'आम्हाला कुणाला सांगण्याची गरज पण नाही', झटका अन् हलालच्या वादावर विक्रेत्यांच्या स्पष्ट भूमिका

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
हडपसरच्या निलेश मानकरांच्या न्यू महाराष्ट्र मटण शॉपमध्ये सकाळी साडेदहा-अकरा वाजता पूजा सुरू असते.
दुकानात गेलं की, धूप ओवाळणाऱ्या हातांच्या दिशेला पाहताना दिसते ती तुळजाभवानी आणि दर्ग्याची तस्बीर. मानकर दोन्हीचीही पूजा एकत्रच करत असतात.
"आमच्याकडे आहे ना पीराचं. दोन्ही आहे. तुळजापूर आणि पीर. त्यामुळे आम्ही बकरा कापत नाही. ते काम पिढ्यानपिढ्या आमच्याकडे काम करणारे लोकच करतात," मानकर सांगतात.
मांस विक्री करणारी मानकरांची ही तिसरी पिढी. दुकानात मानकर मटणाची विक्री करतात, तर हुसेन शेख हे बकरं कापण्याचं काम करतात.
पूर्वापार हीच परंपरा चालत आल्याचंही ते सांगतात.
'मटण बोल्हाई का बकऱ्याचं हा प्रश्न आता बदलला'
ते म्हणतात, "आम्ही कापतो, पण आधी त्यांच्याकडून नस कापली जाते. मग पुढे आपण करायचं. अशीच पद्धत आहे."
इतके दिवस मटण बोल्हाई का बकऱ्याचं, याचा प्रश्न आता मात्र मटण हलाल आहे का झटका यात बदलल्याचं ते नोंदवतात.
मानकर सांगतात, "आमच्याकडे जवळपास 15 ते 20 वर्षांपासून तेच कामगार आहेत. कुरेशी नावाच्या एका कामगाराचे तर वडिलही आमच्याकडेच काम करायचे. तो आमच्याकडे बकरे कापतो. तो बकऱ्याला पाणी पाजून बकरा कापतो आणि साफ करुन देतो."
"मग आम्ही पुढे साफ करुन दुकानात विक्री करतो. आता विचारतात हे हलाल आहे का झटका? आम्ही सांगतो हलाल पद्धतीने कापतो. ते विचारतात आपल्याला खाण्यायोग्य कोणतं? हे योग्य आहे सांगितल्यावर मात्र ठीक आहे म्हणतात."
हलाल आणि झटका हा काय वाद आहे?
मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी 11 मार्चला एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. इथून पुढे हिंदूंकडून हिंदूंसाठी मटणाची दुकानं उपलब्ध करून दिली जातील, असं म्हणत त्यांनी मल्हार प्रमाणपत्राची घोषणा केली.
झटका पद्धतीने कापलेलं मटण विकणाऱ्या हिंदू व्यावसायिकांना हे प्रमाणपत्र दिलं जाईल, असंही त्यांनी घोषित केलं.
यामुळे आपल्याला हलाल पद्धतीचं मटण खावं लागणार नाही, असाही दावा त्यांनी केला. तिथूनच पुन्हा एकदा या विषयावर वादाला सुरुवात झाली.

त्यात त्यांनी म्हटलंय, "महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल, आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालं आहे. झटका मटणसाठी मल्हार सर्टिफिकेशन ही एक नवी संकल्पना आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय."
"या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं, जिथे 100 टक्के हिंदू समाजाचं प्राबल्य असेल. विकणाराही हिंदू असेल," असं राणे यांनी म्हटलं.

"त्या मटणात भेसळ नसेल. या माध्यमातून हिंदू समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचारांच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी टाकलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा," असेही राणे म्हणाले.
"ज्या मटणाला हे प्रमाणपत्र नसेल तिथे हिंदू समाजाने मटण खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन. या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100 टक्के पाठिंबा आहे," अशी घोषणा नितेश राणेंनी केली. या घोषणेनंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं.
पण मुळात 'हलाल' आणि 'झटका' म्हणजे काय?
हलाल आणि झटका या प्राणी मारण्याच्या पद्धती आहेत. 'हलाल'मध्ये सुरुवातीला प्राण्याच्या मानेवरून सुरा फिरवून नस कापली जाते आणि मग रक्त वाहून जाऊ दिलं जातं. त्यात प्राणी मेला की मग तो साफ करुन पुढे विक्रीसाठी दिला जातो.

तर झटका म्हणजे रुढ अर्थाने बळी देताना वापरली जाणारी पद्धत होय. यात प्राण्याच्या मानेवर सुऱ्याने वार करुन त्याला मारलं जातं. 'हलाल' करणारे म्हणजे हलाल पद्धतीनं बकऱ्याला मारणारे लोक मुस्लीम समाजाचे असतात.
ही राजकीय चर्चा-वाद लोकांपर्यंत पोहोचला आहे का?
नेमकी कोणत्या पद्धतीची मांस विक्री होतेय आणि या वादाचे नेमके काय पडसाद दिसतात, हे पाहण्यासाठी आम्ही पोहोचलो पुण्यातल्या कॅन्टॉनमेंटमधल्या शिवाजी मार्केटमध्ये.

शिवाजी मार्केट हे पुण्यातलं मांस विक्रीचं प्रमुख केंद्र. इथे मटण विकणारे तौसिफ पटेल आम्हाला भेटले. या मार्केटमध्ये मांस विक्रीची 23 दुकाने सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. या सगळ्या दुकानांची मालकी प्रामुख्याने मुस्लीम समुदायाकडे आहे. तर झटका मटण मिळणारं एकमेव दुकान आहे पंजाबी सोसायटीचं.
सरकारी कत्तलखान्यात देखील हलाल पद्धतच
पण यापैकी कोणालाही स्वत: प्राणी कापण्याची परवानगी नाही. ते कापले जातात सरकारी अर्थात या भागासाठी असणाऱ्या कॅन्टॉनमेंटच्या कत्तलखान्यात.
कॅन्टॉनमेंटप्रमाणेच पुणे महापालिकेचाही असा स्वतंत्र कत्तलखाना आहे. इथे व्हेटर्नरीयनकडून आधी प्राण्याची तपासणी होते आणि त्यांच्याकडून खाण्यायोग्य असल्याचं प्रमाणपत्र दिलं गेलं, की मग बकऱ्याची कत्तल केली जाते. सरकारी कत्तलखान्यात देखील हलाल पद्धतच वापरली जाते.
ही सगळी प्रक्रिया समजावून सांगत असताना तौसिफ पटेल म्हणतात, "आमचा वेगवेगळ्या ठिकाणी आठवड्याचा बाजार असतो. म्हणजे शनिवारी चाकणला किंवा शुक्रवारी यवतला. तिथून आम्ही बकरे खरेदी करतो."
"पहाटे हे बाजार सुरू होतात. सकाळपर्यंत खरेदी झाली की मग ते बकरे कत्तलखान्यात आणले जातात. तिथे पूर्ण व्यवस्था आहे. गरजेप्रमाणे आम्ही बकरे कापून आणतो आणि मग इथं त्यांची विक्री होते."

हलाल पद्धतीचे फायदे नेमके काय हे सांगण्याचा प्रयत्न इथले व्यापारी करतात. मुस्लिमांमध्ये हलाल मटण खाणं बंधनकारक आहे. तर हिंदूंमध्ये मात्र असं कोणतंही बंधन नाही.
हलाल पद्धतीबद्दल बोलताना शिवाजी मार्केटमधले व्यापारी झाकीर कुरेशी म्हणाले," हलालमध्ये बकरा कापला जातो तेव्हा पूर्ण रक्त बाहेर पडतं. त्यात मग काही आजार असतील तर तेही बाहेर पडतात."
पुढे ते त्यांच्या मराठीमिश्रीत मुसलमानी भाषेत बोलत म्हणाले की, "100 पर्सेंट झटका अगर हो गया तो बिझनेस खतम हो जायेगा. क्योंकी लोग खाएंगे ही नई ना! अब्बी नई क्या झटका रेहने के बावजूद लोग प्रेफर नही करते है वो. तुम नै क्या कोई बी फाइव्ह स्टार मल्टिप्लेक्स हॉटेल में चले जावं. जो आदमी खाने वाला है, वो सबसे पहले बोलता है की मेरको हलाल सर्टेफिकेट बताओ."
बाजारात काय चित्र?
बाजारात काय परिस्थिती आहे, तिथे हलाल-झटका याबाबत काही चर्चा होते आहे का किंवा त्याचे परिणाम दिसत आहेत का, हे पाहण्यासाठी आम्ही लोणंदच्या जनावरांच्या बाजारात गेलो.
इथे सर्वधर्मीय लोक खरेदी-विक्रीत सहभागी होतात. कोणी कापण्यासाठी तर कोणी पाळण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांची खरेदी करतं. या बाजारातही आम्हाला पुन्हा असा वादच लोकांमध्ये नसल्याचं ऐकायला मिळालं.
मुळात हिंदूकडूनही झटका मटणाची मागणीच नसल्याचं व्यापार्यांनी नोंदवलं.
आजूबाजूच्या अनेक गावांमधून व्यापारी इथं खरेदी विक्रीसाठी आले होते. यातलेच एक गणेश धायगुडे गेली अनेक वर्ष सातत्याने या बाजारात हजेरी लावतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले "आम्ही शेतकरी आहोत. आम्ही या गोष्टींवर लई लक्ष देत नाही. काय की सगळे सारखे असतात. येणारे व्यापारी आहेत इथं."
"चार पैसे ते पण देतात. हिंदू देतो, मुस्लिम देतो. सगळे पैसे देतात. कुणीही कुणाचं पैसे बुडवत नाही. सगळे एकसारखे असल्यासारखं आहे आमच्या दृष्टीनं."
तर मटण विक्रेते असणारे माणिक कांबळे दौंडहून खरेदीसाठी आले होते. त्यांच्या मते हा व्यवहार सर्व समाज मिळूनच चालतो.

ते म्हणाले, "कोणाच्या यात्रेला मराठाबी असतो आणि त्यांच्या त्या ईदीला म्हणा तेबी बकरे घ्यायला येतात बाजारात."
पण आता मात्र मटण कोणत्या पद्धतीने कापलंय, हेही विचारलं जात असल्याचं त्यांनी नोंदवलं.
याच बाजारात खरेदीसाठी पुण्याहून आलेले सलीम शेख यांनी हा व्यवसाय दोन्ही धर्माचे लोक धर्माचा विचार न करता करतात. दोन्ही आपल्या कुटुंबासाठी कमावतात, असं मत नोंदवलं.
आपण एक आहोत आणि एकच राहू, असंही ते सांगायला विसरले नाहीत.
व्यावसायिकांच्या मते त्यांची भूमिका काय आणि विक्री कशाची होते याचा विचारच हे 'मल्हार प्रमाणपत्र' देताना केला गेला नाही असं व्यापार्यांचं म्हणणं आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना हडपसरमधील व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनंत प्रबाळे म्हणाले, "हिंदू समाजाची मागणीच नाहीये की आम्हाला झटका द्या, का हलाल नको, असं काही नाहीये. येतात, मटण घेतात आणि जातात."
"आमची दुकानं फार पूर्वीपासूनची जुनी दुकानं आहेत. आमच्या आजोबा-वडिलांपासून चालत आलेली दुकानं आहेत. लोकांना माहिती आहे आम्ही हिंदू आहे का मुसलमान आहे, हे लोकांना माहिती आहे ना. याचं आम्हाला काय, कुणाला सांगण्याची गरज पण नाहीये."
पण मुस्लीम व्यावसायिकांना मात्र झटका पद्धत प्रचलित झाली, तर व्यवसायावर परिणाम होण्याची भीती वाटते आहे. झाकीर कुरेशींनी ही भीती बोलून दाखवताना आत्ता झटका मटण मिळतं तिथेही त्यांची खरेदी होत नसल्याचं नोंदवलं.
प्रमाणपत्र असणाऱ्यांची काय स्थिती?
मुळात 'मल्हार प्रमाणपत्र' देणारी ही संस्था एक खासगी कंपनी आहे. मंत्री नितेश राणे यांनी भूमिका घेतली असली, तरी सरकारकडून मात्र अधिकृतरित्या मटण विक्रीचे असे नियम जाहीर करण्यात आलेले नाहीत.
राणेंनी घोषणा केल्यापासून मल्हार सर्टिफिकेटच्या वेबसाईटवर साधारण साठ व्यावसायिकांची यादी दिसते. या ठिकाणी मल्हार सर्टिफाईड झटका मटण मिळत असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.

खरंच असं मटण मिळतंय का, हे पाहण्यासाठी आम्ही पुण्यातील वेबसाईटवर नोंद असलेल्या विविध दुकानांना भेट दिली.
यापैकी गुरूवार पेठेतल्या पत्त्यावर नोंदवलेल्या ठिकाणी दुकान सापडले नाही. राजेंद्रनगर परिसरात मात्र दुकान होते. इथले व्यावसायिक मंगेश घोलप यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे मात्र त्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचं नोंदवलं.
पण सध्या दुकानात विक्री मात्र हलाल पद्धतीच्याच मटणाची होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन्ही प्रकारचे मटण विकायलाही काही अडचण नसल्याचं ते म्हणाले.
इतिहास काय सांगतो?
ज्या इतिहासाचा दाखला दिला जात आहे त्यात नेमकी काही नोंद आढळते का, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
यासाठी इतिहास आणि खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक चिन्मय दामले यांच्याशी आम्ही बोललो. चिन्मय दामले यांनी नोंदवलं की हलालप्रणीत पद्धत ही ज्यू संस्कृतीच्या प्रभावातून आली आहे.
दामले सांगतात, "कोशर आणि हलाल हे अनुक्रमे ज्यू आणि इस्लाम धर्मांतले नियम आहेत. त्यांचा धर्मानं आखून दिलेल्या जीवनपद्धतीशी संबंध आहे. कोशर आणि हलाल हे फक्त खाण्यापिण्याशी संबंधित नसून जगण्याच्या प्रत्येक बाबीचं नियमन ते करतात."
"त्याच नियमांनुसार, प्राणीहत्या करताना सुरी कशी असावी, तिला धार कशी करावी, तिचं वजन किती असावं, ती कशी फिरवावी अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. कोणते प्राणी खाण्यायोग्य आहेत आणि कोणते नाहीत, हेदेखील या नियमांत सांगितलं आहे. या नियमांनुसार, प्राणीहत्या करणार्या व्यक्तीला खास प्रशिक्षण घ्यावं लागतं."

पुढे ते सांगतात, "हलालचे नियम इतके काटेकोर नाहीत. दोन्ही नियमांमधील साम्य म्हणजे दोन्ही धर्मांत रक्त अशुद्ध ठरवलं आहे. प्राणी कापताना मानेसमोरून सुरी फिरवली जाते. त्याला व्हेन्ट्रन नेक इन्सिजन (Ventral Neck Incision) असं म्हणतात. त्यामध्ये प्राण्याचं रक्त लगेच वाहून जातं."
मात्र, हिंदू धर्मात एक धर्मग्रंथ नाही. हा धर्म एकजिनसी नाही. त्यात अनेक देव, पंथ, जाती, वर्ण आणि विविध लोकपरंपरा असल्याने मांस कापण्याबाबतचे असे कोणतेही नियम हिंदू धर्मात नसल्याचं ते सांगतात. 'झटका' ही पद्धत मूळ शीख समुदायाकडून आल्याचं ते नमूद करतात.
"शिखांचे गुरू गोविंद सिंह यांनी त्यांच्या अनुयायांना मांसाहार करण्याची परवानगी दिली, तरी काही नियमही घालून दिले. त्यापैकी एक म्हणजे प्राणीहत्येच्या वेळी प्राण्याला त्रास होता कामा नये. या पद्धतीला झटका असं म्हणतात. त्यात सुरी मानेवरून फिरवतात. या पद्धतीत रक्त तत्काळ वाहून जात नाही. त्यामुळे रक्ताची गुठळी होण्याची शक्यता असते."
"एकोणिसाव्या शतकात शिखांचे धर्मनियम पुन्हा एकदा लिहिले गेले. त्यांना रेहत मर्यादा असं नाव आहे. त्यातल्या सहाव्या भागातल्या 13व्या प्रकरणात 'प्राणीहत्या करताना प्राण्याला त्रास होऊ नये' असं सांगितलं आहे. ईश्वराचं नाव घेऊन हत्या केलेला प्राणीही वर्ज्य ठरवला आहे. म्हणजे बळी दिलेला प्राणीही चालत नाही. दुसर्या धर्माच्या पद्धतीपेक्षा, म्हणजे हलालपेक्षा, आपली पद्धत वेगळी असावी, असाही त्यामागचा हेतू होता," असंही ते सांगतात.

पुढे ते सांगतात, "ब्रिटिश भारतात आल्यावर त्यांनी कत्तलखाने स्थापले. ते कसे चालावेत, यासाठी नियम तयार केले. काही ठिकाणी हलाल व झटका अश्या दोन्ही पद्धतीनं कत्तल होई. काही ठिकाणी फक्त हलाल मिळे."
"ब्रिटिशांना हवं ते मांस हवं त्या प्र्कारे देण्यास कसाई तयार होते. त्यामुळे हलालपद्धत पसरली. आपला वारसा संमिश्र स्वरूपाचा आहे. अनेक प्रथा वेगवेगळ्या धर्मांत समान आहेत."
"काही एका धर्मातून दुसरीकडे गेल्या आहेत. हिंदू धर्मात अमूकच पद्धतीनं प्राणीहत्या होई, याचा काही पुरावा नाही. कारण तसं कुठेही लिहून ठेवलेलं नाही."
ऐन रमजान सणाच्या काळात हलाल आणि झटका याचा वाद सुरू होता. चर्चेत नसलेल्या मुद्द्यांना पुढे का आणलं जातंय, असाही प्रश्न आता व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.
या प्रश्नांची आणि प्रमाणपत्राच्या परिस्थितीबद्दलची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही 'मल्हार सर्टिफिकेशन' करणाऱ्या खासगी कंपनीच्या आकाश पलंगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही.
अर्थात हलाल आणि झटका मटणावरून झालेल्या चर्चेचा परिणाम सामाजिक सलोखा बिघडवणारा ठरेल आणि त्याचा व्यवसायालाही फटका बसेल, असं मत सर्वधर्मीय व्यापारी आणि विक्रेते नोंदवत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











