोर आलं.
काँग्रेस नेते बद्रुझ्झमान यांनी पोलिसांच्या कारवाईत अनेक आंदोलकही जखमी झाल्याचा दावा केला. तसंच प्रशासनानं चिथावणी दिल्यानंच आंदोलन चिघळल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, पोलिसांनी स्वतः दखल घेत या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर आठ संशयितांना हिंसाचारात सहभागी असल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
यानंतर परिसरात तणाव असून मोठ्या प्रमात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्याचबरोबर सेपाहिजाला जिल्ह्यातील सोनामुरा गावातही वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात अशाच प्रकारचं आंदोलन पाहायला मिळालं. त्यात प्रामुख्यानं अल्पसंख्याक मुस्लीम समुदायातील आंदोलकांचा समावेश होता.
त्रिपुरामध्ये सुमारे 8 टक्क्याहून अधिक म्हणजे अंदाजे 42 लाख मुस्लीम नागरिकांचा समावेश आहे.
मुर्शिदाबादमध्ये शनिवारी झाला हिंसाचार
वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये विरोधाला सुरुवात झाली होती. पण शुक्रवारी हे आंदोलन अधिक तीव्र झालं आणि संघर्ष पाहायला मिळाला.
शुक्रवारी दुपारी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आणि मुर्शिदाबादमध्ये तोडफोड, जाळपोळ, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे रोकण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळं काही रेल्वेंच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.
आंदोलक आणि पोलिसांतील तणाव वाढत गेला. तरीही शनिवारी सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. पण त्यानंतर हळू हळू वातावरण बिघडत गेलं.
धुलियान आणि सूतीच्या विविध भागांमधून शनिवारी हिंसाचाराच्या ताज्या बातम्या समोर येऊ लागल्या. शनिवारी धुलियानमध्ये एका व्यक्तीला गोळी मारली गेली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पस्छिम बंगाल पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जावेद शमीम म्हमाले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यापूर्वी शुक्रवारी सूतीमध्ये दोघांना गोळी मारण्यात आली. त्यापैकी एक अल्पवयीन होता.

फोटो स्रोत, ANI
सूतीमधील एका रहिवाशांनी बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितलं की, "धुलियान आणि सूती गेल्या काही दिवसांपासून जळत आहे. याठिकाणी भीतीचं वातावरण आहे."
"पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका, बसची तोडफोड करण्यात आली तसंच जाळपोळ करण्यात आली. त्याशिवाय सोन्याची, मिठाईची दुकानं आणि लोकांच्या घरात लूट करण्यात आली. पण पोलीस काही करू शकले नाहीत. नंतर बीएसएफ तैनात करण्यात आलं. पण परिस्थिती फार चांगली नव्हती," असंही पोलिसांनी सांगितलं.
याठिकाणी शॉपिंग मॉलमध्येही लूटमार केल्याचा आरोप आहे.
तणावादरम्यान केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगाल पोलीस महासंचालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. तसंच पुरेशी मदत देण्याचं आश्वासन दिलं.
भाजपची हायकोर्टात धाव
याप्रकरणी विरोधी पक्ष नेते शुभेंदू अधिकारी यांनी मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय दलांच्या तैनातीची मागणी करत हायकोर्टात धाव घेतली. याप्रकरणी विशेष पीठानं सुनावणीनंतर केंद्रीय सुरक्षा दलं तैनात करण्याचा आदेश दिला.
त्यांचे वकील अनिश मुखर्जी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "आम्ही काही दिवसांपासून संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये वाढणारा हिंसाचार पाहत आहोत. विशेषतः मुर्शिदाबाद जिल्ह्यात. विरोधीपक्ष नेते शुभेंदू अधिकारी यांनी केंद्रीय दलांच्या तैनातीसह एआयएकडून चौकशीच्या मागणीसाठी जनहित याचिका दाखल केली होती."

फोटो स्रोत, ANI
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते दिलीप घोष म्हणाले की, "मुर्शिदाबाद जिल्ह्याला पश्चिम बंगालपासून वेगळं करण्याचा कट सुरू आहे."
हिंदूबहुल भागात हिंसाचार सुरू असूनही राज्याचे पोलीस महासंचालक काहीही झालं नसल्याचं सांगत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. कोलकात्यातही याविरोधात आंदोलन झालं होतं.
ममता म्हणाल्या, राज्यात वक्फ कायदा लागू करणार नाही
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी हिंसाचारानंतर सोशल मीडिया एक्सवर म्हटलं की, पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा विधेयक लागू होणार नाही.
हा कायदा केंद्र सरकारनं लागू केला आहे आणि त्यांच्याकडूनच यावर उत्तर मागायला हवं, असं ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "माझी सर्वधर्मियांना शांतता ठेवण्याची माझी विनंती आहे. धर्माच्या नावाखाली कोणत्याही प्रकारे, चुकीच्या गोष्टी करू नका. प्रत्येकाचं जीवन मोलाचं आहे. राजकारणासाठी दंगली पसरवू नका. असं करणारे लोक समाजाचं नुकसान करत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
तर पश्चिम बंगालचे राज्य काँग्रेसचे अध्यक्ष शुभांकर सरकार म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये असं व्हायला नको होतं. बंगाल शांती आणि सद्भावाची भूमी आहे. बंगाल आणि मुर्शिदाबादच्या जनतेने शांतता राखण्याची विनंती मी करतो."
"2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहे. त्यासाठी भाजप आणि तृणमूल त्यांच्या फायद्यासाठी राजकारण करत आहे," असा आरोप त्यांनी केला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











