'फेक वेडिंग'चा वाढता ट्रेंड आणि लाखोंची उलाढाल, वर-वधूशिवाय होणाऱ्या पार्ट्या

फोटो स्रोत, Third Place
- Author, निकिता यादव
जेव्हा तुम्ही एखाद्या भव्य, खूप थाटामाटातील भारतीय लग्नाचा विचार करता, तेव्हा डोळ्यासमोर कोणतं दृश्य येतं?
चांगली प्रकाशयोजना, उत्तम-महागडे भरजरी कपडे, बॉलीवूडची हिट गाणी, जेवणाची मेजवानी आणि उत्साहानं भरलेलं वातावरण, असंच ते दृश्य असतं.
त्या थाटामाटात, दिमाखात सर्वकाही विलक्षण, भावनिक आणि लार्जर दॅन लाईफ वाटतं.
आता याच सर्व गोष्टी डोळ्यासमोर आणा, फक्त त्यात वधू आणि वर नसल्याची कल्पना करा. वधू-वराची सप्तपदी नाही, कोणतेही नातेवाईक नाहीत, डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीये अशी बिदाई नाही, पण फक्त पार्टी आहे.
हे आहे बनावट किंवा 'फेक वेडिंग'च विश्व. भारतातील शहरांमध्ये या फेक लग्नांच्या पार्ट्यांचा ट्रेंड वाढतो आहे. त्यात लोक लग्नाच्या पार्टीचा किंवा सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी एकत्र जमतात.
तिथे सर्वकाही थाटमाट लग्नासारखाच असतो, फक्त वधू-वर नसतात आणि लग्न होत नसतं.
या प्रकारच्या पार्टींसाठी तिकीट असतं. हॉटेल, क्लब आणि कंपन्या त्याचं आयोजन करतात. लग्नाच्या सोहळ्याचा पूर्ण आनंद, कोणत्याही तणावाशिवाय, विधीशिवाय किंवा जबाबदाऱ्यांशिवाय घेण्यासाठी आणि धमाल करण्यासाठी या पार्ट्यांचं आयोजन केलेलं असतं.
सोप्या भाषेत सांगायचं तर ती रात्रीच्या वेळी होणारी लग्नाच्या थीमवर आधारित पार्टी असते.
कशा असतात या फेक वेडिंग पार्ट्या
गेल्या काही आठवड्यांपासून, दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये या 'फेक वेडिंग' पार्टी किंवा बनावट लग्नाच्या पार्ट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
यात हजेरी लावणारे सहसा तरुण असतात. त्यांना मित्रमंडळींबरोबर रात्रीची धमाल करायची असते. कोणत्याही दबाबाशिवाय भारतीतील लग्नांमध्ये असते ती मौजमजा, नाट्यमयता आणि आनंद त्यांना लुटायचा असतो.

गेल्या आठवड्यात, आम्ही दिल्लीत अशाच एका कार्यक्रमाला किंवा पार्टीला उपस्थित होतो. ते एक फेक संगीत होतं (म्हणजेच विवाहाच्या वेळेस असतं तसं संगीत या सोहळ्याचं वेळचं धमाल वातावरण असलेली पार्टी)
ती पार्टी एक आलिशान क्लबमध्ये आयोजित करण्यात आली होती. तिथे जबरदस्त उत्साह होता. महिलांनी खास लग्नात घातल्या जातात तशा सीक्वीन्ड म्हणजे चमकदार साड्या आणि लेहेंगा परिधान केले होते.
तर पुरुषांनी खास शिवून घेतलेले कुर्ते आणि पांरपारिक जॅकेट घातले होते. एका पारंपारिक ढोल वादकानं या सर्व गर्दीला डान्स फ्लोअरवर नेलं. तिथे मग सर्वांनी टकिला भरलेल्या पाणीपुरींचा आस्वाद घेतला.
'कौटुंबिक विवाहात नातेवाईकांचा दबाव असतो, इथे आहे फक्त धमाल'
शिवांगी सरीन या पहिल्यांदाच अशा इव्हेंट किंवा पार्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांना हे सर्व वातावरण 'आश्चर्यकारक' वाटलं.
त्या म्हणाल्या, "कौटुंबिक विवाह सोहळ्यात खूपच दबाव असतो. तिथे कपडे कसे घालावेत याची बंधनं असतात. नातेवाईकांचा दबाव असतो. मात्र इथे निव्वळ धमाल आहे."
"विशेषकरून हे सर्व आम्हाला आमच्या मित्रांबरोबर करायचं होतं. आम्ही सर्वांनी एक दिवस आधी कोणते कपडे परिधान करायचे ते ठरवलं आणि मग एकत्र तयारी केली."

फोटो स्रोत, Trippy Tequila
या पार्टी किंवा इव्हेंटच्या तिकिटाचे दर साधारणपणे, 1,500 रुपयांपासून (17 डॉलर;13 पौंड) सुरू होतात आणि ते अगदी 15,000 रुपयांपर्यंत किंवा त्याहूनही वर जातात.
पार्टीचं ठिकाण आणि तिथे असलेल्या सुविधा यानुसार तिकिटाचे दर ठरतात. शिवांगी आणि त्यांच्या मैत्रिणींनी त्या पार्टीसाठी प्रत्येक जोडप्यासाठी 10,000 रुपये मोजले होते.
"महिन्यातून एकदा इतके पैसे खर्च करायला माझी हरकत नाही. हा संपूर्ण अनुभव तिकिटाची किंमत वसूल करणारा होता."
परदेशातील भारतीयांकडून आली ही कल्पना
या इव्हेंटचं आयोजन ज्या रेस्टॉरंटनं केलं होतं, त्याचे मालक शरद मदन आहेत. ते म्हणतात की या ट्रेंडमधून अधोरेखित होतं की हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नाविन्य महत्त्वाचं आहे.
शरद मदन म्हणतात की, या पार्टीचं आयोजन करण्यासाठी शरद मदन यांच्या रेस्टॉरंटला जवळपास दहा लाख रुपये खर्च आला. तिकीट विक्रीतून त्यांना याच्या दुप्पट कमाई अपेक्षित होती.
मात्र हे फक्त नफ्यापुरतंच नाही, असं ते म्हणतात.
"पार्टीमध्ये असणारा सहभाग महत्त्वाचा आहे. या इव्हेंटमधून मला तितक्याच प्रमाणात उत्पन्न मिळालं नाही, तरी मी त्याचं आयोजन करेन. कारण आमच्या ग्राहकांना काहीतरी वेगळं हवं आहे," असं ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
कौशल चनानी 8 क्लब इव्हेंट्सचे सह-संस्थापक आहेत. 8 क्लबनं गेल्या महिन्यात बंगळुरूमध्ये अशाच एका फेक वेडिंग पार्टी आयोजन केलं होतं. त्याला 2,000 जणांनी हजेरी लावली होती. कौशल म्हणतात की या फेक वेडिंग पार्टीची कल्पना परदेशात राहणाऱ्या तरुण भारतीयांकडून आली.
"परदेशातील भारतीय लोक एकत्र येऊन बॉलीवूडच्या संगीतावर नाचायचे, पारंपारिक पोशाख परिधान करायचे आणि त्या संध्याकाळचा आनंद घ्यायचे. आम्ही याच कल्पनेचा वापर केला," असं ते म्हणतात.
बंगळुरूमधील तो इव्हेंट एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला होता. त्याला 'जबरदस्त' प्रतिसाद मिळाला होता, असं ते म्हणतात.
त्यातून त्यांना अशाच इव्हेंटचं आयोजन दिल्लीत करण्यास प्रोत्साहन मिळालं. मग त्यांना जयपूर, कोलकाता आणि लखनौ यासारख्या इतर शहरांमधून याप्रकारच्या इव्हेंटचं आयोजन करणाऱ्यांकडून विचारणा होऊ लागली.
कौशल म्हणाले, "आता ज्या लोकांना यात रस आहे, त्यांना आम्ही आमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) देतो. याप्रकारच्या पार्टीचं आयोजन कसं करायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं आणि त्यातून नफा कसा कमवायचा याचं मार्गदर्शन त्यातून मिळतं."
अर्थात सर्वच फेक वेडिंग पार्टी याच पद्धतीनं होत नाहीत.
पार्ट्यांमध्ये असतात वेगवेगळ्या थीम
अशाच पार्टीचं तिसरं ठिकाण म्हणजे एक स्टार्टअप. त्यांनी अलीकडेच बंगळुरूमध्ये एका संयमित किंवा सौम्य संगीत पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यात मद्यपान नव्हतं, फक्त थीमवर आधारित जल्लोष होता.
"आम्ही या पार्टीला उपस्थित राहणाऱ्या वर आणि वधूकडच्या लोकांमध्ये विभागलं होतं. आम्ही चॅरेड्ससारख्या खेळांचं आयोजन केलं होतं," असं या स्टार्टअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनुराग पांडे म्हणाले.
चॅरेड्स या खेळात एक व्यक्ती एखाद्या शब्दाचं वर्णन त्याच्या हावभावांनी करून दाखवतो आणि दुसऱ्या व्यक्तीला तो शब्द ओळखायचा असतो.
पार्टीमद्ये ढोल होते, सर्व पाहुण्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं आणि अगदी ज्योतिषशास्त्रावर आधारित गेम्सदेखील होते. मात्र यात दारू मुद्दाम वगळण्यात आली होती.
"कधीकधी दारूमुळे अशा इव्हेंटचा अनुभव बाजूला राहतो. आम्हाला एखाद्या पबमधील रात्र किंवा नेहमीच्या पार्टीच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं होतं. आम्हाला या इव्हेंटमध्ये भारतीय विवाहामध्ये असणारा उत्साह दाखवायचा होता," असं पांडे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
यावर टिप्पणी करणाऱ्यांचं म्हणणं आहे की या प्रकारच्या इव्हेटंच्या लोकप्रियतेतून, धमाल किंवा जल्लोष करण्यासाठी कारणं शोधण्याची तरुणांमधील वाढती इच्छा दिसून येते.
"लोकांना भेटण्यासाठी, धमाल करण्यासाठी कोणत्या तरी गोष्टीची आवश्यकता असते. याच्यासाठी विवाहापेक्षा दुसरी चांगली गोष्ट नसते. त्यात धमाल करण्याच्या सर्व गोष्टी एकत्र येतात," असं लेखक आणि सामाजिक भाष्यकार संतोष देसाई म्हणतात.
"हे आनंदाचं शिखर आहे- विशेषकरून जेव्हा ते जेव्हा खऱ्या विवाहामधील तणावापासून मुक्त असतं," असं ते म्हणतात.
त्याचबरोबर ते असंही नमूद करतात की या विवाहाच्या थीमवर आधारित पार्ट्यांमुळे लोकांना त्यांनी पूर्वी लग्नात घालण्यासाठी म्हणून घेतलेले महागडे कपडे पुन्हा परिधान करण्याची संधी मिळते.
मग, अशा प्रकारच्या इव्हेंट्सचा ट्रेंड कायम राहील का?
विजय अरोरा, दिल्लीस्थित टचवूड इव्हेंट्सचे संस्थापक आहेत आणि इव्हेंटसचे प्लॅनर आहेत. त्यांना वाटतं की फेक वेडिंग इव्हेंट ही सध्या एक फॅशन आहे. मात्र त्यात क्षमता आहे.
"जेन झी ला अशा इव्हेंटमध्ये, जल्लोषात सहभागी व्हायची इच्छा आहे," असं ते म्हणाले.
"जर याप्रकारचे इव्हेंट हे बाजारातील एक नवीन श्रेणी म्हणून उदयाला आले तर ते गेम चेंजर ठरू शकतं. कारण त्यामुळे व्याप्ती वाढेल. त्यातून शेवटी संपूर्ण उद्योगासाठी व्यवसायाच्या संधी वाढतील," असं ते पुढे म्हणाले.
राईट रिसर्च या गुंतवणूक सल्लागार फर्मच्या मते, भारतातील विवाह उद्योग जवळपास 130 अब्ज डॉलरचा असल्याचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Third Place
हे क्षेत्र भरभराटीला येत असलं तरी त्याला काही मर्यादा आहेत. बहुतांश विवाह हिवाळ्यात होतात. साधारणपणे ते नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आणि शुभदिवशी होतात. तर पावसाळा (जुलै ते ऑगस्ट) मात्र तसाच जातो.
ठिकाणं मोफत उपलब्ध आहेत, वेंडर्स उपलब्ध आहेत आणि लोकांना सतत वेगवेगळा अनुभव हवा आहे, त्यामुळे जर हा ट्रेंड कायम राहिला तर फेक वेडिंगचे हे इव्हेंट्स ही पोकळी भरून काढू शकतात.
विजय अरोरा म्हणतात की फेक वेडिंग इव्हेंट्समध्ये वाढ झाल्याचं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.
ते म्हणाले, "मात्र यातून हे समजण्यास मदत होते की असे इव्हेंट्स आपल्याला साजरे करायचे आहेत किंवा आपण त्याचा भाग होऊ इच्छितो. जरी आपल्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी आयोजित केलेल्या खऱ्या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहू शकलो नाही, तरी अशा इव्हेंटमध्ये सहभागी होऊन आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा असतो."
सर्व तरुणाईला भावत नाहीत या पार्ट्या
अर्थात या इव्हेंटमध्ये सहभागी होणारा प्रत्येकजण तितकाच आनंद घेऊन बाहेर पडत नाही.
सृष्टी शर्मा ही 23 वर्षांची तरुणी बंगळुरूतील मार्केटिंग प्रोफेशनल आहे. ती म्हणाली की ती एका फेक वेडिंग इव्हेंटला गेली होती. मात्र त्यात तिला फारसं उत्साही वाटलं नाही, तिच्यावर त्याचा प्रभाव पडला नाही. तिचा अपेक्षाभंग झाला.
"गेल्या काही वर्षांपासून मी घरापासून दूर राहते आहे. त्यामुळे मला विवाहात जाण्याची संधी मिळत नाही आणि मला ती उणीव जाणवते," असं ती म्हणाली.
या इव्हेंटची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यात, 'आता लग्नासाठी तुझा नंबर लागणार आहे', असं म्हणून त्रास देणारे नातेवाईक तिथे नसतात," असं ती पुढे म्हणाली.
सृष्टी शर्मा आणि तिच्या मैत्रिणींनी कपडे निवडण्यासाठी तासनतास घालवले, मात्र इव्हेंटमधून त्यांचा अपेक्षाभंग झाला.
"त्यांनी ईडीएमनं (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) सुरुवात केली आणि मग दोन तासांनी त्यांनी बॉलीवूडच्या संगीताला सुरुवात केली," असं ती म्हणाली.
"आम्हाला तिथे लग्नात मिळतं तशा जेवणाची अपेक्षा होती. मात्र तिथे पिझ्झा आणि फ्राईज मिळाल्या. तिथे गोड पदार्थ नव्हते, फक्त दारू होती. तिथली सजावट साधारणच होती आणि तिथे आळसावल्यासारखं वाटलं," असं ती पुढे म्हणाली.
काहीजणांनी याप्रकारच्या इव्हेंट किंवा पार्टीवर टीका केली आहे. त्याचं म्हणणं आहे की याप्रकारचे कार्यक्रम पारंपारिक भारतीय कार्यक्रम आणि मूल्यांचं महत्त्व, गांभीर्य कमी करत आहेत.
विधी कपूर दिल्लीत एका फेक संगीत इव्हेंटला गेल्या होत्या. त्या या मताशी असहमत आहेत.
"जर या इव्हेंटमध्ये लोकांना वधू किंवा वरासारखे कपडे घालण्यास सांगितलं तर ते आक्षेपार्ह ठरलं असतं. मात्र ही फक्त एक पार्टी आहे. आपण त्याकडे खूपच सकारात्मकपणे, उत्साहानं पाहिलं पाहिजे," असं त्या म्हणाल्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.










