You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेवताना किंवा जेवणानंतर लगेच तुम्ही कॉफी घेता का? कॉफीपेक्षा चहा जास्त लाभदायक ठरतो का?
- Author, ज्युलिया ग्रांची
- Role, बीबीसी ब्राझील
तुम्हालाही जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी प्यायची सवय आहे का? असं असेल तर थोडं सांभाळून हे करा. जर जेवणानंतर लगेच चहा कॉफी प्यायची सवय असेल तर काय होऊ शकतं हे आपण समजून घेऊ. जेवणानंतर जर कॉफी प्यायची सवय असेल तर काय होतं हे आपण आधी पाहू.
कॉफी पिण्याच्या या सवयीमुळे अन्नातील पोषक घटक तुमच्या शरीरात शोषून घेण्यात अडचणी येऊ शकतात.
कॉफीमध्ये एक हजार रासायनिक कम्पाउंड असतात, त्यातील कॅफिन, पॉलिफेनॉल आणि टॅनिनसारखी कंपाउंड (संयुगं) अन्नातील पोषक तत्त्वे रोखून धरतात.
मात्र, बहुतांश लोकांमध्ये हा परिणाम दिसून येत नाही. कॉफीच्या या परिणामामुळे तुमच्या शरीरात कसलीही कमतरता निर्माण होत नाही.
न्यूट्रिशन किंवा पोषक तत्त्वं तुमच्या शरीराला आरोग्यदायी ठेवण्यात मदत करतात. आपल्या जेवणातून हे घटक शरीराला मिळत असतात. निरोगी राहण्यासाठी शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्त्वांची गरज असते.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील पोषण विज्ञान (न्यूट्रिशन सायन्स) विभागातील डॉक्टरेट संशोधक आणि आरोग्य विज्ञान अकादमीचे मुख्य शिक्षक अॅलेक्स रुआनी म्हणतात, "कॉफी प्यायल्याने शरीराचं पोषण पूर्णपणे थांबतं असं नाही पण त्याची गती नक्कीच मंदावते."
कॉफीचा शरीरावर होणार परिणाम वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. कॉफीची तीव्रता, तुमच्या शरीराची पचनशक्ती, वय. तुमचं आरोग्य आणि जेनेटिक्स (शरीराची जनुकीय संरचना) हे घटक याबाबतीत महत्त्वाचे ठरतात.
शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन्स (जीवनसत्वे) यांच्या पातळीवर कॉफीचा परिणाम होतो.
लाइनस पॉलिंग इन्स्टिट्यूटच्या संचालक आणि ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ हेल्थच्या प्राध्यापिका एमिली हो म्हणतात, "तुमच्या शरीरातील पोषक तत्त्वाचं प्रमाण पुरेसं असेल तर काही होत नाही. पण आधीच शरीरातील पोषक तत्त्वांचं प्रमाण कमी असेल तर मात्र कॉफी प्यायल्याने हे प्रमाण आणखी कमी होऊ शकतं."
1980पासून सुरू असलेल्या अनेक संशोधनांमधून हे दिसून आलं आहे की, शरीरातील लोहाची पातळी आणि कॉफी यांचा परस्पर संबंध आहे.
एमिली हो म्हणतात, "तुम्ही जेवणासोबत कॉफी पीत असाल तर कॉफीमध्ये असणारे पॉलिफेनॉल्स पचनसंस्थेतील काही मिनरल्ससोबत (खनिजं) चिकटतात."
एमिली यांनी सांगितलं की, असं घडल्यामुळे शरीरातील लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो. कारण शरीरातल्या खनिजांना रक्तात मिसळण्यासाठी आतड्यांच्या कोशिकांमधून जावं लागतं.
त्या म्हणतात, "पण पॉलिफेनॉल्समुळे हे घटक रक्तात न मिसळता शरीरातून बाहेर फेकले जातात."
विशेषतः शरीराला गरजेच्या असणाऱ्या लोहाच्या बाबतीत हे महत्त्वाचं ठरतं. वनस्पती-आधारित अन्नांमध्ये आढळणाऱ्या लोहाला 'नॉन-हीम आयर्न' म्हणतात. फळे आणि भाज्यांसारख्या पदार्थांमधून मिळणारे नॉन-हीम लोह शरीराद्वारे शोषणे कठीण असते.
कॉफीमध्ये असणारं पॉलिफेनॉल हे खरंतर एका प्रकारचं क्लोरोजिनीक अॅसिड असतं. त्यामुळे हे अॅसिड नॉन-हीम लोहासोबत जोडलं जातं. त्यामुळे वनस्पतींपासून मिळणाऱ्या अन्नातील लोह शरीरात नीटपणे शोषलं जात नाही.
त्यामुळे पचनसंस्थेतून प्रवास करताना हे लोह याच कम्पाउंड्समध्ये अडकतं. त्यामुळे शरीरात यांचा वापर करण्याऐवजी लघवीवाटे त्यांना बाहेर काढून टाकतं.
अॅलेक्स रुआनी म्हणतात, "त्यामुळे कॉफी पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेवण्याआधी एक तास किंवा मग लोहयुक्त जेवण केल्यानंतर किमान दोन तासांनी कॉफी पिणं सुरक्षित असू शकतं."
गर्भवती महिला किंवा शरीरात लोहाची कमतरता असणाऱ्या महिलांनी याबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या शरीरातल्या लोहाच्या पातळीवर सतत लक्ष्य ठेवलं पाहिजे.
त्यांना अधिक लोहाची गरज असते आणि त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. त्यामुळे अशा महिलांनी कॉफी पिण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे.
हाडांसाठी कॅल्शियम खूप गरजेचं असतं. ब्रिटनमध्ये 16 ते 49 वयोगटातील लोक शरीराला जेवढी कॅल्शियमची गरज आहे त्यापेक्षा कमी कॅल्शियम घेतात, त्यामुळे हाडं ठिसूळ होण्याचा धोका असतो.
आपल्या रक्तातून (आणि मूत्रातून) अनावश्यक घटक आणि अतिरिक्त पाणी काढून टाकून आपली किडनी (मूत्रपिंड) शरीरातील रसायनांचे (जसे की सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम) संतुलन राखते. किडनी शरीरात हार्मोन्स देखील तयार करते.
अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झालंय की, कॅफिनमुळे शरीरातील लोहाचं शोषण मंदावतं. कारण कॅफिनमुळे किडनीचं कार्य प्रभावित होतं. किडनीमध्ये कॅल्शियमवर होणारी प्रक्रिया आणि मग नंतर आतड्यांमधून होणारं शोषण कॅफिनमुळे रोखलं जातं किंवा त्या शोषणाचा वेग मंदावतो.
असं असलं तरी कॅफिनमुळे होणार परिणाम एवढा मोठा नाही. जे लोक आधीच कमी कॅल्शियमचं जेवण करतात किंवा ज्यांना हाडांशी संबंधित आजारांचा धोका आहे अशा व्यक्तींवर कॅफिनचा प्रभाव जास्त असू शकतो.
अॅलेक्स रुआनी म्हणतात, "ऑस्टियोपोरोसिस इंटरनॅशनल या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कॅफिन हाडं कमकुवत करू शकतं. कारण ते हाडांच्या चयापचयात व्यत्यय आणतं. पण, या क्षेत्रात आणखीन अभ्यासाची गरज आहे."
कॅल्शियम तुमच्या शरीरात साठवलं जातं त्यामुळे रोज कॅल्शियम घेण्याची गरज नसते. पण 19 ते 64 वयोगटातील व्यक्तींनी महिन्याला किमान 700 मिलिग्रॅम कॅल्शियम घेतलं पाहिजे.
कॅफिनमुळे वारंवार लघवीला जाण्याची समस्या देखील उद्भवू शकते हेदेखील लक्षात घ्यायला हवं.
एमिली म्हणतात, "सतत लघवीला गेल्यामुळे शरीरात विरघळणारी खनिजे आणि जीवनसत्वे बाहेर फेकली जाऊ शकतात. मात्र अनेकदा असं घडल्याने शरीरातील या घटकांचं प्रमाण देखील नियंत्रणात राहू शकतं."
रुआनी म्हणतात, "कॉफीमुळे किडनीचं कार्य प्रभावित होतं आणि शरीरात पोषणतत्त्वे शोषून घेण्याच्या प्रक्रियेवर देखील परिणाम होतात त्यामुळं जास्त कॉफी प्यायल्याने वारंवार लघवी होऊ शकते. यामुळे शरीरात विरघळणाऱ्या इतर जीवनसत्वांसोबतच व्हिटॅमिन बी देखील बाहेर फेकलं जाऊ शकतं."
व्हिटॅमिन बी शरीरात जमा होत नाही कारण ते रक्तात विरघळून जातं. अर्थात शरीरात व्हिटॅमिन बी जास्त झाला तर लघवीवाटे ते काढूनही टाकलं जातं.
प्रोबायोटिक्स हे जिवंत बॅक्टेरिया आणि यीस्ट आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं.
एनएचएस (नॅशनल हेल्थ सर्व्हे)च्या वेबसाइटनुसार, काही प्रकरणांमध्ये ते तुमच्या आतड्यांमधील नैसर्गिक बॅक्टेरिया पूर्ववत करण्यास मदत करू शकतात. मात्र, हा दावा सिद्ध करण्यास पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.
मग जर तुम्ही प्रोबायोटिक सप्लिमेंट्स घेत असाल किंवा दही आणि किमची सारखे प्रोबायोटिकयुक्त पदार्थ खात असाल तर ते कॉफी सारख्या गरम पेयांसोबत घेणं टाळायला हवं.
"खरं तर जिवंत जीवाणू (बॅक्टेरिया) उष्णतेला खूप संवेदनशील असतात," असं रुआनी म्हणतात. यामुळे, हे बॅक्टेरिया तुमच्या पोटात टिकू शकत नाहीत आणि नंतर प्रोबायोटिकचा प्रभाव कमी होतो.
अँटीबायोटिक्समुळे होणाऱ्या अतिसारापासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टर कधीकधी प्रोबायोटिक्स वापरण्याची शिफारस करतात.
प्रोबायोटिक्सचे जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी, ते कॉफी पिल्यानंतर किमान अर्धा किंवा एक तासाने घेतले पाहिजे. जर तुम्ही एक कप कॉफी घेतली असेल तर प्रोबायोटिक्सचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही अर्धा ते एक तास वाट पहावी.
तुम्ही आता एवढं सगळं वाचल्यानंतर 'पुन्हा आपला चहाच बरा' असं म्हणत असाल तर थोडं थांबा. या दोन्ही गोष्टींचे परिणाम जवळपास सारखेच आहेत.
एमिली म्हणतात, "खरंतर चहात असणारे पॉलिफेनॉल्स पोषक तत्वांवर सारखाच प्रभाव टाकतात. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल की तुमच्या शरीरातील पोषण तत्वांची पातळी चांगली असायला हवी तर तुम्ही चहा पितानासुद्धा काळजी घेतली पाहिजे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.