मासिक पाळी उशिरा येते किंवा वेळेवर येतच नाही? 'या' 8 पैकी एखादं कारण असू शकतं

फोटो स्रोत, Getty Images
मासिक पाळी हा स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. या काळात स्त्रियांच्या शरीरात विविध बदल होत असतात. मासिक पाळीचं चक्र नियमित आणि सुरळीत राहिलं, तर महिलांचं आरोग्यही चांगलं राहतं.
काही जणींना मासिक पाळी दरम्यान त्रासाला समोरे जावे लागते. अनेकदा महिलांची मासिक पाळी चुकते किंवा थांबते, तर कधीकधी महिने-दोन महिने वेळेत येऊन परत चुकते, अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत 'अॅमेनोरिया' असं म्हणतात.
अॅमेनोरियाची विविध कारणं असू शकतात. पाळी न येण्यामागचं एक कारण गर्भधारणाही असू शकतं. त्याशिवाय इतरही अनेक कारणे असू शकतात.
मासिक पाळीचं हे चक्र सामान्यत: 28 दिवसांचं असतं.
काही महिलांमध्ये हा काळ दोन-तीन दिवस मागे पुढे होऊ शकतो. एखाद्या वेळेस पाळी चुकूही शकते. काहीवेळा ही साधी करणं असतात. परंतु, वारंवार पाळी चुकत असेल किंवा अनियमित असेल तर ते गंभीर आजाराचं लक्षणदेखील असू शकतं.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमीरा अल्कोर्डिन मार्टिनेज यांनी बीबीसीसोबत या विषयावर चर्चा केली. त्या म्हणाल्या, "आपल्या शरीरात घडत असलेल्या बदलांकडे आपण काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं. प्रत्येक महिलेचं शरीर वेगळ्या प्रकारे काम करतं. कोणत्याही दोन महिला एकसारख्या नसतात. शरीराच्या बाबतीतही अगदी तसंच आहे."
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसनुसार, "जर तुमची पाळी तीन महिने किंवा त्याहून जास्त काळापासून आली नसेल आणि तुम्ही गरोदरही नसाल, तर ही गंभीर बाब असू शकते. अशावेळी तुम्ही तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा."

फोटो स्रोत, Getty Images
मुलींमध्ये किशोरावस्थेच्या सुरुवातीला मासिक पाळी सुरु होते. परंतु, 15 वर्षापर्यंत मासिक पाळी सुरु न झाल्यास मुलींनी आरोग्य तपासणी करावी, असा सल्ला अमेरिकेतील मेयो क्लिनिक देतं.
नियमित पाळी महिलांच्या आरोग्याची किल्लीच आहे. मासिक पाळीचं चक्र पुढे-मागे झालं तर त्याचाही शरीरावर परिणाम होतो. परंतु, पाळी अनियमित होण्यामागची कारणं काय असू शकतात? गरोदरपणाव्यतिरिक्त जर पाळी अनियमित (अॅमेनोरिया ) होत असेल, तर त्यामागे कोणती कारणं असू शकतात? हे विस्तृतपणे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
1. ताण-तणाव
डॉ. अमीरा सांगतात, "पाळी न येण्यामागे ताण-तणाव हे एक महत्वाचं कारण ठरू शकते. ताण एखाद्या रोगाप्रमाणे असून याचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. तणावामुळे आपल्या शरीरात एड्रेनलिनसारख्या हार्मोन्सची वेगाने वाढ होते. जे तुमच्या शरीरावर परिणाम करू शकते. यामुळे मासिक पाळी प्रभावित होऊन ती अनियमित होते किंवा पाळीदरम्यान महिलांना त्रास किंवा प्रचंड वेदना जाणवतात. तर काहीवेळेस अतिताणामुळे महिन्यातून (28 दिवसांच्या मासिक चक्रात) दोनदा पाळी येण्याचीही शक्यता असते."

फोटो स्रोत, Getty Images
अतिरिक्त ताण आणि अनियमित पाळीचा शरीरावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. यावर उपाय सांगताना एनएचएस नियमित व्यायाव करण्याच्या, श्वासोच्छवासाचे व्यायाम करण्याचा सल्ला देते.
जर हेदेखील प्रभावी ठरत नसेल तर संज्ञानात्मक वर्तणुकीय उपचार (CBT) ताणतणाव आणि चिंतेवर प्रभावी ठरु शकते.
2. अचानक वजन कमी होणे
जर शरीरातील कॅलरीजचे प्रमाण खूप कमी झाले तर शरीरात ओव्हुलेशनसाठी (अंडाशयातून अंडी सोडण्याची प्रक्रिया) आवश्यक असलेल्या हार्मोन्सचे उत्पादन थांबू शकते.
अशावेळी नोंदणीकृत न्युट्रिशनिस्टचा सल्ला घ्यावा. तसेच, वजन कमी होण्यामागे आहारसंबंधीत समस्या असतील तर त्यासाठी मानसोपचाराची मदत घ्यावी.
3. वजन वाढणे किंवा लठ्ठपणा
शरीरातील कॅलरीजचं प्रमाण खूप वाढलं असेल तर त्याचाही पाळीवर परिणाम होऊ शकतो.
वजन वाढल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात इस्ट्रोजेन बाहेर पडते. या हार्मोन्सच्या पातळीत वाढ झाल्यास मासिक पाळी अनियमित होण्याचा किंवा ती पूर्णपणे थांबण्याचा धोका असतो.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे ज्या महिलांना अॅमेनोरियाचा त्रास आहे आणि त्यांचे वजनही वाढले आहे किंवा बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त आहे, त्यांना वजन आटोक्यात आणण्यासाठी संतुलित आहारासाठी डॉक्टर अनेकदा पोषणतज्ञांचा (न्यूट्रिशनिस्ट) सल्ला घेण्यास सांगतात.
4. अतिरेकी व्यायाम
जास्त व्यायामामुळे होणारा शारीरिक ताणदेखील मासिक पाळी नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्स परिणाम करू शकतो.
शरीरातील अतिरिक्त चरबीचा ओव्हुलेशवरही परिणाम होतो. यासाठीही योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.
5. पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)
PCOS ही खरंतर संप्रेरकांवर दीर्घकाळ परिणाम करणारी स्थिती असते. याचा महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. महिलांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढण्याचं पीसीओएस हे महत्त्वाचं कारण आहे.
ओव्हरी ज्यात (ज्या ठिकाणी सिस्ट तयार होतात) अंड्यांच्या विकासासाठी मोठ्या संख्येने थैलीसारख्या रचना असतात त्यांना फॉलिकल्स म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
PCOS साधारणत: हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे होतो. अँड्रोजेन नावाचं एक मेल हॉर्मोन असतं. PCOS मध्ये अँड्रोजेनची पातळी वाढते. त्यामुळे अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडण्यात अडथळा येतो आणि मासिक पाळीही वेळेवर येत नाही.
एनएसच्या अंदाजानुसार ब्रिटनमध्ये दर दहापैकी एका महिलेल्या पीसीओएसचा त्रास आहे.
मासिक पाळी न येण्याच्या 33 टक्के प्रकरणांमध्ये हे प्रमुख कारण असल्याचं निदर्शनास आल्याचं एनएचएस सांगतं.
6. मेनोपॉज आणि प्रीमेच्योर मेनोपॉज
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) म्हणजे एका विशिष्ट वयात पोहोचल्यानंतर महिलांच्या शरीरातले प्रजनानासाठी कारणीभूत असणारे हार्मोन नैसर्गिकरित्या कमी होणं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पाळी बंद होणं.
जेव्हा महिला मेनोपॉजच्या टप्प्यातून जात असतात तेव्हा त्यांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते आणि ओव्हुलेशनची प्रक्रिया अनियमित होते.

फोटो स्रोत, Getty Images
महिलांचं मेनोपॉजचं सरासरी वय 45 ते 55 दरम्यान असतं. परंतु, दर 100 महिलांपैकी एका महिलेला वेळेआधीच म्हणजेच वयाच्या चाळीशीपूर्वीच मेनोपॉज आल्याचं विविध वैद्यकीय अभ्यासातून समोर आलं आहे.
40 वर्ष वयाआधी पाळी थांबली तर त्याला 'प्रीमेच्योर मेनोपॉज' असं म्हणतात. 40 ते 45 या वयात पाळी थांबली तर त्याला 'अर्ली मेनोपॉज' असं म्हटलं जातं.
7. गर्भनिरोधकांचा वापर
काही गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन्स, इम्प्लांट आणि गर्भाशयात घातलेली उपकरणे देखील अॅमेनोरियामागचं कारण ठरु शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करणाऱ्या महिलांना मासिक पाळी येण्यास अडथळा येतो. गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन बंद केल्यानंतरही शरीरात नियमितपणे ओव्हुलेशन सुरु होण्यास आणि मासिक पाळी येण्यास काही काळ लागू शकतो.
तोंडावाटे गर्भनिरोधक घेणे बंद केल्यानंतरही, शरीरात नियमितपणे ओव्हुलेशन सुरू होण्यास काही वेळ लागू शकतो.
8. इतर समस्या आणि औषधं
मासिक पाळी न येण्यामागे मधुमेह किंवा हायपरथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझम यांसारखे हार्मोनल आजारदेखील कारणीभूत ठरू शकतात.
मेयो क्लिनिकच्या मते, काही औषधंदेखील अमेनोरियामागचं कारण असू होऊ शकतात.
उदा. अँटीसायकोटिक्स, केमोथेरपी, अँटीडिप्रेसस आणि उच्च रक्तदाब आणि ॲलर्जीवर उपचार करण्यासाठी दिली जाणारी औषधे, यामुळे सुद्धा पाळी लवकर थांबू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











