बांगलादेशातल्या पुरासाठी भारताच्या डंबूर धरणाला का दोषी ठरवलं जातंय? वाचा

    • Author, अमिताभ भट्टासाली
    • Role, बीबीसी न्यूज बांगला, कोलकाता

भारतातील त्रिपुरा राज्य गेल्या तीन दशकांतील सर्वात मोठ्या महापुराच्या संकटात सापडलं आहे. त्रिपुरा सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

त्रिपुरा सरकारच्या एका मंत्र्यांनी बीबीसी बांग्लासोबत बोलताना सांगितलं की, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या 151 टक्के पाऊस झालेला आहे.

राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार या महापुरामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत.

राज्य सरकारने गुरुवारी सायंकाळी सांगितल्यानुसार विविध भागात तब्बल 17 लाख लोक महापुरामुळे प्रभावित झाले आहेत. राज्यात गेल्या 4 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.

त्रिपुराचे उर्जामंत्री रतनलाल नाथ यांनी बीबीसी बांगलासोबत बोलताना सांगितले, "एकट्या गोमती जिल्ह्यातच या महिन्यात 665.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. हे प्रमाण नेहमीच्या (195.5 मिमी) पावसाच्या 234 पट आहे. गोमती जलविद्युतकेंद्रांतर्गत येणारा डंबूर बंधारा याच जिल्ह्यात आहेत."

राजधानी आगरतळासह राज्याचा बहुतांश प्रदेश पाण्याखाली गेलेला आहे. याचबरोबर हावडा, खोवाईस, मुहुरी आणि ढालाई या प्रमुख नद्यांसह राज्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

भारतीय हवामान विभागाने राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे

डंबूर धरणावर नेमकं काय घडलं?

त्रिपुरा सरकारकडून याप्रकरणी प्रतिक्रिया आलेली आहे. एक दिवसापूर्वीच भारत सरकारनेदेखील बांग्लादेशातील महापूराचा संबंध त्रिपुरातील बंधाऱ्याशी जोडण्याबाबतच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली होती.

काही बांगलादेशी संघटनांनी त्यांच्या देशात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला भारताला जबाबदार धरलं आहे.

त्यांच्या मते त्रिपुरातील डंबूर जलविद्युत प्रकल्पातून पाणी सोडल्याने बांगलादेशात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

यावर भारतीय परराष्ट्र खात्याने आपली बाजू मांडली आहे, "बांगलादेशातील पूरपरिस्थिती ही गोमती नदीवरील डंबूर बंधाऱ्यातून सोडलेल्या पाण्यामळे निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे, मात्र हे सत्य नाही."

परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, भारत आणि बांग्लादेशातून वाहणाऱ्या गोमती नदीच्या खोऱ्यात यंदा अति पाऊस झाल्याने ही पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, त्रिपुरातील डंबूर बंधारा हा बांगलादेशाच्या सीमेपासून 120 किलोमीटर दूर आहे. हा एक कमी उंचीचा प्रकल्प असून यातून निर्माण होणारी 40 मेगावॅट वीज बांगलादेशालादेखील पुरवली जाते.

या महापुरामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधीक नुकसान झाले, त्यात गोमती जिल्ह्याचाही समावेश आहे. तर बांगलादेशातील माध्यमांनी दावा केला आहे की, याच जिल्ह्यात गोमती जलविद्युत प्रकल्पाच्या डंबूर बंधाऱ्याचे स्लुईस गेट उघडल्याने बांगलादेशातील अनेक भागात पाणी शिरले.

हा जलविद्युत प्रकल्प उर्जा विभागांतर्गत येतो.

उर्जामंत्री रतनलाल नाथ यांनी बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितले, "डंबूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याच्या मुद्द्यावरून जे काही पसरवलं जात आहे ते खोटं आहे. अशा बातम्यांना कोणताही आधार नाही. गोमती जलविद्युत केंद्रांतर्ग बनलेल्या डंबूर बंधाऱ्याचा कोणताही दरवाजा अजून उघडण्यात आलेला नाही."

ते म्हणाले, या बंधाऱ्यावरील जलाशयाची पाणी साठवण क्षमता 94 मीटर एवढी आहे. पाणीपातळी यापेक्षा जास्त वाढल्यास अतिरिक्त पाणी आपोआप स्वयंचलित दरवाज्यांद्वारे नदीत सोडले जाते. पाणीपातळी घटल्यावर दरवाजे पुन्हा आपोआप बंद होतात.

सध्या पाणीपातळीत वाढ झाल्याने दोन स्वयंचलीत दरवाज्यांमधून पाणी नदीत सोडले जात आहे. यातील एका दरवाजातून निम्म्या क्षमतेने पाणी वाहत आहे. नदीकाठावरील गावांना आधीच लाऊड स्पीकरच्या आधारे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यांच्या मते, त्रिपुरामध्ये गेल्या तीन दशकात अशी भयावह पूरपरिस्थिती निर्माण झाली नव्हती.

मंत्री रतनलाल सांगतात, "21 ऑगस्ट 1993 रोजी राज्यातील सबरूम जिल्ह्यात एकाच दिवसात सर्वाधीक 247 मीमी एवढ्या विक्रमी पावसाची विक्रम नोंद करण्यात आली आहे. यंदा 20 ऑगस्ट रोजी 375.8 मिमी इतका पाऊस झाला आहे. तब्बल 31 वर्षांनंतर 24 तासांत एवढ्या पावसाची नोंद झाली आहे."

मंत्र्यांच्या मते, "ऑगस्टच्या पहिल्या 21 दिवसांत सामान्यत: 214 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र गेल्या महिनाभराचा विचार करता, यावर्षी 538.7 मिमी एवढा पाऊस झाला. हे प्रमाण नेहमीपेक्षा 151 टक्के अधीक आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, "एवढा पाऊस पडल्यावर तीन दशकातील सर्वात मोठा महापूर येणं सहाजिकच आहे."

या बातम्याही वाचा -

हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी गुरूवारी राजधानी आगरतळा येथे पत्रकारांशी संवाद साधत राज्य प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले.

राज्याच्या मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागात 450 मदतकेंद्र उभारली असून त्यात 65 हजारपेक्षा अधिक लोकांनी आसरा घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहेत. केंद्रीय आपत्ती निवारण विभागाच्या टीमही राज्यात दाखल झाल्या आहेत.

त्याचबरोबर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमू, आसाम रायफल्स आणि त्रिपुरा स्टेट रायफल्स दलाचे जवानही बचावकार्यात उतरले आहेत.

भारतीय हवामान विभागाने शुक्रवारीही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या घटनांचाही इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बांगवादेशच्या उत्तर भागात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्रिपुरा आणि मिझोरामच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये अचानक पूरपरिस्थिती उद्भवू शकते.

तीस्ता आणि फरक्का समस्या

बांगलादेशच्या वर्तमानपत्रांमधील बातम्यांमध्ये सांगण्यात आले की, पश्चिम बंगालच्या शेजारील पर्वतीय राज्य सिक्किममधून वाहणाऱ्या तीस्ता नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

मात्र, पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील नद्यांचे अभ्यासक आणि या भागातील पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते राजू बसू यांच्या मते, "सिक्किमध्ये दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या हे खरं आहे, मात्र सध्या तीस्ता नदीच्या खोऱ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.

बीबीसी बांगलाशी बोलताना बसू सांगतात, "सध्या कधी ऊन तर कधी पाऊस अशी परिस्थीती आहे. यामुळे भूस्खलनाचा धोका नक्कीच वाढतो. मात्र, नदीच्या पाणलोट क्षेत्रात आणि गजलडोबा भागात सध्या तरी धोक्याचे कोणतेही संकेत जाणवत नाहीत."

पश्चिम बंगाल सरकारच्या सिंचन विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीस्ता नदीवर बनलेल्या गजलडोबा आणि कालझोडा या दोन्ही बंधाऱ्यांची पातळी इतकी वाढणं ही सामान्य बाब आहे.

राजू बसू यांच्या मते, "तीस्ता नदीची ही फार जुनी समस्या आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये ग्लेशिअर लेक आऊटबर्स्ट पुरामुळे मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि घरांचा गाळ तीस्ता नदीत साचलेला आहे आहे. त्यामुळे नदीची खोली कमी झाली आहे. त्यामुळे थोड्या पावसानेच नदीचे पाणी पात्राबाहेर येते. मात्र सध्यतरी तशी परिस्थिती नाही.

ते म्हणतात, या समस्येवर एका दिवसात उपाय काढता येऊ शकत नाही. त्यासाठी एक दिर्घकालीन योजना आखावी लागेल. मात्र, केंद्र आणि सिक्किम व पश्चिम बंगाल या दोन्ही राज्य सरकारांकडून तूर्तास तरी तशा काही हालचाली दिसत नाही.

दुसरीकडे फरक्का बंधाऱ्याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी नदीच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाली होती. त्यामुळे बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले होते. याबाबत फरक्का प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)