नेपाळमध्ये हिंदूराष्ट्र आणि राजेशाही लागू करण्यासाठी आंदोलन, पोलिसांशी चकमकीत दोघांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
नेपाळमध्ये राजेशाहीचे समर्थक आणि सुरक्षा दलांच्या चकमकीत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पत्रकाराचा समावेश आहे. या घटनेत 20 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये राजेशाहीच्या समर्थकांचं 'शक्ती प्रदर्शन' सुरू झालं आणि त्यानंतर एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्या व्हीडिओमध्ये या आंदोलनाचे नेते दुर्गा प्रसाई हे वेगाने कार चालवून बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
व्हीडिओमध्ये दुर्गा प्रसाई पोलिसांचा घेरा तोडून जवळच्या आंदोलकांना पुढे जाण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. त्यानंतर ही गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचेही फुटेज व्हायरल होऊ लागले.
आजूबाजूच्या परिसरातील दुकानं, घरं आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ आणि लूटमार सुरू झाली.
पोलिसांकडून बळाचा वापर केल्याचे फुटेजही सतत समोर येत आहेत. शेवटी शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला. या चकमकींदरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याचीही पुष्टी झाली आहे.
आंदोलनाच्या एक दिवस आधी, गुरुवारी (27 मार्च) माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्याशी भेट घेतल्यानंतर, दुर्गा प्रसाई यांनी सांगितले होते की, राजेशाही आणि हिंदू राज्याची स्थापना हा त्यांचा 'धर्म' आहे.
त्याच दिवशी त्यांना राजेशाहीचं समर्थन करणाऱ्या संयुक्त लोक चळवळ समितीचे कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आलं.


दुर्गा प्रसाई राजेशाही समर्थक चळवळीचा चेहरा
28 मार्चच्या दिवशीच रिपब्लिकन विचारांकडे झुकणाऱ्या सोशलिस्ट फ्रंटने काठमांडूमध्ये आंदोलन केलं. त्यात अनेक नेते संबोधित करणार होते. परंतु राजेशाही समर्थक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर राजेशाही समर्थकांना भाषणं करता आली नाहीत.
राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे नेते धवल शमशेर जबरा यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्ही स्टेजवर येत असताना पोलिसांनी आम्हाला पकडलं आणि त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली."
ते म्हणाले, "स्टेजवरच प्लास्टिकच्या गोळ्या आणि अश्रूधुराचा मारा करण्यात आला. आम्ही बैठक घेऊन पुढे काय करायचं ते ठरवणार आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
संसदेतील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असलेला राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित करत आहे. तरीही 'राष्ट्र, राष्ट्रीयता, धर्म, संस्कृती आणि नागरिक वाचवा' या गैर-राजकीय संघटनेच्या प्रमुखाला या पक्षाचा प्रमुख बनवल्यानंतर अनेक राजेशाही समर्थकांना आश्चर्य वाटलं आहे.
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना, प्रसाई यांनी ते नैसर्गिक उत्तराधिकारी असल्याचं म्हटलं.
प्रसाई म्हणाले, "आज सामान्य जनतेसमोर एकच प्रश्न आहे इतर पक्ष की दुर्गा प्रसाई-राजा? हीच काळाची गरज देखील आहे."
माजी माओवादी आणि यूएमएलच्या शेवटच्या महाअधिवेशनाचे केंद्रीय सदस्य असलेले प्रसाई हे अल्पावधीतच राजेशाही चळवळीचा प्रमुख चेहरा बनले आहेत. त्यांच्यातल्या या बदलाचे अनेकजण साक्षीदार आहेत.
राजेशाहीचं समर्थन करणाऱ्या नेत्यांबाबत प्रश्न?
शुक्रवारी झालेल्या राजेशाही समर्थकांच्या निदर्शनांमध्ये खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
राजकीय शास्त्रज्ञ कृष्णा पोखरेल यांच्या मते, 'राजेशाही समर्थकांना असं वाटलं असेल की अशा परिस्थितीत ते काहीही बोलू शकतात आणि काहीही करू शकतात.
त्यातून अनेकांना स्वतःकडे आकर्षित करू शकतो असं त्यांना वाटतं आणि यातूनच त्यांनी प्रसाईंना पुढे केलं. त्यांना असा विश्वास होता की 'लोकांची एक मोठी लाट उसळेल आणि व्यवस्था उलथून टाकेल'.'

फोटो स्रोत, Getty Images
पोखरेल म्हणाले की, "पण अशा परिस्थितीतही, दुर्गा प्रसाद यांचा इतिहास बघितला तर असं दिसून येतं की, ते प्रदीर्घ काळासाठी इथे आहेत असं वाटत नाही. त्यांची प्रतिमा अशी आहे की ते कुठेही जाऊ शकतात आणि काहीही करू शकतात."
"दुर्गा प्रसाद हे काही लोकांसाठी आक्रमक नेते असू शकतात किंवा तशी विधानं करून ते गर्दी जमवू शकतात असंही अनेकांना वाटतं. पण समजूतदार लोकांना ते चांगला संदेश देण्यात असमर्थ आहेत असंही दिसत," असं पोखरेल यांनी सांगितलं.
प्रसाईंसोबत, सांस्कृतिक तज्ज्ञ जगमन गुरुंग हे देखील समन्वयक म्हणून राजेशाही पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेत सहभागी होत आहेत.
गुरुंग म्हणतात की, "अलिकडच्या कारवायांमध्ये प्रसाई यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्यांना कमांडरची भूमिका देण्यात आली."
प्रचंड यांची टीका
नेपाळ कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चे प्रमुख आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी म्हटले की, जेव्हा रिपब्लिकन पक्ष लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरतात तेव्हा राजेशाही समर्थक डोके वर काढण्याचा प्रयत्न करतात.
प्रचंड म्हणाले, "लोकशाही व्यवस्था चालवणारे लोक जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यानंतर या लोकांनी डोकं वर काढलं आहे."

फोटो स्रोत, PRACHANDA/FB/SCREENGRAB
"आम्ही स्वतःकडे बारकाईने पाहत आहोत आणि आमच्या चुकांमधून शिकत आहोत. तसंच लोकांसाठी, जनतेसाठी आणि आमच्या सर्वांसाठी उभे आहोत."
नेपाळी जनता आणि राजकारण्यांच्या उदारतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रचंड यांनी इशारा दिला आहे.
माजी राजे ज्ञानेंद्र त्यांच्या भूतकाळातील चुकांचे परिणाम भोगत आहेत आणि भविष्यात त्यांनी अशा चुका करू नयेत, असा इशारा प्रचंड यांनी दिला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











