ब्रिटिश रॉयल नेव्हीचं अत्यंत आधुनिक विमान भारतात कसं अडकलं? ब्रिटनची प्रतिमा का लागली पणाला?

एफ-35बी हे लढाऊ विमान 14 जूनला केरळमधील तिरुवनंतपूरम विमानतळावर उतरल्यापासून तिथेच उभं आहे.
फोटो कॅप्शन, एफ-35बी हे लढाऊ विमान 14 जूनला केरळमधील तिरुवनंतपूरम विमानतळावर उतरल्यापासून तिथेच उभं आहे.
    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

भारतातल्या एका विमानतळावर गेल्या तीन आठवड्यांपासून अडकलेलं अत्याधुनिक ब्रिटिश लढाऊ विमान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

इतकं आधुनिक विमान परदेशात इतक्या दिवसांसाठी कसं अडकून पडलंय, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एफ-35बी हे विमान 14 जूनला केरळ राज्यातील तिरुवनंतपूरम विमानतळावर उतरलं आहे.

हिंद महासागरवरून उड्डाण करत असताना खराब हवामानामुळे हे विमान तिथे वळवण्यात आलं. ते रॉयल नेव्हीची प्रमुख युद्धनौका एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सवर परत जाऊ शकलं नाही.

हवामान खराब की तांत्रिक बिघाड

हे विमान सुरक्षितपणे उतरलं, पण त्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ते युद्धनौकेवर परत जाऊ शकलेलं नाही.

जेट विमान उतरल्यापासून एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सच्या अभियंत्यांनी त्याची पाहणी केली आहे, पण आतापर्यंत तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या अभियंत्यांच्या टीम्सना ते दुरुस्त करता आलेलं नाही.

गुरुवारी (3 जुलैला) ब्रिटिश उच्चायुक्तांनी 'बीबीसी'ला दिलेल्या निवेदनात सांगितलं, "विमानतळावरील देखभाल, दुरुस्ती आणि तपासणी केंद्रात (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल फॅसिलिटी) विमान हलवण्याचा प्रस्ताव यूकेने स्वीकारला आहे."

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

यूकेमधून विशेष उपकरणांसह अभियंत्यांची टीम आली की, विमान हँगरमध्ये हलवण्यात येईल, ज्यामुळे इतर विमानांच्या नियोजित देखभालीमध्ये फारसा अडथळा येणार नाही."

"दुरुस्ती आणि सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर हे विमान पुन्हा सेवेत दाखल होईल," असं त्यांनी पुढे सांगितलं. "सुरक्षा आणि दक्षतेचे सर्व नियम पाळले जातील यासाठी ग्राउंड टीम्स भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत."

यूकेमधून तांत्रिक तज्ज्ञ शनिवारी (5 जुलैला) येणं अपेक्षित आहे, असं तिरुवनंतपूरम विमानतळावरील अधिकाऱ्यांनी 'बीबीसी'ला सांगितलं.

110 मिलियन डॉलर (सुमारे 918 कोटी रुपये) किमतीच्या या जेटचे आरएएफचे (रॉयल एअर फोर्स) 6 अधिकारी 24 तास संरक्षण करत आहेत.

ब्रिटनच्या विरोधी पक्षांकडून प्रश्नांचा भडीमार

मुंबईतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. समीर पाटील यांनी 'बीबीसी'ला सांगितलं, "रॉयल नेव्हीकडे फक्त दोनच पर्याय आहेत. ते विमान दुरुस्त करून पुन्हा उड्डाण करण्यायोग्य बनवणे किंवा सी-17 ग्लोबमास्टरसारख्या मोठ्या मालवाहू विमानातून ते घेऊन जाणे."

भारतात अडकलेल्या या जेटचा मुद्दा ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्येही उपस्थित करण्यात आला आहे.

कंझर्व्हेटिव्ह खासदार बेन ओबेस-जेक्टी

फोटो स्रोत, Facebook/Ben Obese-Jecty

फोटो कॅप्शन, कंझर्व्हेटिव्ह खासदार बेन ओबेस-जेक्टी

सोमवारी (30 जून) विरोधी पक्षातील कंझर्व्हेटिव्ह खासदार बेन ओबेस-जेक्टी यांनी सरकारला या जेटचं संरक्षण आणि ते पुन्हा सेवेत कसं आणलं जाणार आहे, याबाबत स्पष्टता द्यावी, अशी विचारणा केल्याचे यूके डिफेन्स जर्नलने म्हटलं आहे.

"हे विमान परत मिळवण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलत आहे, त्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे आणि हे जेट हँगरमध्ये व लोकांच्या नजरेपासून दूर असताना त्यावर असलेल्या संवेदनशील तंत्रज्ञानाचं संरक्षण सरकार कसं करणार आहे?" अशा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला आहे.

ब्रिटनचे सशस्त्र सेना मंत्री ल्यूक पोलार्ड यांनी हे विमान ब्रिटनच्या पूर्ण नियंत्रणाखाली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'बहुतेक जेट विमानाला केरळ आवडलंय'

"जेव्हा एफ-35बी हे विमान युद्धनौकेवर परत जाऊ शकलं नाही, तेव्हा आमच्या भारतीय मित्रांनी दिलेली उत्कृष्ट मदत खूपच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सतत समन्वय ठेवून काम करत आहोत," असं त्यांनी सांगितलं.

"या जेटची सुरक्षा चांगल्या हातात आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. कारण रॉयल एअर फोर्सचे कर्मचारी त्याच्यासोबत सतत उपस्थित आहेत."

 "इतर पर्यटकांप्रमाणेच हे जेटही केरळ सोडायला तयार नाही," असं केरळ पर्यटन विभागाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Kerala Tourism

फोटो कॅप्शन, "इतर पर्यटकांप्रमाणेच हे जेटही केरळ सोडायला तयार नाही," असं केरळ पर्यटन विभागाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एफ-35बी ही अत्याधुनिक स्टेल्थ जेट विमानं आहेत. ते लॉकहीड मार्टिन कंपनीने बनवलेली आहेत. कमी अंतरावरून उड्डाण घेणं आणि सरळ खाली उतरू शकणं ही त्यांची खासियत मानली जाते.

केरळच्या मान्सूनच्या पावसात भिजत रनवेवर एकटं उभं असलेलं "लोन्ली एफ-35बी" विमान, अशा फोटोंमुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.

एका व्हायरल पोस्टमध्ये विनोदी स्वरूपात असं म्हटलं आहे की, हे जेट एका ऑनलाइन साईटवर अवघ्या 4 मिलियन डॉलरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे.

त्या जाहिरातीत सांगण्यात आलं होतं की, या जेटमध्ये 'ऑटोमॅटिक पार्किंग, नवीन टायर्स, नवीन बॅटरी आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना संपवण्यासाठी ऑटोमॅटिक गन' अशा खास सुविधा आहेत.

'एक्स' वरील एका युजरने विनोदानं म्हटलं की, हे जेट इतक्या दिवसांपासून भारतात आहे. त्यामुळे आता त्याला भारतीय नागरिकत्व द्यायला हवं. तर दुसऱ्यानं सुचवलं की भारताने आता भाडं आकारायला सुरुवात करावी आणि त्यासाठी कोहिनूर हिरा हाच योग्य मोबदला ठरेल.

बुधवारी (2 जुलै) केरळ सरकारच्या पर्यटन विभागानेही या मजेशीर मीम्सच्या स्पर्धेत उडी घेतली आणि एक्सवर एक पोस्ट करत लिहिलं – "केरळ, एक अशी जागा, जी तुम्हाला कधीच सोडायची इच्छा होणार नाही."

त्या पोस्टमध्ये एक एआयने तयार केलेला फोटो होता. त्यात एफ-35बी हे विमान रनवेवर उभं असून पार्श्वभूमीला नारळाची झाडं दिसत आहेत.

मजकुरात असं सूचित केलं होतं की, नैसर्गिक सौंदर्यामुळे 'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये आलेल्या पर्यटकांप्रमाणेच, या विमानालाही तिथून जाणं कठीण होत आहे.

ब्रिटन आणि रॉयल नेव्हीची प्रतिमा होईल खराब

डॉ. पाटील म्हणतात की, जेट जितकं जास्त दिवस तिथे अडकलेलं राहील, तितकं ते एफ-35बी आणि रॉयल नेव्हीची प्रतिमा खराब करत आहे.

"विनोदी पोस्ट, मीम्स, अफवा आणि कटकारस्थानी थिअरीज ब्रिटनच्या रॉयल नेव्हीची प्रतिमा आणि विश्वासार्हता खराब करत आहेत. जेट जितकं जास्त दिवस इथं राहील, तितकीच खोटी माहिती पसरत जाईल."

"यामागे इंजिनिअरिंगचं कारण असेल, असं सुरुवातीला वाटलं. मात्र, हे त्यापेक्षा खूपच गंभीर स्वरूपाचं असल्याचं दिसत आहे," असं ते म्हणतात.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

पण बहुतांश लष्करं नेहमीच 'सगळ्यात वाईट परिस्थितीची' तयारी करून ठेवतात आणि हेही तसंच एक प्रकरण आहे. कारण एक लढाऊ विमान परदेशात अडकलेलं आहे, असं ते पुढे म्हणतात.

"बहुतांश लष्करांकडे अशा प्रकारची घटना घडल्यावर काय करायचं किंवा कसा प्रतिसाद द्यायचा यासाठी एक ठरलेली कार्यपद्धती (एसओपी) असते. मग रॉयल नेव्हीकडे अशी एसओपी नाही का?"

बाहेरून पाहता ही परिस्थिती रॉयल नेव्हीसाठी फारशी चांगली दिसत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

"अशी घटना शत्रूच्या भूमीत घडली असती, तर त्यांनी इतका वेळ घेतला असता का? एका व्यावसायिक नौदलाच्या प्रतिमेसाठी ही गोष्ट अतिशय वाईट ठरते."

(तिरुवनंतपूरमहून अश्रफ पदान्ना यांचं अतिरिक्त वार्तांकन)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)