ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणातील संशयित टायलर रॉबिन्सन कोण आहे?

ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणातील संशयित टायलर रॉबिन्सन कोण आहे?

फोटो स्रोत, Getty Images/Kantor Gubernur Utah

    • Author, क्रिस्टल हेस
    • Author, रेगन मॉरिस
    • Reporting from, युटाहमधून वार्तांकन

अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली कर्क यांच्या हत्येच्या आरोपाखाली टायलर रॉबिन्सन नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

टायलर हा 22 वर्षांचा तरुण अमेरिकेतील युटाह राज्यातील असून त्याला गुरुवारी (11 सप्टेंबर) संध्याकाळी अटक करण्यात आली.

कर्क यांची हत्या झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी मारेकऱ्याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. टायलर याच्या वडिलांनी त्याला पोलिसांसमोर शरण जाण्यास तयार केल्यानंतर 33 तास चाललेला हा शोध संपला.

टायलर रॉबिन्सन याच्या अटकेची घोषणा सर्वात आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यांनी टायलरला मृत्यूदंड देण्याची मागणी केली होती.

चार्ली कर्क बुधवारी (10 सप्टेंबर) युटाह व्हॅली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच्या एका वादविवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

त्यांच्या हत्येनं अमेरिका हादरली. कर्क यांच्या हत्येमुळे देशातील पक्षीय राजकीय दरी आणखी वाढल्याचं मानलं जातं आहे.

या पार्श्वभूमीवर या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं आणि अटक करण्यात आलेला आरोपी टायलर रॉबिन्सन कोण आहे हे समजून घेऊयात.

अटकेचा घटनाक्रम

शुक्रवारी (12 सप्टेंबर) एका पत्रकार परिषदेत तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संशयितानं त्याच्या वडिलांसमोर कबुली दिली आणि शरण जाण्याऐवजी तो आत्महत्या करेल, असं म्हणाला.

त्यानंतर रॉबिन्सनच्या वडिलांनी एका तरुण पाद्रीला बोलावलं. त्यांच्या कुटुंबाचे त्या पाद्रीशी कौटुंबिक संबंध होते.

मग पाद्री आणि रॉबिन्सनचे वडील या दोघांनी रॉबिन्सनला शांत करण्याचा प्रयत्न केला, असं पोलिसांनी सांगितलं.

तो पाद्री, न्यायालयीन सुरक्षा अधिकारी म्हणूनही काम करतो. त्यानं नंतर यूएस मार्शलना फोन केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी (11 सप्टेंबर) स्थानिक वेळेनुसार रात्री साधारण 10 वाजता रॉबिन्सनला अटक केली.

चार्ली कर्क अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चार्ली कर्क अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय होते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

युटाहचे गव्हर्नर स्पेन्सर कॉक्स म्हणाले की, सर्व्हेलन्स फुटेजमधून दिसून आलं की गोळीबार होण्याच्या साधारण 4 तास आधी टायलर रॉबिन्सन युटाह व्हॅली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आला होता. या गोळीबारात कर्क यांचा मृत्यू झाला आणि विद्यार्थ्यांना बचावासाठी आश्रय घेण्यासाठी पळावं लागलं.

कॉक्स यांनी पत्रकारांना सांगितलं की, टायलरला जेव्हा ताब्यात घेण्यात आलं, तेव्हा त्यानं गोळीबाराच्या सीसीटीव्हीत दिसत असलेलेच कपडे घातले होते.

कॉक्स पुढे म्हणाले की, तपास अधिकाऱ्यांनी टायलरच्या कुटुंबातील एका सदस्याची चौकशी केली होती. त्या सदस्यानं सांगितलं होतं की, गेल्या काही वर्षांमध्ये टायलर राजकीयदृष्ट्या अधिक सक्रीय झाला आहे.

कॉक्स यांच्या मते, टायलर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अलीकडच्याच एका घटनेची आठवण करून दिली. त्यानुसार टायलरनं सांगितलं होतं की, कर्क युटाहमध्ये येत आहेत आणि कर्क "द्वेष पसरवत आहेत."

कॉक्स म्हणाले की, तपास अधिकारी टायलरच्या रुममेटशीदेखील बोलले. त्या रुममेटनं अधिकाऱ्यांना डिस्कॉर्ड या मेसेजिंग ॲपमधील 'टायलर' नावाच्या एका अकाउंटवरून आलेले मेसेज दाखवले.

या संदेशांमध्ये एक विनंती करण्यात आली होती, ज्यात 'डम्पिंग पॉईंट'वरून रायफल परत मिळवण्यास सांगितलं होतं आणि ती रायफल झुडुपात टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवण्यात आल्याचं म्हटलं होतं.

एफबीआयनं गुरुवारी (11 सप्टेंबर) सांगितलं की, त्यांना कॅम्पसजवळच्या जंगलात एका टॉवेलमध्ये गुंडाळलेलं शस्त्र सापडलं आहे. ही एक आयात केलेली माऊसर .30-06 बोल्ट-ॲक्शन रायफल आहे.

टायलर रॉबिन्सन कोण आहे?

बीबीसीनं तपासलेल्या सार्वजनिक नोंदींवरून असं दिसतं की, टायलर रॉबिन्सन यानं आधी युटाहमध्ये स्वतंत्र किंवा नि:पक्षपाती मतदार म्हणून नोंदणी केलेली होती.

टायलरच्या वडिलांचं नाव मॅथ्यू कार्ल रॉबिन्सन आहे, तर त्याच्या आईचं नाव अंबर डेनिस रॉबिन्सन आहे. त्यांनी रिपब्लिकन म्हणून नोंदणी केलेली असल्याचं राज्याच्या नोंदींमधून दिसतं.

टायलर रॉबिन्सन हा अमेरिकेत चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आहे

फोटो स्रोत, Kantor Gubernur Utah

फोटो कॅप्शन, टायलर रॉबिन्सन हा अमेरिकेत चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आहे

सीबीसी न्यूजनुसार, मतदानाच्या नोंदींवरून असं दिसतं की, टायलरनं गेल्या 2 अध्यक्षीय निवडणुकांमध्ये मतदान केलं नव्हतं. 2020 मध्ये त्याचं वय मतदानासाठी पात्र नव्हतं. सीबीसी न्यूज ही बीबीसीची अमेरिकेतील भागीदार आहे.

टायलर युटाहमध्ये झिऑन नॅशनल पार्कजवळ सेंट जॉर्जमध्ये राहतो. हे ठिकाण कर्क यांना गोळी झाडण्यात आल्याच्या ठिकाणापासून जवळपास 400 किमी नैऋत्येला आहे.

चार्ली कर्क 10 सप्टेंबर 2025 ला युटाह व्हॅली विद्यापीठात आले होते, त्यानंतर थोड्याच वेळात त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली

फोटो स्रोत, Salt Lake Tribune via Getty Images

फोटो कॅप्शन, चार्ली कर्क 10 सप्टेंबर 2025 ला युटाह व्हॅली विद्यापीठात आले होते, त्यानंतर थोड्याच वेळात त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली

सोशल मीडियावरील अकाउंट्समधील माहितीवरून असं दिसतं की, टायलर रॉबिन्सनचे वडील एक काउंटरटॉप आणि कॅबिनेट इन्स्टॉलेशनचा व्यवसाय चालवत होते. तर त्याची आई सामाजिक कार्यकर्ती आहे. हे मॉर्मन कुटुंब होतं आणि स्थानिक चर्चमध्ये सक्रिय होतं.

युटाहच्या उच्च शिक्षण मंडळानं दिलेल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे की, टायलर जेम्स रॉबिन्सन हा डिक्सी टेक्निकल कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल ॲप्रेंटिसशिप प्रोग्राममध्ये तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता.

"यापूर्वी 2021 मध्ये युटाह राज्य विद्यापीठात तो एक सत्र होता," असं युटाह उच्च शिक्षण मंडळानं म्हटलं आहे.

तपास अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली?

तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, टालयलर रॉबिन्सनला ऑनलाइन संस्कृती चांगलीच माहीत होती. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक बुलेट केसिंगवरील मजकूराकडे लक्ष वेधलं.

दोन बुलेट केसिंगमध्ये ऑनलाइन ट्रोलिंग विनोदाचा स्पष्ट संदर्भ मिळतो.

"नोटिस बल्जेस ओओ, हे काय आहे?" हे शब्द कदाचित 'कॉपीपेस्ट'चा संदर्भ देतात. हा मजकूर नेटिझन्सना ट्रोल करण्यासाठी वांरवार वापरला जातो.

आणखी एका न झाडलेल्या कार्टरिजवर लिहिलं आहे, "जर तुम्ही हे वाचलं, तर तुम्ही विनोदी आहात." या मजकुरातून पुन्हा ट्रोलिंग विनोदाचा संदर्भ मिळतो.

दरम्यान, दुसऱ्या शेल केसिंगचा अर्थ अँटिफाचे किंवा फॅसिस्ट-विरोधी चळवळीचे समर्थक किंवा सहानुभुतीदार असा लावता येईल. हा डाव्या विचारसरणीचा गट असून तो गेल्या दशकभरापासून अमेरिकेत सक्रिय आहे.

हा गट अनेकदा ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात आणि उजव्या विचारसरणीच्या गटांविरोधात निदर्शनं करतो.

चार्ली कर्क यांच्या गोळीबार झालेल्या ठिकाणाजवळ सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती दिसतो

फोटो स्रोत, FBI

फोटो कॅप्शन, चार्ली कर्क यांच्या गोळीबार झालेल्या ठिकाणाजवळ सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती दिसतो

दरम्यान एका न झाडलेल्या काडतुसावर "अरे फॅसिस्ट! पकडा!" असं म्हटलं आहे, तर वरच्या बाजूला, उजवीकडे आणि खालच्या बाजूला तीन बाण दिसतात.

खालच्या बाजूला असलेले तीन बाण फॅसिझमच्या विरोधात वापरलं जाणारं एक सामान्य प्रतीक असू शकतं.

एकंदरितच, हे बाण म्हणजे कदाचित व्हीडिओ गेममधील कंट्रोल इनपुटच्या मालिकेचा संदर्भ देतात. अर्थात हे अद्याप अस्पष्ट आहे आणि अधिकाऱ्यांनी केसिंग किंवा आवरणाचे फोटो जाहीर केलेले नाहीत.

पुढच्या स्लीव्हवर 'बेला सिआओ' या गाण्याचे बोल कोरलेले आहेत. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या विरोधात लढणाऱ्या इटलीच्या प्रतिकार सदस्यांबद्दल या गाण्यातून आदर व्यक्त करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रॉबिन्सन डिस्कॉर्ड या सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचं दिसून आलं. डिस्कॉर्डचा वापर प्रामुख्यानं गेमर्स करतात. मात्र इतर समुदायांमध्येही ते आता लोकप्रिय झालं आहे.

पुढे काय?

सरकारी वकिलांनी सांगितलं की, मंगळवारी (16 सप्टेंबर) ते रॉबिन्सनच्या विरोधात औपचारिक आरोपपत्र दाखल करणार आहेत.

युटाह काउंटीच्या शेरीफनं दाखल केलेलं अटकपत्र बीबीसीनं मिळवलं आहे. त्यानुसार, टायलरवर गंभीर स्वरुपाची हत्या, न्यायात अडथळा आणणं आणि बंदूकीचा वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

युटाह व्हॅली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बीबीसीला सांगितलं की, टायलरच्या अटकेमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

बुधवारी (10 सप्टेंबर) दुपारी गोळीबार झाल्यापासून विद्यापीठाचा परिसर बंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या पिवळ्या टेप आणि पोलिसांच्या वाहनांनी विद्यापीठाचा बराचसा परिसर रोखलेला आहे.

मॅककिन्ले शिंकल विद्यापीठातील पहिला वर्षाचा विद्यार्थी आहे. तो म्हणाला, "त्याला ज्या वॉशिंग्टन काउंटीमधून अटक करण्यात आली, तिथेच मी राहतो. मला खूप लाज वाटते आहे."

अँथनी मॅककिन्लेचा चुलत भाऊ आहे. तो म्हणाला, "मला खूप दिलासा मिळाला. मला या हत्येमागचा हेतू आणि हे का घडलं हे जाणून घ्यायचं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)