ट्रम्प यांच्याबरोबरच्या बैठकीत मोठमोठ्या टेक कंपन्यांचे प्रमुख काय म्हणाले, इलॉन मस्क का उपस्थित नव्हते?

टेक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी झालेल्या चर्चेत ट्रम्प यांनी अमेरिकेत गुंतवणूक करण्यावर भर दिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टेक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी झालेल्या चर्चेत ट्रम्प यांनी अमेरिकेत गुंतवणूक करण्यावर भर दिला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (4 सप्टेंबर) व्हाईट हाऊसमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील बड्या व्यक्तींबरोबर एका 'खास 'डिनर'चं आयोजन केलं होतं.

या प्रसंगी तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले भारतीय वंशाचे 5 दिग्गज उपस्थित होते.

त्यात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला, मायक्रॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा, टीआयबीसीओ सॉफ्टवेअरचे संस्थापक विवेक रणदिवे आणि पॅलेन्टियरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) श्याम शंकर यांचा समावेश होता.

याव्यतिरिक्त, ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक, मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साफ्रा कॅट्झ, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन आणि ओपनएआयचे सॅम ऑल्टमन हे देखील या खास भोजनासाठी उपस्थित होते.

मात्र सर्वाधिक चर्चा एका व्यक्तीची झाली. ती व्यक्ती म्हणजे एक्स (पूर्वीचं ट्विटर), टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क. ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या या खास डिनरला इलॉन मस्क उपस्थित नव्हते.

ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराच्या वेळेपासूनच इलॉन मस्क अनेकदा त्यांच्याबरोबर दिसले होते. अनेक प्रसंगी त्यांनी एकमेकांचं कौतुकदेखील केलं होतं. प्रसारमाध्यमांमधून दोघांच्या मैत्रीची खूप चर्चादेखील झाली.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात मस्क त्यांचे जवळचे सहकारी होते. मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी या विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.

मात्र थोड्याच दिवसांमध्ये मस्क ट्रम्प सरकारपासून वेगळे झाले. त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर टीकादेखील केली. दोघांमध्ये आलेल्या वितुष्टाची प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चाही झाली.

मात्र, आता टेक कंपन्यांच्या सीईओ, प्रतिनिधींच्या बरोबर ट्रम्प यांनी डिनर आयोजित केलेलं असताना त्या बैठकीला इलॉन मस्क यांनी उपस्थित न राहण्याची चर्चा होते आहे.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीच्या वेळेस ट्रम्प म्हणाले, "सर्वात समजदार लोक येथे बसलेले आहेत. हा खरंच एक बुद्धिमान गट आहे आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे."

ट्रम्प यांच्या या डिनरवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहीजणांनी याला एक धोरणात्मक भागीदारी म्हटलं, तर काहींनी याला 'राजकीय फोटो-ऑप' म्हटलं.

इलॉन मस्क डिनरला का उपस्थित नव्हते?

या बैठकीला इलॉन मस्क उपस्थित नव्हते. मात्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील मस्क यांचे प्रतिस्पर्धी, ओपन एआयचे सॅम ऑल्टमन डिनरला उपस्थित होते.

डिनर रोझ गार्डनमध्ये होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, खराब हवामानामुळे अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम व्हाईट हाऊसच्या स्टेट डायनिंग रुममध्ये करण्याचा निर्णय घेतला.

ग्राफिक्स

व्हाईट हाऊसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शिक्षणासाठी (एआय) बनवण्यात आलेल्या नव्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर डिनरचं आयोजन करण्यात आलं.

या टास्क फोर्सचा उद्देश अमेरिकेतील तरुणांसाठी एआयचं शिक्षण विकसित करणं हा आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प होत्या.

मस्क यांना जेव्हा विचारण्यात आलं की, या कार्यक्रमाच्या पाहुण्यांच्या यादीत त्यांचा समावेश का नाही. त्यावर ते म्हणाले, "मला बोलावण्यात आलं होतं. मात्र, दुर्दैवानं मी उपस्थित राहू शकणार नाही. माझ्यावतीनं माझे एक प्रतिनिधी तिथे उपस्थित राहतील."

अर्थात, अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांमधून असं दिसतं की, मस्क यांचं नाव पाहुण्यांच्या यादीतच नव्हतं.

'टिम कुक 2 मिनिटात 9 वेळा थँक्यू म्हणाले'

ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी ट्रम्प यांच्याबरोबर दोन मिनिटांच्या संभाषणात 9 वेळा थँक्यू म्हटलं. या गोष्टीची सोशल मीडियावर मोठी चर्चा होते आहे.

टिम कुक यांनी त्यांच्या बोलण्याची सुरुवात थँक्यू म्हणत केली आणि त्यांनी बोलणंदेखील दोनदा थँक्यू म्हणत थांबवलं.

टिम कुक यांनी सांगितलं की ते अमेरिकेत 600 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत

फोटो स्रोत, WHITE HOUSE

फोटो कॅप्शन, टिम कुक यांनी सांगितलं की ते अमेरिकेत 600 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत

टिम कुक म्हणाले, "आम्ही अमेरिकेत महत्त्वाच्या उत्पादनाच्या बाबतीत काम करू शकू, असं वातावरण तुम्ही तयार केलं, याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मला वाटतं की, यातून तुमचा दृष्टीकोन आणि नेतृत्व दिसून येतं."

"अमेरिकेतील कंपन्यांना जगभरात मदत करण्यासाठी मी तुमचे आभार मानतो. ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि मला तुमच्या सरकारबरोबर काम करून आनंद होतो."

ट्रम्प यांनी विचारलं की, ॲपल अमेरिकेत किती गुंतवणूक करते आहे? आतापर्यंत तुम्ही जगाच्या वेगवेगळ्या भागात गुंतवणूक करत होता, आता तुम्ही मायदेशी गुंतवणूक करणार आहात.

त्यावर टिम कुक म्हणाले की, ॲपल अमेरिकेत 600 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे.

सुंदर पिचाई यांनी केली स्तुती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचं जोरदार कौतुक केलं. ट्रम्प सुंदर पिचाईंना म्हणाले की, ते खूप 'अप्रतिम काम' करत आहेत.

या संभाषणादरम्यान सुंदर पिचाई म्हणाले, "एआयमुळे मोठे बदल होणार आहेत. बहुधा असे बदल आपण यापूर्वी कधीही पाहिले नसतील. त्यामुळेच या सर्वांमध्ये अमरिका सर्वात पुढे असेल, याची आपल्याला खातरजमा करायची आहे."

"मला वाटतं की, तुमचं (ट्रम्प) सरकार या दिशेनं आधीपासूनच बरीच गुंतवणूक करतं आहे. मला वाटतं की, तुमच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एआय ॲक्शन प्लॅन ही एक उत्तम सुरुवात आहे. आम्ही एकत्रितपणे काम करण्यासाठी उत्सुक आहोत. तुमच्या नेतृत्वासाठी धन्यवाद."

ग्राफिक्स

डोनाल्ड ट्रम्प यांनी सुंदर पिचाई यांना विचारलं की गुगल अमेरिकेत किती गुंतवणूक करतं आहे. त्यावर सुंदर पिचाई यांनी उत्तर दिलं की, कंपनी पुढील 2 वर्षांमध्ये अमेरिकेत 250 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

या बैठकीत गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनीदेखील त्यांचं मत व्यक्त केलं.

ते म्हणाले, "आता एआयमुळे खूप मोठे बदल होत आहेत. तुमचं सरकार आपल्या कंपन्यांच्या पाठिशी उभं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे."

"ही एक प्रकारची जागतिक स्पर्धा आहे. मला वाटतं की, आपण अशा काळात आहोत, जेव्हा एआय खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या सरकारनं दिलेल्या पाठिंब्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत," असंही सर्गेई ब्रिन यांनी नमूद केलं.

मार्क झुकरबर्ग 'सॉरी' का म्हणाले?

मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं की, त्यांची कंपनी 2028 पर्यंत अमेरिकेत 600 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. तसेच एआय आणि व्हर्च्युअल रिॲलिटीच्या प्रोजेक्ट्सवर अधिक लक्ष देणार आहे.

झुकरबर्ग म्हणाले, "इथे मोठ्या कंपन्यांचा गट उपस्थित आहे. मला वाटतं की, अमेरिकेत डेटा सेंटर आणि इतर आवश्यक सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून इथे उपस्थित असलेल्या सर्व कंपन्या अमेरिकेत मोठी गुंतवणूक करत आहेत."

"या कंपन्या नव्या तंत्रज्ञानाला पुढे नेतील. 2028 पर्यंत मेटा अमेरिकेत किमान 600 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे."

यादरम्यान झुकरबर्ग 'सॉरी' म्हणाले आणि या गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ट्रम्प यांच्या बोलताना मार्क झुकरबर्ग सॉरी म्हणाले आणि हा संवाद माइकमधून ऐकू आला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रम्प यांच्या बोलताना मार्क झुकरबर्ग सॉरी म्हणाले आणि हा संवाद माइकमधून ऐकू आला

गुंतवणुकीबद्दल बोलल्यानंतर काही वेळातच मार्क झुकरबर्ग राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्टीकरण देत होते. माईक सुरू असल्यामुळे त्यांचं हे संभाषण रेकॉर्ड झालं.

मार्क झुकरबर्ग म्हणाले, "माफ करा, मी तयार नव्हतो. मला माहीत नाही की, तुम्हाला कोणती संख्या (गुंतवणुकीशी संबंधित) ऐकायची होती."

झुकरबर्ग असं म्हणाल्यानंतर ट्रम्प हसू लागले.

सत्या नडेला काय म्हणाले?

भारतीय वंशाचे सत्या नडेला मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

ट्रम्प यांच्या या खास डिनरला सत्या नडेलाही उपस्थित होते. नडेला 1992 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये आले आणि 2014 मध्ये त्यांना कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी करण्यात आलं.

सत्या नडेला म्हणाले, "मला वाटतं की, या इंडस्ट्रीचं वैशिष्ट्यं फक्त नवीन तंत्रज्ञान नाही, तर तुम्ही संपूर्ण जगात आमच्यासाठी जी बाजारपेठ तयार केली आहे, त्या बाजारपेठेची उपलब्धता हेही आहे."

"मला वाटतं की, तुम्ही एक असा मंच तयार करत आहात, ज्यामुळे संपूर्ण जग आमच्या तंत्रज्ञानाचा वापर तर करेलच. त्याचबरोबर इतरांच्या तुलनेत त्याच्यावर अधिक विश्वासदेखील ठेवते. तुमच्या धोरणांमुळे आम्हाला खूप मदत होते आहे."

हैदराबादमध्ये जन्मलेले सत्या नडेला गेल्या एक दशकापासून मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हैदराबादमध्ये जन्मलेले सत्या नडेला गेल्या एक दशकापासून मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत

यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सत्या नडेला यांना मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीबद्दल विचारलं.

यावर हैदराबादमध्ये जन्मलेले सत्या नडेला म्हणाले की, त्यांची कंपनी अमेरिकेत दरवर्षी जवळपास 75-80 अब्ज डॉलरची गुंतवणूक करते आहे.

ट्रम्प नडेला यांना म्हणाले, "खूप छान, तुमचे खूप खूप आभार."

ट्रम्प यांच्याकडून सॅम ऑल्टमन यांचा 'बिग लीडर' म्हणून उल्लेख

ओपनएआयचे 40 वर्षांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी ट्रम्प यांचे आभार मानले. ट्रम्प सरकारनं ओपनएआयच्या स्टारगेट या मोठ्या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. हा प्रकल्प सॉफ्टबँक आणि ओरॅकल यांच्यासह संयुक्तपणे करण्यात येतो आहे.

सॅम ऑल्टमन यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगातील एक महत्त्वाचं व्यक्ती मानलं जातं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सॅम ऑल्टमन यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगातील एक महत्त्वाचं व्यक्ती मानलं जातं

ट्रम्प म्हणाले की, एआयच्या उदयोन्मुख क्षेत्रात सॅम ऑल्टमन 'बिग लीडर' आहेत. ट्रम्प म्हणाले की, तुम्ही (ऑल्टमन) आतापर्यंत जे केलं आहे ते अविश्वसनीय आहे.

त्यावर ऑल्टमन म्हणाले, "तुम्ही असे राष्ट्राध्यक्ष आहात जे व्यापार आणि नव्या विचारांना खूप पाठिंबा देता, याबद्दल तुमचे आभार. हा एक खूप चांगला बदल होतो आहे. तुम्ही आपला देश आणि कंपन्यांना इतकं यशस्वी करत आहात, याचा आम्हाला खूप आनंद होतो."

"अमेरिकेत जी गुंतवणूक होते आहे आणि उद्योगांची जी ताकद परतत आहे, त्यामुळे आपण जगात दीर्घकाळ यशस्वी राहू."

यानंतर ट्रम्प यांनी ऑल्टमन यांना गुंतवणुकीबाबत विचारलं, तेव्हा ऑल्टमन म्हणाले की, ते अमेरिकेत एआयच्या क्षेत्रात शेकडो अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)