संवैधानिक पदावरील व्यक्तीनं एकाच धर्माच्या लोकांकडून खरेदी करण्याचं आवाहन करणं योग्य आहे का?

    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठीसाठी

राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी फक्त हिंदू धर्मीय झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी 'मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम' नावाचं पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे.

यानुसार सर्व नोंदणीकृत मांस विक्रेत्यांना 'मल्हार प्रमाणपत्र' दिलं जाणार आहे. हे प्रमाणपत्र फक्त हिंदूंनाच दिलं जाणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर धर्मीयांना ते उपलब्ध नसेल.

नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्याच दुकानातूनच मांस विकत घेण्याचं आवाहन देखील राज्यातील हिंदू जनतेला केलं आहे.

मात्र, संवैधानिक पदावरील व्यक्तीनं एकाच धर्माच्या लोकांकडून खरेदी करण्याचं आवाहन करणं योग्य आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसतोय.

या निर्णयानंतर नितेश राणे यांच्यावर टीका का होत आहे? नेमके काय आक्षेप घेतले जात आहेत, संवैधानिक पदावरील व्यक्तीनं असं आवाहन करणं योग्य आहे का? हे मल्हार प्रमाणपत्र काय आहे? झटका आणि हलाल पद्धतीमध्ये नेमका काय फरक आहे? हे जाणून घेऊयात.

राणे यांनी काय म्हटलंय?

मल्हार प्रमाणपत्राबाबतची माहिती नितेश राणे यांनी एक्स (ट्विटर) या समाज माध्यमावरून एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटलंय, "महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल, आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम (malharcertification.com) या निमित्ताने सुरू झालं आहे. झटका मटणसाठी मल्हार सर्टिफिकेशन ही एक नवी संकल्पना आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय.

"ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं, जिथे 100 टक्के हिंदू समाजाचं प्राबल्य असेल. विकणाराही पण हिंदू असेल," असं राणे यांनी म्हटलं आहे.

"त्या मटणात भेसळ नसेल. या माध्यमातून हिंदू समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचारांच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी टाकलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा," असेही राणे म्हणाले.

"ज्या मटणाला हे प्रमाणपत्र नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये, मटण खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन. या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100 टक्के पाठिंबा आहे," नितेश राणेंच्या भूमिकेमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मल्हार प्रमाणपत्र काय आहे?

मल्हार वेबसाईटनुसार, "हिंदू धार्मिक पद्धतींचं काटेकोर पालन करून झटका पद्धतीचं मांस पुरवण्याऱ्या विक्रेत्यांनाच हे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विक्रेते फक्त हिंदू धर्माचेच असायला हवेत.

"त्यांनाच हे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. हिंदू आणि शीख धर्मातील लोकांसाठी झटका पद्धतीचं मांस उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं आहे.

"कारण झटका पद्धतीचं पालन करून मांस विकणं आणि खाणं हीच एक नैतिक पद्धत असल्याचं बहुतेक हिंदू मानतात. या पद्धतीनं त्या प्राण्याचे हाल न होता पटकन जीव जातो," असे या वेबसाईटवर म्हटले आहे.

झटका पद्धत आणि हलाल पद्धत म्हणजे काय?

या मल्हार सर्टिफिकेटच्या वादामुळे झटका मांस आणि हलाल मांस यांच्यात नेमका फरक काय आहे, असा प्रश्नं अनेकांना पडला आहे.

कोणतंही मांस हलाल आहे की झटका हे त्या प्राण्याला ज्या पद्धतीनं कापलं जातं त्यावरून ठरतं.

बीबीसी न्यूजच्या वेबसाईटनुसार हलाल हा अरेबिक शब्द आहे. याचा अर्थ आहे ज्या गोष्टीची परवानगी आहे ते. इस्लामिक कायद्यानुसार आणि कुराणने सांगितल्यानुसार जी पद्धत आहे त्याला हलाल असे म्हणतात.

हलाल म्हणजे कोंबडीच्या किंवा बकऱ्याच्या मानेवरून चाकू फिरवला जातो, शीर मात्र धडावेगळं केलं जात नाही. श्वासनलिका कापली की सगळं रक्त बाहेर पडतं आणि तडफडून त्या प्राण्याचा मृत्यू होतो.

अशा पद्धतीनं प्राणी कापल्यावर त्याला हलाल प्रमाणपत्र दिलं जातं पण ते सरकारकडून दिलं जात नाही.

याउलट एका झटक्यात जेव्हा प्राण्याची मान धडावेगळी केली जाते तेव्हा त्याला झटका मटण किंवा झटका चिकन म्हणतात. नावावरूनच कळतं की यात तो प्राणी एका झटक्यात कापला जातो.

त्यामुळे त्या प्राण्याच्या शरीरातून रक्त बाहेर पडून, त्याची तडफड होत नाही. या पद्धतीत प्राण्याला गुंगी देऊन बेशुद्धही केलं जातं. बहुतेक शीख आणि हिंदू धर्मीयांमध्ये ही पद्धत वापरली जाते.

'हे सगळं महाराष्ट्राचं चारित्र्य बिघडवणारं'

नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे ध्रुवीकरणाची भीती व्यक्त केली जात आहे तर हे ध्रुवीकरणाचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी फेटाळून लावला आहे.

याबाबत बीबीसी मराठीनं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, "नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवं. कारण मंत्री म्हणून त्यांनी संविधानाच्या साक्षीनं शपथ घेतली आहे. त्या शपथेत त्यांनी म्हटलंय की मंत्री म्हणून काम करताना ते कोणत्याही प्रकारच्या सूड भावनेनं काम करणार नाहीत. जात, पंथ, लिंग, धर्म पाहून पक्षपात देखील करणार नाही. तरीही ते तसं करत नाहीत. हलाल आणि झटका मटणाबाबतचा हा एकच प्रसंग नाही. ते अनेकदा थेट मुस्लीम समाजाला टार्गेट करतात."

पुढं ते असंही म्हणाले की, "सातत्याने ते एका धर्माविरूद्ध, समुदायाविरूद्ध चिथावणी देणारी भाषा करतात. हे सगळं त्यांनी मंत्रिपदाच्या घेतलेल्या शपथेच्या विरोधात जाणारं आहे. त्यामुळे अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणं म्हणजे त्याच्या अशा कृत्यांना थेट मुख्यमंत्र्याचं समर्थन आहे का? असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही."

ते अशी भूमिका वारंवार घेऊनही त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज दिल्याचं ऐकिवात नाही. हे सगळं महाराष्ट्राचं चारित्र्य बिघडवणारं आणि महाराष्ट्राला खूप वर्ष मागे घेऊन जाणारं आहे. शिवाय प्रसार माध्यमांच्या भूमिकांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ते म्हणतात, "प्रसार माध्यमं मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारताना दिसत नाहीत."

तर मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं टाळलंच पाहिजे, असं मत ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.

ते म्हणतात, "हे सगळं ध्रुवीकरणाचं राजकारण आहे. त्यामुळे कधी औरंगजेबाची कबर तर कधी मल्हार मटण असे वेगवेगळे विषय हे येतच राहणार आहेत. विशेषतः आता मुंबई महापालिका आणि अन्य निवडणुका येत आहेत, त्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर ध्रुवीकरणाचं कोणत्या विषयावर करायचं असं काहीतरी टार्गेट दिसतंय त्यांचं."

या नव्या राजकारणात मोठ्या पदावर असलेली लोकं सुद्धा अशा प्रकारची वक्तव्य करताना दिसत आहेत.

"राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असेल असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचा अजेंडाच तो असेल तर त्या बाहेर राणे जाणार नाहीत. त्यामुळे कोणाला कोणतं काम आणि मुद्दा द्यायचा हे राजकीय पक्ष करतच असतात."

"आता अशी वक्तव्य करून राजकीय पक्ष अनेकदा लोकांच्या मतांचा किंवा कलाचा अंदाज घेत असतात , जर अशी प्रकरणं अंगावर उलटायला लागली तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे म्हणून ते टाळताही येतं त्यांना.

"मात्र अशा प्रकारची वक्तव्यं सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तींनी करू नयेत या संविधानातील मर्यादेला या नव्या राजकारणात काही अर्थ नाही," असंही ते म्हणाले.

हे ध्रुवीकरण नाही - भाजप

बीबीसी मराठीनं भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांच्यांशी याबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी विरोधकांकडून होणारे ध्रुवीकरणाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ते म्हणाले, "मल्हार प्रमाणपत्राबाबत सरकारनं काही केलं नाही. ते एका संघटनेनं केलं आहे आणि नितेश राणे यांनी त्यांच्या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं आहे. दुसरा मुद्दा असा की ज्यांचा मल्हार प्रमाणपत्राला विरोध आहे, त्यांचा हलालवर काय मत आहे? त्यांना हलाल प्रमाणपत्र कसं चालतं? ते एका विशिष्ट समाजाचं लांगुनचालन करतात. त्यांना वाटतं म्हणून हलालचं प्रमाणपत्र का देतात?"

"हिंदू समाज आता पूर्ण जागृत झालेला आहे. विरोधकांचा हा खोटा सेक्युलॅरिझम आहे, ते मल्हार प्रमाणपत्राला विरोध करतात पण हलालला नाही," असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.