You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अपघातात पाठीच्या कण्याला दुखापत झाली अन् चालणं बंद झालं, तरी व्हीलचेअरवर तिनं अंतराळात जाण्याचं स्वप्न पूर्ण केलं
- Author, सेहेर असफ
जर्मनीतील एक इंजिनीअर अंतराळात जाणारी जगातील पहिली व्हीलचेअर वापरणारी व्यक्ती ठरली आहे.
मायकेला बेंथॉस असं त्यांचं नाव आहे. सात वर्षांपूर्वी माउंटन बाईकच्या एका अपघातात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यांना अंतराळवीर व्हायचं होतं. मात्र आता या अपघातामुळे त्यांच्या या स्वप्नाचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.
म्हणूनच हे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकतं की नाही, हे जाणून घेण्यासाठी मायेकलानं एका निवृत्त झालेल्या अंतराळ इंजिनीअरशी ऑनलाइन संपर्क साधला होता.
या निवृत्त अंतराळ इंजिनीअरनं मग जेफ बेझॉस यांनी स्थापन केलेल्या 'ब्ल्यू ओरिजिन' या अंतराळ पर्यटन कंपनीबरोबर 10 मिनिटांचं ऐतिहासिक उड्डाण आयोजित करण्यास मदत केली.
'अतिशय झकास अनुभव'
मायकेला बेंथॉस आणि पाच इतर जणांनी शनिवारी (20 डिसेंबर) अमेरिकेतील टेक्सासमधून उड्डाण केलं होतं. त्यांचं अंतराळयान अंतराळाच्या तथाकथित 'सीमे'च्या अगदी वरच्या बिंदूपर्यंत पोहोचलं होतं. ही पातळी 'कार्मन लाईन' म्हणून ओळखली जाते.
"हा अतिशय झकास अनुभव होता!" असं मायकेला म्हणाल्या. जमिनीवर उतरल्यानंतर त्यांनी या भावना व्यक्त केल्या. ब्ल्यू ओरिजिननं याचा व्हीडिओ शेअर केला.
"मला फक्त दृश्य आणि सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणच आवडलं नाही, तर मला वर अंतराळात जाणंदेखील आवडलं. प्रत्येक टप्प्यावर वर जाणं खूपच मस्त होतं," असं मायकेला म्हणाल्या.
न्यू शेपर्ड हे ब्ल्यू ओरिजिन कंपनीचं पुनर्वापर करता येणारं उप-कक्षीय प्रक्षेपण वाहन आहे. जीएमटी प्रमाणवेळेनुसार 14:15 वाजता कंपनीच्या टेक्सासमधील लॉंच पॅडवरून न्यू शेपर्ड यान झेपावलं होतं.
मायकेला बेंथॉस युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये काम करतात. त्या म्हणाल्या की, त्यांच्या अपघातानंतर, "आपलं जग अजूनही अपंग लोकांसाठी किती खडतर आहे हे खऱ्या अर्थानं" त्यांच्या लक्षात आलं.
हॅचमधून बाहेर काढण्यात आलेल्या बेंचचा वापर करून मायकेला त्यांच्या व्हीलचेअरवरून स्वत:च कॅप्सूलमध्ये गेल्या होत्या.
'माझ्यासारखे लोक अंतराळवीर होऊ शकतात?'
हॅन्स कोनिंग्समन हे स्पेसएक्सचे निवृत्त व्यवस्थापक आहेत. त्यांनी हे उड्डाण आयोजित करण्यास मदत केली. या उड्डाणादरम्यान मदत लागली तर त्यासाठी ते जवळच बसलेले होते.
"मी हॅन्स यांना पहिल्यांदा ऑनलाइन भेटले होते. मी त्यांना इतकंच विचारलं होतं की तुम्ही स्पेसएक्समध्ये इतका काळ काम केलं आहे. तुम्हाला वाटतं का की माझ्यासारखे लोक अंतराळवीर होऊ शकतात?" असं मायकेला बेंथॉस म्हणाल्या.
कोनिंग्समन म्हणाले की मायकेला बेंथॉस यांनीच "मला हे करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या प्रबळ इच्छेनंच मला पटवून दिलं की मी सुद्धा हे केलं पाहिजे. मी बराच काळ जी गोष्ट बाहेरून पाहत होतो, त्याचा मी अनुभव घेतला पाहिजे, असं त्यामुळेच मला वाटलं."
ब्ल्यू ओरिजिन कंपनीनं म्हटलं की मायकेला बेंथॉस यांना कॅप्सूलच्या आत जाण्यास आणि बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी सहाय्यक उपकरणं जोडण्यात आली होती.
'आम्हाला तिचं स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमान'
"मिशीचं हे उड्डाण विशेषकरून अर्थपूर्ण आहे. कारण यातून दिसून आलं की अंतराळ प्रत्येकासाठी आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केल्याचा आम्हाला अभिमान आहे," असं फिल जॉयस म्हणाले. ते न्यू शेपर्डचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.
ब्ल्यू ओरिजिन कंपनीनं आयोजित केलेली ही 16 वी उपकक्षीय अंतराळ पर्यटन मोहीम होती. या मोहिमेसाठी किती खर्च आला हे उघड करण्यात आलेला नाही.
कंपनीनं डझनभर पर्यटकांना अंतराळ नेलं आहे. एप्रिल महिन्यात ब्ल्यू ओरिजिननं 11 मिनिटांसाठी यान अंतराळात पाठवलं होतं. या मोहिमेत गेलेल्या सहा महिलांमध्ये पॉप स्टार कॅटी पेरी, बेझॉस यांची होणारी पत्नी लॉरेन सांचेझ आणि सीबीएसच्या निवेदिका गेल किंग यांचा समावेश होता.
अंतराळ पर्यटनात वर्चस्व मिळवण्यासाठी खासगी अंतराळ कंपन्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा असताना ही हाय-प्रोफाईल उड्डाणं होत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)