'ब्राह्मण नफा कमावतायेत' या विधानामुळं चर्चेत आलेले नवारो भारतावरून मस्कवर का संतापले?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नवारो यांनी केलेल्या पोस्टमध्ये फॅक्टचेक नोट जोडण्यात आल्यानंतर आणखी एक वाद सुरू झाला.
नेमकं काय घडलं, समजून घेऊया.
पीटर नवारो यांनी एक्सवर इलॉन मस्क यांचा हवाला देत लिहिलं, "भारत सरकारची प्रचारयंत्रणा पूर्ण ताकदीनं काम करत असून खोटेपणा पसरवत आहे."
पीटर नवारो यांच्या या पोस्टवर एक्सकडून कम्युनिटी नोट म्हणजेच फॅक्टचेकची नोंद जोडण्यात आली आहे.
या कम्युनिटी नोटमुळे नवारो नाराज झाले आणि त्यांनी इलॉन मस्क यांच्यावर प्रपोगंडा करण्याचा आरोप केला. मस्क यांनी मात्र नवारो यांच्या पोस्टवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मस्कच्या बहाण्याने भारतावर निशाणा
पीटर नवारो यांनी शुक्रवारी (5 सप्टेंबर) उशिरा रात्री भारताच्या रशियन तेल खरेदीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी करून नफा कमावल्याचा आरोप केला.
नवारे यांनी लिहिले की, "भारत मोठे टॅरिफ दर लादतो, ज्यामुळे अमेरिकेचे रोजगार आणि चांगल्या वेतनाच्या संधी कमी होतात. भारत केवळ नफा कमावण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करतो ज्यामुळे रशियाच्या युद्धयंत्रणेला चालना मिळते. यामध्ये युक्रेनियन आणि रशियन लोकं मारले जात आहेत. अमेरिकन करदात्यांना जास्त पैसा खर्च करावे लागताहेत. भारत हे सत्य स्वीकारत नाही आणि फक्त खोट्या गोष्टी करतो."

फोटो स्रोत, X/REALPNAVARRO
नवारो यांच्या या पोस्टवर एक्सने कम्युनिटी नोटसह 'फॅक्ट चेक' जोडली.
ज्यात म्हटलंय की, " भारत केवळ नफ्यासाठी नाही तर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करतो. आणि ते कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या विरोधात नाही. भारत काही गोष्टींवर टॅरिफ लावत असला तरी अमेरिकेला भारताबरोबरच्या सेवा व्यापारातून अधिक नफा मिळतो. दुसरीकडे अमेरिका देखील रशियाकडून काही वस्तू आयात करतो, हे एकप्रकारचे दुटप्पी धोरणच नाही का.."

फोटो स्रोत, Getty Images
सदर कम्युनिटी नोटवर नवारो यांनी संताप व्यक्त केला. सदर पोस्टला कोट करून त्यांनी लिहिलं, "वाह! इलॉन मस्क लोकांच्या पोस्टमध्ये प्रपोगंडा पसरवण्यासाठीची परवनागी देत आहेत. खाली लिहिलेली नोट निरुपयोगी आहे. भारत केवळ नफा कमविण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करत आहे. युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी भारताने इतके तेल खरेदी केले नव्हते. भारत सरकारची प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करत आहे. युक्रेनियन लोकांना मारणे थांबवा. अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या हिसकावणं बंद करा."
नवारो यांच्या या पोस्टवरही एक्सने कम्युनिटी नोट जोडली. त्यात लिहिले आहे की, "नवारो यांचे दावे दुटप्पी आहेत. भारताने रशियाकडून कायदेशीररित्या तेल खरेदी केले आहे. ते त्यांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी असून कोण्त्याही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात नाही. अमेरिका स्वतः भारतावर दबाव आणतो, युरेनियमसारख्या अब्जावधी डॉलर्सच्या रशियन वस्तू आयात करतो. हे एकप्रकारचं ढोंग असून यातून स्पष्टपणे दुटप्पी धोरण दिसून येतं."
'ब्राह्मण' विधानामुळे चर्चेत आले नवारो
पीटर नवारो यांनी काही दिवसांपूर्वीच, 'ब्राह्मण' भारतीय लोकांच्या किंमतीवर फायदा कमावत आहेत आणि याला आळा घालण्याची गरज आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ते बरेच चर्चेत आले होते.
ट्रम्प सरकारमधील वरिष्ठ व्यापार सल्लागार असलेल्या नवारो यांनी फॉक्स न्यूज संडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "पंतप्रधान मोदी हे एक महान नेते आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मग भारतीय नेते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना कसं काय सहकार्य करु शकतात? हे समजत नाहीये."
नवारो पुढे म्हणाले, "मी एवढंच सांगेन, भारतीयांनो, या ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्या समजून कटाक्षाने लक्ष द्या. 'ब्राह्मण' भारतीय लोकांच्या किंमतीवर नफा कमावत आहेत आणि याला आळा घालण्याची गरज आहे.

दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "'ब्राह्मणांची नफा कमाई'चं हे विधान ब्रिटिशांनी येथे वापरलेल्या 'फोडा आणि राज्य करा' या नीतीसारखेच आहे."
नवारो यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, "पीटर नवारो यांनी केलेल्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या विधानांकडे आमचं लक्ष आहे. आम्ही ते निश्चितच फेटाळतो."
रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. भारताने हा प्रकार 'अयोग्य आणि अव्यवहार्य' असल्याचं म्हटलंय. भारताचं असं म्हणणं आहे की, आम्हाला 'जिथून स्वस्तात तेल मिळेल, तिथून आम्ही ते खरेदी करणं सुरू ठेवू.'
मस्क आणि नवारो यांच्यातील जुना वाद
या वर्षी एप्रिल महिन्यात इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांना 'मूर्ख' म्हटलं होतं.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मस्क यांनी एक म्हण वापरत नवारो यांना 'अत्यंत मूर्ख' असे संबोधले होते.
मस्क यांची ही टिप्पणी नवारो यांच्या एका मुलाखतीनंतर आली होती ज्यात नवारो यांनी टेस्लावर टीका केली होती.
नवारो म्हणाले होते, "तो (मस्क) प्रत्यक्षात कार बनवणारा नाही, तर अनेक बाबतीत फक्त कारचे भाग जोडणारा (असेंबल करणारा) आहे."

फोटो स्रोत, EPA
नवारो ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणावर चर्चा करताना म्हणाले होते की भविष्यात कारचे सुटे भाग अमेरिकेतच तयार होतील.
मात्र, मस्क यांनी यावर उत्तर देताना नवारो यांचे दावे फेटाळून लावत ते 'पूर्णपणे चुकीचे' असल्याचं म्हटलं होतं.
हा वाद त्यावेळी उफाळून आला होता जेव्हा मस्क ट्रम्प प्रशासनाचा भाग होते, परंतु त्यांनी अनेकदा अमेरिकन सरकारवर उघडपणे टीका केली होती.
पीटर नवारो ट्रम्प यांचे इतके खास कसे बनले?
अमेरिकेतील राजकारण आणि विशेषत: व्यापार धोरणांवर चर्चा झाली की पीटर नवारो यांचे नाव निश्चितच पुढे येते.
नवारो हे केवळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सल्लागारच मानले जात नाहीत, तर त्यांच्या धोरणांनी ट्रम्प प्रशासनाची आर्थिक दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिकादेखील बजावली आहे.
पीटर नवारो यांचा जन्म 15 जुलै 1949 रोजी मॅसॅच्युसेट्स येथे झाला. त्यांनी टफ्ट्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि नंतर हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली.
ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरणांचे प्राध्यापक होते. या काळात त्यांनी जागतिक व्यापार, उत्पादनक्षेत्र आणि चीनच्या आर्थिक धोरणांवर अनेक पुस्तके लिहिली.
2016 च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवारो ट्रम्प यांच्या टीममध्ये सहभागी झाले. यानंतर जॅरेड कुशनर यांच्या शिफारशीवरून त्यांना आर्थिक सल्लागार बनवण्यात आलं.
ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांना ऑफिस ऑफ ट्रेड अँड मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीचे संचालक म्हणून नेमण्यात आलं.
इथूनच त्यांनी "बाय अमेरिकन, हायर अमेरिकन" सारख्या धोरणांना पुढे नेलं.

नवारो यांनी अमेरिकन उत्पादनक्षेत्र बळकटी देण्यासाठी आणि चीनविरुद्ध कठोर भूमिका घेण्यासाठी रणनीती आखली.
टॅरिफ वाढवण्यात आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करारांचे पुनर्विलोकन करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता.
नवारो यांनी कॅपिटल हिल्स येथील हिंसाचाराच्या चौकशीदरम्यान काँग्रेस समितीसमोर हजर होण्यास नकार दिला होता.
या प्रकरणात त्यांना 'कंटेम्प्ट ऑफ काँग्रेस' अंतर्गत दोषी ठरवून चार महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
तरीही, 2025 मध्ये ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला त्यांना पुन्हा एकदा व्यापार सल्लागार बनवण्यात आले.
ट्रम्प आणि नवारो हे दोघेही अमेरिकेत उद्योग परत आणण्याचे आणि जागतिक स्तरावर कठोर व्यापार धोरणाचे समर्थक राहिले आहेत.
याच सामायिक दृष्टिकोनामुळे नवारो हे ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू आर्थिक सल्लागार बनले.
चीन आणि रशियासोबतच्या आर्थिक नातेसंबंधांबाबत त्यांची कडक भूमिका ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाशी सुसंगत ठरते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











