घराच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या 'स्प्रे'मुळे दमा होतो? ही साधनं सुरक्षित आहेत का? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेसिका ब्रॅडले
कोरोनाच्या साथीनंतर साफसफाईसाठीच्या उत्पादनांच्या आपल्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र घराच्या साफसफाईसाठी आपण वापर असलेल्या काही उत्पादनांचे आरोग्याच्या दृष्टीनं काही धोकेदेखील असतात.
साफसफाईसाठी मानव रसायनांचा वापर जवळपास 5,000 वर्षांपासून करतो आहे. प्राचीन रोमन साफसफाईसाठी "युरिन स्क्रबर"चा वापर व्यावसायिक उत्पादन म्हणून करायचे. युरिन स्क्रबर म्हणजे सफाईसाठी लघवीचा वापर करणं.
लघवीचा वापर कपडे स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतं, असं लक्षात आल्यानंतर त्याचा वापर केला जाऊ लागला होता. सुदैवानं साफसफाई किंवा स्वच्छतेच्या बाबतीत आपण बरीच मजल मारली आहे.
अगदी अलीकडेच, कोरोनाच्या संकटानं जगभरातच साफसफाई, स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आणला. त्याचं महत्त्व खूपच वाढलं. आपल्या दररोजच्या साफसफाईच्या सवयी त्यानंतर बदलल्या आहेत. आता अनेकजण घरातील संभाव्य सूक्ष्मजीव किंवा जंतू यांच्या त्रासाबद्दल अधिक जागरुक झाले आहेत.

फोटो स्रोत, Serenity Strull /BBC
एका फिनिश अभ्यासानुसार, कोरोनाच्या काळात साफसफाईच्या उत्पादनांच्या वापरात लक्षणीय वाढ झाली. वैज्ञानिकांना असं दिसलं की कोरोनाच्या संकट काळात लोक 70 टक्के अधिक वेळा साफसफाई करत होते. तर साफसफाईच्या उत्पादनांच्या वापराचं प्रमाण 75 टक्क्यांनी वाढलं होतं.


साफसफाईसाठी घरात वापरली जाणारी उत्पादनं, आपल्या शौचालयातील, स्वयंपाकघरातील आणि घराच्या आसपसाच्या इतर ठिकाणचे बहुतांश जिवाणू नष्ट करण्याचं आश्वासन देतात. यात अँटीबॅक्टेरियल स्प्रेचादेखील समावेश आहे.
मात्र या उत्पादनांमुळे विविध हानिकारक हवा दूषित करणारे रासायनिक घटक आणि हवेतील सूक्ष्म कण यांच्याशी आपला संपर्क वाढू शकतो.
घरांची नियमितपणे साफसफाई करण्यातील धोके कोणते आणि आपण वापरत असलेल्या उत्पादनांबद्दल आपल्याला चिंता वाटली पाहिजे?
साफसफाई करताना आरोग्यासंदर्भातील धोके
साफसफाईसाठीच्या उत्पादनांचा वापर हा दम्याच्या "सुधारित जोखीम घटकांपैकी" एक आहे, असं एमिली पचेको दा सिल्व्हा म्हणतात. त्या इन्सर्म येथील फ्रेंच नॅशनल इस्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि मेडिकल रिसर्चमध्ये पीएचडीनंतरच्या (पोस्ट डॉक्टरल) संशोधक आहेत.
त्या जंतुनाशकं आणि साफसफाईच्या उत्पादनांमुळे दम्यावर होणाऱ्या परिणामांसंदर्भातील तज्ज्ञ आहेत.
याचा अर्थ, दमा होण्याचा धोका कमी करण्यासाठी आणि त्याची लक्षणं कमी करण्यासाठी, या उत्पादनांचा प्रभाव बदलता येतो.

फोटो स्रोत, Getty Images
घरात वापरल्या जाणाऱ्या साफसफाईच्या उत्पादनांचे आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी 2024 मध्ये वैज्ञानिकांनी 77 अभ्यासांचं विश्लेषण केलं. त्यातून वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की या उत्पादनांचा शरीरातील श्वसन संस्थेवर हानिकारक परिणाम होऊ शकतो.
विशेषकरून, द्रव रुपातील आणि कपड्यानं सफाई केल्या जाणाऱ्या उत्पादनांपेक्षा स्प्रेच्या स्वरुपात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा श्वसन संस्थेवर अधिक हानिकारक परिणाम होतो.
वैज्ञानिकांना आढळलं की साफसफाईसाठी नियमितपणे स्प्रे चा वापर केल्यास दमा होण्याचा, आधीच असलेला दमा वाढण्याचा, प्रौढांमधील नियंत्रणात नसलेला दमा वाढण्याचा आणि मुलांमध्ये श्वास घेताना आवाज येण्याचा धोका अधिक वाढतो.
विशेषकरून आठवड्यातून चार ते सात वेळा स्प्रे चा वापर केल्यामुळे तरुणांमध्ये दमा होण्याचा धोका वाढतो. स्प्रेच्या वाढत्या वापरानं दम्याची लक्षणं अधिक गंभीर होतात, याचे काही पुरावे आहेत.

संशोधक म्हणतात की साफसफाई करण्याच्या इतर कोणत्याही उत्पादनांपेक्षा स्प्रे अधिक वाईट किंवा धोकादायक असतात कारण त्यातील रसायनांचे कण हवेत जातात आणि त्यामुळे श्वसनावाटे ते आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात जाणं सोपं होतं.
काही अभ्यासांमध्ये संशोधकांना असंही आढळलं की गर्भधारणेच्या काळात साफसफाईच्या उत्पादनांच्या संपर्कात येणं आणि बालपणातच श्वास घेताना आवाज होणं किंवा घरघर होणं यांच्यात एक संबंध असतो.
संशोधकांचं म्हणणं आहे की प्रौढांपेक्षा वेगानं श्वास घेणाऱ्या मुलांच्या बाबतीत या उत्पादनांचा धोका अधिक मोठ्या स्वरुपात असू शकतो.
यामागचं एक कारण म्हणजे, साफसफाईच्या उत्पादनांच्या वापरामुळे अस्थिर स्वरुपाची सेंद्रिय संयुगं म्हणजे व्होलाटाईल ऑरगॅनिक कंम्पाउंड्स (व्हीओसी) तयार होतात. त्यामुळे कान, नाक आणि घशात जळजळ होऊ शकते.
"साफसफाईची उत्पादनं काहीजणांसाठी धोकादायक असतात याचे पुरेसे पुरावे आहेत. विशेषकरून जर या लोकांनी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यावर हा धोका असतो. कोणत्या विशिष्ट रसायनांमुळे हे नुकसान होतं, हे सांगता येणं कठीण आहे," असं निकोला कार्सलॉ म्हणतात. त्या युकेतील योर्क विद्यापीठात इनडोअर एअर केमिस्ट्रीच्या प्राध्यापक आहेत.
अर्थात क्लोरिन, अमोनिया, हायड्रोक्लोरिक अॅसिड, क्लोरामाईन आणि सोडियम हायड्रॉक्साईडसारख्या काही विशिष्ट रसायनांमुळे हा धोका असतो, असं सूचित करणारे काही पुरावे आहेत.
कारण ही रसायनं क्षयकारी किंवा झीज होणारी आणि शरीरात वेदना किंवा जळजळ निर्माण करणारे असतात. श्वासाबरोबर ती आत गेल्यावर ऊतींचं नुकसान करू शकतात.
नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक उत्पादनांचं काय?
अलीकडच्या वर्षांमध्ये, साफसफाईसाठीच्या 'नैसर्गिक' उत्पादनांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यात कोणतीही कृत्रिम रसायनं नसतात आणि ती पर्यावरणासाठी चांगली असल्याचा दावा करतात.
संशोधकांनी 2024 च्या त्यांच्या पुनरावलोकनातून असा निष्कर्ष काढला की ज्या "पर्यावरणपूरक उत्पादनामध्ये" फक्त जैविकदृष्ट्या विघटन होणारे घटक असतात, ते पारंपारिक उत्पादनांपेक्षा कमी धोकादायक असतात. अर्थात संशोधकांचं म्हणणं आहे की या उत्पादनांचा श्वसन संस्थेवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी पुढील संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
पाचेको दा सिल्व्हा यांच्या जेव्हा लक्षात आलं की "पर्यावरणपूरक" आणि घरगुती तयार केलेल्या उत्पादनांचा श्वसन संस्थेवर होणारे परिणाम पाहणारा कोणताही अभ्यास नाही, तेव्हा त्यांनी 40,000 हून अधिक लोकांच्या माहितीचं विश्लेषण केलं आणि त्यांना गेल्या 12 महिन्यामधील त्यांच्या श्वसनाशी संबंधित आरोग्याबद्दल आणि साफसफाईच्या उत्पादनांच्या वापराबद्दल विचारलं.
कापड किंवा वाईप्सचा वापर करून दर आठवड्याला एकदा वापर जंतुनाशकाचा वापर करून सफाई केल्यावर त्याचा दम्यावर हानिकारक परिणाम होईल. तर पर्यावरणपूरक आणि घरगुती तयार केलेले स्प्रे आणि वाइप्स कमी हानिकारक असतील, असं या डेटामधून दिसून येईल, अशी त्यांची अपेक्षा होती.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला त्यांना दिसलं की तिन्ही श्रेणीतील उत्पादनांचा आठवड्यातून एकदा वापर केल्यास त्याचा दम्याशी संबंध आहे.
मात्र, जेव्हा पाचेको दा सिल्व्हा यांनी जेव्हा प्रत्येक श्रेणीतील उत्पादनांच्या आठवड्याच्या वापराचा अभ्यास केला आणि लोकांच्या स्प्रे किंवा त्रासदायक रसायनांचा दर आठवड्याला होणारा वापर देखील लक्षात घेतला, तेव्हा पर्यावरणपूरक उत्पादनांचा आणि घरगुती तयार केलेल्या उत्पादनांचा दम्याशी संबंध दिसून आला नाही.
तर वाईप्स म्हणजे कापड किंवा वाईप्सचा वापर करून केलेल्या साफसफाईचा दम्याशी लक्षणीय संबंध असल्याचं दिसून आलं.
अभ्यासातून असं दिसून येतं की "पर्यावरणपूरक आणि घरगुती उत्पादनांचा वापर दम्यासाठी कमी हानिकारक ठरू शकतो. मात्र वाइप्सचा वापर हानिकारक ठरू शकतो," असं पाचेको दा सिल्व्हा म्हणतात.
मात्र त्या म्हणतात की, साफसफाईसाठीच्या "पर्यावरणपूरक" उत्पादनांची कोणतीही मानक (स्टँडर्ड) व्याख्या नाही, ज्याचा अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षावर परिणाम होऊ शकतो.
खरंतर, पर्यावरणपूरक ही संकल्पना सामान्यत: मार्केटिंगसाठी वापरली जाते (इसाबेल गेरेटेसेन यांचा 'पर्यावरणपूरक'चा अर्थ नेहमीच तुम्हाला वाटतो तसा नसतो हा लेख वाचा).
यासंदर्भात कार्सलॉ पुढे म्हणतात की "पर्यावरणपूरक" स्प्रे आपल्यासाठी नक्कीच चांगले नसतात, कारण आपल्या शरीराला नैसर्गिक आणि कृत्रिम घटकांमधील फरक माहित नसतो.
"साफसफाईसाठीच्या इतर कोणत्याही प्रकारच्या उत्पादनापेक्षा स्प्रे खूपच वाईट असतात. कारण त्यामुळे रसायनांचे कण हवेत जातात."
साफसफाईच्या उत्पादनांमधील घटक आणि त्यांचे परिणाम
एका अभ्यासात, कार्सलॉ यांनी नैसर्गिक घटक असलेल्या उत्पादनांचा वापर केल्यावर होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास केला. त्यांना आढळलं की नियमितपणे वापरले जाणाऱ्या इतर उत्पादनांमध्ये जितकी सुगंधी रसायनं असतात, तितकीच सुगंधी रसायनं त्यामध्येदेखील असतात.
"उदाहरणार्थ, लिंबाचा सुगंध येणाऱ्या उत्पादनाच्या बाबतीत तो सुगंध लिंबाचा आहे की कारखान्यात तयार केलेला आहे, यामुळे कोणताही फरक नाही. जे तेव्हा ते हवेत सोडलं जातं तेव्हा ते समान संयुग असतं," असं त्या म्हणतात.
लिंबामध्ये लिमोनिन नावाचं संयुग असतं. जेव्हा ते रासायनिक अभिक्रियांना सामोरं जातं तेव्हा त्यातून फॉर्मल्डीहाईड हे रासायनिक संयुग तयार होऊ शकतो. फॉर्मल्डीहाईडमुळे कर्करोग होऊ शकतो हे ज्ञात आहे.
साफसफाईची घरगुती उत्पादनं म्हणजे घरी तयार केलेली उत्पादनं आरोग्यदायी असतात, असं वाटून काहीजण त्यांचा वापर करतात. त्यामध्ये पाणी, सिट्रिक अॅसिड, मीठ, खायचा किंवा बेकिंग सोडा यासारखे घटक असल्याची एक सामान्य कल्पना असते.
मात्र ही उत्पादनं तयार करण्याची निश्चित अशी कोणतीही प्रक्रिया नाही. या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे सक्रिय घटक सुरक्षितपणे कसे वापरावेत याबद्दल माहितीचा अभाव आहे, असं वैज्ञानिक म्हणतात.
साफसफाईच्या अँटीबॅक्टेरिल उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक प्रतिकार वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याची देखील चिंता वैज्ञानिकांमध्ये आहे.
प्रतिजैविक प्रतिकार म्हणजे ज्या प्रक्रियेद्वारे जिवाणू प्रतिजैविकं किंवा अँटीबायोटिक्स विरोधात बचाव विकसित करतात. यामुळे काही संसर्गामध्ये प्रतिजैविकांचा म्हणजे अँटीबायोटिक्सचा प्रभाव कमी होतो.

फोटो स्रोत, Getty Images
काही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की काही विशिष्ट अँटीबॅक्टेरियल उत्पादनांचा वापर केल्यामुळे विशिष्ट अँटीबायोटिक्समध्ये उलटी अभिक्रिया होऊ शकते. म्हणजेच त्या अँटीबायोटिक्सना प्रतिकार होऊ शकतो ज्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होतो, असं इलेन लार्सन म्हणतात. त्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये एपिडेमिओलॉजीच्या प्राध्यापक आहेत.
"शेवटी सूक्ष्मजीवांचा प्रतिकार करण्यासाठीची पली रोगप्रतिकार क्षमता सैद्धांतिकदृष्ट्या कमी होऊ शकते," असं इलेन लार्सन म्हणतात.
लार्सन पुढे म्हणतात, ही बाब स्वच्छतेच्या गृहितकाद्वारे स्पष्ट केली जाऊ शकते. त्यानुसार लहान मुलं जितक्या कमी वयात जिवाणू, विषाणू आणि इतर सूक्ष्मजीवांच्या संपर्कात येतात तितकी त्यांची रोगप्रतिकार क्षमता चांगली विकसित होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या सिद्धातांच्या अचूकतेबद्दल वैज्ञानिकांमध्ये काही मतभेद आढळून आले आहेत.
लार्सन यांनी त्यांची कारकीर्द अँटीबॅक्टेरियल रेझिस्टन्सचा अभ्यास करण्यासाठी समर्पित केली आहे. 2007 मध्ये त्यांनी अँटीमायक्रोबियल साबण आणि साफसफाईसाठी वापरली जाणाऱ्या घरगुती उत्पादनांच्या मानवी संपर्कात येण्याबद्दलची वाढती चिंता दूर करण्यासाठी एक अभ्यास केला.
त्यातून लार्सन यांना पाहायचं होतं की अँटीबॅक्टेरियल म्हणवल्या जाणाऱ्या उत्पादनांचा वापर केल्यानं काही आरोग्यविषयक फायदा होतो का. त्यांनी मॅनहॅटनमध्ये राहणाऱ्या 238 कुटुंबांना किचन स्प्रे आणि हार्ड सरफेस क्लीनर (एकतर अँटीबॅक्टेरियल किंवा ज्यात अँटीबॅक्टेरियल घटक नव्हते) सारखी उत्पादनं दिली.
ही सर्व उत्पादनं व्यावसायिकरित्या उपलब्ध होती, मात्र त्यावरील लेबल काढण्यात आलं होतं. लार्सन यांनी मग जवळपास एक वर्षभर दर आठवड्याला या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांचं निरीक्षण केलं.
त्यांनी या लोकांनी सांगितलेल्या श्वसन संस्थेतील विषाणूच्या कोणत्याही संसर्गाची (ताप, सर्दी, खोकला आणि नाक गळणं) नोंद घेतली.
या अभ्यासाच्या शेवटी, लार्सन यांना अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांच्या दोन्ही गटांमध्ये श्वसन संस्थेच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये कोणताही फरक आढळला नाही.
शेवटी या लोकांनी त्यांचे कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी आणि कठीण पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या उत्पादनांमध्ये अँटीबॅक्टेरियल घटक आहेत की नाही याचा कोणताही फरक पडलेला दिसून आला नाही.
सफाई करताना होणारं घर्षण महत्त्वाचं
"सर्वात महत्त्वाची बाब घर्षण आहे याचा हा उत्तम पुरावा आहे. साफसफाई करताना कापड आणि पृष्ठभागात होणारं घर्षण महत्त्वाचं ठरलं होतं. ते उत्पादन अँटीबॅक्टेरियल आहे की नाही यामुळे फारसा फरक पडला नव्हता," असं त्या म्हणाल्या.
इतर अभ्यासातून आढळलं की बिगर अँटीबॅक्ट्रेरियल साबणानं शॉवर घेतला आणि आंघोळ केल्यामुळे आपल्या सभोवतालच्या हवेत त्वचेशी निगडीत जिवाणू प्रमाणात पसरतात ते ठरतं. लार्सन सूचवतात की हीच बाब आपण जेव्हा आपल्या घराची सफाई करतो तेव्हा घडू शकते.
"आपल्या 'कोपराचं वंगण' हे आपण निवडलेल्या उत्पादनाइतकंच प्रभावी असतं."
हात धुताना हातांची होणारी हालचाल हीच सर्वात प्रभावी असते, असा सल्ला
अमेरिकेचं अन्न आणि औषध प्रशासन (यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) देतं. साबण आणि पाण्यापेक्षा अँटीबॅक्टेरियल साबण हा अधिक प्रभावी असतो हे दाखवणारं कोणतंही निर्णायक संशोधन नाही.
मात्र, लार्सन त्यांच्या अभ्यासातून निष्कर्ष काढतात की घराच्या साफसफाईचा संसर्गाच्या प्रकारावर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजारांच्या मूळाशी जिवाणू असू शकतात. या अभ्यासात निवडण्यात आलेली उत्पादनांमध्ये अँटी-व्हायरल गुणधर्म असल्याचा दावा करण्यात आला नव्हता.
लार्सन म्हणतात की यामागचं कारण असं आहे की अँटीबॅक्टेरियरल उत्पादनं नेहमीच विषाणूंना प्रतिबंध करत नाहीत. विषाणू अनेकदा हवेत असतात आणि अनेकदा श्वसन संस्थेत होणाऱ्या संसर्गाचं ते कारण असतात.
"तापामध्ये श्वास घेण्याच्या तुलनेत आपल्या शरीराबाहेरील गोष्टींमुळे प्रदूषित होण्याची खूपच कमी शक्यता असते. त्यामुळे अँटीबॅक्टेरियल उत्पादनं संक्रमणाच्या गतीवर परिणाम करत नाहीत," असं त्या म्हणतात.
मात्र, लार्सन पुढे म्हणतात, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा सालमोनेला सारख्या जिवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गात, हानिकारक जिवाणूंची वाढ रोखून किंवा जिवाणूंना मारून अँटीबॅक्टेरियल उत्पादनं उपयोगी ठरू शकतात.
त्या त्यांच्या शोधनिबंधात लिहितात की अँटीबॅक्टेरियल उत्पादनं वापरण्याच्या कोणत्याही संभाव्य फायद्यांची तुलना अँटीबायोटिक्सच्या रेझिस्टन्सच्या सैद्धांतिक धोक्याशी करणं आवश्यक आहे.
शेफिल्ड विद्यापीठातील अभ्यासात आढळून आलं की अँटीबॅक्टेरियल घटकांशिवाय असलेले सौम्य क्लीन्सर म्हणजे सफाईसाठीची उत्पादनं कोरोनाव्हायरससह आवरण असलेल्या विषाणूंना मारू शकतात. या विषाणूंना बाह्य आवरणाचा थर असतो.
मग आपण आपल्या घरांची साफसफाई कशाप्रकारे करावी?
घराच्या साफसफाईसाठी वापरली जाणारी उत्पादनं आणि आपलं आरोग्य यातील संबंधामागचं नेमकं तंत्र वैज्ञानिकांना माहित नाही. मात्र सर्वसाधारणपणे या उत्पादनांच्या कमीत कमी संपर्कात येण्याचा सल्ला दिला जातो आणि आपल्याला खरोखरंच गरज असेल तेव्हाच त्यांचा वापर करावा, असं कार्सलॉ म्हणतात.
उदाहरणार्थ, अमेरिकन लंग असोसिएशन, परिसर हवेशीर ठेवण्याचा आणि या उत्पादनांमध्ये त्रासदायक किंवा अपायकारक घटकांचा वापर टाळण्याचा सल्ला देतं.
"साफसफाई करू नका असा सल्ला तुम्हाला कोणीही देणार नाही. कारण 50 वर्षांपूर्वी आपल्याला होणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी करण्यामध्ये त्याचा मोठा प्रभाव आहे," असं कार्सलॉ म्हणतात.
अर्थात आपण जी खोली साफ करत आहात, त्यामध्ये हवा चांगली खेळती असल्याची आपण नेहमीच खातरजमा केली पाहिजे. उदाहरणार्थ खिडकी उघडी आहे की नाही हे पाहिलं पाहिजे, असं कार्सलॉ पुढे म्हणतात.
आपल्या आरोग्याला असणारा धोका कमी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे स्प्रे ऐवजी द्रव रुपातील क्लीनर किंवा उत्पादनांचा वापर करावा, असं त्या म्हणतात.
"उत्पादनांमधील रसायनांचं एरोसोलमध्ये रुपांतर करण्यात स्प्रे प्रभावी असतात. हे एरोसोल श्वासातून आत जाणं सोपं असतं. मात्र द्रव रूपातील उत्पादनांच्या बाबतीत श्वासातून तितक्याच प्रमाणात रसायनं शरीरात जात नाहीत."
ज्या उत्पादनांमध्ये खूप जास्त प्रमाणात फ्रॅगरन्स किंवा सुगंध टाकलेला असतो अशा उत्पादनांचा कमी वापर करण्याचा सल्ला कार्सलॉ देतात. कारण साधारणपणे या उत्पादनांमध्ये असे घटक असण्याची शक्यता वाढते, जे आपल्या श्वसनमार्गासाठी अपायकारक असतील.
आपल्या घरांची अजिबातच सफाई न करता त्यांची साफसफाई करणं निश्चितच सुरक्षित गोष्ट आहे, यावर सर्वांचं एकमत आहे.
पर्यावरणपूरक किंवा नैसर्गिक उत्पादनं देखील आरोग्यासाठी काही धोके निर्माण करू शकतात असं संशोधनातून आढळून येत असल्यामुळे, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या स्वत:च्या "कोपराचं वंगण" (एल्बो ग्रीस) हे आपण साफसफाईसाठी निवडलेल्या उत्पादनांइतकंच प्रभावी आहे.
कारण आपण पृष्ठभाग पुसत असताना निर्माण होणारं घर्षण तिथले जिवाणू काढून टाकण्यास मदत करतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











