बाल निरीक्षण गृहातील हत्येच्या आरोपीने दिली बारावीची परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
एक स्वतंत्र खोली, स्वतंत्र पर्यवेक्षक आणि सोबत एक अधिकारी, बाहेर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचा तगडा पहारा अशा वातावरणात त्याने बारावीची परीक्षा द्यायला सुरुवात केली आहे.
इतका तगडा बंदोबस्त असण्याचे कारण म्हणजे हा परीक्षार्थी विधिसंघर्षग्रस्त बालक असून तो बालनिरीक्षण गृहात राहून बारावीची परीक्षा देतोय. पण बाल निरीक्षणगृहात राहून त्याला बारावीची परीक्षा देण्याची संधी कशी मिळाली? त्याच्या हातून कोणता गुन्हा घडला होत्या ज्यासाठी त्याला निरीक्षण गृहात पाठवण्यात आलं? पाहुयात
राहुल (बदललेलं नाव) मूळचा यवतमाळ मधला आहे. त्याला आई वडील नाहीत. तो लहान असताना आई वारली आणि त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे पोरका झालेल्या राहुलच्या सवयी बिघडल्या. त्याची काही स्थानिक गुंडांच्या टोळीसोबत ओळख झाली, असं बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.
एका भांडणाच्या प्रकरणात त्यानं 6 महिन्यापूर्वी एका व्यक्तीची हत्या केली. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं असतं त्याची यवतमाळच्या बाल निरीक्षणगृहात रवानगी झाली होती.
याआधीही त्याने 2 वर्षापूर्वी एक हत्या केली होती. तेव्हाही तो बाल निरीक्षण गृहात होता, अशी माहिती नागपूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी दिली.
त्याने गुन्हा करण्यापूर्वी बारावीच्या परीक्षेचा अर्ज दाखल केला होता. आता परीक्षा जवळ आल्यानंतर त्याला परीक्षा द्यायची इच्छा होती.
पण हे कसं शक्य होईल माहिती नव्हतं. त्यामुळे तो अस्वस्थ होता. यातूनच त्याने एक दिवस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
स्वतःला दुखापत करून घेतली. ही बाब यवतमाळच्या बाल न्याय मंडळाच्या पीठासीन अधिकारी ईना धांडे यांना समजल्यानंतर त्यांनी कारण विचारलं तर त्याने बारावीची परीक्षा द्यायची आहे अशी इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर नागपूर विभागीय शिक्षण मंडळासोबत चर्चा करून त्याच्या परीक्षेची सोय झाली.


पठाण सांगतात, या मुलाला नागपूर बाल निरीक्षण गृहाच्या ताब्यात देत असून त्याला यवतमाळमध्ये परीक्षेला ने-आण करण्याची जबाबदारी नागपूरच्या बाल संरक्षक अधिकाऱ्याची असेल असा आदेश ईना धांडे यांनी दिले.
पण नागपूरवरून यवतमाळला प्रत्येक पेपरसाठी जाणं येणं अवघड होतं. त्यामुळे नागपुरात त्या विद्यार्थ्याची परीक्षा घ्यावी अशी विनंती केली असता धांडे यांनी नव्याने आदेश काढले.
हे आदेश घेऊन पठाण नागपूर विभागीय शिक्षण मंडळाला भेटले आणि त्यांनी या एका परिक्षर्थीची परीक्षा देण्याची सोय केली.
नागपूर बाल संरक्षक गृहाच्या एक किलोमीटरच्या परिसरात या परीक्षार्थीला परीक्षा केंद्र देण्यात आले असून त्याच्यासाठी स्वतंत्र खोली आहे.
त्याच्यासाठी स्वतंत्र पर्यवेक्षक असून ही सगळी माहिती गोपनीय राहावी यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त आहे.
पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशी त्याने 4 तास केला अभ्यास
बारावीची परिक्षा 11 फेब्रुवारी पासून सुरू झाली. पण आपल्याला परीक्षा देता येईल की नाही हे या विधीसंघर्षग्रस्त बालकाला माहिती नव्हतं. त्यामुळे त्याचा अभ्यास पण व्हायचा होता.
त्याला परीक्षा देता येईल हे समजल्यानंतर त्याने नागपूर बाल निरीक्षण गृहाच्या वाचनालयात पहील्या पेपरसाठी रात्री 4 तास अभ्यास केला.
त्याच्यासाठी सगळ्या पुस्तकांची सोय करून देण्यात आली आहे. तसेच ही संधी देण्यासाठी त्याने बाल निरीक्षण गृहाचे आभार देखील मानले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











