‘गेल्या वर्षी 10 एकर तूर केली, 65 क्विंटल उत्पन्न झालं; यंदा बियाणं आणलं पण पेरलंच नाही’

हवामानातल्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचं पैशाचं गणित आता बिघडलेलं दिसतंय. रावळगुंडवाडी गावच्या बसगौंडा यांनी यंदा आपल्या 10 एकरात तूर पेरलीच नाही.

त्यांच्यासारखे सांगली जिल्ह्यात असे अनेक शेतकरी आहेत. सांगलीत सरासरी 11 हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पीक घेतलं जातं. पण या हंगामात सांगलीमध्ये केवळ 7 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यामुळे जवळपास 40 % तुरीचे क्षेत्र घटलं आहे.

गेल्या वर्षी बसगौंडा यांना 10 एकरामध्ये 65 क्विंटल तुरीचं उत्पादन घेता आलं. पण यंदाच्या हंगामात पावसाचा तऱ्हेवाईकपणा पाहून त्यांनी विकत घेतलेलं बियाणं मातीत रुजवलंच नाही.

त्याऐवजी त्यांची सगळी भिस्त ज्वारी आणि हरभऱ्यावर राहिली. गेली 15 वर्षं ते तुरीचं उत्पादन घेत होते.

बसगौंडा व्हनखंडे सांगतात, “मी गेल्या वर्षी 10 एकर तूर केली होती. गेल्या वर्षी पावसाने मला भरपूर साथ दिली. निसर्गाने करेक्ट पाऊस झाला. जसं तुरीला पाणी लागायचं तेव्हा थोडाफार पाऊस व्हायचा. त्यामुळे गेल्या वर्षी दहा एकरामध्ये माझं 65 क्विंटल उत्पन्न आलं.

“यावर्षी पण तूर पेरावं म्हणून बियाणं लातूर वरुन आणून निर्मल दुर्गा ही व्हरायटी मागवली. पण पावसाअभावी ओलच झाली नाही. त्यामुळे यावेळी तूरच पेरली नाही.”

भाववाढ पण शेतकऱ्यांना फायदा नाही

पण, ही केवळ बसगौंडा यांचीच गोष्ट नाहीयेत.

राजकुमार खोत यांनी मागच्या 10 वर्षांपासून घेत असलेल्या तुरीवरच अवलंबून राहायचं ठरवलं. यंदा त्यांचं उत्पादन 50 टक्क्यांनी घटलंय.

राजकुमार खोत सांगतात, “यावर्षी आधुनिक करायला गेलो. ड्रीपवरती. आणि सहा फूट सरी सोडून हाताने टोचलं. पाऊस पडला नाही. एकवेळ फक्त ड्रीपनं पाणी दिलं. त्यावर उगवलं ते. त्यानंतर एक पाऊस झाला. त्यानंतर वाढ होऊन त्याच्या वाफसावर एवढ्यापर्यंत शेंगा झाल्या.

“त्याच्यामुळे पाऊस झाला असेल तर झाडाची उंची वाढली असती. झाडंपण कमी झाली. अंतरपण जास्त असल्यामुळे खेळती हवा झाली. हे भेगा पडलंय सगळं. हवा आत घुसली.”

तुरीचं क्षेत्र घटल्यामुळे चढ्या भावाने तूर विकली जात आहे. असं असलं तरी शेतकऱ्यांना तीही परवडण्यासारखी नाही, असंच दिसतंय.

राजकुमार खोत सांगतात, “या वर्षी जास्त भाव आहे. 9-10 हजार क्विंटलला भाव आहे. पण उत्पन्न नाही, काय करायचं? 2-3 क्विंटल, 4 क्विंटलमध्ये हे भागत नाही. 4 एकरात 10 क्विंटल येतील, हे काहीच नाही. त्याचा औषध खर्च, पेरणी खर्च, खुरपणी खर्च त्यात भागत नाही पुढे जमीन करायची म्हटलं की दुसरीकडे काढूनच करावं लागतंय. आता बँकेने कर्ज दिलंय ते भरायला पैसे नाहीत. ते कर्जबाजारी होऊन बसायची वेळ येतेय.”

“आधी 25 एक क्विंटल निघत होतं. त्यात सगळं आपलं बँक भरायचं म्हणा, जमीन तयार करायचा खर्च, सगळं भागून आपल्याला पैसे राहात होतं. यावेळी काहीच नाही,” असंही राजकुमार सांगतात.

दर 10 हजारांच्या पलीकडे

यंदा देशासह महाराष्ट्रात तुरीचं उत्पादन घटलंय. नाफेड कडून सध्या 7 हजार रुपये तुरीला हमी भाव मिळतोय. बाजारपेठांमध्ये तुरीची आवक कमी झाल्याने दर 10 हजारांच्या पलीकडे गेले आहेत.

सोलापूर बाजार समितीतील व्यापारी संचालक बसवराज इटकळे सांगतात, “तामिळनाडू, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, गुजरात अशा ठिकठिकाणी माल जातोय. सगळ्या राज्यांना तूरडाळ आणि तूर हवी असते. त्याच्यामुळे मागणी जास्त आहे. उत्पादन कमी असल्यामुळे आवक कमी आहे."

ते पुढे सांगतात, “बाहेरून माल आपण आयात करतो. देशामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यासाठी मुभा देतो. तरीपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तिकडे बसलेले जे काही भारतीय लोकच तिथंच व्यापारी आहेत. भारताला किती तूर लागणार आहे, हे ओळखून त्याहिशेबानं तिकडं तुरीचं दर वाढवण्यात आलेले आहेत. त्यामुळे परदेशातून येणारी तूरडाळ कमी दरात येत आहे आणि असलेला माल आपल्याला पुरत नाही.”

एकूण जागतिक तूर उत्पादनात भारताचा वाटा 70 टक्क्यांपर्यंत आहे. भारत किंवा भारतीय उपखंड वगळता अन्य देशांत तुरीचा अन्न म्हणून फारसा उपयोग होत नाही.

भाव वाढण्याचे कारण काय?

भारतात दरवर्षी 42 ते 44 लाख टन तूरडाळीची मागणी असते. केंद्रीय सांख्यिकी संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात देशात 42.20 लाख टन इतकं तुरीचं उत्पादन झालं.

तर 2022-23 चं लक्ष्य 45.50 असताना प्रत्यक्षात फक्त 33.12 लक्ष टन इतकंच उत्पादन झालं.

कृषी तज्ज्ञांच्या मते, या वर्षी 43 लाख टन उत्पादनाचं लक्ष्य असताना हवामानातील चढ-उतारामुळे तब्बल 25 टक्क्यांची तूट येण्याची शक्यता आहे.

यंदा देशात सरासरी 30 लाख टन तूरीचे उत्पादन होण्याचा अंदाज असल्यामुळे मागील सहा वर्षांतील हे नीचांकी उत्पादन ठरण्याची शक्यता आहे.

तुरीच्या उत्पादनातील तूट मोठी असल्यानं मोठ्या प्रमाणात तुरीची किंवा तूरडाळीची आयात करणं अडचणीचं ठरणार आहे. याचा अर्थ तुरीची मागणी जास्त आणि उत्पादन कमी राहणार आहे. त्यामुळे वर्षभर तूरडाळीचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.

परिणामी किरकोळ बाजारात तुरीचे भाव दोनशे रुपये किलोपर्यंत जाऊ शकतात.