एलियन्स खरंच आहेत का, पृथ्वीवर ते येतील का? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

रात्रीच्या आकाशात तारे पाहताना आपण कधी विचार केला आहे का, आपल्याशिवाय या विश्वात अजून दुसरा कुठला जीव आहे का? विज्ञान सांगतं की, एलियन्स अस्तित्वात असण्याची शक्यता खूपच जास्त आहे. फक्त आपली त्यांची भेट व्हायला आणखी थोडा वेळ लागणार आहे.

पृथ्वी हा असंख्य ग्रहांमध्ये एक छोटासा ठिपका आहे, मग आपल्यासारखे जीव केवळ येथेच असतील हे कसं शक्य आहे?

आपली पृथ्वी खूप लहान आहे आणि आकाश अनंत आहे. या अनंत विश्वात आपल्याशिवाय अजून कोणी आहे का, हे जाणून घेणं विज्ञानासाठी मोठं आव्हान आहे.

पृथ्वीच्या परिपूर्ण परिस्थितीशिवाय बाहेरील वातावरणाच्या जीवाबद्दल आपल्याला काय माहीत आहे?

अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, एलियन्सचे ठोस पुरावे नसले तरीही असं मानावं लागेल की, ते अस्तित्वात आहेत. फक्त आपला मिल्की वे (आकाशगंगा) सुमारे 200 अब्ज आकाशगंगांपैकी एक, सुमारे 300 अब्ज तारे आहेत. आपल्या पृथ्वीवरील जीवनासाठी सूर्य हा एक मुख्य स्रोत आहे.

शास्त्रज्ञ सतत अशा तार्‍यांच्या भोवती फिरणारे ग्रह, ज्याला एक्सोप्लॅनेट्स म्हणतात ते शोधत आहेत. अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. मॅगी अॅडेरिन-पोकॉक म्हणतात, 'आपल्याला खात्री आहे की, ते तिथे आहेत. हा निव्वळ शक्यतेचा प्रश्न आहे.'

आताचे तंत्रज्ञान आपल्याला या एक्सोप्लॅनेट्सची सविस्तर तपासणी करण्याची परवानगी देते. शक्तिशाली दूरदर्शकांच्या (खगोलीय पिंड) मदतीने, शास्त्रज्ञ हे पाहू शकतात की, या ग्रहांभोवती फिरणाऱ्या तार्‍यांमधून जाणाऱ्या प्रकाशातून त्यांचा रासायनिक घटक काय आहे हे समजू शकते. याला 'स्पेक्ट्रोस्कोपी' असं म्हणतात.

महत्वाचं म्हणजे अशी रासायनिक रचना शोधणं जी पृथ्वीसारखी असेल, म्हणजे असा पर्याय आहे की हजारो प्रकाशवर्षे दूर अशी जागा असेल जिथे आपल्यासारखं जीवन टिकू शकतं.

संकेत तरी सकारात्मक दिसत आहेत. युनायटेड किंगडममधील मँचेस्टर विद्यापीठाचे खगोलशास्त्राचे प्राध्यापक टिम ओ'ब्रायन म्हणतात, 'आपल्याला शेकडो अशा ग्रहांची माहिती आहे, जे जीवनासाठी योग्य असू शकतात. पुढील 10 वर्षांत आपण जीवनाचे पुरावे सापडण्याची शक्यता असलेला ग्रह शोधूच.

अधिक आशादायक पुरावे आपल्याला पृथ्वीवरच सापडतात. पूर्वी अतिशय कठीण किंवा निर्जन समजल्या जाणाऱ्या ठिकाणी राहतात असे जीव सापडले आहेत. जिथे सूर्यप्रकाश किंवा उष्णता पोहोचत नाही, उदाहरणार्थ आपल्या महासागरातील सर्वात खोल खंदकांमध्ये.

पूर्वी आपल्याला वाटायचं की, जीवन फक्त अशा ग्रहांवरच असू शकतं, जो आपल्या तार्‍यापासून योग्य अंतरावर असेल (जिथे योग्य प्रमाणात किरणोत्सर्ग असेल). आपल्याला शक्य वाटत नव्हतं अशा ठिकाणी पृथ्वीवर जीवन सापडल्याने आपल्याला हे समजलं की, फक्त ग्रह नव्हे तर उपग्रहावर (चंद्र) देखील जीवन असू शकतं.

याचा अर्थ असा नाही की, ते लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या हिरव्या प्राण्यांसारखे असतील. फक्त हे की तिथे जीवन शक्य आहे आणि टिकून राहण्यास सक्षम आहेत.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, बाहेर जीवन असण्याची शक्यता खूप जास्त असली, तरी ते जीवन बुद्धिमान आहे की नाही, सध्या हे ठरवणं कठीण, किंवा कदाचित अशक्य आहे.

"पृथ्वीवरील जीवनाच्या बहुतेक इतिहासात जीवन खूप साधं होतं. खरंतर, अब्जावधी वर्षे ते फक्त बॅक्टेरियासारखं जीवन होतं," असं प्राध्यापक ओ'ब्रायन म्हणतात.

आपल्या ग्रहावर बहुपेशीय जीवनदेखील निर्माण होणं फक्त काही संयोगाच्या घटनांमुळे शक्य झालं. एलियन जीवन किंवा परग्रहवासी जीवन आपल्याशी संपर्क साधण्यासाठी शारीरिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत असणं आवश्यक आहे.

जर आपण एकटे नसलो, तर एलियन जीव आपल्याला भेटायला येतील अशी अपेक्षा करायची का? हे थोडं गुंतागुंतीचं आहे.

ताऱ्यांदरम्यान प्रवास करू शकतील असे कुठलेही जीव कधीच आलेले नाहीत. अद्याप हे का घडलं नाही?

"आपली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे, आपल्याकडे फक्त एका प्रकारचेच जीवन आहे आणि ते म्हणजे पृथ्वीवरील जीवन," असं डॉ. मॅगी अॅडेरिन-पोकॉक म्हणतात.

डॉ. अॅडेरिन-पोकॉक म्हणतात, 'जर तुम्ही एखाद्या खूप सक्रिय तार्‍याजवळ राहत असाल, तर तुम्हाला जमिनीखाली राहावं लागेल.

याचा अर्थ असा नाही की, बुद्धिमान जीवन तिथे नाही, पण तुम्हाला ते संप्रेषित किंवा प्रकाशित करण्याचं साधन मिळणार नाही. कारण तुम्ही जमिनीखाली राहत आहात.'

किंवा कारण फक्त एवढंच असू शकतं की, वैज्ञानिकदृष्ट्या आपण त्याच भाषेत किंवा समान भाषेत बोलत नाही.

"आम्ही 1960 पासून रेडिओ टेलिस्कोप्स वापरून परग्रहवासीय संस्कृतींपासून येणाऱ्या संकेतांवर लक्ष ठेवून आहोत," असे प्राध्यापक ओ'ब्रायन सांगतात. पण, एखादा जीव अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं संकेत पाठवू शकतो. त्यामुळे आपल्याला काही ऐकू येणं कधीही शक्य नाही.

जरी आपण इतर जीवनाशी एकाच 'तरंगलांबी'वर असलो, तरी इतक्या मोठ्या अंतरामुळे संदेश पाठवायला आणि उत्तर मिळवायला हजारो वर्षे लागू शकतात (जसं आता एखाद्या पत्राद्वारे संवाद साधणं कमी गतीचं वाटतं.)

कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील 'ब्रेकथ्रू लिसन' नावाच्या नवीन प्रकल्पाद्वारे, शास्त्रज्ञ जवळच्या लाखो तार्‍यांमध्ये शोध घेत आहेत आणि जिथेही संदेश पाठवता येईल तेथून पृथ्वीवर उत्तर मिळेल, अशी त्यांना आशा आहे.

ते आपल्या मिल्की वेच्या (आकाशगंगा) मध्यभागी असलेल्या तार्‍यांकडेही पाहत आहेत. हे तारे सुमारे 25 हजार प्रकाशवर्षांवर आहेत. म्हणजे, अशा एखाद्या तार्‍याकडून पाठवलेला संदेश आपल्यापर्यंत पोहोचायला सुमारे 25 हजार वर्षे लागतील.

जर एलियन जीवन खरोखरच अस्तित्वात असेल, तर त्यांचे संदेश ऐकायला आपल्याला हजारो वर्षे लागू शकतात.

अत्यंत दूरच्या अंतरावर ताऱ्यांदरम्यान प्रवास करणं नजीकच्या भविष्यात शक्य दिसत नाही.

आपण प्रकाशाच्या वेगाने रेडिओ तरंग पाठवू शकतो. परंतु, ते फक्त रेडिओ तरंग आहेत, जे अंतराळातील निर्वातातून जातात. पण कोणतंही अंतराळ यान ताऱ्यांदरम्यान प्रवास करू शकत नाही.

जर आपण प्रोब (वैज्ञानिक संशोधनासाठी वापरले जाणारे) किंवा लोकांच्या रूपात काही भौतिक वस्तू पाठवू इच्छित असू, तर ते खूप आव्हानात्मक ठरू शकतं.

जर आपण हे अजून करू शकत नाही, तर आपल्या आकाशीय किंवा खगोलीय शेजाऱ्यांनाही (एलिएन्सलाही) कदाचित हे शक्य नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे आपल्यापर्यंत येण्याचं तंत्रज्ञान असलं, तरी त्यांना कदाचित येण्याची इच्छा नसावी, हाही विचार केला पाहिजे.

यासाठी काहीसं आकाशीय किंवा वैश्विक नशीब किंवा योग्य वेळ देखील गरजेची आहे. आपली संस्कृती, सभ्यता पृथ्वीवर खरोखर किती काळापासून आहे, हे लक्षात ठेवणं कठीण आहे.

पृथ्वीवर जीवन 3.5 अब्ज वर्षांपासून आहे, परंतु आधुनिक मानव फक्त सुमारे 3 लाख वर्षांपासून आहे. ही संस्कृती किंवा सभ्यता लवकरच नष्ट होऊ शकते. त्यामुळे संपर्क साधण्यासाठी वेळ खूपच कमी आहे.

आपल्याला नक्की माहिती नाही की, एलियन्सने कधी आपल्या ग्रहाला भेट दिली आहे का? पण आपण निश्चितपणे हे म्हणू शकतो की, मानव पृथ्वीवर राहत असताना ते कदाचित येथे आलेले नाहीत.

डॉ. अॅडेरिन-पोकॉक म्हणतात, 'जर आपली संस्कृती एलियन्सच्या संस्कृतीशी जुळत नसेल, तर आपण कधीही त्यांना भेटणार नाही.' कदाचित ते खूप आधी आले असतील किंवा ते भविष्यात खूप नंतर येतील, जेव्हा कदाचित मानवी जीवन संपलेलंही असेल.

कदाचित ज्युरासिक काळात डायनासोरबरोबर एलियन्स राहत असतील. परंतु, आपल्याला कदाचित हे कधी माहीतही होणार नाही.

(ही माहिती बीबीसी रेडिओ 4 च्या 'द इन्फिनिट मंकी केज' कार्यक्रमावर आधारित आहे)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)