मनसेची उमेदवारांची यादी : 'अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं कर्तव्य'; दीपक केसरकरांचं वक्तव्य

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे माहीम मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं कर्तव्य आहे, असं म्हणत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

याआधी भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महायुतीने माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता वाढली होती.

माहीममध्ये शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर मुख्य दावेदार होते. त्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला होता. मात्र, आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी एक पाऊल मागे घेत या मतदारसंघावरील दावा सोडत अमित ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

दीपक केसरकर म्हणाले, "राज ठाकरेंनी एकही जागा न घेता लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं कर्तव्य आहे."

"त्या मतदारसंघात आमचे विद्यमान आमदार आहेत. आमचं त्या विद्यमान आमदारांशी बोलणं चालू आहे. त्यांचा योग्य तो मान राखला जाईल. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोडगा काढणार आहेत," असं दीपक केसरकरांनी सांगितलं.

केसरकर पुढे म्हणाले, "मी स्वतः सदा सरवणकरांना भेटून आलो आहे. त्यामुळे कुणीही काळजी करू नका. शेवट गोड होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे."

"सरवणकरांच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. त्यामुळे पुढील 5 वर्षे ते राज्यमंत्रीच राहणार आहेत. याशिवाय त्यांना विधान परिषदेचे आमदार करण्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निर्णय घेतील," असंही केसरकरांनी नमूद केलं.

मनसेच्या उमेदवारांची पाचवी यादी

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत 15 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

यापूर्वी 5 उमेदवारांची यादी, त्याआधी 13 उमेदवारांची यादी आणि तत्पूर्वी 45 उमेदवारांची जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार मनसेकडून आतापर्यंत एकूण 78 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मनसेने जाहीर केलेल्या 45 उमेदवारांच्या यादीत अमित ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे. अमित ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंच्या सदा सरवणकरांचं आव्हान असेल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र माहीममधून अद्याप उमेदवार जाहीर केला नाहीय.

यापूर्वी पंढरपुरातून दिलीप धोत्रे आणि मुंबईतील शिवडीतून बाळा नांदगावकर यांची नावं राज ठाकरेंनी जाहीर केली होती.

अमित ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंचा उमेदवार

आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील दुसरी व्यक्ती थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांच्यापुढे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सदा सरवणकर यांचे आव्हान असेल असे बोलले जात होते.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं या मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवार जाहीर केली आहे.

वरळीतून आदित्य ठाकरे 2019 साली लढले होते, त्यावेळेस मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे यावेळी माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे उमेदवार देणार की नाही अशीही चर्चा सुरू होती. मात्र, अखेर उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला.

तर वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे हे मनसेचे उमेदवार घोषित झाले आहेत.

गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 साली आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी वरळीतून उमेदवार जाहीर केला नव्हता. यावेळी मात्र यावेळी संदीप देशपांडेंच्या रूपानं उमेदवार देण्यात आलाय.

वरळीतून आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार असल्यानं आणि ठाकरे गटाकडून त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्यानं, संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

संदीप देशपांडे हे राज ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात, तसंच मुंबई महापालिकेचे ते माजी नगरसेवकही आहेत.

मनसेच्या यादीतले लक्षवेधी उमेदवार

कल्याण ग्रामीण मधून विद्यमान आमदार राजू पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राजू पाटील हे 2019 ते 2024 या कार्यकाळात मनसेचे एकमेव आमदार होते. आता ते आमदारकी राखतात की त्यांच्यासाठी निवडणूक आव्हानाची ठरते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ठाण्यातील मनसेचे आक्रमक नेते म्हणून ओळख तयार केलेल्या अविनाश जाधव यांना मनसेनं उमेदवारी दिलीय. अविनाश जाधव हे राज ठाकरेंचे ठाण्यातील महत्त्वाचे शिलेदार मानले जातात.

तसेच, बेलापूरमधून गजानन काळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. इथून भाजपच्या मंदा म्हात्रे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे विरोधातील दोन उमेदवारांशी गजानन काळेंना लढावं लागणार आहे. गजानन काळे हे मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष आहेत.

तसंच, पुण्यातील कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून साईनाथ बाबर अशी लक्षवेधी नावं या यादीत आहेत.

मनसेच्या 15 उमेदवारांची यादी

  • पनवेल - योगेश चिले
  • खामगाव - शिवशंकर लगर
  • अक्कलकोट - मल्लिनाथ पाटील
  • सोलापूर शहर मध्य - नागेश पासकंटी
  • जळगाव जामोद - अमित देशमुख
  • मेहकर - भय्यासाहेब पाटील
  • गंगाखेड - रुपेश देशमुख
  • उमरेड - शेखर टुंडे
  • फुलंब्री - बाळासाहेब पाथ्रीकर
  • परांडा - राजेंद्र गपाट
  • उस्मानाबाद (धाराशिव) - देवदत्त मोरे
  • काटोल - सागर दुधाने
  • बीड - सोमेश्वर कदम
  • श्रीवर्धन - फैझल पोपेरे
  • राधानगरी - युवराज येडुरे

मनसेकडून पाच उमेदवारांची नावे जाहीर

  • कसबा पेठ - गणेश भोकरे
  • चिखली - गणेश वरखडे
  • कोल्हापूर उत्तर - अभिजित राऊत
  • केज - रमेश गालफाडे
  • कलीना - संदीप उर्फ बाळकृष्ण हुटगी

मनसेची 13 उमेदवारांची यादी

  • अमरावती – पप्पू उर्फ मंगेश पाटील
  • नाशिक पश्चिम – दिनकर धर्माजी पाटील
  • अहमदपूर -चाकूर – डॉ. नरसिंग भिकाणे
  • परळी – अभिजित देशमुख
  • विक्रमगड – सचिन शिंगडा
  • भिवंडी ग्रामीण – वनिता कथुरे
  • पालघर – नरेश कोरडा
  • शहादा – आत्माराम प्रधान
  • वडाळा – स्नेहल जाधव
  • कुर्ला – प्रदीप वाघमारे
  • ओवळा-मजिवडा – संदीप पाचंगे
  • गोंदिया – सुरेश चौधरी
  • पुसद – अश्विन जयस्वाल

मनसेच्या यादीतील 45 उमेदवार

  • कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) रतन पाटील
  • माहिम - अमित राज ठाकरे
  • भांडुप पश्चिम - शिरीष गुणवंत सावंत
  • वरळी - संदीप सुधाकर देशपांडे
  • ठाणे शहर - अविनाश जाधव
  • मुरबाड - श्रीमती संगिता चेंदवणकर
  • कोथरुड - किशोर शिंदे
  • हडपसर - साईनाथ बाबर
  • खडकवासला - मयुरेश रमेश वांजळे
  • मागाठाणे - नयन प्रदीप कदम
  • बोरीवली - कुणाल माईणकर
  • दहिसर - राजेश येरुणकर
  • दिंडोशी - भास्कर परब
  • वर्सोवा - संदेश देसाई
  • कांदिवली पूर्व - महेश फरकासे
  • गोरेगांव - विरेंद्र जाधव
  • चारकोप - दिनेश साळवी
  • जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे
  • विक्रोळी - विश्वजित ढोलम
  • घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
  • घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे
  • चेंबूर - माऊली थोरवे
  • चांदिवली - महेंद्र भानुशाली
  • मानखुर्द-शिवाजीनगर - जगदीश खांडेकर
  • ऐरोली - निलेश बाणखेले
  • बेलापूर - गजानन काळे
  • मुंब्रा-कळवा - सुशांत सुर्यराव
  • नालासोपारा - विनोद मोरे
  • भिवंडी पश्चिम - मनोज गुळवी
  • मिरा-भाईंदर - संदीप राणे
  • शहापूर - हरिश्चंद्र खांडवी
  • गुहागर - प्रमोद गांधी
  • कर्जत-जामखेड - रवींद्र कोठारी
  • आष्टी - कैलास दरेकर
  • गेवराई - मयुरी बाळासाहेब मस्के
  • औसा - शिवकुमार नागराळे
  • जळगांव शहर - डॉ. अनुज पाटील
  • वरोरा - प्रवीण सूर
  • सोलापूर दक्षिण - महादेव कोगनुरे
  • कागल - रोहन निर्मळ
  • तासगांव-कवठे महाकाळ - वैभव कुलकर्णी
  • श्रीगोंदा - संजय शेळके
  • हिंगणा - विजयराम किनकर
  • नागपूर दक्षिण - आदित्य दुरुगकर
  • सोलापूर शहर-उत्तर - परशूराम इंगळे

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.