'ब्राह्मण रशियन तेलापासून नफा कमावतायेत', असं डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार का म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो

फोटो स्रोत, EPA/Shutterstock

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.

नवारो यांनी म्हटलं आहे की, 'ब्राह्मण' भारतीय लोकांच्या किंमतीवर फायदा कमावत आहेत आणि याला आळा घालण्याची गरज आहे.

ट्रम्प सरकारमधील व्यापारविषयक घडामोडींचे सल्लागार नवारो यांनी 'फॉक्स न्यूज संडे'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदी एक महान नेते आहेत. मात्र, भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे, ही गोष्ट समजत नाहीये की, भारताचं नेतृत्व रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत कसं काय सहकार्य करत आहेत? "

पुढे नवारो यांनी म्हटलं की, "त्यामुळे, मी फक्त एवढंच म्हणेन की, भारतीय लोकांनी कृपया करुन हे समजून घ्यावं की, इथं काय घडतंय? भारतीय लोकांच्या किंमतीवर ब्राह्मण नफा कमवत आहेत. आपल्याला याला आळा घालावा लागेल."

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे अमेरिका आणि भारताच्या राजनैतिक आणि व्यापारविषयक संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. तेव्हापासून, नवारो यांनी सातत्याने भारतावर निशाणा साधला आहे.

ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लावला होता. त्यानंतर, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं सुरुच ठेवलं तर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्यात येईल, असाही निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. त्यानुसार, 27 ऑगस्टपासून हा टॅरिफ लागू झाला आहे.

दुसऱ्या बाजूला, भारताने हा प्रकार 'अयोग्य आणि अव्यवहार्य' असल्याचं म्हटलंय. भारताचं असं म्हणणं आहे की, आम्हाला 'जिथून स्वस्तात तेल मिळेल, तिथून आम्ही ते खरेदी करणं सुरू ठेवू.'

चीनबाबतच्या प्रश्नावर काय बोलले नवारो?

नवारो यांना विचारण्यात आलं की, फक्त भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादल्यानं पुतिन यांना 'नियंत्रणात' आणलं जाऊ शकेल का? कारण, रशियन तेलाची खरेदी तर चीनकडूनही केली जाते.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रश्नाला उत्तर देताना नवारो यांनी म्हटलं की, "ठीक आहे. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, भारतावर सध्या 50 टक्के टॅरिफ आहे. मात्र, चीनवर देखील 50 टक्क्यांहून थोडा अधिक टॅरिफ आहे. तर प्रश्न असा आहे की, आम्ही स्वतःला नुकसान न पोहोचवता ते आणखी किती वाढवू शकतो? "

नवारो यांनी म्हटलं की, फेब्रुवारी 2022 मध्ये पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याच्या आधी भारत रशियन तेलाची खरेदी करत नव्हता.

पुढे नवारो यांनी म्हटलं की, "पुढे काय झालं? बरं, रशियन रिफायनरीज् भारतात प्रवेश करतात आणि मोठ्या तेल कंपन्यांशी युती करतात. पुतिन मोदींना कच्च्या तेलावर सवलत देतात. हे तेल ते रिफाईन करून युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये मोठ्या प्रीमियमने पाठवतात आणि भरपूर पैसे कमवतात."

"तर मग यामध्ये काय चूक आहे? खरं तर, यामुळे 'रशियन युद्धयंत्रणा' मजबूत होते. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीचं समर्थन करताना, भारत म्हणतो की, त्यांची ऊर्जा खरेदी राष्ट्रीय हितानं प्रेरित आहे."

"युक्रेनवरील आक्रमणानंतर पाश्चिमात्त्य देशांनी रशियाच्या कच्च्या तेलावर प्रतिबंध लादले होते. त्यानंतरच रशिया हा भारताचा आघाडीचा उर्जा पुरवठादार होऊन उभा ठाकला आहे."

चीनमधील शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/Shutterstock

फोटो कॅप्शन, चीनमधील शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

नवारोंनी असा आरोप केला की, "यामुळे, युक्रेनच्या लोकांचं नुकसान होत आहे. आणि करदाते म्हणून आम्हाला जे करायचंय ते म्हणजे युक्रेन स्वत:चं रक्षण करु शकेल यासाठी आपल्याला त्यांना अधिक पैसे पाठवावे लागतील. आणि त्याव्यतिरिक्त, 50 टक्के टॅरिफपैकी 25 टक्के टॅरिफ यासाठी आहे कारण, भारत हा टॅरिफचा 'महाराजा' आहे."

त्यांनी असा दावा केला की, "जगात सर्वाधिक टॅरिफ तेच (भारत) लावतात. म्हणूनच, ते आम्हाला भरपूर वस्तू निर्यात करतात आणि त्या आम्हाला विकू देत नाहीत. मग कुणाला त्रास होईल? अमेरिकन कामगार, अमेरिकन करदाते आणि रशियन ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी पडणारे युक्रेनचे लोक."

पीटर नवारो यांनी याआधीही युक्रेन युद्धावरुन भारत आणि पंतप्रधान मोदींवर टीका केलेली आहे.

आधी त्यांनी युक्रेन संघर्षाला 'मोदींचं युद्ध' असं म्हटलं होतं.

गेल्या आठवड्यात बुधवारी अमेरिकन टॅरिफचे नवे दर लागू झाल्यानंतर काही तासांनंतरच पीटर नवारो यांनी भारताविरोधात हल्लाबोल केला होता.

डोनाल्ड ट्रम्पसोबत नवारो

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्पसोबत नवारो

नवारो यांनी ब्लूमबर्ग टीव्हीवरील चर्चेमध्ये इथपर्यंत म्हटलं होतं की, रशिया-युक्रेन या दोन देशांमधील युद्ध खरं तर वास्तवात 'मोदींचं युद्ध' आहे.

नवारो यांनी पुढे म्हटलं होतं की, "भारत जे करतोय, त्यामुळे अमेरिकेला प्रत्येक नुकसान झेलावं लागतं. कारण, भारताच्या मोठ्या टॅरिफमुळे आमच्या नोकऱ्या, कारखाने, उत्पन्न आणि चांगल्या वेतनाच्या संधी कमी होतात, त्यामुळे ग्राहक आणि व्यवसायांचे नुकसान होते आणि कामगारांचेही नुकसान होते. मग करदात्यांनाही त्रास होतो, कारण आम्हाला 'मोदींच्या युद्धाची' किंमत मोजावी लागते."

जेव्हा 'ब्लूमबर्ग'नं त्यांना विचारलं की, तुम्हाला याचा अर्थ हे 'पुतिनचं युद्ध' आहे असं म्हणायचंय का, तेव्हा नवारो म्हणाले की, "माझा अर्थ 'मोदीचं युद्ध' असाच आहे, कारण शांततेचा मार्ग काही प्रमाणात भारतातून जातो."

या मुलाखतीत पुढे ते म्हणाले की, "मला त्रास देणारी गोष्ट म्हणजे भारतीय लोक या मुद्द्यावर खूप अहंकरी आहेत. ते म्हणतात, 'अरे, आमच्याकडे जास्त टॅरिफ नाहीयेत. अरे, हे आमचं सार्वभौमत्व आहे.

आम्हाला हवं तिथून, ज्याच्याकडून हवं ते तेल आम्ही खरेदी करू शकतो. पण भारत, तू जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहेस, ठीक आहे, तर त्याप्रमाणेच वाग."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.