Ghibli ट्रेंड ज्यांच्या चित्रांमुळे सुरू झाला, त्या शैलीचे निर्माते हायाओ मियाझाकी यांच्याविषयी जाणून घ्या

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

आपले फोटो ChatGPT AI च्या मदतीने जिबली (Ghibli) स्टाईलच्या चित्रात रूपांतरीत करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर आहे. जगभरातल्या युजर्सनी स्वतःचे फोटो, मीम्स अगदी सिनेमांमधले सीन्सही अशा प्रकारे जिबलीच्या चित्रात करून पाहिले आहे.

हा ट्रेंड इतका फोफावला की OpenAI ज्यावर चालतं ते GPUs सतत प्रोसेसिंग करून वितळायला लागल्याचं सॅम ऑल्टमन यांनी एक्सवर लिहीलं. आणि नंतर फोटो जनरेट करणारं हे फीचर फ्री व्हर्जन वापरणाऱ्यांसाठीही खुलं करण्यात आलं.

पण हा स्टुडिओ जिबली काय आहे? त्याची सुरुवात करणारे हायाओ मियाझाकी कोण आहेत?

Ghibli हे अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रातलं हे एक खूप मोठं - गाजलेलं नाव आहे. इतकं की यांच्या दोन सिनेमांना ऑस्कर्स मिळाले आहेत.

काही जण याचा गिबली वा घिबली असा उच्चार करतात.

पण या Studio ला सुरुवात करणारे हायाओ मियाझाकी (Hayao Miyazaki) याचा उच्चार जि-बु-री असा करतात.

मियाझाकींना लहानपणापासूनच गोष्टी सांगण्याचं वेड होतं. 1958 साली आलेल्या Panda and the Magic Serpent या जपानमधल्या पहिल्या अ‍ॅनिमेटेड फिल्ममुळे त्यांना अ‍ॅनिमेशनमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली.

स्टुडिओ जिबलीची स्थापना

अ‍ॅनिमेटर आणि दिग्दर्शक असणारे हायाओ मियाझाकी, ताकाहाता इसाओ (Takahata Isao) आणि प्रोड्यूसर सुझुकी तोशिओ या तिघांनी मिळून 1985 मध्ये एका अ‍ॅनिमेशन स्टुडिओला सुरुवात केली.

मियाझाकींच्या वडिलांची विमानांचे भाग तयार करणारी कंपनी होती. म्हणून त्यांना विमानांमध्ये खूप रस आहे. त्याकाळात सहारा वाळवंटात Caproni Ca.309 या इटालियन विमानाचा वापर व्हायचा. आणि लिबियन अरेबिक भाषेत गिबली या शब्दाचा अर्थ होतो वाळवंटातली गरम हवा. त्यावरून Caproni Ca.309 विमानाला गिबली हे नाव पडलं होतं. या इटालियन विमानाच्या नावावरून मियाझाकींनी आपल्या स्टुडिओचं नाव ठेवलं...जिबली.

40 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या स्टुडिओ जिबलीने जपानी अ‍ॅनिमेशनचं जग बदललं आणि मियाझाकींना जपानमध्ये गॉडफादर ऑफ अ‍ॅनिमेशनचं म्हटलं जाऊ लागलं.

स्टुडिओ जिबलीची शैली आणि खासियत

जपानमध्ये Manga म्हणजे जपानी शैलीची कॉमिक बुक्स आणि ग्राफिक नॉव्हेल्स खूप प्रसिद्ध आहेत. यामध्ये इलेस्ट्रेशन्समधून - चित्रं रेखाटून गोष्टी सांगितलेल्या असतात.

तर Anime हा Japanese-style 2D animation प्रकार आहे.

स्टुडिओ जिबली हा यांचा मिलाफ आहे... पण तरीही त्यांची एक स्वत्रंत्र शैली आहे.

मग या जिबलीची अ‍ॅनिमेशन्स इतरांपेक्षा वेगळी का आहेत..

कारण ती अजूनही हाताने रेखाटली जातात...रंगवली जातात... जगभरातल्या अ‍ॅनिमेशन स्टुडिओजनी कम्प्युटर जनरेटेड इमेजेस आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान वापरायला कधीच सुरुवात केली असली, तरी मियाझाकींनी मात्र आपलं हे वेगळेपण टिकवून ठेवलं.

पेस्टल रंग, टपोऱ्या - बोलक्या डोळ्यांची लोकं, बारकाईने वॉटर कलरमध्ये रेखाटलेली पाश्वर्भूमी, सुंदर निसर्गचित्रणं यामुळे जिबलीचं अ‍ॅनिमेशन, ही गोष्ट पाहणाऱ्याला खिळवून ठेवतं.

यात निसर्ग, पर्यावरणाचे मुद्दे, राजकारण, युद्ध, मानवी भावभावना या सगळ्या गोष्टींचा मिलाफ असतो. Hand-drawn Animation असल्याने मियाझाकींचे सिनेमे तयार व्हायला प्रचंड वेळ लागतो.

मियाझाकींचा सिनेमा

स्टुडिओ जिबलीने प्रोड्यूस केलेल्या बहुतेक फिल्म्स या मियाझाकींनी लिहिल्या आणि दिग्दर्शित केलेल्या आहेत.

1988 मधली फिल्म माय फ्रेंड टोटोरो (My Friend Totoro), 1989 ची कीकीज डिलिव्हरी सर्व्हिस (Kiki's Delivery Service) या प्रचंड गाजल्या.

पण मनस्वी कलाकार असणाऱ्या मियाझाकींनी आपल्या फिल्म्स पश्चिमेतल्या देशांमध्ये रीलिज न करण्याचं जाहीर केलं. कारण त्यांनी केलेल्या मूळ फिल्म्सना तिथे पुन्हा कात्री लावली जात होती.

अखेर 1996 मध्ये प्रसिद्ध वॉल्ट डिस्नी स्टुडिओने स्टुडिओ जिबलीच्या फिल्म्स वितरीत करण्यासाठी करार केला. कोणत्याही सिनेमाचं पुन्हा एडिटिंग करण्यात येणार नाही, ही मियाझाकींची अट मान्य करण्यात आली.

2003 साली स्टुडिओ जिबलीच्या स्पिरीटेड अवे (Spirited Away) या सिनेमाला अ‍ॅनिमेटेड फीचरसाठीचा ऑस्कर मिळाला. हा पुरस्कार जिंकणारी ही पहिली नॉन इंग्लिश अ‍ॅनिमेटेड फिल्म होती. हा सिनेमा जपानमधला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा त्याकाळी ठरला होता आणि तब्बल 19 वर्षं हा रेकॉर्ड टिकून होता.

2014 साली मियाझाकींना त्यांच्या कामासाठी मानद ऑस्करही देण्यात आला.

मियाझाकींची गोष्ट सांगण्याची एक खास शैली आहे. माझा सिनेमा मुलांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या मुलांना आवर्जून दाखवावा, इतका लक्षात रहायला हवा, असं त्यांनी अनेकदा मुलाखतींमधून म्हटलंय.

एव्हिएशन क्षेत्रात असणाऱ्या वडिलांमुळे लागलेल्या विमानांच्या गोडीमुळे मियाझाकींच्या अनेक सिनेमांमधून वेगवेगळी विमानं आणि त्यांचे सिक्वेन्सेस दिसत राहतात.

त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव होता. म्हणूनच मियाझाकींच्या सिनेमातल्या नायिका वा महिला पात्रं ही कणखर दिसतात.

त्यांच्या अनेक सिनेमांमधली गोष्ट ही त्या महिलांभोवती फिरते. म्हणजे ज्या स्पिरीटेड अवे सिनेमाला ऑस्कर मिळाला, त्यातली मुलगी तिच्या आईबाबांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय, ज्यांचं डुकरांमध्ये रूपांतर झालंय.

माय नेबर टोटोरो ही आहे दोन बहिणींची गोष्ट...याच सिनेमातलं Totoro चं कॅरेक्टर असणारा प्राणी स्टुडिओ जिबली कंपनीचा लोगोही आहे.

मियाझाकींची निवृत्ती आणि कमबॅक

गंमतीची गोष्ट म्हणजे 84 वर्षांच्या हायाओ मियाझाकींनी 1997 पासून आजवर अनेकदा निवृत्ती जाहीर केली आणि कमबॅकही केला.

2024 मध्ये ऑस्कर जिंकणारा The Boy and the Heron हा सिनेमाही त्यांचा कमबॅक सिनेमा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली ही गोष्ट आहे माहितोची..ज्याला युद्धामुळे गाव सोडावं लागतं, आईचा मृत्यू होतो...आणि त्यानंतर त्याला एक बोलणारा एक गूढ हेरॉन पक्षी भेटतो...

हा सिनेमा तयार व्हायला तब्बल 7 वर्षं लागली. 60 अ‍ॅनिमेटर्सनी यातली सगळी चित्रं हाताने रेखाटली आणि एक मिनिटभराची चित्रं - अ‍ॅनिमेशनसाठी तब्बल महिनाभराचा काळ लागला. हा सिनेमा जपानमध्ये आजवर तयार करण्यात आलेल्या सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक आहे.

डिस्नीचा एलिमेंटल आणि स्पायडर मॅन सीरिजमधल्या सिनेमाला मागे टाकत या जिबलीच्या सिनेमाने सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचा ऑस्कर जिंकला. जानेवारी 2024मध्ये मियाझाकींचा गोल्डन ग्लोबनेही सन्मान करण्यात आला.

2001 मध्ये स्टुडिओ जिबलीने टोकियोच्या मिताकामध्ये जिबली म्युझियम सुरू केलंय जिथे तुम्हाला या सगळ्या सिनेमांचा सखोल अनुभव घेता येतो.

जिबली, मियाझाकी आणि AI

स्टुडिओ जिबलीचाच 1997 साली आलेला प्रिन्सेस मोनोनोके हा सिनेमा सध्या 4K मध्ये पुन्हा रीलिज झालाय आणि AI ट्रेंडचा फायदा झाल्याने दणक्यात चाललाय.

पण AI च्या मदतीने जनरेट करण्यात आलेल्या एकूणच चित्रांबद्दल हायाओ मियाझाकींचं मत चांगलं नाही.

हा कलाकारांचा, त्यांनी कलेसाठी समर्पित केलेल्या आयुष्याचा अपमान असून आपण आपल्या कामात याचा समावेश कधीच करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

AI चा वापर करून जिबली स्टाईल चित्रं करण्याचा ट्रेंड आल्यानंतर आता AI च्या वापरातल्या नैतिकतेबद्दलही चर्चा सुरू झालीय.

म्हणजे कुणीतरी संपूर्ण आयुष्य घालून विकसित केलेली कला, AI चं तंत्रज्ञान वापरून क्षणात 'कॉपी' करणं कितपत योग्य आहे याबद्दलची चर्चा आता सुरू आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)