एकाच मुलीचे दोन सख्ख्या भावांशी लग्न, का होतेय या घटनेची सर्वदूर चर्चा?

प्रदीप नेगी (डावीकडे), कपिल नेगी (उजवीकडे) यांनी सुनिता चौहान (मध्यभागी) यांच्याशी लग्न केलं आहे.

फोटो स्रोत, ALOK CHAUHAN

फोटो कॅप्शन, प्रदीप नेगी (डावीकडे), कपिल नेगी (उजवीकडे) यांनी सुनिता चौहान (मध्यभागी) यांच्याशी लग्न केलं आहे.
    • Author, सौरभ चौहान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्याच्या शिलाई गावात सध्या एका अनोख्या लग्नावरून चांगलीच चर्चा रंगली आहे आणि वादही सुरू आहे.

कुंहाट गावातील सुनिता चौहान यांनी दोन सख्खे भाऊ असलेल्या प्रदीप नेगी आणि कपिल नेगीबरोबर एकाचवेळी विवाह केला आहे.

अनुसूचित जमातीच्या सूचीतील हाटी समुदायामध्ये एक जुनी 'बहुपती' प्रथा आहे. त्या प्रथेअंतर्गत हा विवाह सोहळा झाला आहे.

स्थानिक भाषेत याला 'जोडीदारा' किंवा 'जाजडा' असं म्हटलं जातं.

सिरमौरच्या ट्रांस गिरी परिसरात झालेल्या विवाह सोहळ्यात शेकडो गावकरी आणि नातेवाईकही सहभागी झाले होते.

पारंपरिक खाद्यपदार्थ, लोकगीतं आणि नृत्य यामुळं हा सोहळा आणखी अविस्मरणीय बनला.

एकीकडे हा विवाह सोहळा सांस्कृतिक परंपरेचं उदाहरण आहे, तर त्याचवेळी यामुळं अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.

बीबीसीनं या विषयी नवरदेव आणि नवरीच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण वारंवार विनंती करूनही त्यांनी याबाबत बोलायला नकार दिला.

किती जुनी आहे प्रथा?

नवरीचे कुटुंब सिरमौर जिल्ह्याच्या कुंहाटा गावातील आहे. ते गाव नवरदेवाच्या शिलाई गावापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलापासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

दोन्ही कुटुंबं ही हाटी समुदायाची आहेत. हा समुदाय प्रामुख्यानं सिरमौर जिल्ह्याच्या ट्रान्स गिरी परिसराशिवाय उत्तराखंडच्या जौनसार-बावर आणि रवाई-जौनपूर परिसरातही राहतो.

या समुदायात ही बहुपती प्रथा दीर्घ काळापासून प्रचलित आहे. या प्रथेबाबत माहिती असलेल्या लोकांच्या मते, याचा उद्देश कुटुंबात ऐक्य टिकून राहवं आणि वारसा हक्कानं मिळणाऱ्या शेतीची, संपत्तीची वाटणी रोखणं हा आहे.

या प्रथेमध्ये एक महिला दोन किंवा त्यापेक्षा जास्त भावांबरोबर लग्न करते आणि घरातील जबाबदारी या एकमतानं उचलल्या जातात. सिरमौर शिवाय ही प्रथा शिमला, किन्नौर आणि लाहौल स्पितीच्या काही भागांमध्येही पाहायला मिळते.

प्रदीप नेगी (डावीकडे), कपिल नेगी (उजवीकडे) आणि सुनिता चौहान (मध्यभागी)

फोटो स्रोत, ALOK CHAUHAN

फोटो कॅप्शन, प्रदीप नेगी (डावीकडे), कपिल नेगी (उजवीकडे) आणि सुनिता चौहान (मध्यभागी)

स्थानिक रहिवासी कपिल चौहान यांच्या मते, "जोडीदारा प्रथा ही आमची ओळख आहे. संपत्तीची वाटणी रोखणे, हुंड्याची प्रथा दूर ठेवणे, भावांमध्ये एकता आणि लहान मुलांच्या पालन पोषणाच्या दृष्टीनं ही प्रथा फायद्याची आहे."

त्यांच्या मते, शिलाई भागातील जवळपास प्रत्येक गावात चार ते सहा कुटुंबं या प्रथेचं पालन करतात.

कपिल चौहान यांना या नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, "मला खूप आधीपासून याबाबत माहिती होती. हे अचानक झालेलं नाही. ही एक जुनी प्रथा आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. नवरदेव, नवरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जोवर याबाबत काही आक्षेप नाही, तोपर्यंत इतरांचं याच्याशी काही देणं घेणं नाही," असंही ते म्हणाले.

"लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये बिनधास्त राहत आहे, तर याचाही स्वीकार करायला हवा," असंही ते म्हणाले.

सहमती आणि सांस्कृतिक अभिमान

हा विवाह सोहळा 12 जुलैपासून सुरू झाला. त्याची आणखी एक वेगळी बाब म्हणजे, नवरी आणि दोन्ही नवरदेव हे सुशिक्षित आहेत. नवरी सुनिता चौहानचं आयटीआय झालं आहे.

प्रदीप नेगी राज्य सरकारच्या जल शक्ती विभागात काम करतात आणि कपिल नेगी विदेशात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करतात.

सुनिता चौहान या लग्नाबाबत म्हणाल्या की, "हा माझा स्वतःचा निर्णय होता. मला ही प्रथा माहिती होती. मी स्वतः ती स्वीकारली."

प्रदीप नेगी यांच्या मते, "आमच्या संस्कृतीमध्ये हा विश्वास, काळजी आणि सामुदायिक जबाबदारीचं नातं आहे."

ग्राफिक्स

कपिल नेगी म्हणाले की, "विदेशात राहूनही मी या नात्यासाठी कटिबद्ध आहे. तसंच मला पत्नीला स्थैर्य आणि प्रेम द्यायचं आहे."

हा विवाह सोहळा पारंपरिक रमलसार पुजा पद्धती अंतर्गत झाला. या विधीमध्ये फेऱ्यांच्याऐवजी 'सिन्ज' हा विधी होतो. सिन्ज म्हणजे आगीमध्ये फेरे मारण्याऐवजी, आगीसमोर उभं राहून वचनं दिली जातात.

जोडीदारा प्रथेमध्ये नवरीच्या घरून नवरदेवाच्या घरी वरात जाते. त्यामुळंच ही प्रथा भारतातील विवाहासंदर्भातील इतर परंपरांपेक्षा वेगळी आहे.

वजीब-उल-अर्ज आणि कायदेशीर मान्यता

हिमाचल प्रदेशमध्ये 'जोडीदारा' प्रथेचा उल्लेख 'वजीब उल अर्ज' नावाच्या वसाहतवादी काळाच्या राजकीय दस्तऐवजामध्ये आहे. यामध्ये गावांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रथांची नोंद केलेली असून, त्यात जोडीदारा ही हाटी समाजाची प्रथा असल्याचं म्हटलं आहे.

या प्रथेचा उद्देश शेतीयोग्य जमीनीची वाटणी रोखणं आणि कुटुंबाला एकत्र ठेवणं हा असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हिंदू विवाह कायद्यानुसार एक पत्नी विवाहालाच मान्यता दिली जाते. त्यामुळं अशा विवाहाच्या कायदेशीर बाजूवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

हिमाचल प्रदेश हायकोर्टाचे वकील सुशील गौतम यांच्या मते, "दोन्ही विवाह एकाचवेळी झाल्यानं यात हिंदू विवाह कायदा 1995 चे कलम 5 आणि भारतीय न्याय संहिताचे कलम 32 लागू होत नाही."

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाळंमुळं

'जोडीदारा' प्रथेची मुळं ट्रांस गिरी परिसरात खोलवर रुजलेली असल्याचं मानलं जातं. महाभारतातील द्रौपदीच्या कथेबरोबर याचा संदर्भ जोडला जातो. त्यामुळंच अनेक लोक याला 'द्रौपदी प्रथा'ही म्हणतात.

हिमाचल प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री डॉक्टर वाय. एस. परमार यांनी त्यांच्या 'पॉलियंड्री इन द हिमालयाज' या पुस्तकात या प्रथेमागील सामाजिक आणि आर्थिक कारणांचा सविस्तर उल्लेख केला आहे.

ग्राफिक्स

त्यांच्या मते, 'ही प्रथा डोंगरी भागातील कठिण परिस्थितींमुळं तयार झाली आहे. कारण याठिकाणी शेतीयोग्य जमिनीचं प्रमाण कमी असून ती एका ठिकाणी राहणं गरजेचं होतं.'

हाटी समुदायाशी संबंधित अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते अमिचंद हाटी यांच्या मते, "या प्रथेला सामाजिक मान्यता असून ही समुदायाचं ऐक्य आणि परंपरा दर्शवते. सामाजिक मूल्यांचं संरक्षण करणारी प्रथा म्हणून याकडं पाहिलं पाहिजे."

केंद्रीय हाटी समितीचे सरचिटणीस कुंदन सिंह शास्त्री यांच्या मते, ही प्रथा खूप जुनी आहे. तिचा उद्देश कुटुंबातील ऐक्य टिकवणं हा आहे.

सामाजिक वाद आणि टीका

या विवाह सोहळ्यानंतर सामाजिक आणि नैतिकतेच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. काही लोकांच्या मते हा एखाद्याचं वैयक्तिक मत आणि आवड याच्याशी संबंधित विषय आहे. तर अनेक संघटना हा प्रकार महिला अधिकारांच्या विरोधी असल्याचं सांगतात.

ऑल इंडिया डेमोक्रेटिक वुमेन्स असोसिएशनच्या सरचिटणीस मरियम धावले याबाबत म्हणाल्या की, "ही प्रथा महिलांच्या शोषणाला प्रोत्साहन देणारी असून त्यांच्या अधिकारांचं हनन करणारीही आहे."

कपिल नेगी आणि सुनिता चौहान

फोटो स्रोत, ALOK CHAUHAN

फोटो कॅप्शन, कपिल नेगी आणि सुनिता चौहान

हिमाचल प्रदेशच्या माकपचे माजी राज्य सचिव डॉ. ओंकार शद यांनीही ही प्रथा संविधान आणि कायद्याच्या विरोधी असल्याचं म्हटलं आहे.

तर हिमाचल प्रदेश सरकारचे उद्योगमंत्री आणि शिलाईचे आमदार हर्षवर्धन चौहान यांच्या मते, "ही शिलाईची जुनी प्रथा आहे. प्रदीप आणि कपिल यांही प्रथा जीवंत ठेवत सांस्कृतिक वारशाचा गौरव केला आहे."

हाटी समुदायाच्या इतर प्रथा

जोडीदाराशिवाय हाटी समुदायात विवाहाच्या इतरही चार परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथा आहेत.

बाल विवाहात गर्भावस्थेतच बाळाचा विवाह ठरवला जातो. मोठे झाल्यानंतर त्यांच्या सहमतीनं विवाह सोहळा संपन्न केला जातो.

सामाजिक मूल्यांचं संरक्षण करणारी प्रथा म्हणून याकडं पाहिलं पाहिजे

फोटो स्रोत, ALOK CHAUHAN

फोटो कॅप्शन, स्थानिकांच्या मते, सामाजिक मूल्यांचं संरक्षण करणारी प्रथा म्हणून याकडं पाहिलं पाहिजे.

जाजडा विवाहात वराकडील लोक विवाहाचा प्रस्ताव ठेवतात आणि सहमती असेल तर इतर विधी केल्या जातात. यात प्रथेतही 'सिन्ज' विधीने विवाह होतो.

खिताइयो विवाह म्हणजे एखादी विवाहित महिला सासरशी संबंध संपवून दुसरा विवाह करते तो विवाह.

हार विवाह म्हणजे एखादी महिला कुटुंबाच्या इच्छे विरोधात कुणाशी लग्न करते तो विवाह सोहळा.

काळानुसार बदलत्या परंपरा

अभ्यासकांच्या मते, पूर्वीच्या तुलनेत आता जोडीदारा प्रथा फार कमी झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ता रमेश सिंगटा यांच्या मते, ही प्रथा आता काही मोजक्या गावांमध्येच पाहायला मिळते. यातले बहुतांश विवाह सोहळे कोणताही गाजावाजा न करता होतात."

पण, सोशल मीडिया आणि हाटी समुदालाला मिळालेला आदिवासींचा दर्जा यामुळं नुकत्याच झालेल्या या विवाह सोहळ्याकडं सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं.

हाटी समुदायाच्या एकूण लोकसंख्येबाबत अधिकृत आकडा समोर आलेला नाही. पण या समुदायाला आदिवासींचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती, तेव्हा यांची लोकसंख्या अंदाज 2.5 ते 3 लाखांच्या दरम्यान असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यात सिरमौरच्या ट्रान्स गिरी भागातील जवळपास 1.5 ते 2 लाख लोकांचा समावेश आहे.

हाटी समुदायाची ओळख

सिरमौर जिल्ह्यातील 150 हून अधिक ग्रामपंचायती या गिरिपार भागातील आहेत. समुदायातील काही लोकांच्या मते, या भागात कधीही कायमस्वरुपी बाजारपेठ नव्हती. आजूबाजूच्या भागातून येऊन लोक याठिकाणी तात्पुरते हाट म्हणजे बाजार भरवायचे. त्यामुळंच तेव्हापासून या समुदायाला हाटी समुदाय म्हटलं जाऊ लागलं.

सामाजिक कार्यकर्ते रमेश सिंगटा यांच्या मते, हाटी हे नाव स्थानिक हाट बाजारांमध्ये गरगुती वस्तू विक्रीच्या जुन्या परंपरेशी संबंधित आहे. उत्तराखंडमध्ये हाटी समुदाय जौनसारी समुदायाचा भाग मानला जातो. त्यांच्या प्रथा बऱ्याच अंशी सारख्या आहेत.

उत्तराखंडमध्ये हाटी समुदाय जौनसारी समुदायाचा भाग मानला जातो.

फोटो स्रोत, ALOK CHAUHAN

फोटो कॅप्शन, उत्तराखंडमध्ये हाटी समुदाय जौनसारी समुदायाचा भाग मानला जातो.

केंद्र सरकारनं हिमाचल प्रदेशच्या हाटी समुदायाला आदिवासी दर्जा दिला होता. पण जानेवारी 2024 मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयानं 'गिरीपार अनुसुचित जात सुरक्षा समिती'च्या एका याचिकेवरून या निर्णयावर स्थगिती आणली होती.

समितीच्या मते, हाटी समुदायाला एसटी दर्जा दिल्यानं सध्याच्या आरक्षणावर परिणाम होऊ शकतो. तसंच अनुसुचित जातींच्या अधिकारांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या समुदायाला आदिवासींचा दर्जा असला तरी अद्याप त्यांना तशा सुविधा मात्र मिळत नाहीत.

उत्तराखंड (तत्कालीन उत्तर प्रदेश) च्या हाटी समुदायाला 1967 मध्येच आदिवासींचा दर्जा मिळाला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.