'गाझामधील लोक म्हणजे चालणारे मृतदेह', युद्ध आणि उपासमारीमुळे मृत्यूच्या आकड्यात वाढ

"गाझामधील लोक मृत किंवा जिवंत नाहीत, ते चालणारे मृतदेह आहेत", 24 जुलैला जारी केलेल्या एका निवेदनात युनायटेड नेशन्स रिलिफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रेफ्युजीस (यूएनआरडब्ल्यूए) या संस्थेचे कमिशनर-जनरल फिलिपी लाझ्झारिनी यांनी म्हटलं आहे.

हमासकडून संचालित आरोग्य मंत्रालयानं सांगितल्यानुसार, गाझामध्ये आतापर्यंत भूकेनं मृत्यू पावलेल्यांची संख्या 113 झाली आहे. हा आकडा वाढत चालला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणाले होते की, "गाझामधील 21 लाख लोक मूलभूत गरजांच्या तुटवड्याच्या गंभीर संकटाला तोंड देत आहेत. तिथे कुपोषण वाढत चाललं आहे. गाझामधील प्रत्येक घरावर उपासमारीचं संकट घोंघावतं आहे."

लाझ्झारिनी यांनी म्हटलं आहे की, "100 हून अधिक लोक उपासमारीनं मृत्युमुखी पडले आहेत, ज्यात लहान मुलांची संख्या जास्त आहेत."

100 हून अधिक आंतरराष्ट्रीय मदत संघटना आणि मानवाधिकार गटांनीही मोठ्या प्रमाणात उपासमारीचा इशारा दिला आहे.

आपल्या टीमला दिसणारी बहुतेक मुलं दुर्बल, कमकुवत आहेत आणि त्यांना तातडीनं आवश्यक उपचार मिळाले नाहीत तर त्यांचा मृत्यू होण्याचा धोका वाढू शकतो, असं लाझ्झारिनी यांनी म्हटलं आहे.

23 जुलैला जागतिक आरोग्य संघटनं (WHO) म्हटलं आहे की गाझाच्या लोकसंख्येचा मोठा भाग "उपासमारीनं मरत आहे".

"मला माहित नाही की तुम्ही याला सामूहिक उपासमार सोडून दुसरं काय म्हणाल आणि ती मानवनिर्मित आहे," असे संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले.

यूएनआरडब्ल्यूएचे फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी "दिवसभरात जेमतेम एक छोटासा आहार घेऊन तग धरून आहेत. बहुतांश वेळा त्यांना फक्त डाळच खायला मिळते आहे," असं फिलिपी लाझ्झारिनी म्हणतात.

कामावर असताना उपासमारीनं कर्मचारी बेशुद्ध पडल्याच्या वृत्तांवर प्रकाश टाकत ते ही माहिती देतात.

तहानी शेहादा या मानवीय मदत करणाऱ्या संस्थेच्या कर्मचारी बीबीसीला सांगतात की, "गाझामधील लोक दररोज जिवंत राहण्याचा संघर्ष करत नाहीयेत, तर ते दर तासाला जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत आहेत."

गाझामधील रहिवासी बीबीसीला सांगतात की, त्यांना भीती वाटते की जर मदत वितरित होत असलेल्या ठिकाणी पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तर त्यांना गोळ्या घातल्या जातील.

गाझामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या उपासमारीमुळे 'भयावह परिस्थिती' निर्माण झाली असल्याचं, संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे.

दोन महिन्यांच्या युद्धबंदीनंतर मार्चच्या सुरुवातीला इस्रायलने गाझाला मदत पोहोचवणे थांबवलं.

जवळजवळ दोन महिन्यांनंतर नाकेबंदी अंशतः शिथिल करण्यात आली, परंतु अन्न, इंधन आणि औषधांचा तुटवडा वाढत गेला.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांत अन्न मदत मिळवण्याच्या प्रयत्नात इस्रायली सैन्याने 1000 हून अधिक पॅलेस्टिनींना ठार मारलं आहे.

महमूद अब्दुल रहमान अहमद बीबीसीला सांगत होते की, 20 जुलैला सकाळी त्यांचा मुलगा पाणी वितरण केंद्रांकडे नेहमीप्रमाणे पाणी आणायला गेला होता.

पाण्याचं रिकामं कॅन घेऊन तो इतरांसोबत रांगेत उभा असताना अचानक तिथल्या लोकांवर आणि पाणी वितरण केंद्रावर बॉम्बहल्ला झाला. ज्यात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.