भारत आणि पाकिस्तानात झालेल्या शस्त्रसंधीनंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांत काय चर्चा आहे?

फोटो स्रोत, Getty Images
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे कट्टरतावाद्यांनी 22 एप्रिलला केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव निर्माण झाला होता.
दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात सैन्य कारवाया केल्यानंतर हा तणाव वाढीला लागला. मात्र काल अचानक दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला सहमती दिली आणि हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
अर्थात त्यानंतर शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचा आरोपही दोन्ही देशांनी एकमेकांवर केला.
परदेशातील माध्यमांमध्ये या शस्त्रसंधी आणि त्याच्या उल्लंघनाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जगातील प्रसिद्ध दैनिकांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्याबद्दल लेख प्रसिद्ध झाले आहेत.
अमेरिकन माध्यमांत काय चर्चा आहे?
न्यू यॉर्क टाइम्समध्ये लिहिलंय, "चार दिवस ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे. मात्र काही वेळातच सीमेवर गोळीबार सुरू असल्याची बातमी आली."
न्यू यॉर्क टाइम्स लिहितं, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शस्त्रसंधीची घोषणा केली आणि अमेरिकेने यात मध्यस्थी केली. भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी शस्त्रसंधी झाल्याचं स्पष्ट केलं. परंतु पाकिस्ताननेच फक्त अमेरिकेच्या भूमिकेचा स्वीकार केला."
वॉशिंग्टन पोस्ट लिहितं, "दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवण्याचा हा प्रयत्न आहे. या संघर्षाची सुरुवात भारतानं पाकिस्तान प्रशासित काश्मीरवर हवाई हल्ले केल्यावर झाली होती."
"22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर होतं असं भारतानं म्हटलं होतं. त्यानंतर पुढचे तीन दिवस दोन्ही देशांत एकमेकांविरोधात हल्ल्यांची मालिका सुरू झाली."
ब्रिटनमधील माध्यमांनी काय लिहिलं?
फायनान्शिअल टाइम्सने लिहिलं, "भारत आणि पाकिस्तानात 2016 आणि 2019 मध्ये झालेले संघर्ष काश्मीर आणि सीमाप्रदेशापुरताच मर्यादित होते. मात्र यावेळेस दोन्ही देशात गंभीर संघर्ष दिसला. दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई तळांवर हल्ले केले आणि ड्रोनही पाठवले."
टेलिग्राफ लिहितं, "भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या जवळ पोहोचले होते. याआधी या दोन देशांमध्ये याप्रकारचे हल्ले 1971 च्या युद्धावेळी झाले होते. त्या युद्धानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला आणि मगच युद्ध संपलं."
टेलिग्राफ लिहितं, "भारताने पाकिस्तानच्या तीन हवाई तळांना लक्ष्य केलं. पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तरादाखल भारतावर जेट हल्ले केले."
"1971आणि आजच्या स्थितीत महत्त्वाचा फरक म्हणजे तेव्हा दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं नव्हती, आज मात्र दोन्ही देशांकडे ती आहेत."
अरेबिक माध्यमांत काय चर्चा?
अरब न्यूज डॉट कॉम लिहितं, "भारत आणि पाकिस्तानने एकमेकांवर हल्ले करून शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप केला. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करताच काही वेळातच हे आरोप झाले."
"चार दिवस ड्रोन, क्षेपणास्त्र आणि जेट फायटर हल्ले-प्रतिहल्ले झाल्यानंतर शनिवारी (10 मे) दोन्ही देशांनी शस्त्रंसधीला मंजुरी दिली. या हल्ल्यांत किमान 60 लोकांचा मृत्यू झाला. सीमेवर राहणाऱ्या लोकांना आपली घरं सोडावी लागली."
"शस्त्रसंधीची घोषणा ट्रम्प यांनी केली ही गोष्ट चकीत करणारी होती."

फोटो स्रोत, Getty Images
खलीज टाइम्स लिहितं, "दुबईत राहणाऱ्या सिद्धार्थ गुप्ता यांच्यामते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीमुळे त्यांच्यावरचा मोठा ताण दूर झाला. आता यापुढे तणाव वाढण्याचा धोका कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे."
"पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये राहणारे मंजूर खान यांनी आता आपल्याला व कुटुंबीयांना गोळीबाराचा आवाज ऐकावा लागणार नाही, असं म्हटलं आहे."
सौदी गॅझेट डॉट कॉम लिहितं, "सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानातील सैन्यसंघर्ष कमी करण्यासाठी राजनयिक प्रयत्नांना गती दिली."
"परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसहाक डार यांच्याशी स्वतंत्रपणे फोनवर चर्चा केली."
बांगलादेश आणि नेपाळच्या माध्यमांनी काय लिहिलं?
बांगलादेशातील इंग्रजी वर्तमानपत्र द डेली स्टार लिहितं, "गेल्या तीन दशकातील दोन दक्षिण आशियाई देशांतली ही सर्वात भीषण लढाई होती. यामुळे व्यापक युद्धाची सुरुवात होण्याचा धोका होता."
"या लढाईत अण्वस्त्रं वापरण्याचा धोकाही तयार झाला होता. कारण आपल्या अण्वस्त्र संबंधी उच्चस्तरीय मंडळाची बैठक घेण्याचं पाकिस्ताननं जाहीर केलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
द डेली स्टार वर्तमानपत्रानं लिहिलं, "भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी शस्त्रसंधीच्या सहमतीवर आल्याबद्दल मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनुस यांनी त्यांची प्रशंसा केली. तसेच अमेरिकेने मध्यस्थी केल्याबद्दल त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले."
नेपाळमधील काठमांडू पोस्ट लिहितं, "दक्षिण आशिया केंद्रातील अटलांटिक कौन्सिलच्या संशोधक शुजा नवाज म्हणतात, आता येत्या दिवसात सिंधू जलकरारावर प्रामुख्याने चर्चा होईल. यातून जे प्राप्त झालं त्याचं दोन्ही देशांंच्या सरकारांना श्रेय घेण्याची संधी मिळेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











