You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना रानौतला भाजपकडून उमेदवारी, हिमाचलमधील मंडीमधून लढणार निवडणूक
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे.
या यादीतलं सर्वांत ठळक नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रानौत. कंगनाला भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी मधून उमेदवारी दिली आहे.
हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ मधील मतदारसंघातून उमेदवारांची नावं भाजपने जाहीर केली आहेत.
महाराष्ट्रात सोलापूरमधून भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी लढत होईल.
भंडारा गोंदियामधून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.
गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेतेंना उमेदवारी मिळाली आहे.
उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना भाजपने तिकीट दिलं आहे, पण पिलभीतमधून वरूण गांधींना उमेदवारी दिली गेली नाहीये.
भाजपच्या पाचव्या यादीतली काही महत्त्वाची नावं
- केरळमधील वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात के सुरेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमध्ये श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशच्या मेरठमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांना बेळगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
- भाजप नेते संबिद पात्रा यांना ओडिशाच्या पुरीमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.
- केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद हे पटना साहिबमधून निवडणूक लढतील.
- नवीन जिंदाल हे हरियाणाच्या कुरुक्षेत्रमधून भाजपचे उमेदवार असतील.
- केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान हे ओडिशातील संबळपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.
कंगना रानौतची उमेदवारी
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर केलेली टीका, त्यानंतर शिवसेनेविरूद्ध घेतलेली भूमिका, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरील टीका यांमुळे कंगना चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली होती.
तेव्हापासूनच तिच्या राजकारण प्रवेशाचीही चर्चा होत होती.
आता तिला तिच्या मूळ राज्यातून म्हणजेच हिमाचलमधून भाजपने तिकीट दिल्यानंतर कंगना खऱ्या अर्थाने राजकारणात सक्रीय झाली आहे.
नकुशी ते पुरस्कारप्राप्त अभिनेत्री
हिमाचल मंडी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात 23 मार्च 1987 ला अमरदीप रनौत आणि आशा रनौत यांच्या पोटी तिचा जन्म झाला.
तिचे पणजोबा आमदार होते, आजोबा आयएएस अधिकारी होते. वडील व्यापारी तर आई शिक्षिका होती.
कंगनाच्या जन्मावेळी त्यांच्या घरात आनंद व्यक्त करण्यात आला नाही, असं ती सांगते.
कंगनाच्या कुटुंबीयांना मुलगा होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे तिला घरातच भेदभावाची वागणूक मिळाली. तिच्या घरात कुणी पाहुणा आल्यानंतर ती कशा प्रकारे नकुशी आहे, हे सांगितलं जात होतं.
या सर्वांचा परिणाम कंगना लहानपणापासूनच हट्टी आणि बंडखोर स्वभावाची होती, असं तिने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. याच बंडखोर स्वभावातून तिने 16 व्या वर्षीच घर सोडलं. ती घराबाहेर पडल्यानंतर काही दिवस घरच्यांनी तिच्याशी बोलणं सोडलं होतं. पण नंतर त्यांच्यात समेट घडली. सध्या तिची मोठी बहीण रंगोली हीच कंगनाची मॅनेजर म्हणून काम पाहते.
छोट्या गावातून आलेल्या कंगनाने पुढे अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या वर्षी आलेल्या मणिकर्णिका चित्रपटाच्या निमित्ताने तिने दिग्दर्शनातही हात आजमावून पाहिला आहे.
अभिनयासाठी कंगनाला आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तर आजपर्यंतच्या वाटचालीसाठी तिला 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं आहे.