You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंजाबमध्ये पुराचं थैमान : रस्ते खचले, हॉटेल्स पाण्याखाली, अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात
- Author, सरबजीत सिंह धालीवाल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
डोंगराळ भागात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे पंजाबमधील पठाणकोट, जालंधर, गुरुदासपूर, होशियारपूर, अमृतसर, कपूरथळा, फिरोजपूर आणि फाजिल्का जिल्ह्यातील अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत.
पंजाबमधील नद्या आणि नाले सध्या पाण्याने भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे.
पंजाब सरकारसह, भारतीय लष्कर आणि एनडीआरएफची पथके अनेक ठिकाणी बचाव कार्यात गुंतलेली आहेत.
सध्या जम्मू-पठाणकोट महामार्गावरील वाहतूक बंद आहे आणि ट्रकच्या लांबच लांब रांगा आहेत.
जम्मू-काश्मीरमधून पठाणकोटमधील माधोपूरमार्गे पंजाबमध्ये प्रवेश करणाऱ्या रावी नदीला बुधवारी पूर आला आहे.
या नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पठाणकोट आणि माधोपूरच्या सखल भागात पाणी शिरलं आहे.
यामुळे, बुधवारी पठाणकोट-जम्मू महामार्ग अनेक तास बंद होता.
पठाणकोटमध्ये अनेक किलोमीटरपर्यंत ट्रकांच्या रांगाच रांगा
पठाणकोटमध्ये बीबीसीच्या टीमला राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूला अनेक किलोमीटरपर्यंत ट्रकच्या लांबच लांब रांगा दिसल्या.
प्रशासनाने बुधवार संध्याकाळपर्यंत या मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.
याशिवाय, काही यात्रेकरू वैष्णोदेवी आणि इतर तीर्थस्थळांकडे जाण्यासाठी महामार्ग मोकळा होण्याची वाट पाहत असल्याचे दिसून आले.
जालंधरहून भाजीपाला घेऊन जम्मूला जाणारे ट्रक चालक बहादूर सिंग म्हणाले, "आम्ही मंगळवारी दुपारपासून महामार्ग मोकळा होण्याची वाट पाहत आहोत."
बुधवारी हलका पाऊस पडला होता. दिवसा हवामान स्वच्छ दिसून आले. परंतु, महामार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे.
संध्याकाळी, रावी नदीची पाण्याची पातळी थोडी कमी झाल्यानंतर, प्रशासनाने काही काळासाठी ट्रकची वाहतूक पूर्ववत केली.
जम्मूहून चंदीगडला जाणारे भारतीय लष्कराचे जवान रणजित सिंग म्हणाले की, पावसामुळे जम्मूमधील परिस्थिती सध्या चांगली नाही.
रणजित सिंग यांच्या म्हणाले की, "मी सकाळी 6 वाजता जम्मूहून चंदीगडला निघालो, पण वाटेत तुटलेले रस्ते आणि पूल असल्याने, मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच पठाणकोटला पोहोचू शकेन."
आता बस आणि रेल्वेची वाहतूक बंद असल्याने चंदीगडला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याची आपल्याला कल्पना नाही, असं ते सांगतात.
बीबीसीच्या टीमने पाहिलं की, रावी नदीचं पाणी पठाणकोटच्या सखल भागात शिरलं आहे.
शहरातून वाहणाऱ्या नद्या सध्या पूर्ण वेगानं वाहत आहेत.
रावी नदीच्या जलद प्रवाहामुळे पठाणकोट शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत आणि रस्ते तुटले आहेत.
बीबीसी टीमनं पाहिलं की, नदीजवळ बांधलेलं 'कोरल' हॉटेल नदीत बुडालं आहे.
या हॉटेलचे मालक दिनेश महाजन यांनी बीबीसीला सांगितलं की, "मंगळवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रावी नदीतील पाण्याची पातळी वाढू लागली आणि पाणी हळूहळू हॉटेलमध्ये शिरलं. हॉटेलचं खूप नुकसान झालं आहे."
75 वर्षीय दिनेश महाजन म्हणतात, "1988 नंतर पहिल्यांदाच रावी नदीनं जनजीवनावर इतका मोठा परिणाम दाखवला आहे. 1988 मध्ये पंजाबला पुराचा मोठा फटका बसला होता."
जेव्हा बीबीसीची टीम पंजाबहून रावी नदी ओलांडून जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील लखनपूरला पोहोचली, तेव्हा रावी नदीच्या पाण्यामुळे झालेला विध्वंस स्पष्टपणे दिसत होता.
रावी नदीच्या पाण्याने एक इमारत उद्ध्वस्त झाली आहे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूला असलेला रस्ताही वाहून गेला आहे. पाण्यामुळे झालेलं नुकसान इथे स्पष्टपणे दिसत होते.
माधोपूर धरणाचे दरवाजे तुटले
जेव्हा बीबीसीची टीम माधोपूर हेडवर्क्सवर पोहोचली तेव्हा अचानक तिथे असलेल्या बॅरेजच्या धरणाचा एक दरवाजा तुटला. त्यामुळे एसडीओसह अनेक कर्मचारी तिथे अडकले. लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने या लोकांना बाहेर काढण्यात आलं.
गेट तुटल्याने एक व्यक्तीही पाण्यात वाहून गेली.
बीबीसी टीमला असं आढळून आलं की, सकाळच्या तुलनेत संध्याकाळपर्यंत रावी नदीची पाण्याची पातळी थोडी कमी झाली होती. पठाणकोटचे उपायुक्त आदित्य उप्पल यांनीही या गोष्टीला पुष्टी दिली.
ते म्हणाले, "पाण्याची पातळी निश्चितच पूर्वीपेक्षा कमी आहे, परंतु येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता असल्याने अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे."
दुसरीकडे, जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्याचे उपायुक्त राजेश शर्मा यांच्या मते, "डोंगराळ भागात सतत पाऊस पडत आहे, ज्यामुळे पाणी मैदानी प्रदेशाकडे वेगानं सरकत आहे."
जम्मू आणि आसपासच्या भागात पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
राजेश शर्मा म्हणाले, "रावी नदीत महामार्गाचा काही भाग वाहून गेला आहे आणि जर डोंगराळ भागात आणखी पाऊस पडला तर परिस्थिती अधिक धोकादायक होऊ शकते. प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)