You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोट आणि मेंदूचं नेमकं काय आहे कनेक्शन? ते तुटल्याने येऊ शकतं नैराश्य
- Author, आंद्रे बिएरनथ
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
परीक्षा आली किंवा एखादं संकट आलं की पोटात गोळा येतो. किंवा तुम्ही म्हणता, माझ्या पोटात तर खड्डाच पडला.... तसंच एखादी भारी गोष्ट घडली, आनंद वाटला की पोटात गुदगुल्या झाल्यासारखं वाटतं. हे असं का होत असेल? आनंद आणि दुःख किंवा भीतीसारख्या भावना तर डोक्यात म्हणजे मेंदूत व्हायला पाहिजेत ना?
या भावनांच्यावेळेस पोटात का बदल होतात? हे कोण नियंत्रित करत असतं? आपल्या भावना पोटाला, पोटातल्या आतड्याला कशा कळतात? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण मेंदू आणि आपलं आतडं या दोन 'मित्र' अवयवांची माहिती घेणार आहोत.
मेंदू आपल्या शरीरातील अवयवांना सूचना देतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र आतड्यांचा, त्यातील सूक्ष्मजीवांचा मेंदूशी थेट संपर्क असतो. जिवाणू, विषाणूंसारखे हे सूक्ष्मजीव फक्त अपायकारकच नसतात तर आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त देखील असतात.
अनेक आजार, आपला मूड, भावना यांच्यावर या सूक्ष्मजीवांचा परिणाम होत असतो असं ताज्या संशोधनातून समोर आलं आहे. हा संबंध नेमका कसा असतो, संशोधकांनी त्यातून काय निष्कर्ष काढले आहेत आणि त्याचा आरोग्यासंदर्भात काय फायदा होणार आहे यासंदर्भातील महत्त्वाची आणि तितकीच रंजक माहिती यातून मिळते.
आपल्या आतड्यात 10 कोटींहून अधिक मज्जातंतू (याला नर्व्ह सेल्स किंवा न्यूरॉन्स म्हणतात) असतात. आपल्या शरीरात सेरोटोनिन स्रवतं. ते निरोगी राहण्याशी संबंधित न्युरोट्रान्समीटर असतं. 95 टक्के सेरोटोनिनची निर्मिती आतड्यातील हे मज्जातंतूच करतात.
अलीकडेच, संशोधनातील एका पुराव्यानं शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी आतड्यातील सूक्ष्मजीवांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. या सूक्ष्मजीवांमध्ये कित्येक ट्रिलियन म्हणजे हजारो अब्ज जिवाणू, विषाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीवांचा समावेश असतो.
यातून दिसून येतं की आपले आतडे आणि मेंदू एकमेकांशी कशाप्रकारे जोडलेले आहेत आणि ते एकमेकांवर कसा प्रभाव टाकतात. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीच्या आधी तुम्हाला कदाचित "गट फिलिंग" (आतून काहीतरी जाणवं) आली असेल किंवा बद्धकोष्ठता झाल्यावर चीडचीड झाली असेल.
मात्र हा संपर्क कसा साधला जातो? निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी आतडे आणि मेंदूतील या संबंधात सुधारणा करणं शक्य आहे का?
मेंदू आणि आतड्याचा परस्परसंबंध
शरीरातील हे दोन महत्त्वाचे अवयव तीन वेगवेगळ्या प्रकारे जोडलेले असतात, असं डॉ. सलिहा महमूद अहमद म्हणतात. त्या गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट आहेत आणि बॉवेल रिसर्च युकेच्या सदिच्छादूत आहेत.
यातील पहिला मार्ग म्हणजे व्हेगस नर्व्ह. ही आपल्या शरीरातील मज्जासंस्थेतून एक अतिशय महत्त्वाची रचना असते. ती मेंदू आणि हृदय, आतड्यांसारख्या अनेक अवयवांना थेट एकमेकांशी जोडते.
दुसरा म्हणजे, मेंदू आणि आतडे हार्मोन्सच्या माध्यमातून संवाद साधतात. घ्रेलिन आणि जीएलपी-1 सारख्या पदार्थांची ग्रंथींद्वारे निर्मिती होते आणि ते संपूर्ण शरीरात संदेश पाठवतात.
तिसरा म्हणजे, आपली रोगप्रतिकारशक्ती.
"अनेकजणांना असं वाटतं की रोगप्रतिकारक पेशी फक्त आपल्या रक्तात किंवा लिम्फ नोड्समध्ये असतात. मात्र त्यांचा एक मोठा भाग आपल्या आतड्यात कार्यरत असतो. तो मेंदू आणि संपूर्ण शरीरात एक मध्यस्थाचं काम करत असतो," असं डॉ. अहमद म्हणतात.
डॉ. पंकज जे पसरिचा अमेरिकेतील मायो क्लिनिकमध्ये ग्रॅस्ट्रोएन्टरोलॉजीचे तज्ज्ञ आहेत.
मेंदूला कार्यरत राहण्यासाठी प्रचंड ऊर्जेची आवश्यकता असते आणि आतडे हे ऊर्जेचे केंद्र किंवा पॉवरहाऊस असतं, त्यामुळे मेंदू आणि आतड्यात हा विशेष संपर्क होतो, या गोष्टीला त्यांनी अधोरेखित केलं.
ते म्हणतात की मेंदूचं वजन आपल्या शरीराच्या वजनाच्या फक्त 2 टक्केच असतं. मात्र शरीराला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी 20 टक्के ऊर्जेचा वापर एकटा मेंदू करतो. तर आतड्याचं काम असतं की अन्नाचं विघटन सोप्या रेणूंमध्ये करणं आणि ते शोषून घेत संपूर्ण शरीराला "ऊर्जा" पुरवणं.
मात्र हा दोन्ही बाजूनं असणारा संबंध असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, मेंदू आतड्यावर प्रभाव टाकतो आणि त्याचवेळी आतडे देखील मेंदूवर प्रभाव टाकतात.
आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण याची अनेक उदाहरणं पाहू शकतो.
आपण जेव्हा एखाद्या धोकादायक किंवा वाईट परिस्थितीला तोंड देत असतो किंवा कामाच्या ठिकाणी घेतली जाणारी बैठकीत भाग घेणार असतो, तेव्हा आपल्या शरीरातील पहिली प्रतिक्रिया आतड्यांमध्ये होत असते.
त्यातून आपल्याला मळमळ होऊ शकते, पोटात गोळे येऊ शकतात किंवा अगदी अतिसार किंवा हगवण होऊ शकते.
तसंच जेव्हा आपण प्रेमात असतो, तेव्हा आपल्याला पोटात गुदगुल्या झाल्यासारखं वाटतं किंवा आपली खूप आवडीची व्यक्तीबरोबर असल्यास खूपच उत्साही असल्यासारखं वाटतं.
दुसऱ्या बाजूला, जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल आणि तुम्ही कित्येक दिवस शौचास गेले नसाल, तर त्यामुळे तुमची चिडचिड होते आणि तणाव जाणवतो.
"पण हे कोडं सोडवण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आम्ही गोळा करत आहोत," असं डॉ. पसरिचा म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)