न्यूयॉर्कमधील 'इंडिया डे' परेडमधील राम मंदिराच्या देखाव्याला विरोध का होतोय?

फोटो स्रोत, Getty Images
न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडला 40 वर्षांपेक्षा जुना इतिहास आहे. मात्र, ही वार्षिक परेड यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात दरवर्षी इंडिया डे परेडचं आयोजन केलं जातं. भारताच्या स्वातंत्र्य दिनानंतरची ही परेड प्रसिद्धही आहे. अनेक सेलिब्रिटी यात उत्साहानं सहभागी होत असतात.
यावर्षीही न्यूयॉर्कमध्ये ‘इंडिया परेड’चं आयोजन करण्यात आलंय.
या वर्षीच्या परेडमध्ये अयोध्येच्या राम मंदिराचा देखावा तयार करण्यात आला आहे. पण या देखाव्याला अनेक संघटनांकडून विरोध करण्यात आलाय.
‘मुस्लीमविरोधी’ असल्याचा आरोप
एनबीसी न्यूजच्या एका वृत्तानुसार, दक्षिण आशियातील विविध अमेरिकन संघटना आणि खासदार न्यूयॉर्क शहरातील रविवारच्या इंडिया डे परेडमध्ये प्रदर्शित करण्यात येणाऱ्या देखाव्यावर टीका करत आहेत. ते स्पष्टपणे मुस्लीमविरोधी असल्याचे म्हणत आहेत.
या परेडच्या प्रसिद्धीसाठी जारी करण्यात आलेल्या एका व्हीडिओत अयोध्येच्या राम मंदिराचे मोठे मॉडेल दाखवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
त्यावर न्यूयॉर्कने दक्षिण आशियातील सर्व समुदायांचा विचार करायला हवा, असं खासदारांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, “हिंदू आणि मुस्लिमांचे निवडून आलेले प्रतिनिधी या नात्याने आम्ही या महान शहराच्या रस्त्यांवर भारतीय संस्कृती आणि वारश्यांच्या उत्सवाचं स्वागत करतो. परंतु, अशा सार्वजनिक सोहळ्यांत भेदभाव किंवा कट्टरतेच्या प्रतिकांचा समावेश असता कामा नये.”

फोटो स्रोत, Getty Images
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेतील संस्थांनी न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स आणि गव्हर्नर कॅथी होचूल यांना पत्र पाठवून हा ‘देखावा’ मुस्लिमविरोधी असल्याची तक्रार केली. हा देखावा म्हणजे ‘मशीद’ पाडण्याच्या कृत्याचं गुणगाण करण्यासारखा आहे, असं त्या तक्रारीत म्हटलं.
यात काऊन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशंस, इंडियन अमेरिकन मुस्लिम काऊन्सिल आणि हिंदू फॉर ह्युमन राईट्स यांचा समावेश आहे.


आयोजक काय म्हणतात?
अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशिदीच्या जागेवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राम मंदिर उभारण्यात आलं.
अयोध्येतील बाबरी मशीद 1992 साली पाडण्यात आली होती. त्याबाबत काही हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप होता. काही भाजप नेत्यांचाही त्यात सहभाग होता.
या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात अनेक वर्ष खटला चालला. अखेर कोर्टानं राम मंदिराच्या बाजूनं निकाल दिला.
अयोध्येतील नवीन राम मंदिराचं उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्रजी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समधील एका बातमीनुसार, 'धार्मिक कट्टरवाद्यांनी मशीद पाडली आणि त्याच जागेवर हे (राम मंदिर) मंदिर उभारण्यात आलं.'
'मशीद पाडल्याच्या घटनेनंतर भारतात मोठ्या प्रमाणात धार्मिक हिंसाचार उफाळून आला. यात हजारो लोक मारले गेले. मृतांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त होती,' अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्सने दिली होती.
'परेडचे आयोजक राम मंदिराच्या मॉडेलचा समावेश करण्याच्या त्यांच्या निर्णयाची पाठराखण करत आहेत, तर अनेक गट याला मुस्लीमविरोधी द्वेषाचे प्रतिक म्हणत आहेत,' असं वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
न्यूयॉर्कमधील 'इंडिया डे' परेडचं आयोजन फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनद्वारे करण्यात आलं आहे. या बोर्डाचे अध्यक्ष अंकुर वैद्य यांनी सांगितलं की, देखाव्यादरम्यान मंदिराच्या मॉडेलला मॅडिसन अॅव्हेन्यूपर्यंत घेऊन जाणार आहेत.
महापौरांना तक्रारीचे पत्र
देखाव्याचे आयोजन करणाऱ्यांपैकी एक असलेल्या ‘विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका’ने म्हटलंय की, ते एक पवित्र स्थळ म्हणून अयोध्येच्या राम मंदिराशी संबंधित हा उत्सव साजरा करत आहेत. हे स्थळ हजारो वर्षांपासून हिंदूंच्या श्रद्धेचं ठिकाण राहिलं आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, विहिंप अमेरिकेचे अध्यक्ष अजय शाह हे भारतातील विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत.
देखाव्यावर केलेल्या टीकेवर अजय शाह यांनी टीकाकारांवर ‘हिंदूंप्रति द्वेष’असल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, “त्यांच काम म्हणजे, मुख्य प्रवाहातील हिंदू आणि त्यांच्या भावनेला नेहमीच बदनाम करणं हेच आहे. त्यांना कोणत्याही एका मंदिराची नव्हे तर सगळ्याच मंदिरांची अडचण आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
हिंदू धर्म आणि त्याचं पालन करणाऱ्यांनी अमेरिकेतील रहिवाशांचं जीवनही समृद्ध केलं आहे. त्यामुळे त्यांची बदनामी करणारी ही मागणी फेटाळून लावावी, असंही शाह म्हणाले.
तर, ‘इंडियन अमेरिकन मुस्लीम काऊन्सिल’ (आयएएमसी)ने स्थानिक महापौर एरिक ॲडम्स आणि गव्हर्नर कॅथी होचूल यांना परेडमधील देखाव्याला विरोध दर्शविणारं एक पत्र लिहिलं आहे.
बुधवारी (14 ऑगस्ट) एका पत्रपरिषदेत आयएएमसीने या देखाव्याला अमेरिकन मूल्यांचा अपमान करणारा असल्याचं म्हटलं होतं.
अजय शहा यांनी देखाव्यावर टीका करणारे हे ‘हिंदूंबद्दल द्वेष’ बाळगणारे असल्याचा आरोपही केला आहे.
"मुख्य प्रवाहातील हिंदू आणि त्यांच्या श्रद्धेला बदनाम करणे हे त्यांचं नेहमीचं काम आहे. त्यांना सगळ्याच मंदिरांची अडचण होते," असंही ते म्हणाले.

या बातम्याही वाचा :
- ट्रम्प-बायडन डिबेट: अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होते?
- 'त्या कृष्णवर्णीय आहेत की भारतीय?' कमला हॅरिस यांच्या वांशिकतेवर ट्रम्प यांंचं प्रश्नचिन्ह
- कमला हॅरिस : कृष्णवर्णीयांचा आवाज बुलंद करणाऱ्या वकील ते डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार
- कमला हॅरिस 85 मिनिटांसाठी अमेरिकेच्या 'राष्ट्राध्यक्ष' का झाल्या?

दरम्यान, दलित सॉलिडॅरिटी फोरमचे सदस्य एकलान सिंह यांनी मॅनहॅटन परेडमधील राम मंदिराच्या देखाव्याचा उत्साह साजरा करण्याचा विचार “स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'ची थट्टा करण्यासारखा असल्याचं म्हटलंय.
मुस्लिमांकडून कट्टरतेचं प्रतिक म्हणून विरोध होत असलेल्या गोष्टीला मॅनहॅटनच्या मॅडिसन एव्हेन्यूवरील मिरवणुकीत समाविष्ट करण्यावरून विवादाला तोंड फुटल्याचंही वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
याआधीही विविध कारणांवरून वाद
पत्रकार परिषदेत ॲडम्स म्हणाले की, "शहर सर्वांसाठी खुलं आहे आणि इथं द्वेषाला जागा नाही. द्वेषाला प्रोत्साहन देणारी व्यक्ती किंवा देखावा परेडमध्ये असेल तर त्यांनी तसं करू नये."
तर दरवर्षी एक लाखाहून अधिक भारतीय अमेरिकन या कार्यक्रमासाठी येतात. तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्पोर्ट्स स्टार यात सहभागी होतात, असं आयोजकांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांच्या कार्यालयाकडून एका ई-मेलला उत्तर देताना ते या परेडमध्ये उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, यापूर्वीच्या अनेक परेडमध्ये महापौरांची उपस्थिती राहिलेली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, हिंदू राष्ट्रवादाच्या राजकारणामुळं न्यूयॉर्क परिसरात वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
एडिसन येथील 2022 मधील इंडिया डे परेडमध्ये बांधकाम उपकरणांचा समावेश केल्यानेही खळबळ उडाली होती. त्यावेळी न्यू जर्सीच्या दोन्ही सिनेटर्सनीही त्याचा निषेध केला होता.
नरेंद्र मोदी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले, त्यावेळी त्यांनी मॅनहॅटनच्या मॅडिसन सक्वेअरमध्ये एक सभा घेतली होती. त्यावेळीही आंदोलकांचा एक गट तिथं पोहोचला होता.
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, 2023 मध्ये मोदींनी संयुक्त राष्ट्रांत योग सत्र आयोजित केलं होतं, त्यावेळीही महापौर अॅडम्स सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमातही आंदोलकांचा काही जणांशी वाद झाला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन











