डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक चार्ली कर्क यांची गोळ्या घालून हत्या, ते का होते चर्चेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ज्यूड शीरिन आणि अॅना फागुय
- Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे समर्थक आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे कंझर्वेटिव्ह कार्यकर्ते चार्ली कर्क यांची बुधवारी (10 सप्टेंबर) एका कॉलेजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
कर्क हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी होते, तसेच समाजमाध्यमांवर आणि विद्यार्थी संघटनांमध्ये ते सक्रिय होते.
31 वर्षीय कर्क अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये 'ओपन-एअर डिबेट्स' आयोजित करण्यासाठी ओळखले जात होते.
चार्ली कर्क यांच्या हत्येनंतर पत्नी एरिका हल्लेखोरांबाबत म्हणाल्या...
चार्ली कर्क यांच्या पत्नी एरिका कर्क यांनी कर्क यांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक भाष्य केलं आहे.
त्यांनी आपल्या वक्तव्याच्या सुरुवातीलाच पोलीस आणि आपात्कालीन कर्मचाऱ्यांचे आभार मानले, ज्यांनी गोळी लागल्यानंतर चार्ली कर्क यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर त्यांनी कर्क यांची टीम, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही आभार मानले.
त्यांनी थेट ट्रम्प यांना संबोधित करत म्हटलं की, "तुम्ही ज्याप्रकारे त्यांच्या पाठीशी उभे राहिलात, त्याच पद्धतीने त्यांनी तुम्हाला समर्थन दिलं."

फोटो स्रोत, Turning Point USA
पुढे एरिका कर्क यांनी असं वचन दिलं की, चार्ली कर्क यांचं काम सुरुच राहिल. त्यांची कॅम्पस टूरही सुरु राहिल आणि त्यांचा पॉडकास्टही सुरु राहिल.
चार्ली यांची हत्या करणाऱ्यांबाबत त्या म्हणाल्या की, "तुम्हाला याची जराही कल्पना नाहीये की तुम्ही या पत्नीच्या मनात कशाप्रकारची आग लावली आहे. या विधवेचा हुंकार संपूर्ण जगामध्ये युद्धघोषणेसारखा निनादत राहिल."
सरतेशेवटी, एरिका यांनी चार्ली यांना असं वचन दिलं की, त्या चार्ली यांचा वारसा कधीच समाप्त होऊ देणार नाहीत.
त्या म्हणाल्या की, "अराजकता, साशंकता आणि अनिश्चिततेनं भरलेल्या या जगात माझ्या पतीचा आवाज नेहमीच निनादत राहील."
चार्ली कर्कच्या हत्येतील संशयिताला अटक करण्यात आली आहे.
कॉलेज सोडून राजकारणात 'प्रवेश'
2012 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी कर्क टर्निंग पॉइंट यूएसए (टीपीयूएसए) विद्यार्थी संघटनेचे सहसंस्थापक झाले.
उदारमतवाचा प्रभाव असलेल्या अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये पुराणमतवादी (कंझर्वेटिव) विचारांचा प्रसार करणं हा टीपीयूएसए विद्यार्थी संघटनेचा उद्देश ठेवण्यात आला.
त्यांच्या सोशल मीडिया आणि पॉडकास्टवर अनेकदा ट्रान्सजेंडर ओळख, हवामान बदल, धर्म आणि कौटुंबिक मूल्ये यासारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांसोबत केलेल्या वादविवादांचे व्हीडिओ शेअर केले जातात.
कर्क प्रभावशाली लोक राहत असलेल्या शिकागोच्या प्रॉस्पेक्ट हाइट्स भागातच वाढले. त्यांचे वडील आर्किटेक्ट होते.
कर्क यांनी शिकागोजवळील एका कम्युनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, मात्र राजकारणात येण्यासाठी त्यांनी शिक्षण सोडले.
त्यांनी वेस्ट पॉइंट येथील प्रतिष्ठित यूएस मिलिटरी अकादमीसाठी अर्ज केला, पण त्यांची निवड झाली नाही.
कर्क अनेकदा विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत उत्तर-आधुनिकतावादसारख्या (पोस्ट मॉडर्निझम) गंभीर विषयांवर चर्चा करायचे. यावेळी ते त्यांच्याकडे महाविद्यालयाची पदवीही नसल्याबद्दल विनोद करायचे.

फोटो स्रोत, Reuters
2012 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा पुन्हा निवडून आल्यानंतर कर्क टीपीयूएसएमध्ये अधिक सक्रिय झाले.
या संघटनेचा उद्देश विद्यार्थ्यांना 'मुक्त व्यापारापासून सरकारचे अधिकार मर्यादित करण्यापर्यंत'च्या मुद्द्यांवर प्रोत्साहन देण्यासाठी संघटित करण्याचा आहे.
आता या संघटनेच्या अमेरिकेतील 850 हून अधिक महाविद्यालयांमध्ये शाखा आहेत.
कर्क यांनी देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये भाषणं दिली.
त्यांची अनेक भाषणं अति-पुराणमतवादी टी पार्टी चळवळीच्या सदस्यांमध्ये खूप लोकप्रिय होती.
सीबीएस न्यूजच्या अहवालानुसार, त्याच्या पुराणमतवादी रेडिओ टॉक शोच्या सोशल मीडिया पेजवर लाखो फॉलोअर्स होते.
कर्क यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा
कर्क एक प्रभावी वक्ते होते. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ऑक्सफर्ड युनियनला संबोधित केले.
2020 मध्ये त्यांनी 'द मॅगा डॉक्ट्रिन' नावाचं पुस्तक लिहिलं. ते सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले. हे पुस्तक ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट' मोहिमेचं समर्थन करते.
गेल्या वर्षीच्या निवडणुकीत ट्रम्प आणि इतर रिपब्लिकन उमेदवारांच्या निवडणूक मोहिमेत टीपीयूएसएने महत्त्वाची भूमिका बजावली.
हजारो नवीन मतदारांची नोंदणी करून अॅरिझोना राज्य ट्रम्प यांच्या बाजूनं वळवण्यासाठी मदत केल्याबद्दल कर्क यांना मोठ्या प्रमाणात श्रेय दिलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
जानेवारीमध्ये वॉशिंग्टन डीसी येथे ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात कर्क उपस्थित होते. ट्रम्प यांच्या दोन्ही कार्यकाळात ते व्हाईट हाऊसचे नियमित पाहुणे होते.
बुधवारी (10 सप्टेंबर) ट्रम्प यांनी कर्क यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.
ट्रम्प म्हणाले, "महान माणूस असलेल्या चार्ली कर्क यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील तरुणांचं मन चार्लीपेक्षा चांगलं कोणीही समजू शकलं नाही."
ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्क यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचंही कौतुक केलं.
कर्क यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनांमध्येही भाषणं दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी अॅरिझोना येथील टर्निंग पॉइंट परिषदेत भाषण देऊन या मदतीची परतफेड केली.
कर्क यांची वादग्रस्त वक्तव्ये
या वर्षाच्या सुरुवातीला कर्क यांनी ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्यासोबत ग्रीनलँडचा प्रवास केला होता.
त्यावेळी ट्रम्प ग्रीनलँड अमेरिकेत सामील व्हावे, असा युक्तिवाद करत होते.
कर्क यांचे लग्न माजी मिस अॅरिझोनाशी झाले होते. त्यांना अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणाचे भविष्य मानले जात होते. मात्र, त्यांच्याकडे एक अत्यंत ध्रुवीकरण करणारी व्यक्ती म्हणूनही पाहिले जात होते.
रिपब्लिकन राजकारणातील त्यांच्या योगदानाबद्दल सर्वात मोठी श्रद्धांजली ट्रम्प यांनीच दिली असावी.
कर्कच्या पॉडकास्टच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या एका क्लिपमध्ये ट्रम्प म्हणतात, "मी चार्ली यांचे आभार मानू इच्छितो. ते एक अद्भुत व्यक्ती आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली युवा संघटनांपैकी एक संघटना उभारण्याचे उत्तम काम केले आहे."

फोटो स्रोत, Reuters
कर्क यांनी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये आणि पॉडकास्टमध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा केली. यापैकी एक मुद्दा बंदूक नियंत्रण होता.
काही महिन्यांपूर्वी केलेल्या एका भाषणात कर्क म्हणाले होते, "दुर्दैवानं दरवर्षी बंदुकीच्या काही मृत्यूंची किंमत चुकवणे योग्य आहे. यामुळे आपण संविधानातील दुसऱ्या दुरुस्तीची अंमलबजावणी करू शकू."
कर्क यांची अनेक वक्तव्ये वादग्रस्त मानले गेले.

फोटो स्रोत, Getty Images
सीबीएस न्यूजनुसार, कर्क यांनी कोविडच्या साथीवरही संशय व्यक्त केला होता. याशिवाय ट्रान्सजेंडर लोकांविरुद्ध प्रचार केला होता आणि 2020 ची निवडणूक ट्रम्प यांच्याकडून चोरी करण्यात आल्याच्या खोट्या दाव्यालाही त्यांनी सार्वजनिकपणे प्रोत्साहन दिलं होतं.
सीबीएसच्याच अहवालात म्हटलं आहे की, कर्क यांनी 'ग्रेट रिप्लेसमेंट' कटाच्या सिद्धांताचेही समर्थन केले होते. या सिद्धांतानुसार, श्वेतवर्णीय लोकसंख्येच्या जागेवर अल्पसंख्यांकांना आणण्याचा कट रचला जात आहे.
काहींनी असंही सांगितलं की, कर्क यांनी वेगवेगळ्या विचारांच्या वादविवादाचे कौतुक केले आणि त्याला प्रोत्साहनही दिलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











