You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केवळ आहारातूनच मिळणारे झिंक काय असते? ते का गरजेचे आहे?
झिंक हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा खनिज आहे. शरीरामध्ये 300 हून अधिक एन्झाइम्स आहेत जे झिंकच्या उपस्थितीवर अवलंबून असतात.
हे फक्त रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यातच नाही; तर शरीराचा विकास, प्रजनन क्षमता, आणि स्नायूंच्या दुरुस्तीमध्येही आवश्यक आहे.
झिंकचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करणं आवश्यक आहे, नाहीतर याचा अभाव आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात.
निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला याची थोड्याशा प्रमाणात का होईना, पण गरज असते.
इतर खनिजांप्रमाणेच, मानवी शरीर झिंक तयार करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला ते आपल्या आहारातूनच मिळवावे लागते.
निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला याची थोड्याशा प्रमाणात का होईना, पण गरज असते.
इतर खनिजांप्रमाणेच, मानवी शरीर झिंक तयार करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला ते आपल्या आहारातूनच मिळवावे लागते.
झिंकची गरज का आहे?
झिंक आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे गरजेचे आहे. शरीरातील 300 हून अधिक एन्झाइम्स झिंकवर अवलंबून असतात. हे एन्झाईम्स म्हणजे असे प्रथिने असतात जे रासायनिक प्रक्रिया गतीमान करण्यात मदत करतात.
झिंक प्रथिने आणि कार्बोहायड्रेटच्या पचनापासून ते डीएनएच्या निर्मितीपर्यंत शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये सहभागी असतो. हे कॅल्शियम आणि इतर खनिजांना हाडांच्या रचनेत सामील होण्यासाठी मदत करते आणि हाडांच्या विकासात भूमिका बजावते.
झिंक एक अँटिऑक्सिडन्ट म्हणूनही कार्य करते. हे पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासह आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला सामान्यपणे काम करण्यास मदत करते.
झिंक सामान्य प्रजनन आणि प्रजनन क्षमतेसाठी देखील महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये हे अंडाणूच्या विकासात भूमिका बजावते, तर पुरुषांमध्ये हे शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये आणि त्यांची गती वाढवण्यासाठी मदत करते.
मुलांमध्ये ते मेंदू आणि मज्जासंस्थेच्या वाढीस आणि विकासास मदत करते.
झिंक खरंच सर्दीशी लढण्यासाठी मदत करते का?
झिंक शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. 1980 च्या दशकापासून सर्दी-खोकल्याच्या औषधांमध्ये हा एक सामान्य घटक राहिला आहे. त्यावेळी केलेल्या अभ्यासांमध्ये स्पष्ट झालं होतं की, झिंक सर्दीच्या विषाणूंचा प्रसार रोखू शकतो.
पण अलीकडील संशोधनात असं दिसून आलं आहे की, झिंक सर्दी रोखण्यापेक्षा तिचा कालावधी कमी करण्यास जास्त प्रभावी आहे.
30 हून अधिक संशोधनांचा आढावा घेतल्यानंतर झिंकमुळे सर्दी टाळता येऊ शकते, असे कोणतेही प्रमाण सापडले नाहीत. पण काही संशोधनांमध्ये हे दिसून आलं आहे की, जर ते लवकर घेतले तर सर्दीचे दिवस एक ते दोन दिवसांनी कमी होऊ शकतात.
तथापि, झिंकचे प्रकार, मात्रा आणि सेवनाची वेळ यामध्ये फरक असल्याने तज्ज्ञ हे निष्कर्ष निर्णायक मानत नाहीत.
झिंकचे काही दुष्परिणामही आहेत. जास्त डोस घेतल्यास पोटासंबंधी समस्या, उलटी आणि तोंडात धातूची चव येणे यासारख्या समस्या होऊ शकतात.
झिंकची किती गरज असते?
युनायटेड किंगडममध्ये प्रौढांसाठी झिंकची दररोजची मात्रा पुरुषांसाठी 9.5 मिलीग्राम आणि महिलांसाठी 7 मिलीग्राम असावी, असं सुचवण्यात आलं आहे.
तर स्तनपान करणाऱ्या महिलांना पहिल्या चार महिन्यांत स्तनपानाच्या कालावधीत दररोज अतिरिक्त 6 मिलीग्राम आणि त्यानंतर अतिरिक्त 2.5 मिलीग्राम झिंकची आवश्यकता असते.
कोणत्या खाद्य पदार्थांमध्ये झिंक असते?
झिंकचे चांगले स्रोत असलेले अन्न पदार्थ खालीलप्रमाणे आहेत
- मांस
- मटार, बिन्स आणि मसूर
- बिया
- भरड धान्य आणि ब्राउन राइस
- अंडी
- डेअरी उत्पादनं
फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि खनिजे असतात. परंतु त्यामध्ये झिंकचे प्रमाण कमी असते. मांसाहारातून मिळणारे झिंक हे शाकाहारी अन्नातून मिळणाऱ्या झिंकपेक्षा चांगले असते.
असं यासाठी आहे कारण, वनस्पतींमध्ये मिळणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये फायटेट्स (संग्रहीत फॉस्फॉरसचा एक प्रकार) आढळतात. हे फायटेट्स आतड्यात झिंकशी चिकटून त्याच्या शोषणास अडथळा आणतात.
संशोधनात असं दिसून आलं आहे की, जे लोक शाकाहारी आणि व्हिगन आहाराचं पालन करतात त्यांच्यात झिंकचं प्रमाण कमी असतं.
वनस्पतींचे अन्न तयार करण्याचे काही मार्ग आहेत. जे झिंक शोषण सुधारण्यास मदत करू शकतात. बिन्स आणि धान्ये भिजवून आणि अंकुरित केल्याने त्यांच्या फायटेटचे प्रमाण कमी होऊ शकते, जसं की किण्वनच्या (फर्मेंटेशन) प्रक्रियेमुळं होऊ शकतं.
याचा अर्थ असा आहे की, साधारण चपातीच्या तुलनेत खमिरी रोटी झिंकचा उत्तम स्रोत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जागतिक स्तरावर 30 टक्के लोकसंख्येला झिंकच्या कमतरतेचा धोका आहे.
सप्लिमेंट्सबद्दल काय?
जर तुम्ही झिंक सप्लिमेंट्स घेण्याचा विचार करत असाल, तर हे महत्त्वाचं आहे की, तुम्ही जास्त प्रमाणात झिंक घेऊ नका. एनएचएसने दिवसाला 25 मिलीग्रामपेक्षा जास्त झिंक न घेण्याची शिफारस केली आहे.
(या लेखातील सर्व सामग्री फक्त सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल काही शंका असेल, तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.