गाझामध्ये अन्नाचं दुर्भिक्ष्य आणि दुष्काळी परिस्थिती; संयुक्त राष्ट्रांच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

    • Author, रिबेका थॉर्न आणि अँजेला हेंशॉल
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

गाझामध्ये अन्नाचं दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने दुष्काळाची परिस्थिती असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी मान्य केलंय.

संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने तयार झालेल्या अन्न सुरक्षा संस्थेच्या अहवालाच्या हवाल्याने याला दुजोरा देण्यात आला आहे.

त्यांनी म्हटलंय की, गाझा शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पहिल्यांदाच अन्नाचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे.

द इंटेग्रेटड फूड सिक्योरिटी फेज क्लासिफिकेशन (आयपीसी) असं म्हणतं की, गाझा पट्टीतील 5 लाखांहून अधिक लोक उपासमार, गरिबी आणि मृत्यूला तोंड देत आहेत.

पुढील महिन्यात देईर अल-बलाह आणि खान युनूसमध्ये आपत्तीजनक परिस्थिती उद्भवण्याचा अंदाजही वर्तवण्यात येतो आहे.

मात्र, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा रिपोर्ट फेटाळून लावला आहे. गाझामध्ये अन्नाच्या दुर्भिक्ष्यातून कसलाही दुष्काळ नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

गाझामध्ये अधिक लोक आजारी पडण्याची शक्यता, आयपीसीचा अंदाज

आयपीसीने त्यांच्या अहवालात पुढील महिन्यात गाझा पट्टीत काय घडण्याची शक्यता आहे, याचा अंदाज वर्तवला आहे.

आयपीसीनं असं नमूद केलं आहे की, यामुळे रोगांचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे.

यामध्ये, कुपोषण, गर्दीच्या राहणीमानामुळे होणारे श्वसनाचे तीव्र आजार, तसेच अतिसार, रक्तरंजित अतिसार, गोवर आणि पोलिओ यांचा समावेश असू शकतो.

दुसऱ्या बाजूला, इस्रायलने आयपीसीचा हा रिपोर्ट धुडकावून लावला आहे. विशेषत: गाझा शहरात अन्नाचं दुर्भिक्ष्य असल्याचा निष्कर्ष त्यांनी पूर्णपणे फेटाळला आहे.

हजारो लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर

गाझातील भीषण परिस्थितीमुळे हजारो लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अनेकांना दिवसेंदिवस अन्न मिळत नसल्याचं चित्र आहे. लहान मुलांपासून ते मातांपर्यंत अनेकांचे आयुष्य धोक्यात आलं आहे.

संयुक्त राष्ट्रांसह अनेक संस्थांनी गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर भुकेमुळे मृत्यू होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.

गाझापट्टीत दर तीनपैकी एका व्यक्तीला अनेक दिवस अन्न मिळत नसल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अन्न सहाय्य कार्यक्रमानं म्हटलं गेलं आहे.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'गाझामध्ये उपासमारीची स्थिती नाही' असं म्हणत हा दावा फेटाळला होता. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र 'गाझामध्ये उपासमार सुरू आहे' असं म्हटलं.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायलनं गाझामध्ये उपासमारी असल्याचं नाकारलं असलं तरी, त्या भागात मदत पोहोचावी म्हणून त्यांनी 'स्थानिक आणि तात्पुरता युद्धविराम' जाहीर केला आहे.

परंतु, संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी प्रमुख टॉम फ्लेचर यांनी गाझामधली उपासमार थांबवण्यासाठी 'खूप मोठ्या प्रमाणात' अन्नाची गरज असल्याचे म्हटलं आहे.

गाझा शहरातील दर पाचपैकी एक मूल कुपोषित आहे आणि कुपोषित मुलांची संख्या दररोज वाढत आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सीनं सांगितलं आहे.

संयुक्त राष्ट्रांनी सांगितलं आहे की, गाझामधील रुग्णालयांमध्ये अनेक लोकांना अन्नाच्या कमतरतेमुळे खूपच अशक्त अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं जात आहे आणि काही लोक तर रस्त्यावरच बेशुद्ध पडत आहेत.

संयुक्त राष्ट्रांनी अद्याप गाझामध्ये उपासमारी किंवा टंचाई जाहीर केलेली नाही, परंतु इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशननं (आयपीसी) इशारा दिला आहे की, तिथं टंचाईची परिस्थिती खूपच गंभीर आहे.

टंचाई किंवा उपासमार म्हणजे काय आणि ती कधी जाहीर होते?

इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशन (आयपीसी) ही एक जागतिक प्रणाली आहे, जी एखाद्या लोकसंख्येला चांगलं आणि पौष्टिक अन्न मिळवण्यात किती अडचण होते, हे सांगते.

सर्वात गंभीर अवस्था म्हणजे 'फेज 5: टंचाई' जी खालील गोष्टींवर आधारित असते:

  • 20 टक्के कुटुंबांना फारच कमी म्हणजेच अन्नाची तीव्र कमतरता जाणवते.
  • किमान 30 टक्के मुलं तीव्र कुपोषणानं ग्रस्त आहेत.
  • दररोज 10 हजार लोकांपैकी किमान दोन प्रौढ किंवा चार मुलं थेट उपासमारीमुळे किंवा कुपोषण आणि आजारांमुळे मरतात.

आयपीसीच्या 12 मेच्या अहवालानुसार, गाझातील सगळे लोक संकटाच्या (फेज 3) किंवा त्याहून वाईट अवस्थेत आहेत.

आयपीसीने सांगितलं आहे की, मे ते सप्टेंबर 2025 मध्ये सुमारे 469,500 लोकांना भयंकर अन्नटंचाईचा सामना करावा लागू शकतो (फेज 5).

जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते, तेव्हा संयुक्त राष्ट्र (यूएन) टंचाई किंवा उपासमारी जाहीर करते. कधी कधी देशाच्या सरकारबरोबर आणि अनेकदा आंतरराष्ट्रीय मदत संस्था किंवा मानवतावादी संघटनांकडूनही हे जाहीर केलं जातं.

उपासमारीच्या वेळी शरीराचं काय होतं?

उपासमारी म्हणजे खूप दिवस अन्न न मिळणं, ज्यामुळे शरीराला त्याच्या कामासाठी पुरेसं उर्जादायक अन्न (कॅलरी) मिळत नाही.

सहसा, शरीर अन्नातून ग्लुकोज तयार करतं. पण जेव्हा अन्न मिळत नाही, तेव्हा शरीर लिव्हर (यकृत) आणि स्नायूंमध्ये साठवलेला ग्लायकोजन तोडून रक्तात ग्लुकोज सोडतं.

जेव्हा हे साठे संपतात, तेव्हा शरीर साठवलेली चरबी आणि नंतर स्नायू वापरून ऊर्जा तयार करतं.

उपासमारीमुळे फुप्फुसे, पोट आणि प्रजननासाठी लागणारे अवयव लहान होत जातात. याचा मेंदूवरही परिणाम होतो, ज्यामुळे भ्रम (हॅल्युसिनेशन), नैराश्य आणि ताण किंवा चिंता होऊ शकते.

काही लोक उपासमारीमुळे मरण पावतात, पण खूप कुपोषित लोकांना मुख्यतः श्वसन किंवा पचन यंत्रणेमध्ये झालेल्या संसर्गांमुळे मरण येतं, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झालेली असते.

उपासमारीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा होतो.

"मुलं एकदमच खूप कुपोषित होत नाहीत. त्यांना पूर्वी कांजिण्या, न्यूमोनिया, अतिसार यांसारखे आजार झालेले असतात," असं युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोमधील मानद वरिष्ठ संशोधक प्रा. शार्लट राईट सांगतात.

"जी मुलं पूर्वी निरोगी होती पण आता उपासमारीला सामोरी जात आहेत, त्यांच्यात अन्न खाण्याची आणि पचवण्याची ताकद अजूनही असते. जर अन्न मिळालं तर. परंतु, काही मुलं मात्र हळूहळू खूप अशक्त होत जातात," असं त्या म्हणाल्या.

कुपोषणाचा बालकांवर आणि लहान मुलांवर काय परिणाम होतो?

बालपणात अन्नाची कमतरता असेल, तर त्याचा आयुष्यभर परिणाम होतो. मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो आणि त्यांची वाढ खुंटू शकते.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ), 'स्टंटिंग' म्हणजे मुलांची वाढ नीट न होणं. यामागे कारणं असतात म्हणजे पुरेसं पोषण न मिळणं, वारंवार आजारी पडणं आणि मानसिक-भावनिक काळजीचा अभाव. अशा मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानानं कमी असते.

युनायटेड नेशन्स फाउंडेशननुसार, जे लोक स्वतः कुपोषणाचा सामना करतात, त्यांच्या मुलांनाही कुपोषण होण्याची शक्यता जास्त असते.

युनिसेफच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेदरम्यान आहार योग्य नसेल तर आईला अ‍ॅनिमिया (रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणं), प्री-एक्लॅम्पसिया (ब्लड प्रेशरशी संबंधित त्रास), जास्त रक्तस्राव होणं आणि जीव धोक्यात येणं यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.

तसंच बाळासाठीही मृत जन्म, कमी वजनानं जन्म घेणं, अशक्तपणा आणि वाढीमध्ये किंवा मुलांचा विकास होण्यामध्ये अडथळे येण्याचा धोका असतो.

कुपोषित मातांना त्यांच्या बाळाला पुरेसं आणि पोषणमूल्य असलेलं दूध तयार करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो.

मेडिसिन सॅन्स फ्रंटियर्सचे डॉ. नुरादीन अलीबाबा, जे कुपोषित मुलांवर उपचार करतात, ते म्हणाले की कुपोषणाचा परिणाम आयुष्यभर राहू शकतो.

डॉ. अलीबाबा सांगतात की, "कुपोषणामुळे मुलांची वाढ खुंटते, आणि ही वाढ पुन्हा कधीच भरून निघत नाही. म्हणजे ही मुलं कायमची ठेंगणी म्हणजेच कमी उंचीची राहतात, ज्यामुळे त्यांना पुढे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासोबतच त्यांचं शिकण्याचं कौशल्यही कायमचं कमी होऊ शकतं, आणि हे बहुदा शाळा सुरू झाल्यावरच समजतं."

"कुपोषणामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे अशा मुलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो."

"एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेकांना हे पूर्णपणे समजत नाही की मुलींच्या बाबतीत कुपोषणाचं एक पातळी अशी असते की त्यामुळं त्यांना वंध्यत्व येऊ शकतं. आणि जरी त्या गर्भवती राहिल्या, तरी त्यांचं बाळ बहुतांश वेळा कमी वजनाचं जन्मतं."

कुपोषणामुळे हाडं कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजारही होऊ शकतो. या आजारात हाडं सहज तुटण्याची शक्यता वाढते.

डॉ. अलीबाबा सांगतात, "वय वाढल्यानंतर हाडं ठिसूळ होतात आणि त्यांना शरीराचं वजन सुद्धा नीट झेपत नाही. त्यामुळे एखादा छोटासा धक्का किंवा पडणं सुद्धा हाडं तुटण्याचं कारण बनू शकतं."

कुपोषणावर कसे उपचार केले जातात?

"या संकटावर उपाय करण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत, एक म्हणजे गाझामध्ये जास्तीचं अन्न पोहोचणं, आणि दुसरं म्हणजे महागडी पण जीवनावश्यक औषधांसारखी खास खाद्यपदार्थंही पुरवणं," असं प्रा. राईट यांनी आवर्जून सांगितलं.

"अन्न तातडीनं लहान मुलं आणि त्यांच्या मातांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे."

"आई बाळाला दूध पाजू शकते, पण त्यासाठी तिलाही नीट अन्न मिळणं गरजेचं असतं. आणि खरी अडचण हीच आहे की, ते अन्न थेट आईंपर्यंत पोहोचायला हवं, ते मधेच कुणाकडेही थांबू नये."

"महत्त्वाचं म्हणजे, मुलं आणि त्यांच्या आईंना आधी मदत मिळाली पाहिजे आणि त्यांना फारसं काही लागणारही नाही."

'बीबीसी अरेबिक'च्या हेल्थ रिर्पोटर आणि डॉक्टर म्हणूनही प्रशिक्षित असलेल्या स्मिथा मुंडसाद म्हणतात की, कुपोषणामुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होतात, विशेषतः मुलांवर. आणि त्यावर उपचार करणं नेहमी सोपं नसतं.

त्या म्हणतात, "अतिशय गंभीर स्थितीत, जेव्हा एखादी व्यक्ती खाणं-पिणंही थांबवते, तेव्हा तिला रुग्णालयात खास औषधांसोबत तयार केलेलं अन्न द्यावं लागतं. त्याचबरोबर संसर्ग आणि इतर त्रासांवरही उपचार करावे लागतात."

"कधी कधी एखाद्याला खूप लवकर किंवा चुकीचं अन्न दिलं, तर ते धोकादायक ठरू शकतं."

"फक्त अन्न मिळणं पुरेसं नाही, तर योग्य अन्न मिळणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी एक व्यवस्थित आरोग्य व्यवस्था असणंही खूप आवश्यक आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)