‘75 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून मी मातीसाठी काम करायचं ठरवलं आणि गावी आले’

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, जुन्नर

“माझं बीएससी नर्सिंग पूर्ण झालं. त्यानंतर टाटा रुग्णालयात 2 वर्षं, मग सायन हॉस्पिटलमध्ये 3 वर्षं अशी परमानंट पोस्ट होती. तिथं 70-75 हजार सॅलरी होती. पण समाधान नव्हतं. ते समाधान शोधत-शोधत मी गावी आले.”

काव्या दातखिळे सांगत होती. काव्या ही पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या दातखिळेवाडी गावात राहते. दीड वर्षांपूर्वी ती नोकरी सोडून गावाकडे परत आली आणि तिनं मातीसाठी काम करण्यास सुरुवात केली.

वडिलोपार्जित जमिनीवर रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. पण, ते करताना मातीखाली असलेल्या सूक्ष्मजीवांबाबत फारसा विचार केला जात नाही हे काव्याच्या लक्षात आलं.

तिच्या मते, फक्त कुणाचं तरी पोट भरायचं म्हणून उत्पन्न काढायचं आणि आपल्या खिशात पैसे आले पाहिजेत, हेच एक धोरण ठेवून आपण काम करतोय. आणि हेच चित्र बदलावं असं तिला वाटत होतं.

त्यानंतर, काव्यानं जीवाणू आणि बुरशींना एकत्रित घेऊन काम करायचं ठरवलं.

यासाठी काव्यानं गावाकडे गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभारला. त्यासाठीचं शेड उभारलं.

अडीच टन माल तयार, पण...

पण गांडूळ खत तयार केलं आणि विकलं, इतकं सोपं हे समीकरण नव्हतं. याची जाणीव तिला सुरुवातीच्या काही महिन्यांतच झाली.

काव्या सांगते, “पहिले अडीच महिने इतके वाईट गेले की, आपला अडीच टन माल तयार होता पण तो विकला जात नव्हता. मग वाटलं आपण परत एक पाऊल पाठी घेऊन जॉब सुरू करायला पाहिजे. पण तेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे यूट्यूब चॅनेल आहे. तिथं आपण ज्या प्रामाणिकतेने काम करायला सुरुवात केली त्याच प्रामाणिकतेने लोकांना सांगू. मग मी 15 मिनिटांचा व्हीडिओ अपलोड केला. तिथूनच मला 5 टनाची ऑर्डर तीही एकाच शेतकऱ्याकडून आली, तितका मालही तेव्हा तयार नव्हता.”

यानंतर काव्याचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आणि तिनं गांडूळ खताबरोबरच वर्मिवॉश, गांडूळ बीज याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. दोन महिन्यांत तिची गांडूळ खताची एक बॅच विक्रीसाठी तयार होते.

प्रत्येक बॅचला साधारणपणे 15 टन माल तयार होतो, त्यातून दीड लाख प्रॉफिट मिळतं. वर्मिवॉशमध्ये 100 % प्रॉफिट मिळतं, कारण गांडूळ खतातून जो द्रवरुप निचरा बाहेर पडतो तो द्रवरुप खत म्हणून विकला जातो, असं ती सांगते.

सोशल मीडियाची मदत

यूट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काव्या सक्रिय आहे. इथूनच तिला मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात. इथं ती तिला येणाऱ्या अडचणींविषयीही माहिती टाकत असते.

“मी ठरवलं की आपल्याला शेतीविषयकच माहिती अपलोड करायची आहे. मग सुरुवातीला मी शेतकऱ्यांच्या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत, म्हणजे भेटीगाठी घेत असताना शेतकऱ्यांनी त्यात नवीन काय केलंय, विषमुक्त शेती कशी केलीय, ते जाणून घेऊन अपलोड करायला सुरुवात केली.”

काव्याचे पती राजेश हे मेकॅनिकल इंजीनियर आहेत. पत्नीच्या कामात तिची साथ देण्यासाठी त्यांनीही 6 महिन्यांपूर्वी नोकरी सोडली.

काव्या सांगते, “मी मातीसाठी काम करायला सुरुवात केलेली. माझ्या वातावरणात कधीकधी ते पण इन्हॉल्व होत होते. त्यांनी पाहिलं की इथं फार समाधान आहे. समाधान आहे, पैसा आहे आणि प्रतिष्ठा आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: निर्णय घेतला. मला कामाचा खूप लोड येत होता. शेती, प्रोजेक्ट, कार्यशाळा सांभाळणं. आता त्यांचा हातभार लागल्यामुळे मला पूर्णपणे शेती आणि कार्यशाळा सांभाळता येतात.”

'प्रशिक्षण घेऊन शेती करणं गरजेचं'

सध्या गांडूळ खताला मागणी जास्त, पण उत्पादन कमी आहे, अशी अवस्था असल्याचं गांडूळ खत उत्पादक सांगतात. पण, गांडूळ खत निर्मिती करताना काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं असतं. शेडमधील तापमान आणि पाणी व्यवस्थापन करणं या बाबींची काळजी घ्यावी लागते.

काव्या सांगते की, “गांडूळांना किंवा कोणत्याही जीवाणूंना पाण्याची जास्त गरज नसते. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जीवाणूंना गारव्याची गरज असते. त्यामुळे उन्हात हा प्रोजेक्ट केला तर तो फेल होण्याची शक्यता जास्त असते.”

काव्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यात आंबा आणि भाताचं उत्पादन ती घेते. शेतीत साक्षर होऊन पाऊल टाकलं, तर शेतीतून पैसा, प्रतिष्ठा आणि समाधान हमाखास मिळतं, असं ती सांगते.

“सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे आपल्याला शेतीचं प्रशिक्षण हवं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नियोजन करता आलं पाहिजे, मग ते शेणाचं असो की पाण्याचं असो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी करता येईल यावर फार लक्ष देणं गरजेचं आहे.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)