You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाताळ विशेषांकाच्या परंपरेबाबत तुम्हाला माहिती आहे का?
- Author, कमिल पारखे
- Role, लेखक आणि पत्रकार
दिवाळी येण्याआधीच दसऱ्याचा मुहूर्त साधून दिवाळी अंकांचं प्रकाशन केलं जातं. तसं आतापर्यंत डिसेंबरच्या मध्यात सांता क्लॉजच्या साथीने कॅरोल सिंगर्स 'जिंगल बेल जिंगल बेल'; असं गात दारापर्यंत पोहोचण्याआधीच दोन नाताळ विशेषांक हाती पडले आहेत.
मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांना एक वेगळेच महत्त्व आहे. मोबाईल युग सुरू झाल्यापासून आणि त्यानंतरच्या समाजमाध्यमांच्या सार्वत्रिकिकरणामुळं पुस्तकं आणि नियतकालिकं वाचणं कमी झालं असलं तरी याहीवर्षी उत्साहानं दिवाळी अंक काढले जात आहेत. आणि आता प्रतीक्षा आहे ती ख्रिसमस विशेषांकांची.
नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक काढण्याची परंपरा तशी खूप जुनी असली तरी याविषयी अनेकांना कदाचित माहिती नसेलही.
'निरोप्या' हे 1903 साली जर्मन धर्मगुरु हेन्री डोरींग यांनी सुरू केलेले मासिक. पहिल्या महायुद्धाचा काही काळ वगळता आजतागायत प्रसिद्ध होत आहे, गेली काही वर्षं या मासिकाचा नाताळ विशेषांक प्रसिद्ध होतो.
मला आजही आठवतं या नाताळ विशेषांकाची सुरुवात 1975 साली 'निरोप्या'चे तेव्हाचे संपादक फादर प्रभुधर यांनी केली होती. आजही हा नाताळ विशेषांक माझ्या संग्रहात आहे.
तेव्हापासून कोरोनाकाळाचा अपवाद वगळता गेली पाच दशकं नियमितपणे नेहेमीपेक्षा अधिक पानं आणि जाहिराती असणारा 'निरोप्या' चा नाताळ विशेषांक प्रसिद्ध होत आहे. माझ्या लिखाणाची सुरुवातच मुळी 'निरोप्या'तून झाली. श्रीरामपुरात मी शाळेत असताना 1974 साली.
'निरोप्या' मासिक पुण्यातल्या स्नेहसदनमधून जेसुईट संस्था प्रसिद्ध करते. फादर भाऊसाहेब संसारे हे सद्याचे `निरोप्या'चे संपादक आहेत.
'ज्ञानोदय' हे मराठीतील सर्वांत दीर्घायुष्य लाभलेलं नियतकालिक. स्थापना 1842. मराठीतलं पहिलं नियतकालिक बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली सुरू केलं होतं. डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी 'ज्ञानोदया'च्या संपादकाची धुरा घेतल्यानंतरचा हा पहिलाच नाताळ विशेषांक.
मराठी पत्रकारितेच्या आणि नियतकालिकांच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेली मराठीतील सर्वांत जुनी असलेली ही दोन्ही नियतकालिकं ही ख्रिस्ती संस्थांमार्फत चालवली जातात हे विशेष. अर्थात या संस्थांचं पाठबळ हे यामागचे प्रमुख कारण.
यापैकी निदान 'निरोप्या' तरी स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे हे या अंकाच्या रंगीत आणि कृष्णधवल जाहिरातींतून दिसतं.
वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या 'सुवार्ता' मासिकाचा सुद्धा नाताळ विशेषांक असतो. फादर डॉ. अनिल परेरा 'सुवार्ता'चे संपादक आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनेक वर्षे - जवळजवळ पंचवीस वर्षे - सुवार्ताचे संपादक होते.
इतर नाताळ विशेषांक आणि या नियकालिकांचे संपादक पुढीलप्रमाणे
- कादोडी (वार्षिक) - ख्रिस्तोफर रिबेलो
- ख्रिस्तायन (ऑनलाइन नाताळ अंक) - ख्रिस्तोफर रिबेलो
- गीत (वार्षिक नाताळ अंक) - लेस्ली डायस
- जनपरिवार (साप्ताहिक) - अँड्र्यू कोलासो
- कॅथॉलिक (त्रैमासिक) - स्टीफन आय परेरा
- निर्भय आंदोलन (द्वैमासिक) - मनवेल तुस्कानो
दयानंद ठोंबरे हे नव्वदच्या दशकापासून पत्रकारीतेतील माझे सहकारी. मुद्रितशोधनाच्या निमित्ताने माझ्या अनेक मराठी पुस्तकांचे ते पहिले वाचक आहेत. गेली बारा वर्षं दयानंद ठोंबरे 'अलौकिक परिवार' या नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत.
पिंपरी चिंचवड येथील फ्रान्सिस गजभिव गेली सात वर्षं 'शब्द' नावाचा नाताळ विशेषांक काढत आहेत. या विशेषांकात वैचारिक लेख, ललित लेख कविता वगैरे विविध साहित्यप्रकार असतात.
नव्या डिजिटल युगात काही ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन असतात.
गेली 11 वर्षं प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) या स्वरूपात वसईतून ‘कादोडी’ अंकाचं प्रकाशन ख्रिस्तोफर रिबेलो यांच्या संपादनाखाली होत आहे.
यावर्षी काही दिवाळी अंकात मी लिहिलं आहे, तसंच चार नाताळ अंकांतही माझे एक लेख असणार आहेत.
नाताळ विशेषांकांत केवळ धार्मिक किंवा ख्रिस्ती धर्माविषयीच लेख आणि कविता असतात असं मुळीच नाही. कुठलाही नाताळ विशेषांक हाती घेतला की हे लगेच लक्षात येईल.
उदाहरण द्यायचं झालं तर अलौकिक परिवार या नाताळ विशेषांकात रेडिओ जॉकी स्मिता यांनी 'पोळीचा डबा' या लेखात पोळीचा डबा, फूड प्रोसेसर आणि पेला यांचं कोरोना काळातल्या प्रसंगाचं संभाषण आपल्या खुसखुशीत शैलीत लिहिलं आहे.
या लेखातील शेवटचे वाक्य असे आहे: 'देव करो आणि कोरोना किंवा अजून कशामुळेही जगातल्या कुठल्याही घरातला पोळीचा डबा कधीच रिकामा नसो.'
'निरोप्या' नाताळ विशेषांकात माझा 'जोतिबा आणि सावित्रीबाईंचे शिक्षक रेव्ह. जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल' हा लेख आहे.
काही दैनिकं आणि इतर नियतकालिकं आणि अनियतकालिकेसुद्धा नाताळ विशेषांक प्रसिद्ध करत असतात. दिवाळी अंकांतून जशा मोठ्या आर्थिक उलाढाली होतात तशाच या नाताळ अंकांतून सुद्धा होतातच.
अपवाद काही हौशी संपादकांचा जे निव्वळ निखळ आनंदासाठी आपलं काम, नोकरी सांभाळून यासाठी वेळ देत असतात. आणि नाताळाच्या सणानिमित्त वैचारिक फराळ पुरवत असतात.
आज पंचवीस डिसेंबर, नाताळ घरोघरी साजरा होत आहे काही नाताळ विशेषांक गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले आहेत.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)